घरफिचर्ससारांशमान्सूनची लहर...शेतकर्‍यांचा कहर!

मान्सूनची लहर…शेतकर्‍यांचा कहर!

Subscribe

भारतीय शेती ही मान्सूनवर अवलंबून आहे. बरेचदा मान्सून हा वेळेवर आणि पुरेसा येईलच असे सांगता येत नाही. भारतामध्ये सर्वसाधारणपणे जून ते सप्टेंबर हा कालावधी पावसाळा असतो. या कालावधीत पाऊस पडणे अपेक्षित असते. शेतकर्‍यांना अक्षरशः मान्सूनची चातकासारखी वाट पाहावी लागते. अशा परिस्थितीत मान्सूनने शेतीकडे जर पाठ फिरवली तर सिंचनाची सोय असणारे थोडेफार शेतकरी वगळता इतर शेतकर्‍यांची पाण्याअभावी दयनीय अवस्था होते. मान्सूनच्या लहरीपणामुळे शेतकर्‍यांचा कहर होतो.

– प्रा. डॉ. कृष्णा शहाणे

शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा समजला जातो. आजही भारतातील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे ६० टक्के लोकसंख्या ही प्रत्यक्ष-प्रत्यक्ष रीतीने चरितार्थासाठी शेतीवर अवलंबून आहे, म्हणजेच त्यांचा उदरनिर्वाह हा शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. भारतीय शेतीसमोरील महत्त्वाची समस्या म्हणजे पावसाचा अनियमितपणा होय. मान्सून हा आपल्या हुलकावण्या देण्याच्या प्रवृत्तीबद्दल प्रसिद्ध आहे.

- Advertisement -

भारतीय शेती ही मान्सूनवर अवलंबून आहे. बरेचदा मान्सून हा वेळेवर आणि पुरेसा येईलच असे सांगता येत नाही. भारतामध्ये सर्वसाधारणपणे जून ते सप्टेंबर हा कालावधी पावसाळा असतो. या कालावधीत पाऊस पडणे अपेक्षित असते. शेतकर्‍यांना अक्षरशः मान्सूनची चातकासारखी वाट पाहावी लागते. अशा परिस्थितीत मान्सूनने शेतीकडे जर पाठ फिरवली तर सिंचनाची सोय असणारे थोडेफार शेतकरी वगळता इतर शेतकर्‍यांची पाण्याअभावी दयनीय अवस्था होते. शेतकर्‍यांच्या विविध पिकांच्या पेरण्या लांबतात.

पिकांच्या ज्या टप्प्यात पाण्याची आवश्यकता असते त्या टप्प्यात पाणी मिळाले नाही तर पिके जळून जातात. अनेकदा शेतकर्‍यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहते. म्हणजेच पहिल्या पेरणीच्या वेळी खर्च झालेला वेळ, पैसा, शेतकर्‍यांचे कष्ट या सर्व गोष्टी वाया जातात. त्यातून सर्वसामान्य अशा शेतकर्‍यांची मानसिकता बदलते ती वेगळीच. त्यातून शेतकर्‍यांचे मनोधैर्य कमी होते. यातूनच कोरडा दुष्काळ पडतो. त्यातून शेतकरी विस्थापित होतात. यातून अनेक अडचणी शेती क्षेत्रासमोर उभ्या राहतात.

- Advertisement -

बरोबर या विरुद्ध परिस्थिती म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाला तर हाताशी येणारी किंवा येऊ पाहणारी पिके वाया जातात. जास्त पावसामुळे पिके जळतात आणि त्या पिकाच्या तसेच त्या कालावधीत केलेल्या जमिनीच्या मशागतीवरील पैसा, श्रम वाया जातात. मान्सून जर अतिरिक्त आला म्हणजेच जास्त पावसामुळे हे पाणी जमिनीत साचून राहिल्यास त्याचा त्या पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. पिकांचा रंग बदलतो. अशा वेळी जमिनीतून पाण्याचा निचरा होणे महत्त्वाचे असते. जास्त पावसामुळे पाणी शेतात साचून राहते. त्यातून अनेकदा रोगट वातावरण तयार होते. जास्त पाऊस पडणे, उघडीप, पुन्हा पाऊस, पुन्हा उघडीप अशा परिस्थितीत अनेक रोग व किडी पिकावर पडतात. त्यामुळे बरेचदा पिकांचे पूर्णपणे नुकसान होते. यातून शेती आणि शेतकर्‍यांची दयनीय परिस्थिती होते. शेतकरी हवालदिल होतो.

अशा वेळी उदरनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून असणार्‍या कुटुंबांचे फार मोठ्या प्रमाणावर हाल होतात. त्यांना स्वतःच्या कुटुंबाला वर्षभर पुरेल इतके अन्नधान्य शेतीतून मिळवणेदेखील अवघड होते. हा मान्सून किंवा पर्जन्यमान फारच क्वचित अपेक्षेप्रमाणे पडतो. अनेकदा तो शेतकर्‍याचा अपेक्षाभंग करतो किंवा शेतकर्‍याला हुलकावणी देतो. शेतकर्‍याला दुष्काळी परिस्थितीत सिंचनाच्या साधनांवर अवलंबून राहावे लागते. अतिवृष्टीच्या कालावधीत सर्वच परिस्थिती हाताबाहेर जाते. त्यामुळे भारतीय शेती हा मान्सूनबरोबर खेळलेला जुगार होय, असे भारतीय शेतीसंदर्भात खेदाने म्हटले जाते ते काही उगीचच नाही. म्हणजेच अनियमित पावसाळा किंवा मान्सूनचा लहरीपणा हे भारतीय शेती आणि शेतकर्‍यासमोरील मोठे आव्हान ठरते. यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न झाल्यास कोरड्या दुष्काळाच्या कालावधीत शेती आणि शेतकर्‍यांची होणारी हानी कमी होऊ शकेल.

यावरील उपायांचा विचार केल्यास शासनाची भूमिका अत्यंत मोलाची ठरते. कोरड्या दुष्काळाचा सामना करण्यासाठी शासनाने विविध उपाय केल्यास शेतकरी बांधवांना थोडा आधार मिळण्यास मदत होईल. यात प्रामुख्याने बहुउद्देशीय धरणांची निर्मिती करणे, जुन्या धरणांमधील गाळ काढून त्यांची जलधारण करण्याची क्षमता वाढवणे, नद्या जोड प्रकल्प अमलात आणणे, सरोवरे, तळी यांची निर्मिती करणे, पाण्याचे दुर्भीक्ष असणार्‍या परिसरात पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा करणे यांसारखी उपाययोजना करता येईल.

याउलट परिस्थितीत म्हणजेच अतिवृष्टीच्या वेळी अतिरिक्त पावसामुळे होणारे नुकसान कसे कमी होईल यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. यात प्रामुख्याने पावसाचे पूर्वानुमान अथवा अंदाज अधिकाधिक अचूक कसा येईल याकडे लक्ष देणे आणि यावर अधिकाधिक संशोधन करणे महत्त्वाचे आहे. जास्त पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यास शासन मदत जाहीर करते. ही मदत भरीव अशा स्वरूपात असावी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -