घरफिचर्ससारांशडोन्ट बी अ मिनिमम गाय

डोन्ट बी अ मिनिमम गाय

Subscribe

भारतीय सिनेमात क्वचित प्रसंगीच असं घडतं जेव्हा दमदार मुख्य स्त्री पात्र आपल्याला पाहायला मिळतं, ज्याचं लेखन इतकं उत्तम असेल आणि मुख्य नायकाला वरचढ ठरणारं हे पात्र असेल, पण फॅमिली मॅनच्या माध्यमातून हे पात्र समोर आलंय आणि त्याला तितकाच न्यायदेखील मिळाला आहे. फॅमिलीमॅनमध्ये मुख्य भूमिकेत कोण? हादेखील चर्चेचा विषय असू शकतो, काहींना श्रीकांत हिरो वाटतो तर काहींसाठी राजी कथेची मुख्य नायिका आहे.

कुठल्याही सिनेमाचं अथवा वेबसिरीजचं परीक्षण करताना कास्टिंगबद्दल तितकंस बोललं जात नाही, कलाकारांच्या अभिनयाबद्दल बोललं जातं खरं, पण त्या पात्रासाठी तोच कलाकार का यावर तितकीशी चर्चा होत नाही. ओटीटीच्या प्रवेशानंतर इंडस्ट्रीत जे काही आमूलाग्र बदल झाले त्यापैकी एक म्हणजे मुख्य भूमिकेव्यतिरिक्त इतर व्यक्तिरेखांच्या कास्टिंगला महत्व देणं आणि त्यासाठी उत्तम कलाकारांची निवड करणं. फॅमिली मॅनचा सिझन 2 नुकताच प्रदर्शित झाला आणि त्यावर विविध प्रतिक्रिया वाचनात आल्या, एक वेबसिरीज म्हणून याच अनेक जणांनी समीक्षण केलं, पण या सर्वात फॅमिली मॅनबद्दल एक बाब जी मला आवडली ती म्हणजे सिरीजमधील मुख्य पात्र राजी आणि ते साकारणार्‍या समंथाचा अभिनय, मेनस्ट्रीम हिंदी इंडस्ट्रीत सीमा विश्वासच्या बँडिट क्वीननंतर तब्बल 27 वर्षांनी इतकं प्रभावी फिमेल कॅरॅक्टर मी पाहिलंय… युटर्न, मक्खी, सुपर डिलक्ससारखे सिनेमे करणार्‍या समंथाकडून ज्या अपेक्षा होत्या त्या सर्वांना पुरून उरेल असा अभिनय समंथाने केलाय. तिच्या डार्क मेकअपबद्दल ट्रोलिंग झालं, ते चांगलं की, वाईट यापेक्षा जे पात्र तिने साकारलं त्याबद्दल बोलणं जास्त गरजेचं आहे. मनोज वाजपेयीसारखा कलाकार समोर असताना, प्रत्येक सिनमध्ये त्याला वरचढ ठरणं खरंच अवघड काम होतं आणि त्यात समंथाला यश आलंय.

भारतीय सिनेमात क्वचित प्रसंगीच असं घडतं जेव्हा दमदार मुख्य स्त्री पात्र आपल्याला पाहायला मिळतं, ज्याचं लेखन इतकं उत्तम असेल आणि मुख्य नायकाला वरचढ ठरणारं हे पात्र असेल, पण फॅमिली मॅनच्या माध्यमातून हे पात्र समोर आलंय आणि त्याला तितकाच न्यायदेखील मिळाला आहे. फॅमिलीमॅनमध्ये मुख्य भूमिकेत कोण? हादेखील चर्चेचा विषय असू शकतो, काहींना श्रीकांत हिरो वाटतो तर काहींसाठी राजी कथेची मुख्य नायिका आहे. याला कारणंदेखील तशीच आहेत, स्वतःवर झालेल्या अन्यायाविरुद्ध बंड पुकारून शस्त्र हाती घेतलेली राजी तिच्या ठिकाणी योग्य वाटते आणि आपण खरंच बदल घडवतोय का? हे राजीची कहाणी ऐकल्यावर श्रीकांतचे बोल पुन्हा तिला नायिका सिद्ध करतात.

- Advertisement -

फॅमिली मॅनची कथा काल्पनिक असली तरी तिचे वास्तविकतेशी धागेदोरे आहेत, लिट्टे प्रभाकरन, धनु , राजीव गांधी यांची नावं बदलली असली तरी इतिहास माहिती असलेल्यांना ही कथा आपलीशी वाटते. तामिळी व्यक्तींवर श्रीलंकेत झालेले अत्याचार आणि त्यातून जन्मलेल्या लिट्टेसारख्या संघटना आपण पाहिल्या आहेत. राजी ही त्याच लढाईचा बळी ठरलेली एक युवती, पंधरा वर्षाच्या मुलीवर एकाच रात्री इतक्या वेळा बलात्कार झाले की, संख्याही तिला मोजता आली नाही, घरातील व्यक्तींची हत्या झाली आणि तेव्हा तिला थलाईवाने (भास्करन) आधार दिला, आपल्यावर झालेल्या अत्याचाराचा बदला घ्यायचा म्हणून ती संघटनेत सहभागी झाली आणि सगळी दुःखं विसरत दगड बनली. सिनेमात श्रीकांतचा एक संवाद आहे जो राजीची अवस्था अतिशय स्पष्टपणे सांगतो, जब इन्सान जानवर बन जाता है, तो जानवर से भी बत्तर हो जाता है, and if you mix it with politics फुल हैवान म्हणून राजकारण आणि हिंसेचा बळी ठरलेली राजी नायिका वाटायला लागते. सुरुवातीला अतिशय लाचार बनून कंपनीत मॅनेजर आणि बसमध्ये टपोरी व्यक्तीचे स्पर्श सहन करणारी राजीनंतर स्वतःला ज्या प्रकारे बदलते ते खरंच पाहण्यालायक आहे. श्रीकांतच्या डोळ्यात पाहून मेरी कहाणी सच है, म्हणणं तिचा मिशनप्रती दृढ निश्चय दर्शवितं तर साजिद गेल्याची बातमी कळताच भरल्या ताटावरून उठून जाणं, तिच्यात जराशी का होईना शिल्लक राहिलेली माणुसकी दाखवतं.

जबरदस्ती करताना तोंडात चापट मारली म्हणून मॅनेजरला जीवे मारणारी राजी आणि दुसरीकडं मिशन थांबू नये म्हणून टोल ऑफिसर सोबत झोपायला तयार होणारी राजी, अशा एकाच पात्राच्या विविध छटा आपल्याला वेळोवेळी दिसतात आणि त्या प्रत्येक छटेला तितक्याच उत्तमरीत्या समंथाने साकारलं आहे. एका ट्रेन महिला सैनिकाची भूमिका साकारण्याच्या आधी समंथाने 3 महिने विशेष ट्रेनिंग घेतली होती म्हणून तिचे अ‍ॅक्शन सीन्स उत्तम जमून आलेत, आपल्यापेक्षा ताकदवर व्यक्तींना मारणं कुठंच कृत्रिम वाटत नाही. राजी आणि श्रीकांत दोघेही एकसारखे आहेत फक्त ते एकमेकांच्या विरोधात दिसतात, दोघांनीही चुका केल्यात, कदाचित श्रीकांतने राजीपेक्षा जास्त केल्यात. श्रीकांतच्या पात्राला जे जे आवश्यक होतं ते सर्व मनोजने केलंय कदाचित त्यापेक्षा अधिकच त्याने कलाकार म्हणून दिलंय, पण राजीचं कॅरॅक्टरच अशा प्रकारे लिहिलं गेलं की, शेवटी तेच पात्र सिरीजमध्ये मुख्य वाटतं.

- Advertisement -

मनोज वाजपेयी, समंथा , शारीब हाश्मी, प्रियामणी ही सिरीजची अशी काही पात्रं होती ज्यांच्याकडून अपेक्षा होत्या आणि त्यांनी तसंच कामसुद्धा केलं. पण केवळ ही कास्टिंग फॅमिलीमॅनला वेगळं बनवत नाही, या सिरीजमध्ये छोट्यात छोट्या पात्राची कास्टिंग सुद्धा अतिशय उत्तम केली आहे, ज्याचं श्रेय मुकेश छाबराला जातं आणि त्यांच्याकडून तसा सिन काढून घेण्याचं श्रेय दिग्दर्शक राज डी. के. ला जातं. सिनेमात दाखवण्यात आलेल्या स्थानिक व्यक्तींपासून ते टपरीवाल्यांपर्यंत प्रत्येकाची कास्टिंग भारी केलीये, प्रत्येकाचं रिएक्शन तिथे जेन्युइन वाटतं. म्हणजे एक साधी गोष्ट आपल्याकडे टपरीवाल्याला प्रत्येक गोष्टीत इंटरेस्ट असतो, तसंच त्यात दाखवलंय राजीला बघून ती इथली नाहीये हे म्हणणं आणि नंतर कोणी न विचारता ही स्वतः होऊन मनोजला तुम्ही कुणाला शोधताय का ? असं विचारणं हे लिखाणातले बारकावे दर्शवितात.

सिनेमात धृतीची भूमिका साकारणार्‍या अश्लेषा ठाकूरने देखील चांगलं काम केलंय, आपल्या आई वडिलांमध्ये सारं आलबेल नाही, कळल्यावर तिच्या प्रतिक्रिया या कुठेही कृत्रिम वाटत नाही. साजिदची भूमिका करणारा शहाब अली, फिमेल पोलीस इन्स्पेकटरची भूमिका करणारी देवदर्शीनी , मुथ्थुच्या भूमिकेतील रवींद्र विजय, पंतप्रधान बसूच्या भूमिकेतील सीमा बिस्वास अशा प्रत्येकाने आपली भूमिका उत्तमरीत्या साकारली आहे. फॅमिली मॅन ही उत्तम परिपूर्ण मनोरंजक वेब सिरीज आहे, पण तिच्या परिपूर्ण बनण्यामागे जसं कास्टिंग हे एक कारण आहे तसंच उत्तम दिग्दर्शनसुद्धा आहे, राज आणि डिकेची स्टोरी टेलिंग , कॅमेरा आणि पात्रांकडून हवे असलेले सीन्स काढून घेणे यामुळे एकदा ही सिरीज पाहण्यास हरकत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -