बदल ही काळाची गरज !

आषाढ नैवेद्याविषयी बोलायचे तर आपण ही परंपरा अजूनही जोपासतो आहोत याचा आनंद आहेच, परंतु या परंपरा जोपासताना त्यात काळानुसार काही बदल आपण स्वीकारायला हवेत असे मला वाटते. कारण आपल्यासारख्या शेकडो-हजारो सख्या आषाढ नैवेद्याची परंपरा जोपासतात, त्यातून बहुसंख्य मंदिरांमध्ये नैवेद्याच्या पदार्थांचे ढीगच्या ढीग लागलेले दिसतात. काय होतं त्या पदार्थांचं? याचा विचार कधी केलाय आपण? मंदिरातील पुजारी अथवा व्यवस्था पाहणारे, तुम्ही ठेवलेला नैवेद्य काही क्षणातच उचलून बाजूला टाकून देतात, काही ठिकाणी तर मोठाले ड्रम किंवा पोती, गोण्या ठेवलेल्या असतात, क्षणार्धात तुमचा नैवेद्य त्यात सामावून जातो.

यावर्षीचा आषाढ महिना नुकताच सुरू झाला आहे. आषाढ महिना आणि आपले रीतिरिवाज यांची एक वेगळी सांगड आहे. खरं तर आपल्या पूर्वजांनी निसर्गाची बदलणारी स्थिती आणि त्या अनुषंगाने आपल्या आरोग्याला अनुसरून परंपरांची सांगड घातली आहे. आषाढात पावसाचे प्रमाण वाढलेले असते, वातावरण बदलामुळे या काळात पचनशक्ती कमी होते. त्यामुळे या काळात शरीराला स्निग्धता गरजेची असते, म्हणूनच आषाढ महिन्यात तळलेले पदार्थ करण्याची पध्दत आहे. यालाच आखाड तळणे असेही म्हणतात. यात प्रामुख्याने गोड गुळाच्या पुर्‍या, खीर यांचा समावेश असतो. आरोग्यासाठी आषाढ महिन्यात देवीची पूजा करून तळलेल्या पदार्थांचा मरीमातेला नैवेद्य दाखविण्याची पद्धत आहे. साथीच्या आजारांपासून रक्षण करण्याची तसेच सर्वांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली जाते. या परंपरेलादेखील एक इतिहास आहे.

प्लेगच्या साथीच्या काळात देवी आणि निसर्ग यांच्याशी नाते जोडणारा हा सण सुरू झाला. प्लेग या रोगाने सर्वत्र हाहा:कार माजविला होता. या रोगाची तीव्रता भयानक होती. प्रत्येक कुटुंबात मृत्यू थैमान घालत होता. प्लेगच्या साथीची तीव्रता आषाढ महिन्यात अधिक असायची. हा देवीचा प्रकोप आहे अशी धारणा सर्वसामान्य लोकांमध्ये झालेली होती. त्यामुळे या त्रासातून मुक्त होण्यासाठी तसेच मरी मातेला प्रसन्न करण्यासाठी पूजा व नैवेद्य करून चांगले आरोग्य प्रदान कर, अशी मनोभावे प्रार्थना केली जात असे. नंतर हा रोग गेला, पण त्यासाठी सुरू झालेली प्रथा आजतागायत कायम राहिली. अर्थात कालानुरूप त्यात काही बदलही झाले.

हे सगळं सांगण्यामागे माझा वेगळा हेतू आहे. अलीकडच्या काळात बहुसंख्य महिला नोकरी-व्यवसायात गुंतलेल्या असल्या तरी आपल्या पूर्वापार चालत आलेल्या रीतिरिवाजांना न विसरता त्यांची जोपासना करीत आहेत. ही एका दृष्टीने खरोखरच आनंददायी गोष्ट आहे. पुढची पिढी हे रीतिरिवाज कितपत सांभाळेल किंवा पाळेल हे सांगता येत नाही. मात्र हे संस्कार त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत असे मला जसे वाटते, तसेच तुम्हांलाही नक्कीच वाटत असेल यात शंका नाही.

या ठिकाणी मला फक्त आषाढ नैवेद्याविषयी बोलायचे आहे. आपण ही परंपरा अजूनही जोपासतो आहोत याचा आनंद आहेच, परंतु या परंपरा जोपासताना त्यात काळानुसार काही बदल आपण स्वीकारायला हवेत असे मला वाटते. कारण आपल्यासारख्या शेकडो-हजारो सख्या आषाढ नैवेद्याची परंपरा जोपासतात, त्यातून बहुसंख्य मंदिरांमध्ये नैवेद्याच्या पदार्थांचे ढीगच्या ढीग लागलेले दिसतात. काय होतं त्या पदार्थांचं? याचा विचार कधी केलाय आपण? मंदिरातील पुजारी अथवा व्यवस्था पाहणारे, तुम्ही ठेवलेला नैवेद्य काही क्षणातच उचलून बाजूला टाकून देतात, काही ठिकाणी तर मोठाले ड्रम किंवा पोती, गोण्या ठेवलेल्या असतात, क्षणार्धात तुमचा नैवेद्य त्यात सामावून जातो.

तुम्ही प्रयत्नपूर्वक नैवेद्याचे पदार्थ तयार करता, त्यासाठी वेळ, पैसे आणि श्रम खर्ची घालता. काय होतं त्याच ? कोंबून कोंबून भरलेल्या गोण्या, पोते दुसर्‍या दिवशी अक्षरशः घंटागाडीत टाकले जातात. काही ठिकाणी मंदिराबाहेर चार चार दिवस नैवेद्याच्या पदार्थांचे ढिगारे उघड्यावर पडलेले असतात, त्यावर पाऊस पडतो, कुत्री-मांजरी ते ढिगारे उचकटतात. (कटू असले तरी वास्तव आहे).

आपण एकीकडे ‘अन्न हे पूर्णब्रह्म’चा विचार मांडतो तर दुसरीकडे आषाढ नैवेद्याच्या रूपाने मोठ्या प्रमाणावर पूर्णब्रम्हाच्या या रुपाला वाया घालवतो. हा विरोधाभास आपणच निर्माण केलाय. देवाला नैवेद्य दाखवलाच पाहिजे, त्याविषयी दुमत नाही आणि त्याला विरोधही नाही, पण नैवेद्याचे हे पदार्थ, जे तुम्ही परिश्रमपूर्वक तयार केलेले आहेत ते देवाचा प्रसाद म्हणून भुकेलेल्याच्या पोटात गेले तर नक्कीच त्या भुकेलेल्याच्या तोंडून देव तुम्हांला आशीर्वाद देईल, आणि खर्‍या अर्थाने तुमच्या परिश्रमांचा हेतू साध्य होईल याविषयी माझ्या मनात तरी शंका नाही.

संतश्रेष्ठ गाडगेबाबा यांनी आयुष्यभर हीच तर शिकवण दिलीये, भुकेलेल्याला अन्न, तहानलेल्याला पाणी, आणि गरीबाला शिक्षण द्या..देव तिथेच भेटेल. तुम्हाला देव खूश व्हावा असे वाटत असेल तर गाडगेबाबांची शिकवण आचरणात आणून पहा..देव खरंच प्रसन्न होईल. या विचारामागे तुमच्या किंवा कोणाच्याच मनातील श्रद्धेला दुखवायचे नाहीये, पण अंधश्रद्धा वाढीस लागू देऊ नका एवढाच संदेश तुम्हाला द्यायचाय. एकदा, फक्त एकदाच हा विचार प्रत्यक्ष कृतीत आणून तर बघा, भुकेलेल्याच्या चेहेर्‍यावरचा तृप्तीचा आनंद तुम्हाला देव दर्शन घडविल्याशिवाय रहाणार नाही.

–वैशाली गोडसे खातळे