घरफिचर्ससारांशशापित सौंदर्याची वनसम्राज्ञी!

शापित सौंदर्याची वनसम्राज्ञी!

Subscribe

वान आणि नरनाळ्याच्या (अकोट, जि. अकोला) नैसर्गिक सौंदर्य स्थळांमध्ये एक परमोच्च सुखाचा बिंदू म्हणजे शार्दुलबाबाची टेकडी.  नरनाळ्याची तटबंदी ज्या उतरंडीवर संपते तेथून सुमारे अडीच तीन किमी अंतरावर मेळघाटी टेकड्यांमध्ये वसलेली ही एक वनसौंदर्याची मलमली तारुण्यातली अरण्यसम्राज्ञी! टेकडी तशी खडकाळ दगडी. सुमारे साडेअठ्ठाविसशे फूट उंच टेकडीच्या दक्षिण, पश्चिम आणि उत्तर भागाकडे प्रचंड खोल दर्‍या आहेत. शार्दुलबाबाची टेकडी चढणार्‍याला कुठलेही आजार होणार नाहीत ही श्रद्धा आजही शाबूत आहे, मात्र टेकडीची दुर्गमताच एवढी मोठी की सामान्य माणूस सहसा टेकडी चढायला धजावत नाही. 

-रणजितसिंह राजपूत
नरनाळा किल्ल्याच्या राणी महालकडून दक्षिण बाजूने या टेकडीकडे जाणारी एक डोंगर पायवाट. ही पायवाट एका नैसर्गिक सँडल पाथसारखी. राणी महालापासून पुढे गेल्यानंतर एका भल्यामोठ्या बुरजाखाली एक ‘व्ही’ पॉईंट. हा ‘व्ही’ पाईंट म्हणजेच नरनाळ्याच्या तेलीयागड भागाची ‘तेलनखिंड’. तेलनखिंडी संबंधित दंतकथा, एका तेलविक्रेत्या तरुण तेलीणीशी संबंधित. व्ही पॉइंर्ट किंवा तेलन खिंड हे दर्‍यात विखुरल्या मेळघाटच्या प्रकृतीचे प्रवेशद्वार.
व्ही फॉर ‘व्हॅलीज’ शार्दुल टेकडी.  ही त्या दरी पसार्‍यातली सर्वांत उंच टेकडी.  टेकडीवर किंवा टेकडीसमोर दिसणार्‍या नरनाळ्याच्या बुरुजावरून हे अफाट आकाश आणि त्यांचे क्षितिज समांतर असणारे अक्राळविक्राळ परंतु तेवढेच विलोभनीय आणि विलक्षण, गहिरे आभाळ दरीचे स्वरूप भान हरवून टाकणारे.  त्यात भयाची जाणीव असतेच, तुमचे तारे जमिनीवर नसले तर या आकाश दरीतून तुम्ही पर्वतीय दरीमध्ये कोसळणार. सोबत असतो तो अर्थातच घोंघावणारा रानवारा.
शार्दुल टेकडीला जायला दुसरा मार्ग धारगड मंदिराजवळून. प्राचीन काळी आणि धारगडच्या शिवाची उपासना करणारे धार्मिक आजही प्रथम धारगडचे दर्शन घेतात. त्यानंतर शार्दुलबाबाचे दर्शन घेतात आणि त्यानंतर नरनाळा उतरतात. सत्य एवढेच जाणवते की, या प्रकारच्या वारीला किंवा प्रवासाला भूगर्भ विज्ञानाचे शास्त्रीय आधार असावेत किंवा आहेत, परंतु तसा अभ्यास अद्यापपर्यंत झालेला नाही. ज्या शार्दुलबाबाच्या नावाने ही टेकडी प्रसिद्ध आहे त्या शार्दुलबाबाविषयी कुठलीच माहिती उपलब्ध नाही, परंतु संस्कृतमध्ये शार्दुलचा अर्थ वाघाचा एक प्रकार असा होतो.
या टेकडीची दुर्गमता आणि घनदाट जंगलामुळे येथे वाघांचा वावर पूर्वीही असावा. त्यामुळे या टेकडीस शार्दुल टेकडी नाव पडले असावे, असे म्हणणे शास्त्रीयदृष्ठ्या संयुक्तीक वाटते. टेकडीवर आज पाणी नसलेले एक कुंड बांधीव स्वरूपात आहे. शिवलिंग व नंदी आहेत. नंदी सुबक आणि घासीव दगडाचा आहे. शिवलिंग आणि नंदी हे मूर्ती स्वरूपात असतानाही शार्दुलबाबा आमचा की तुमचा या वादाचीच आरती सतत गायली जाते. शार्दुलबाबांच्या टेकडीची सौंदर्यात्मकता आणि निसर्ग वैशिष्ठ्य याकडे कुणाचेही लक्ष नाही. म्हणूनच ती या निबिड अरण्यात शापित सौंदर्याची सम्राज्ञी वाटते.
 शार्दुलबाबाविषयी जी दंतकथा सांगितली जाते, त्याच्याविषयी एक प्रामाणिक सत्य एवढेच की शार्दुलबाबा हा शिवकालीन किंवा तत्पूर्वीचा असावा. दंतकथाही अतिशय साधी आणि एवढीच आहे की शार्दुल नावाचा हा एक सिद्ध पुरुष, परिस्थितीने वैतागून आणि कुणाशीही कुठलेच नाते सांभाळायचे नाही असे ठरवून विरक्तीने या साडेअठ्ठावीसशे फूट उंचीवर चढून गेला आणि तेथेच राहू लागला.
त्यानंतर पुढे वैताग शांत झाल्यावर किंवा समर्थ रामदासांनी दिलेल्या भेटीनंतर त्याने फक्त लोकांच्या आजारांवर उपचार सुरू केले, परंतु एकदा टेकडीवर चढलेला शार्दुल टेकडीवरून कधी उतरलाच नाही. शार्दुलबाबाची टेकडी चढणार्‍याला कुठलेही आजार होणार नाहीत ही श्रद्धा आजही शाबूत आहे, मात्र टेकडीची दुर्गमताच एवढी मोठी की सामान्य माणूस सहसा टेकडी चढायला धजावत नाही.
 वान आणि नरनाळ्याचा विचार केल्यास शार्दुल टेकडीचा हा संपूर्ण परिसर वाघा बिबट्यांच्या आवागमनाचा प्रमुख परिसर येतो (अ‍ॅनिमल कॉरिडॉर). हा मार्ग आबाधित ठेवणे ही जबाबदारी अर्थातच सार्‍यांची येते. वान अभयारण्याच्या या संपन्न जैविक विविधतांचा विचार केल्यास ही जैविक विविधताच ज्या वन्य प्राण्यांसाठी एक वेगळे वाण आहे, ती प्राणीसृष्टी संख्यात्मकदृष्ठ्या आज वानमध्ये तशी कमी प्रमाणात आढळते, परंतु बिबटे, वाघ, अस्वले कमी प्रमाणात आढळणारे परंतु अस्तित्व टिकवून असणारे रानगवे, सांबर, चौसिंगा, भेडकी हरिणे, भुई अस्वल (रॅटल), रानकुत्रे वान अभयारण्यात आहेतच.
संख्यात्मक आणि तुलनात्मक विचार केल्यास अभयारण्याची निर्मिती झाली. त्यापेक्षा आज या प्राण्यांची मुख्य म्हणजे वाघ, बिबटे, कोल्ही, तडस यांचे खाद्य असलेल्या तृणभक्षी आणि तत्सम प्राण्यांची संख्या वाढत्या प्रमाणात आहे. शिकारी आणि मुख्यत्वे करून सर्वत्र विखुरलेली अवैध चराई, महसुली तसेच अवैध वृक्षतोड यावर प्रभावशाली नियंत्रण आल्याने मेळघाटी वाघाचे सहज दर्शन होईल असा हा शार्दुल टेकडीचा परिसर आहे.
वानच्या प्राणी विश्वात ज्याचा उल्लेख दुर्दैवाने अधिकृत नोंदीमध्ये नाही ते आगळे वैशिष्ठ्य म्हणजे विशेषत: वाघांना जे मांस अतिशय चविष्ट वाटते आणि ते मांस मिळण्यासाठी वाघ प्रसंगी स्वत:लाही भयानक इजा करून घेतो ते सायळचे अस्तित्व. संपूर्ण टेकडी आणि वान परिसरात सायळची अनेक बिळे आढळतात.  सायाळ (पॉरक्युपाईन) या सस्तन प्राण्याविषयी फारशी शास्त्रीय माहिती उपलब्ध नाही, परंतु भारतीय लोककथा आणि लोकसाहित्यात सायळविषयी जे उपलब्ध आहे त्यातून हा प्राणी मानवी जीवनात किती महत्त्वपूर्ण मानला गेला होता हे स्पष्ट होते. या सायळची अनेक घरे (बिळे) वान अभयारण्य आणि शार्दुल टेकडीच्या परिसरात आढळतात.
 धारगडकडून झोडलिंगबुवा खोर्‍यात भेटलेली मालकांगण आणि एका भव्य पिपरन वृक्षाखाली आढळलेले सायळचे घर या भ्रंमतीत संस्मरणीय ठरले. सायळला आणि तिच्या कुटुंबीयांना कुठलाही धक्का न देता ही वास्तू पाहता आली. आपल्या अर्ध कमळाकृती शेपटावर असलेल्या चिमुकल्या निंबोळी आकाराच्या बिळात कुटुंब एकत्र राहत असतात. संयुक्त कुटुंब पद्धती आपले एक अस्तित्व चिन्ह येथे रोवून आहे. वान निसर्गाचे वाण आहे आणि माणसांनी माणसांसाठी केलेल्या कथित विकासकार्यातही निसर्गाचं हे देणं उपकारक ठरते याचे बोलके उदाहरण म्हणजे वारी हनुमाननजीक बनलेले वानचे धरण.
याच धरणाने सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून दिल्यात. पाण्याचा प्रश्न सोडवला ही या धरणाची नैतिकता आहे, परंतु वान धरणामुळे शार्दुल टेकडी  परिसरातील स्थानांतरीत आणि स्थानिक स्वरूपाच्या पक्ष्यांची संख्या वाढली आहे. पक्षी अभयारण्यात वान धरणाच्या क्षेत्रात येणारा भाग एक वेगळा अनुभव देणारा ठरतो, मात्र माणसांनी या पक्षी अधिवासाची उपेक्षा आणि शोषण सुरू ठेवले आहे.
समर्थ रामदासांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला शार्दुल टेकडीचा हा परिसर म्हणजे वान अभयारण्याचा परिसर. समर्थ रामदासच म्हणतात, वन्ही तो चेतवावा, चेतविताच चेततो, ते वानचे वाण सांभाळण्यासाठी निसर्ग आणि जैविक विविधतांचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचाच वन्ही अकोला, अमरावती आणि अकोट हिवरखेड परिसरात चेतवण्याची गरज आहे. ते जमले तर सातपुडा श्रृंखलातील जैविक विविधता आणि निसर्ग आपल्या वैशिष्ठ्यांसह सांभाळण्याचे जे योगदान शार्दुल टेकडीचा परिसर करू शकतो ते अन्य अभयारण्यापेक्षा खूप मोठे आणि भरीव असेल.
शिवाय निसर्ग पर्यटन, साहसी पर्यटन, ग्रामीण पर्यटन यांच्या ज्या उपलब्धी वान अभयारण्यात व या परिसरात आहेत त्यादेखील पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाला एक निश्चित आणि सुलभ आकार देणार्‍या आहेत. अर्थातच आकोट-हिवरखेड परिसराला त्यातून रोजगार उपलब्ध होऊ शकतो आणि इतिहासाचे  पुरातत्वीय संशोधन झाल्यास हा एकूणच परिसर मध्य भारतातील एक महत्त्वपूर्ण पर्यटनस्थळ बनू शकतो.
-(लेखक शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागात जिल्हा माहिती अधिकारी आहेत)
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -