घरफिचर्ससारांशदिन खाली खाली बर्तन है... और रात है जैसे अंधा कुवा...

दिन खाली खाली बर्तन है… और रात है जैसे अंधा कुवा…

Subscribe

प्रिय रसिक वाचकहो, ‘छोटासा लम्हा है...’ सदरातला हा शेवटचा लेख. वर्षभर महिन्यातून दोनदा या सदराच्या माध्यमातून आपली भेट व्हायची. आता २०२३ मध्ये आपली भेट होणार नाही याची रुखरुख वाटत आहे. हे माझं गेल्या तीन वर्षातलं चौथं सदर लेखन. हिंदी चित्रपटांचे गीतकार, संगीतकार आणि गायक यांच्यावर लिहिलेले माझे अनेक लेख विविध वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध झाले आहेत, मात्र याच्याशी निगडित विषयावर सदर लिहिण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता. ‘आपलं महानगर’ च्या वाचकांना हे सदर आवडलं असेल अशी आशा व्यक्त करतो. आता काही दिवस गुलजारने ‘घरौंदा’ मधल्या गाण्यात म्हटल्याप्रमाणे दिन खाली खाली बर्तन है और रात है अंधा कुवा... अशी मनाची अवस्था असेल.

–प्रवीण घोडेस्वार

हिंदी चित्रपट गीतकार म्हणून महान उर्दू शायर साहीर लुधियानवी यांची आगळी ओळख आहे. तद्वतच गीतकार शैलेन्द्र यांचंही नाव त्यांच्या सहज-साध्या-सोप्या भाषेतल्या अर्थपूर्ण गाण्यांसाठी आदराने घेतलं जातं. साहीर व शैलेन्द्र यांच्यानंतर हिंदी सिनेसंगीतात आपला वेगळा ठसा उमटवणारे रसिकप्रिय गीतकार म्हणजे गुलजार. त्यांची गाणी नव्या पिढीतल्या श्रोत्यांमध्येही लोकप्रिय असून त्यांचा चाहतावर्गही मोठा आहे. गीतकार गुलजार आणि संगीतकार राहुलदेव बर्मन या जोडगोळीने एक काळ गाजवला. गुलजार यांच्या शब्दांना यथोचित न्याय देणारं अविस्मरणीय संगीत राहुलदाने दिलं आहे. आर. डी. उर्फ पंचम आणि गुलजार यांनी एकत्र येऊन केलेल्या गाण्यांवर भरभरून लिहिलं गेलं आहे. त्यावर दृकश्राव्य कार्यक्रमांची निर्मितीही झाली आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन माझ्या या सदराचे मध्यवर्ती सूत्र ठरवलं. ते म्हणजे गुलजार विदाऊट आरडी अर्थात राहुलदेव बर्मन शिवायचा गुलजार! आरडी यांच्याखेरीज ज्या ज्या संगीतकारांनी गुलजारची गाणी संगीतबद्ध केलीत त्यांचा परामर्श या सदरातून घेण्याचं निश्चित केलं. शक्यतो एका संगीतकारावर एकच लेख लिहायचा असं ठरवलं जेणेकरून अधिक संगीतकारांचा समावेश करता येईल.

- Advertisement -

हिंदी चित्रपटसृष्टीतल्या अनेक श्रेष्ठ नि दिग्गज संगीतकारांना गुलजारचे शब्द संगीतबद्ध करण्याची संधी मिळाली आहे. काही संगीतकार मात्र अपवाद आहेत. उदाहरणार्थ जुन्या काळातले संगीतकार नौशाद, रोशन, रवी, चित्रगुप्त तर अलीकडच्या काळातले राम लक्ष्मण, उषा खन्ना, बप्पी लाहिरी, रवींद्र जैन, आनंद-मिलिंद, नदीम-श्रवण, विजू शाह यांसारख्या संगीतकरांना गुलजार यांच्या गाण्यांना चाली लावण्याची संधी मिळाली नाही.

हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक लोकप्रिय गाणी देणार्‍या संगीतकारांमधली एक जोडी म्हणजे लक्ष्मीकांत-प्यारेलाल. हे राहुलदेव बर्मनचे समकालीन. गुलजार आणि ही जोडी फक्त एकदाच ‘गुलामी’ चित्रपटासाठी एकत्र आली. यातलं त्यांचं ‘सुनाई देती है जिस की धडकन…’ हे गाणं चिरंतन झालंय. सदरातल्या पहिल्या परिचयात्मक लेखानंतर ‘गुलामी’ मधल्या गाण्याची चर्चा करणार्‍या लेखापासून ही गुलजार शब्दस्वरांची यात्रा प्रारंभ झाली. यानंतर संगीतकार खय्याम (चित्रपट-थोडी सी बेवफाई), भूपेन हजारिका (रुदाली), राजेश रोशन (खट्टा-मीठा), शारंग देव (आस्था), इलायराजा (सदमा), जयदेव (घरौंदा), विशाल भारद्वाज (सत्या, इश्कीया), वनराज भाटिया (हीप हीप हुर्ये), हृदयनाथ मंगेशकर (लेकीन), हेमंतकुमार (खामोशी), ए. आर. रहमान (दिल से), मदन मोहन (मौसम), सचिनदेव बर्मन (बंदिनी), संदेश शांडिल्य (दस तोला), कल्याणजी-आनंदजी, वसंत देसाई (शक), सलील चौधरी (आनंद), जतीन-ललित (खुबसुरत), शंकर जयकिशन (सीमा), कनू रॉय (गृहप्रवेश), शांतनू मोईत्रा (यहां) अशा एकूण २३ संगीतकारांनी स्वरबद्ध केलेल्या आणि गुलजार यांच्या लेखणीतून साकारलेल्या गाण्यांचा रसस्वाद आपण घेतला. आरडीनंतर गुलजार यांनी ज्या संगीतकारासोबत जास्त आणि लक्षवेधक काम केलं तो म्हणजे विशाल भारद्वाज. त्यामुळे या जोडीच्या दोन चित्रपटांचा समावेश केला.

- Advertisement -

काही नामवंत संगीतकारांचा समावेश या सदरात करता आला नाही याची खंत वाटते. हे म्हणजे संगीतकार अन्नू मलिक (फिलहाल, फिजा, अक्स), जगजितसिंह (सितम), गायक भूपेंद्र सिंह (सुरमई रात नामक गझल अल्बम), प्रितम चक्रवर्ती (जस्ट मॅरिड, बिल्लू बार्बर, द स्काय इज पिंक), शंकर-एहसान-लॉय (बंटी और बबली, झूम बराबर झूम, किल दिल, रॉक फोर्ड, छपाक, सूरमा, मिर्जीया, राझी) इत्यादी. यांनी गुलजार समवेत केलेलं कामही उल्लेखनीय आहे. गुलजार यांनी आरडीनंतर उत्कृष्ट काम संगीतकार विशाल भारद्वाजसोबतच केलंय. त्याचप्रमाणे ए. आर. रहमान आणि शंकर-एहसान-लॉय यांच्यासमवेत केलेलं कामही वैशिष्ठ्यपूर्ण आहे. त्यामुळे गुलजार आणि हे तीन संगीतकार यावरही लेखमाला होऊ शकते.

सदर सुरू असताना अनेक वाचक मित्र-मैत्रिणींनी आपले अभिप्राय देऊन माझा हुरूप वाढवला. यामध्ये डॉ. रफिक काझी (जळगाव), प्रोफेसर संदीप चौधरी, प्रोफेसर भारती गोरे (औरंगाबाद), चिदानंद तांबोळी (नंदुरबार), डॉ. कविता पवार (धुळे), अश्विनी वैद्य-बापट (दापोली), रवींद्र चव्हाण, प्रमोद पाटील, (नाशिक), डॉ. मंगेश बनसोड (मुंबई), कवी मंगेश काळे (पुणे) यांचा विशेषत्वाने उल्लेख करायला हवा. शिवाय नाशिकच्या लेखिका, प्राचार्या डॉ. लीना पांढरे मॅडम यांनी कधी एखाद्या चुकलेल्या शब्दाविषयी टिप्पणी करून तर कधी दाद देऊन प्रोत्साहित केलं. गुलजारच्या गाण्यांवर लिहितोय असं समजल्यावर मित्र मंगेश बनसोड याने एक पुस्तक संदर्भासाठी पाठवून दिलं. सदराचं नाव काय असावं याची चर्चा करताना ‘छोटासा लम्हा है’ हे समर्पक शीर्षक उदयोन्मुख लेखक, समीक्षक नितीन भरत वाघने सुचवलं. (‘माचीस’ चित्रपटातल्या छोड आए हम वो गलीया… गाण्यातल्या ह्या ओळी आहेत.) या सगळ्यांचे मनापासून आभार मानून धन्यवाद देतो. प्रख्यात लेखक, प्रकाशक, ‘ऋतूरंग’ दिवाळी अंकाचे संपादक आणि गुलजार यांचे स्नेही अरुण शेवते यांनी फोन करून माझं सदर चांगलं असल्याचं सांगितलं. हा क्षण माझ्यासाठी खूप आनंदाचा होता.

‘‘ख़ुशी के गाने फुलजो के तरह होते है, जो जल्दी चमकते है और जल्दी खतम होते है, दर्दभरे गीत अगरबत्ती की तरह होते है, देर तक जलते रहते है असं गुलजार यांनी म्हटलं आहे. हे जरी खरं असलं तरी त्यांची आनंदी असो वा दर्दभरी सर्वच गाणी रसिक श्रोत्यांना विलक्षण आनंद देत असतात यात शंका नाही. मला हे सदर लिहिण्याची संधी दिल्याबद्दल ‘सारांश’ पुरवणीचे संपादक हेमंतराव भोसले यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. ‘आपलं महानगर’च्या वाचकांना हे सदर आवडलं असेल अशी आशा व्यक्त करतो. आता काही दिवस गुलजारने ‘घरौंदा’मधल्या गाण्यात म्हटल्याप्रमाणे दिन खाली खाली बर्तन है और रात है अंधा कुवा…अशी मनाची अवस्था असेल. आपलं महानगरच्या सर्व वाचकांना आणि हितचिंतकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -