Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश अस्वस्थ दशकाच्या वाटेवर

अस्वस्थ दशकाच्या वाटेवर

आपल्या देशाला चळवळ आणि आंदोलनांचा फार मोठा इतिहास आहे. म्हणून आजच्या काळात युवकांनी सुरुवातीला स्वतःचे करिअर भक्कम करून नंतर तन-मन-धनाने चळवळीसाठी योगदान दिले, तर समाजाला त्याचा फायदा होईल. नाहीतर आपला फायदा राजकीय लोक घेतात. आणि आपण आहे तिथेच राहतो. आपल्याला यशस्वी व्हायचे असेल, समाजात बदल घडवायचा असेल, तर देशाचे दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे कलाम साहेब युवकांशी संवाद साधत असताना काही प्रश्न विचारत असत त्या प्रश्नांची उत्तरे जरी आपण मिळवली तरी देशाचा आणि आपला विकास होऊ शकतो.

Related Story

- Advertisement -

मागच्या आठवड्यात ‘मी देशाला काय देऊ शकतो..?’ हे सृजनपाल सिंग यांचे डॉ. वृंदा चापेकर अनुवादित पुस्तक वाचनात आले. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनातील विविध पैलूंची ओळख त्यानिमित्ताने झाली. त्यांनी देशातील तरुणांना दिलेल्या संदेशाची वर्गाच्या भींतीपलीकडे जाऊन विचारधनाची दिलेली शिदोरी आमूलाग्र. आपण आपल्या अवतीभवतीचं नकारात्मक वातावरण ज्यावेळी पाहतो, त्यावेळी हे पुस्तक माझ्या पिढीच्या युवकांनी वाचावं असं मला वाटतं. समाज बदलण्यासाठी निघालेला युवक आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. पण त्या वाटेवर चालताना त्याला काही मर्यादा येतात. महापुरुषांनी दिलेल्या विचारातून त्यांची पाऊलवाट समोर जात असते. पण एका वळणावर थोडं विचलित झाल्यास मार्ग बदलतो. मूळ उद्देश बाजूला राहतो. मग पुन्हा प्रश्न पडतो आता पुढे काय..?

अलीकडच्या काळात या पुढे काय..? चे उत्तर युवकांना मिळत नाही. हे आपण पाहत आहोत. याला कारणंही तशीच आहेत. एखादी बिगर राजकीय संघटना युवक स्थापन करतात. त्यांच्या कामाचा अजेंडा ठरलेला असतो. थोड्याबहुत प्रमाणात यश मिळायला लागलं की लगेच एखादा राजकीय पक्ष त्यांना गळाला लावतो. ती संघटना त्या पक्षात विलीन होते. सुरुवाती-सुरुवातीला त्या संघटनेचं काम त्यांच्या मूळ जाहीरनाम्यानुसार चालतं. पण काही कालावधीनंतर मात्र त्यांना त्या राजकीय पक्षाच्या दयेवर राहावं लागतं. एकूणच काय तर स्वतंत्र विचारांनी प्रेरित असणारी संघटना राजकीय पक्षाच्या दावणीला बांधली जाते. तसे पाहता हा भारतातील सर्वच संघटना आणि चळवळींचा इतिहास आहे की, सुरुवातीचा काळ स्वतंत्रपणे काम करणे आणि नंतर राजकीय सुंदोपसुंदी. बरं यात दुसरा एक मुद्दा असा की, ज्या हिरीरीने या चळवळीत युवक सहभागी होतात, त्याच प्रमाणात सर्व युवकांना राजकीय पक्षाचा फायदा होत नाही. त्यातील एक-दोन चेहर्‍यांना त्याचा फायदा होतो. बाकीच्यांना मात्र पुन्हा आपल्या परिस्थितीवर सोडून दिले जाते. मग पुन्हा प्रश्न त्या युवकांनी काय करायचे..? पुन्हा नव्या संघटनेची बांधणी, आंदोलन, मोर्चे की अन्य काही. याच विवंचनेत त्यांना जगावे लागते.

- Advertisement -

बरं यात युवक आंदोलन का करतात..? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं खरं. पण त्या आंदोलनाचं यश मिळत नाही. खरंतर आपल्यावर लादल्या गेलेल्या, न पटणार्‍या मूल्याबद्दल जाचक नितीनियमांच्या विरोधात असंतोष युवक व्यक्त करतात. शासनाने लादलेल्या निर्णयाबद्दल, सामाजिक, धार्मिक, प्रथा-परंपरा संकेतांबद्दल युवकांच्या मनात आजच्या आधुनिक काळात चीड आहे. आजही काही धार्मिक प्रथा व सामाजिक नियम आहेत, जे काळाच्या ओघात न पटणारे आहेत. त्याबद्दल युवक आवाज उठवतात. पण पद्धतशीरपणे त्यांचे आंदोलन चळवळ चिरडली जाते. त्यांना मुख्य प्रवाहापासून बाजूला सारले जाते. त्यांचा राजकीय फायदा घेतला जातो. प्रसंगी अंगावर लाठीहल्ला झेलणारे युवक हतबल होतात. आणि यातून संन्यास घेतात. हेही आपण पाहिले आहे.

विद्यापीठीय शिक्षण घेताना युवकांच्या चळवळी समाजात अधिक प्रमाणात दिसून येतात. इथे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, या वयातील चळवळी थोड्या कमकुवत असतात. याचे कारण युवकांचे कमी वय. म्हणून त्यांचा अनुभवसुद्धा कमी असतो. त्यांची कृती भावनेच्या भरातली आणि तात्काळ निकाल मिळावा हीच असते. व्यावहारिक ज्ञानाची जोड मिळाली नसल्याने चळवळीत गोंधळ निर्माण होण्याची शक्यता जास्त. शिवाय नेतृत्वाचा अभावही असतो. अर्थात काही चळवळींना दोन पिढ्यातील लोक मार्गदर्शन करत असतात. म्हणून त्या यशस्वी होतात. पण सर्वच चळवळी आणि आंदोलनांना अशी अनुभवजन्य माणसं भेटत नाहीत. म्हणून आजच्या युवकांनी हेसुद्धा लक्षात घ्यायला हवे की, सध्याच्या काळात आपण घेतो तो श्वाससुद्धा राजकीय असतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा फायदा आपल्याला करून घेता आला पाहिजे.

- Advertisement -

पाठीमागच्या काही वर्षात भारतात पुन्हा आंदोलने आणि चळवळींनी जोर धरला आहे. अगदी लोकपाल विधेयकासंदर्भातले आंदोलन, सध्या गाजत असलेले शेतकरी आंदोलन, विविध राज्यात होणारे आरक्षणाचे आंदोलन इत्यादी. या सर्व आंदोलनाच्या केंद्रभागी आजचा युवक आहे. पण या युवकांच्या होणार्‍या अपरिमित हानीकडे कुणाचेच लक्ष नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात राजकीय पक्ष, संघटना युवकांना घेऊन आंदोलन करतात. त्यावेळी सरकार आणि आंदोलनकर्ते यांच्यात संघर्ष पहावयास मिळतो. पोलिसी बळाच्या वापरात हजारो युवकांना अटक होते. काहींवर अजामीनपात्र गुन्हा नोंदवला जातो. काही दिवसांनी सरकार आपला निर्णय मागे घेते. त्यानंतर ज्या आंदोलनकर्त्यांवर गुन्हे नोंदवले गेले होते, त्यातील काही गुन्हे मागे घेतले जातात. पण दरम्यानच्या काळात मात्र अटक झालेल्या युवकांच्या कुटुंबाला समाजात अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. ज्यांना अटक होते त्यांचा उमेदीचा काळ कोर्टकचेर्‍यात जातो. परिणामी त्यांच्या करिअरच्या वाटा बंद होतात. याकडे मात्र कोणाचेच लक्ष नसते. होरपळत असतो. तो फक्त युवक….

आपण हे मान्य केले पाहिजे की, आपल्या देशाला चळवळ आणि आंदोलनांचा फार मोठा इतिहास आहे. म्हणून आजच्या काळात युवकांनी सुरुवातीला स्वतःचे करिअर भक्कम करून नंतर तन-मन-धनाने चळवळीसाठी योगदान दिले, तर समाजाला त्याचा फायदा होईल. नाहीतर आपला फायदा राजकीय लोक घेतात. आणि आपण आहे तिथेच राहतो. आपल्याला यशस्वी व्हायचे असेल, समाजात बदल घडवायचा असेल, तर लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केला त्याप्रमाणे आपण कलाम साहेबांच्या स्वप्नातला भारत निर्माण करू शकतो. डॉ. कलामसाहेब युवकांशी संवाद साधत असताना काही

प्रश्न विचारत असत. त्या प्रश्नांची उत्तरे जरी आपण मिळवली तर देशाचा आणि आपला विकास होऊ शकतो. कलामसाहेब जे प्रश्न विचारत ते मुद्दाम मी इथे देत आहे. ते पुढीलप्रमाणे.-देशातील महत्त्वाचे जलस्त्रोत जोडून पूरनियंत्रण आणि दुष्काळ निवारणाच्या यशस्वी प्रकल्पाचा प्रवर्तक, अशी स्वतःची ओळख बनवायची आहे..? ऊर्जेची निर्मिती आणि वापर या बाबतीत देशाला संपूर्ण स्वावलंबी बनवण्यात सिंहाचा वाटा उचलणारा, अशी स्वतःची ओळख बनवायची आहे..? शेकडो उपक्रमांच्या निर्मितीस सक्षम असणार्‍या एखाद्या अनन्यसाधारण धाडसी प्रकल्पाचा जनक, अशी स्वतःची ओळख बनवायची आहे..? राष्ट्राच्या उभारणीच्या चळवळी लाखो युवकांना मार्गदर्शन करणारा, अशी स्वतःची ओळख बनवायची आहे..? की, देशाच्या सार्वजनिक आरोग्य संवर्धनात आमूलाग्र बदल घडवून जनतेत नवचैतन्य निर्माण करणारा, अशी भावी पिढ्यांमध्ये स्वतःची ओळख बनवायची आहे..?

या काही प्रश्नांची उत्तरं युवकांनी मिळवली तर देशपातळीवर विकास होऊ शकतो. आणि भारत जगाचे नेतृत्व करू शकतो. असे असले तरी एक प्रश्न मनात कायम उरतो. तो असा की, मी देशाला काय देऊ शकतो..? या प्रश्नाबरोबरच आज हजारो युवक आपापल्यापरीने आंदोलन करत प्रतिप्रश्न विचारत आहेत की, प्रस्थापित सरकारांनी आम्हाला काय दिले..? हाच प्रश्न घेऊन युवक रस्त्यावर येत आहेत. असा प्रश्न जर युवकांना पडत असेल, तर काळानुरूप आंदोलनाची आणि चळवळीची तीव्रता अधिकाधिक वाढू शकते. युवकांचा देश म्हणून मिरवणार्‍या सरकारलाही याचा विसर पडू नये इतकंच…!

- Advertisement -