सिनेविश्वातील ‘अंबानी’ MCU

मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स (MCU)ने 2009 ते 2019 या 11 वर्षांच्या कालखंडात तीन फेजमधील एकूण 23 सिनेमे जगभरात प्रदर्शित केले. पहिल्या आणि दुसर्‍या फेजमध्ये प्रत्येकी सहा आणि तिसर्‍या फेजमध्ये 11 सिनेमे या युनिव्हर्सने प्रदर्शित केले होते, ज्यातून त्यांनी जवळपास दीड लाख कोटी रुपये कमावलेत आणि ही रक्कम युरोपातील अनेक देशांच्या जीडीपीपेक्षाही जास्त आहे. मग आता प्रश्न आहे की एमसीयु इतकं यशस्वी कसे ठरले आणि इतकं यशस्वी ठरलेलं मार्वल युनिव्हर्स 2 सिनेमांच्या अपयशानंतर मागे राहील असे अजिबात वाटत नाही. पुढच्या महिन्यात रिलीज होणारा स्पायडर मॅन- नो वे होम इटर्नल्सला मिळालेलं अपयश दूर करेल आणि सिनेमा विश्वातील अंबानी आम्हीच आहोत हे मार्वल पुन्हा सिद्ध करेल, असे वाटते.

व्यवसाय यशस्वी होतो तो केवळ एका उत्तम बिजनेस आयडियामुळे, म्हणून भांडवल कितीये किंवा व्यवसाय किती मोठा आहे? या गोष्टी बिजनेस आयडियापुढे फिक्या ठरतात. जगभरात सिनेमा हा व्यवसाय म्हणूनच पाहिला जातो आणि या व्यवसायातील अंबानी आहेत मार्व्हल स्टुडिओज. बाजारात काय चालत आणि लोकांना काय आवडत या दोन्ही गोष्टी ज्याला कळतात तो व्यवसायात यशस्वी होतो. मार्व्हल स्टुडिओजच्या यशामागे देखील याच दोन गोष्टी आहे, एवेन्जर्स एन्ड गेम सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर आता पुढे मार्वलचे काय होणार असा प्रश्न अनेकांना पडला होता, पण फेज फोरची सुरुवात झाली आणि एकामागे एक सिनेमे स्टुडिओजने जाहीर केले, ज्यातील ब्लॅक विडो, शँग-ची आणि इटर्नल्स प्रदर्शित झालेत.

दरम्यानच्या काळात लोकी, वांडा व्हिजनसारख्या सिरीज देखील मार्व्हलने प्रदर्शित केल्या ज्याला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. फेज 4 मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमांमध्ये शँग-ची सोडला तर इतर दोन सिनेमाना मात्र इतर मार्व्हल सिनेमांप्रमाणे यश मिळालं नाही, पहिले तीनही फेज व्यावसायिकदृष्ठ्या यशस्वी ठरल्यानंतर चौथ्या फेजची अशी सुरुवात मार्वलसाठी प्रतिकूल ठरेल का ? ज्या सिनेमातून मार्व्हलने आपले 10 नवीन सुपरहिरोज समोर आणले त्याच सिनेमाला मिळालेला अल्प प्रतिसाद भविष्यातील सिनेमांवर काय प्रभाव पाडेल ? आणि लोकांची आवड ओळखून सिनेमे बनविणारा मार्वल स्टुडिओज यावेळी कमी पडला की, हे सिनेमे केवळ बेस तयार करण्याचं काम करणार आहेत? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत.

मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स (MCU)ने 2009 ते 2019 या 11 वर्षांच्या कालखंडात तीन फेजमधील एकूण 23 सिनेमे जगभरात प्रदर्शित केले. पहिल्या आणि दुसर्‍या फेजमध्ये प्रत्येकी सहा आणि तिसर्‍या फेजमध्ये 11 सिनेमे या युनिव्हर्सने प्रदर्शित केले होते, ज्यातून त्यांनी जवळपास दीड लाख कोटी रुपये कमावलेत आणि ही रक्कम युरोपातील अनेक देशांच्या जीडीपीपेक्षाही जास्त आहे. मग आता प्रश्न आहे की एमसीयु इतकं यशस्वी कसे ठरले आणि इतकं यशस्वी ठरलेलं मार्वल युनिव्हर्स 2 सिनेमांच्या अपयशानंतर (अपयश कमाईच्या बाबतीत नव्हे तर प्रेक्षकांकडून आलेल्या प्रतिक्रियांच्या बाबतीत) मागे राहील का ? तर यासाठी काही काळ मार्व्हलच्या इतिहासात जावं लागेल. स्टॅनली नावाच्या व्यक्तीने कॉमिक्सच्या माध्यमातून अनेक सुपरहिरोजना जन्म दिला ज्यातील स्पायडरमॅन हे पात्र आपल्याकडे देखील बहुतांश जणांना माहिती होते, मार्वल स्टुडिओजने अनेक सिनेमे 2007 च्या आधीही बनवले होते पण 2007 दरम्यान मार्वल स्टुडिओजची आर्थिक स्थिती डबघाईला आली, त्यावेळी त्यांनी स्पायडरमॅन आणि एक्स मेन या पात्रांचे हक्क सोनी स्टुडिओला विकले.

2008 साली नवीन सुपरहिरो सोबत मार्वलने सिनेमा बनविला आणि तो तुफान चालला, रॉबर्ट डाऊनी ज्युनियरने साकारलेला टोनी स्टार्क उर्फ आयर्नमॅन प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला आणि मार्वल स्टुडिओ पुनर्जीवित झाला. पहिलाच सिनेमा हिट झाल्यानंतर त्यांनी दुसरा सुपरहिरो अर्थात हल्क प्रेक्षकांच्या भेटीला आणला. पण तो सिनेमा प्रेक्षकांना तितका आवडला नाही. मग मार्वल स्टुडिओजने पुन्हा एकदा हुकमी एक्का ठरलेल्या आयर्नमॅनचा वापर केला आणि तब्बल दोन वर्षांनी आयर्नमॅन 2 रिलीज केला. तो उत्तम चालला त्या नंतर थॉर आणि कॅप्टन अमेरिकासारखे दोन नवे सुपरहिरोज इंट्रोड्युस केले आणि सर्वांना एकत्र आणत, मार्वल स्टुडिओजचा महत्वाकांक्षी प्रकल्प मार्वल द एवेन्जर्स आपल्या भेटीला आला. 5 सिनेमांनी मिळून जितकी कमाई केली जवळपास तितकेच पैसे एकट्या एवेन्जर्स सिनेमाने कमावले. एकंदरीत काय तर मार्वलचा प्रत्येक सिनेमा त्यांच्या पुढच्या घातलेल्या एखाद्या मोठ्या प्रोजेक्टचा भाग असतो, ज्यातून त्यांना भरघोस उत्पन्न आणि प्रेक्षकांचे प्रेम मिळते. म्हणून फेज 4 च्या सुरुवातीला 3 पैकी 2 सिनेमांना आलेलं अपयश हे मार्वल स्टुडिओजच्या उत्पन्नावर किंवा त्यांच्या प्रेक्षक संख्येवर फार परिणाम करेल, असं सध्या तरी वाटत नाही.

मार्वलचा फेज फोर काही गोष्टींसाठी खास आहे, पहिली म्हणजे हा फेज इतर तीनही फेजपेक्षा मोठा असेल आणि दुसरी म्हणजे या फेजमध्ये सिनेमांसह अनेक टेलिव्हिजन आणि वेब सिरीजदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. 3 ते 4 वर्षात या फेजमध्ये तब्बल 11 सिनेमे आणि 13 सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ज्यापैकी 3 सिनेमे आणि 4 सिरीज प्रदर्शित झाल्या आहेत. कोरोनामुळे फेज 4 चे अनेक सिनेमे लांबणीवर पडले होते, फेज 4 ची सुरुवात झाली ती डिजनी हॉटस्टारवर रिलीज झालेल्या वांडा व्हिजनया सिरीजने, त्यांनतर द फाल्कन विंटर सोल्जर आणि लोकी या दोन सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आणि पहिला सिनेमा येण्यासाठी जुलैची वाट पाहावी लागली. ब्लॅक विडो हा फेज फोरचा पहिला सिनेमा यावर्षीच्या जुलै महिन्यात प्रदर्शित झाला होता. फेज 4 मध्ये आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या सर्व सिनेमा आणि सिरीजमध्ये महत्वाचा सिनेमा आहे तो म्हणजे इटर्नल , वरकरणी पाहता इटर्नल सिनेमा हा मार्वलचा फ्लॉप सिनेमा ठरलाय, नवीन 10 सुपरहिरोज एंजलिना जॉली, क्रेग हेरिंग्टन, सलमा ह्येकसारखी मोठी स्टारकास्ट आणि ऑस्कर विजेती दिग्दर्शिका क्लोई झाओ असताना हा सिनेमा कसा फ्लॉप ठरला, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्यामागे कारण आहे या सिनेमाचा लांबलेला फर्स्ट हाफ, एक्शन सीन्सची कमतरता आणि डीसी टाइपमधले डार्क शूट. सिनेमाच्या अपयशाची ही कारणं सोडली तरी एक गोष्ट इटर्नलच्या बाबतीत महत्वाची आहे, जी संपूर्ण मार्वल स्टुडिओजचे बदललेले स्वरूप दाखवून देते.

इटर्नलमध्ये अनेक अशा गोष्टी आहेत ज्या मार्वल स्टुडिओजच्या सिनेमात पहिल्यांदा पाहायला मिळाल्या आहेत. समलैंगिक असलेला सुपरहिरो, इकारीस-सर्सीमधला सेक्स सिन आणि अमेरिकेसोबतच इतर जगाला आणि त्यांच्या सुपरहिरोजला दिलेलं महत्व… इटर्नलमध्ये तुम्हाला भारत पाहायला मिळेल, गुप्त साम्राज्य, बॉलिवूड नायक असलेला सुपरहिरो दिसेल. मार्वल स्टुडिओजमध्ये झालेला हा बदल त्यांचे बदलणारे रूप दाखवतोय. सिनेमांना ज्या भागातून आणि देशातून प्रतिसाद मिळतोय, त्या देशांना कथानकात स्थान देऊन, तिथल्या प्रेक्षकांना आपल्याकडे अधिक आकर्षित करण्याचा हा प्रयत्न आहे. इटर्नल्स सिनेमात नव्याने केलेले प्रयोग आणि सिनेमाला आलेलं अपयश याचा फार संबंध नसला, तरी मार्वल स्टुडिओज येणार्‍या काळात ते बदल कायम ठेवेल का हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल. लोकांना काय आवडतं ? हे चांगलंच ठाऊक असणार्‍या सिनेमाविश्वातील सर्वात यशस्वी व्यापारी असणार्‍या मार्वल स्टुडिओजचा प्रवास एका सिनेमाच्या अपयशाने थांबत नाही. पण म्हणून प्रेक्षकांच्या नकारात्मक प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष करण्याचं धाडस सध्यातरी मार्वल करेल असं वाटत नाही. पुढच्या महिन्यात रिलीज होणारा स्पायडर मॅन- नो वे होम इटर्नल्सला मिळालेलं अपयश दूर करेल आणि सिनेमा विश्वातील अंबानी आम्हीच आहोत हे मार्वल पुन्हा सिद्ध करेल इतकीच अपेक्षा.