घरफिचर्ससारांशशिक्षण क्षेत्राचे अभ्यासपूर्ण विवेचन!

शिक्षण क्षेत्राचे अभ्यासपूर्ण विवेचन!

Subscribe

एक विषय : शिक्षण, एक लेखक : संदीप वाकचौरे, एक प्रकाशक : घनश्याम पाटील (चपराक प्रकाशन पुणे) या त्रिवेणी संगमाची फलश्रुती म्हणजे नुकतेच प्रकाशित झालेले ‘पाटी पेन्सिल’ हे वाकचौरे यांचे तिसरे पुस्तक! संदीप वाकचौरे हे अभ्यासू शिक्षण अभ्यासक आहेत. शिक्षण क्षेत्रात होणार्‍या बदलांवर ते बारकाईने लक्ष ठेवून असतात. होणार्‍या बदलांचा विद्यार्थी, शिक्षक, पालक, शासन, समाज या महत्त्वाच्या घटकांवर काय आणि कसा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होतो याची विविध माध्यमांवर ते सखोल चर्चा करतात.

–नागेश शेवाळकर

‘पाटी पेन्सिल’ पुस्तकात वाकचौरे यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण असे ३५ लेख लिहिले आहेत. शिक्षण क्षेत्र एक महासागर आहे. कितीही दूर जा, कितीही खोलवर जा, हाती अमृतच येईल. जेव्हा संदीप वाकचौरे यांच्यासारखे पट्टीचे अभ्यासक या महासागरात यथेच्छ विहार करतात त्यावेळी त्यांना शंख, शिंपले, मोती याप्रमाणे काही नको असलेल्या गोष्टीही सापडतात. नंतर यथावकाश ते सापडलेले सारे काही अक्षराच्या कोंदणात बसवून सादर करतात.

- Advertisement -

विद्यार्थ्याला या ना त्या कारणाने शाळेतून बाहेर काढणे हे बालमनाला नैराश्यात ढकलणारे आहे. त्याच्या आत्मसन्मानाला धक्का देणारे आहे. हा धक्का मुलांच्या मनावर आणि शरीरावर दीर्घकाळ परिणाम करणारा असतो. अशा आशयाचे विचार ‘पाटी पेन्सिल’ लेखात मांडून लेखक शाळेतील फी ठरविण्याचा अधिकार पालक सभेला द्यावा, अशी सूचना करतात तेव्हा आठवते, शाळा-शाळांमधून असणार्‍या पालक सभा कार्यान्वित आहेत का? शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी या त्रिकोणात पालक कुठे असतात? केवळ पालक सभेला हजेरी लावली म्हणजे संपले सारे असे होते का? खेडोपाडी तर अनेक वेळा पालक समिती सदस्यांच्या घरी जाऊन स्वाक्षर्‍या घ्याव्या लागतात हे चित्र बरोबर वाटते का?

‘भुकेचे करायचे काय?’ या लेखात लेखकाने जागतिक भूक निर्देशांकाची चर्चा करताना शालेय पोषण आहाराचे वास्तव समोर ठेवले आहे. शालेय पोषण आहाराचा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर सकारात्मक परिणाम झाला आहे का हा खरा संशोधनात्मक विषय आहे. शरीराची भूक भागली पण ज्ञानाच्या भुकेचे काय? अर्थात पोटाची भूक भागली असं म्हणणंही थोडं धाडसाचं ठरेल.

- Advertisement -

‘महाराष्ट्र म्हणजे शिक्षणाची प्रयोगशाळा’ ही आपल्या राज्याची ओळख सर्वदूर आहे. आता राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने ४८८ शाळा आदर्श करण्याचे ठरविले आहे, परंतु अंमलबजावणीचे काय? अंमलबजावणीचे घोडे गवत खात असेल तर मग कोवळ्या, फुलणार्‍या कळ्यांचं काय? ‘आपलं राज्य एक प्रयोगशाळा’ हे चांगलं वाटत असलं तरीही ते किती लाभदायक आहे, यापूर्वी अनेक योजना आल्या नि गेल्या, त्यांचा सकारात्मक परिणाम झाला का? हेही विचारात घेणे गरजेचे आहे. कारण पुढील एका लेखात लेखक लिहितात, ‘आपण शिक्षणात अक्षराची साक्षरता पेरत गेलो, मात्र शिक्षणातून अपेक्षित असलेल्या मूल्यांचा विचार रूजवायचा राहिला तर नाही ना? अशी शंका येते. अभ्यासक्रमात गाभा घटक, जीवनकौशल्य आणि मूल्यांचा विचार अधोरेखित केला गेला आहे, मात्र प्रत्यक्षात तो विचार अंमलबजावणीत आला असता तर आपल्याला वर्तमानात दिसणारी परिस्थिती निश्चित नियंत्रणात आली असती.’

एकेकाळी गाभाभूत घटकांचा आणि मूल्य शिक्षणाचा एवढा गाजावाजा झाला होता तो लक्षात घेता आणि आता लेखकाचे विचार वाचताना असे वाटते की सारेच मुसळ केरात गेले की काय? कारण लेखक म्हणतात त्याप्रमाणे ‘प्रामाणिकपणा हे मूल्य रुजले असते तर एवढा भ्रष्टाचार माजला नसता.’ हे निश्चित खरे आहे, पण मूल्य रुजविण्याची जबाबदारी केवळ शिक्षकांचीच आहे का? समाज, पालक हे नामानिराळे राहू शकतात का? शाळेत विद्यार्थी सहा-सात तास असतो. उर्वरित काळात तो घरात आणि समाजात असतो. ते वातावरण आणि शाळेतील मूल्य शिक्षण किती विरोधाभास आहे ना? त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात पडतो आणि जे सहज साध्य असेल तिकडे वळतो. ‘शाळा हे मंदिर,’ असे माजी शिक्षण संचालक वि. वि. चिपळूणकर यांचं मत होतं. तसे मानले तर या मंदिरातून बाहेर पडलेले काही विद्यार्थी पालकाला शोधायला मदिरालयात जात असतील तर कशाचे मूल्य नि कोणता गाभाभूत घटक आपण जोपासत आहोत?

‘साक्षरतेचं चांगभलं’ हा लेख साक्षरतेची चिरफाड करणारा आहे, योजनांची दशा नि दिशा दाखवणारा आहे! साक्षरता अभियान आणि त्यापूर्वी प्रौढ साक्षरता ह्या दोन महत्त्वाकांक्षी योजना आपण राबविल्या आहेत. त्या योजनांचे चर्वितचर्वण आपण केले आहे. अनेक दंतकथा आपण ऐकल्या आहेत. त्यावेळी साक्षरता केवळ अक्षर वाचन, लेखनापुरती मर्यादित मानण्यात आली होती, परंतु ती तरी पूर्ण झाली का? निरक्षर साक्षर झाले का? याबाबत लेखक म्हणतात, ‘आपल्याकडे शिक्षणाच्या साक्षरतेपेक्षा व्यक्तीचे शहाणपण महत्त्वाचे आहे… साक्षर किंवा उच्चशिक्षित माणसं भ्रष्टाचारी, नीतीहीन, कामचुकार, तत्त्वहीन, अप्रामाणिक माणसं चांगले नागरिक कसे होऊ शकतील, असा प्रश्न जेव्हा संदीप वाकचौरे यांच्यासारख्या ज्येष्ठ शिक्षण अभ्यासकाला पडतो तेव्हा वाचकांची मनोवृत्ती ‘संपले सारे’ अशी होते.

एखाद्या शाळेचा सुरक्षा रक्षक जेव्हा एखाद्या पालकाला मारहाण करतो त्यावेळी मनात विचार येतो, हेच का ते शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण? पालक आर्थिक ताण सोसून जी देणगी देतात त्यातून ह्या सुरक्षा रक्षकांचा पगार होत असेल तर प्रश्न पडतो की देणगी द्यावी तर कशासाठी? सुरक्षा रक्षक असतील, शिक्षक असतील, संस्थाचालक असतील यांची मुजोरी सहन करण्यासाठी देणगी? अशा शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये निर्भयता निर्माण होईल का? अर्थात सर्व शाळांमध्ये असे वातावरण नाही. बहुतांश शाळा खूप छान आहेत, पण देणगी द्यावीच लागते ना? लेखकाने मुद्यांचे स्पष्टीकरण करताना अनेक थोर विचारवंतांच्या विचारांचा दाखला दिला आहे. तसेच अग्रगण्य संस्थांनी जाहीर केलेली आकडेवारी उधृत केली आहे. यावरून लेखकाचा शिक्षणविषयक अभ्यास किती सखोल आहे हे लक्षात आल्याशिवाय राहत नाही.

परीक्षा! अभ्यासक्रमाच्या पूर्ततेसाठी करावा लागणारा एक सोपस्कार! परंतु या मूल्यमापनातून पास-नापास आणि आशा-निराशा असे दोन गट पडतात. हे धोकादायक ठरू शकते. यासंदर्भात लेखक चिंतनीय अशी प्रश्नपत्रिका सादर करतात. विद्यार्थी पुस्तकी परीक्षेत नापास झाले तरी जगण्यासाठी लागणारी सक्षमता प्राप्त करू शकले का? शिक्षणाच्या प्रक्रियेत शिकणे महत्त्वाचे नाही का? मुळात आपण का शिकतो? शिक्षण देणार्‍या संस्था समाजाने का निर्माण केल्या? या प्रश्नांची उत्तरे संबंधित घटकांनी दिली पाहिजेत, अर्थात त्यांना ह्या प्रश्नांमागचे गांभीर्य समजायला हवे.

गळती ही शिक्षण क्षेत्राला लागलेली कीड आहे. कितीही आणि कोणत्याही योजना नि अभियान राबविले तरीही ही कीड कमी होत नाही हे वास्तव आहे. याबाबत लेखकाने स्वामी विवेकानंद यांचा एक विचार अधोरेखित केला आहे. स्वामी म्हणतात, ‘गरीब शिक्षणापर्यंत पोहचत नसेल तर शिक्षणाने गरिबांपर्यंत पोहचण्याची गरज आहे.’ खरंच असे घडले का, घडत आहे का? योजनांची उधळण पाहता शिक्षण गरिबांपर्यंत पोहचत असेल पण त्यातून शिक्षणाचा हेतू पूर्ण होतो का हे महत्त्वाचे आहे.

शालेय स्तरावर मराठी नापास, मातृभाषेत शिक्षण कधी, बोली जपायला हव्यात, गिरगिटायला हवेच ना अशा अनेक लेखांमधून वाकचौरे यांनी शिक्षणविषयक अभ्यासपूर्ण माहितीने परिपूर्ण असे विचार मांडले आहेत. ते पालक, अधिकारी, पदाधिकारी, संस्थाचालक, शिक्षक, सरकार, शिक्षणतज्ज्ञ अशा सर्व घटकांना विचार करण्यासारखे आहेत. सोबत शिक्षण क्षेत्रात जे नवनवीन प्रयोग केले जातात, सरकार बदलले, शिक्षणमंत्री बदलला की योजना बदलते, धोरणं बदलतात ही पद्धती निश्चितच पोषक नाही तर घातक आहे. जे चांगले आहे त्यात आमूलाग्र बदल न करता आवश्यक असा मामुली बदल केला तर तो पोषक ठरेल. संदीप वाकचौरे यांनी अत्यंत तळमळीने हा लेखसंग्रह लिहिला असून तितक्याच सक्षमपणे प्रकाशक घनश्याम पाटील यांनी प्रकाशित केला आहे. तो शिक्षण क्षेत्रातील सर्वांना मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही.

=पाटी पेन्सिल : लेखसंग्रह
=लेखक : संदीप वाकचौरे
=प्रकाशक : घनश्याम पाटील
=(चपराक प्रकाशन, पुणे)
=(७०५७२९२०९२)
=पृष्ठ संख्या : १५२
=किंमत : २५०/-
=आस्वादक : नागेश शेवाळकर, पुणे
=(९४२३१३९०७१)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -