Sunday, February 28, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश बावनकशी सोनं...

बावनकशी सोनं…

मराठी पडद्याने आजवर अनेक नायिका पाहिल्या. मात्र 21 फेब्रुवारी 1942 साली जन्मलेल्या जयश्री गडकरींनी मराठी नायिकांना जो घरंदाजपणा बहाल केला तो आजही कायम आहे. पडद्यावरील आपल्या अभिनय व्यक्तीरेखेतही त्यांनी कधी मराठी स्त्रीत्वाला तडजोडीच्या छायेत येऊ दिले नाही. ज्या काळी हिंदी पडद्यावर झळकण्यासाठी तत्कालीन नावाजलेल्या अभिनेत्रींमध्ये स्पर्धा लागलेली होती त्या काळातही मराठी पडद्यावरील घरंदाज अभिनयातील जयश्री गडकरींना आपल्या चित्रपटात प्रमुख भूमिकेत घेण्यासाठी हिंदी निर्मात्यांमध्येही चुरस रंगली होती. मात्र हिंदी पडद्याच्या लखाखत्या व्यावसायिक जगात रमण्यापेक्षा आपल्यातील अभिनयाला न्याय देणा-या मराठी मातीतल्या चित्रपटांच्या बाजूने जयश्री गडकर कायम उभ्या राहिल्या.

Related Story

- Advertisement -

जयश्री गडकर हे मराठी चित्रपट सृष्टीला पडलेलं सुखद स्वप्न आहे. मराठी चित्रपटातील कृष्ण धवल पडदा 60 आणि 70 च्या दशकात जयश्री गडकर यांनी पुरता ताब्यात घेतला. मराठी मातीतील नऊवारी साडीतलं खानदानी सौंदर्य आणि परिणामकारक जिवंत अभिनय हे त्याचं वैशिष्ठ्य. मराठी पडद्याच्या सुवर्णकाळातील या महानायिकेला पर्याय नव्हता. लावणी मग ती बैठकीची असो किंवा नृत्य सादरीकरणाची जयश्री गडकर यांनी लावणीची इभ्रत कायम ठेवली. या काळात लावणी गावी तर सुलोचना चव्हाण यांनी खड्या आवाजात आणि त्याला पडद्यावर न्याय द्यावा जयश्री गडकर यांनीचं… लावणीतील कलावंतीण याच या काळात पडद्यावरच्या नायिका होत्या. मात्र लावणीतीत कला आणि अदांनाही एक खानदानी आब, रुतबा होता. जयश्री गडकर यांनी तो राखलाच, त्यांनी पडद्यावर साकारलेली नायिका आजही मराठी चित्रपटातील नव्ख्या अभिनेत्रीसाठी वस्तुपाठ ठरतात. तमाशा आणि लावणीकलेला मराठमोळा नऊवारी साज त्यांनी बहाल केला होताच, त्यामुळेच बहुजनांच्या लोककलेची रागिणी अर्थात पोटापाण्यासाठी जोपासलेली मराठी लावणी चित्रपटाच्या पडद्याची राणी ठरली.

बोर्डावरचा मराठी तमाशाला नाकं मुरडणारा अभिजन वर्ग या काळातही होताच. लावणी आणि मराठी तमाशा कला जपली तो वर्ग वर्णव्यवस्थेतील अस्पृश्य मानल्या जाणार्‍या जातींमध्ये बहुतांश विभागला गेला होता. सधन सावकार आणि सरंजामदारांकडून होणारं लावणीचं शोषण हे तत्कालीन समाजात सत्ता आणि राजमान्यता मिळालेलं होतं. आनंद यादवांचा नटरंग गणा कागलकर हे त्याचं अलिकडेचं उदाहरण, गणासारख्या पैलवान पुरुषाचं होणार्‍या शोषणाची कथा नटरंग कादंबरी आणि चित्रपटाचा विषय असला तरी या पुरुषी वर्चस्ववादाशी लढा देणारी पहिली नायिका जयश्री गडकर यांनी खूप आधीच साकारली होती. सांगते ऐका… सवाल माझा ऐका.. या चित्रपटांच्या शीर्षकातच समजातील पुरुषप्रधान वर्चस्वाला महिलेने दिलेलं आव्हान होतं. स्त्री त्यातही बहुजन वर्गातील ही शोषणासाठीच केलेली व्यवस्था असल्याचं पडद्यावरच चित्र असताना जयश्री गडकर, लीला गांधी यांनी त्याला अभिनयातून आव्हान दिलं.

- Advertisement -

रंगकर्मी निळू फुले यांनी याबाबत एक मजेशीर किस्सा त्यांच्या मुलाखतीत सांगितला होता. झालं असं की निळूभाऊंचं एकाच दिवशी 3 ठिकाणी तीन वेगवेगळ्या चित्रपटाचं शूटिंग होतं. पहिल्या ठिकाणी निळूभाऊ गेले असता दिग्दर्शक दत्ता माने यांनी शॉट रेडी केला होता. प्रसंग सावकाराकडून गरीब शेतकर्‍याच्या पत्नीवरील अत्याचाराचा प्रसंग होता. निळू भाऊ या अत्याचारासाठी तयार होते. अत्याचार होणारी ही श्रमिक महिला अर्थातच जयश्री गडकर होत्या. शॉट ओके झाला. निळूभाऊ दुस-या सेटवर गेले. तिथंही अब्रू लुटण्याचाच प्रसंग होता. तिथंही अत्याचार होणारी महिला जयश्री गडकरच पुढं तिस-या चित्रिकरणाच्या ठिकाणीही तोच प्रसंग आणि नायिकाही तीच, आता निळूभाऊ वैतागून त्या दिग्दर्शकाला म्हणाले डिरेक्टर साहेब…प्रसंग तोच ठेवता, हरकत नाही, निदान बाई तरी बदलावी…असं बोलल्यावर सेटवर एकच हास्यकल्लोळ उडाला.

बहुजन वर्गातील घरंदाज महिलांची होणारी परवड जयश्री गडकर यांनी पडद्यावर मांडली. मात्र त्यांनी साकारलेल्या नायिका केवळ कैफयत मांडणा-या रडाबाई नव्हत्या. त्या व्यवस्थेला सवाल करणा-या होत्या. असा खडा सवाल त्यांनी तमाशाच्या बोर्डावर अनेकदा टाकला. अरुण सरनाईक, चंद्रकांत मांढरे आदी मंडळी त्यांच्या सवालाला जवाब देणारी होती. अनेकदा जयश्री गडकर यांच्या सवाल जवाबाला तेवढ्याच ताकदीने उत्तरबंद करणारी दुसरी महिला लिला गांधीच होत्या. जयश्री गडकरांची लावणी घरंदाज होती. त्यात एक खानदानी अदब होती. सवाल माझा ऐका..चं कथानक रणजीत देसाईंचं होतं. तर दिग्दर्शन दत्ता मानेच करत होते. बोर्डावरच्या सवाल जवाबात पित्याला एका सवालाचं उत्तर देणं कठीण होतं. या पराभवामुळे नायिकेच्या पित्याला बोर्डावरच लुगडं नेसवलं जातं. हे लुगडं उतरवून पित्याच्या डोक्यावर स्वाभिमानाचा फेटा चढवण्याची आन, त्याची मुलगी म्हणजेच चित्रपटाची नायिका घेते. ही नायिका जयश्री गडकर यांनी साकारली होती. अखेर तमाशाच्या फडात टाकलेल्या सवालासाठी प्रतिस्पर्ध्यांना हार पत्करावी लागते आणि या शाहीराची मुलगी आपल्या पित्याचा स्वाभिमान परत मिळवते. या कथानकात महिलांच्या स्वाभिमानाचा हुंकार होता.

- Advertisement -

श्रमिक महिलांच्या मातृसत्ताक कुटुंबातील तिचे स्थान समाजव्यवस्थेत मोलाचे होते. ऐरणीच्या देवा तुला, ठिणगी ठिणगी वाहू दे…या गाण्यात जयश्री गडकर यांचे पडद्यावरचे धनी चंद्रकांत मांढरे होते. दिग्दर्शक भालजी पेंढारकरांसाठी हे गाणं दिलं जगदीश खेबुडकरांनी लिहलेलं…या गाण्यात ऐरणीच्या देवा तुला आगीनफुलं वाहू दे…असे मूळ शब्द खेबुडकरांनी लिहिले होते. हे शब्द लता मंगेशकरांनी रेकॉर्डिंगच्या वेळेस ठिणगी-ठिणगी असे बदलून घेतले, गाण्यात लोहाराच्या घणांच्या घावांचा ठेका धरला होता. जयश्री गडकर यांनी ठिणगी-ठिणगी म्हणताना हा आगीनफुलांचा ठेका अभिनयातून अचूक पकडला होता. साठ आणि सत्तरच्या दशकात मराठी पडद्यावरील नायिकांचे प्रतिनिधीत्व जयश्रींंनी केलं होतं, यात शेतकरी, कुंभार, लोहार अशा बारा बलुतेदारांची नायिका त्यांनी साकारली. मराठी चित्रपटांचा केंद्रबिंदू ग्रामीण जीवनाशी निगडित होता. शहरातील मेट्रोपोलिटन प्रेक्षकांसाठी त्यावेळी खास सिनेमे बनवले जात नव्हते.

हे चित्रपट मातीशी नाळ जोडून होते. मग ही माती पश्चिम महाराष्ट्रातील असो किंवा मराठवाड्यातील, त्यानं मराठी प्रेक्षकांना फरक पडत नव्हता..गोमू माहेरला जाते हो नाखवा…म्हणताना जयश्री गडकरांनी अभिनयात कोकणातील तांबड्या मातीचे रंग भरले. कोकणातील नवविवाहिता आपल्या घो, सोबत कोकणातील खाडीनदीतून नावेतून माहेरी जाते, त्यावेळी आपल्या माहेरची ओढ जयश्री गडकरांनी साकारताना ही नायिका पश्चिम महाराष्ट्रातील नऊवारी नायिकेचं प्रतिनिधीत्व करते याचा विसर पडवा, इतकी परिणामकारपणे साकारली. अर्थातच तिचा पडद्यावरचा घोव झालेला नायक रमेश देव होता. अरुण सरनाईकांसोबतची सवाल जवाबांची जुगलबंदी, सांगते ऐका, केला इशारा जाता जातामध्ये रंगली होती. हिंदी पडद्यावर शोले हिट झाल्यावर जशी घोडदौडीच्या नायक खलनायकांची लाट आली होती तसाच प्रकार मराठी पडद्यावरही झाला होता. ढोलकीचा ठेका लावणीशी जुळल्यानंतर अनेक तमाशाप्रधान कलाकृती मराठी पडद्यावर साकारल्या. राम कदम आणि जगदीश खेबुडकरांची त्याला साथ लाभली.

मराठी पडद्यावर बेरकी खलनायक साकारणार्‍या राज शेखर यांनी जयश्री गडकर यांच्या अभिनयाविषयी फार मोलाची गोष्ट सांगितली. जयश्री गडकर यांच्याविरोधात मी नेहमीच मराठी पडद्यावर कुंभाड रचत आलो होतो. ती कथानकाची गरज होती. मात्र जयश्री गडकर यांच्यासमोर त्यांच्यावर वाईट नजर ठेवणारा खलनायक म्हणून उभं राहातानाही मला त्यांच्या घरंदाजपणाचं कौतुक वाटतं होतं. पडद्यावर दिसणारा हा घरंदाज खानदानीपणा त्यांच्या केवळ त्यांच्या अभिनयाचा नाही तर त्यांच्या व्यक्तीमत्वाचा भाग होता. राज शेखर यांच्याप्रमाणेच जयश्री गडकर यांच्यासोबत गणपत पाटील यांचंही मैत्रीपूर्ण नातं होतं. मराठी पडद्यावरील सहकलाकारांच्या अडीअडचणीत जयश्री गडकर नेहमीच त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहात.

धीरुभाई देसाईंनी 1961 मध्ये हिंदी चित्रपट ‘सारंगा’ बनवला, यात तब्बल बारा गाणी होती. यात शीर्षक भूमिकेत जयश्री गडकर होत्या. नायिका म्हणून हिंदी पडद्यावरील हा त्यांचा पहिला चित्रपट होता. मधुबाला, मीनाकुमारी, साधना अशा अनेकविध दिग्गज नायिकांच्या स्पर्धेत जयश्री गडकर हे नाव त्यावेळी हिंदी पडद्यावर नायिका म्हणून महाराष्ट्राचं नेतृत्व करत होतं. जयश्री गडकरांनी शांतारामबापूंच्या ‘झनक झनक पायल बाजे’मध्ये नृत्य समुहातील एक म्हणून काम केलं होतं. ही एक नृत्यांगना मराठी पडद्यावरील नायिकांची लावणीसम्राज्ञी होईल, असं कुणालाही त्याकाळी वाटलं नसावं..पण हे खरं झालं.

सारंगाच्या यशामुळे हिंदी पडद्याकडून जयश्री गडकरांना अनेकदा बोलावणं आलं, मात्र यशासाठी आपल्या आवडीनिवडीशी कुठलाही तडजोड त्यांनी केली नाही. हिंदी आणि मराठी पडद्यावरील पौराणिक कथांवरील आधारित चित्रपटात रामायणातील कौसल्या, सती, सावित्री, पार्वती, लक्ष्मी या भूमिकांसाठी जयश्री गडकर हेच नाव प्रामुख्याने समोर होतं. त्यामुळेच हिंदी पडद्यावर सर्वाधिक पौराणिक चित्रपट साकारणा-या जयश्री गडकर असाही त्यांचा नावलौकीक होता. मनाला न पटणारी आणि अनैतिक वर्तन करणा-या महिलेची भूमिका त्यांनी पडद्यावरही कधीच साकारली नाही. हिंदी पडद्यावरील व्यावसायिक स्पर्धेतील यशाचे तडजोडीतील ठोकताळे त्यांना कधीही मंजूर नव्हते.

हिंदीतील कमालीच्या व्यावसायिक जगात त्या रमणार्‍या नव्हत्या. मराठीच नाही तर हिंदी पडद्यालाही महिलाप्रधान सिनेमांकडे वळवण्यात जयश्री गडकरांचा मोठा वाटा आहे. हिंदी पडद्यावर खाष्ट सासू एक मराठी अभिनेत्री ललिता पवार साकारत असतानाच प्रेमळ सासू साकारण्यासाठीही जयश्री गडकर हेच मराठी नाव होतं. मराठी पडद्यावर जयश्री गडकर यांनी त्यांच्या घरंदाज अभिनयाशी कुठलीही तडजोड न करता मिळवलेलं यश हे अस्सल बावनकशी सोनं आहे. त्याची झळाळी कधीही कमी होणारी नाही.

पडद्यावरी…गडकरी जयश्री

सांगू काशी मी
चांदोबा चांदोबा भागलास का
घरकुल
अवघाचि संसार
गाठ पडली चालता चालता
आलिया भोगासी
लेक लाडकी या घरची
जिवलगा
थांब लक्ष्मी कुंकू लावते
सुबह का तारा
सावित्री
सांगते ऐका
मल्हारी
पंचारती
अवघाची संसार
ससुराल
सारंगा
मनिनी
बाप माझा ब्रह्मचारी
सुख आले माझ्या दारी
सुभद्रा हरण
परदा
मोहित्यांची मंजुळा
मेरे अरमान मेरे सपने
महासती अनुसुया
सवाल माझा ऐका
मल्हारी मार्तंड
आई कुणा म्हणू मी
साधी माणसं
गोपाळ कृष्ण
पटलाची सून
लव कुश
बहारों के सपने
एक गाव बारा भानगडी
हर हर गंगे
बलराम श्री कृष्ण
दगाबाज
भगवान परशुराम
अशी एक रात्र आहे
लाखात अशी देखणी
तुळशी विवाह
श्री कृष्ण लीला
श्री कृष्णार्जुन युद्ध
कसं काय पाटील बरं हाय का
नाग पंचमी
हरि दर्शन
महासती सावित्री
आई उदे ग अंबाबाई
किसान और भगवान
हर हर महादेव
दावत
ध्रुव बाळ
एक गाव की कहानी
बजरंगबली
महिमा श्री राम की
गायत्री महिमा
हर हर गंगे
कडकलक्ष्मी
सून माझी लक्ष्मी
आव्हान
सती नाग कन्या
महाभारत
सुलगते अरमान
सिंदूर का दान
श्रावण कुमार
माया बाजार
नया कदम
मास्टरजी
वीर भीमसेन
कृष्ण-कृष्ण
बिजली
रामायण (टीव्ही मालिका)
शेर शिवाजी
पूर्णसत्य
खुनी दरिंदा
नझराना
भटक भवानी
मार्च मिटेंगे
ईश्वर
कानून अपना अपना
अमीरी गरिबी
बॉम्बे ते मॉरिशस
मालमासला
सौभाग्यदान

- Advertisement -