Wednesday, September 22, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश प्रत्यक्ष सर्व गोष्टींना मुकण्याचा काळ!

प्रत्यक्ष सर्व गोष्टींना मुकण्याचा काळ!

विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रवाहात ठेवण्यासाठी कृतिशील शिक्षक महाराष्ट्र हा शिक्षकांचा समूह सध्या ‘मस्ती की पाठशाला’ हा उपक्रम राबवत आहे. यात राज्यभरातून वीस हजार विद्यार्थी सहभागी झाल्याचे हा समूह सांगतो. महाराष्ट्र सरकारने हे शैक्षणिक वर्षसुद्धा ऑनलाईन पद्धतीने सुरू होणार असल्याचे जाहीर केल्यामुळे हा पर्याय शोधण्याचे या समूहाचे म्हणणे आहे. राज्यभरातून जिल्हानिहाय आणि माध्यमनिहाय गट तयार करून या उपक्रमात विद्यार्थ्यांना सामावून घेतले जात आहे. कोरोनामुळे प्रत्यक्षरित्या सर्वच गोष्टींना मुकण्याचा हा काळ आहे, पण त्यातून मार्ग काढण्याचा हा प्रयत्न आहे.

Related Story

- Advertisement -

विद्यार्थी परीक्षेची वाट पाहत होते. पालक त्यांच्या मुलांच्या भविष्याचा विचार करत होते. तर शिक्षक सरकारच्या निर्णयाची वाट पाहत होते. अशातच केंद्र सरकारने सीबीएसईची दहावी बरोबरच बारावीचीही परीक्षा रद्द केल्याची घोषणा 1 जून रोजी केली. दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या नववीच्या गुणांवर आधारित गुण देण्यात यावेत. तर बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अकरावीच्या गुणांवर आधारित. पण हे सर्व निर्णय घेताना याचे परिणाम काय होतील याचा विचार केला गेलेला नाही. (अर्थात परिणामांची चर्चा आजकाल सरकार करत नाही तो भाग अलाहिदा) याचा विचार होणे गरजेचे होते.

कारण येथे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. सध्या दोन शैक्षणिक वर्षांचा कालावधी बंद शाळा, व महाविद्यालयाविना शिक्षक आणि विद्यार्थ्यांना पहावा लागतोय. यात महत्त्वाची गोष्ट ही की, शाळा आणि महाविद्यालयांमधून जे प्रत्यक्ष ज्ञान विद्यार्थ्यांना मिळते. तीच त्यांच्या आयुष्याची शिदोरी असते. या ठिकाणावरून मिळालेले प्रत्यक्ष शिक्षण हे समाजात जीवन जगताना त्यांना कामी येते. किंबहुना त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. पण यावर्षी मात्र महाविद्यालयाची पायरी न चढता पास होणारे विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतील. जे आयुष्यांच्या प्रश्नांची उत्तर यात शोधतील.

- Advertisement -

याच अनुषंगाने मी दहावी-बारावी आणि महाविद्यालयातील आजूबाजूच्या काही विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. त्याबद्दल त्यांच्या काही भावना त्यांनी व्यक्त केल्या. दहावीच्या वर्गातला एक विद्यार्थी आहे. त्याला मी सहज बोललो की, आता तर तुमची मजा आहे, तू आणि तुझे मित्र थेट अकरावीत जाणार.. त्यावर ती बोलत होता की, मला परीक्षा रद्द झाल्याचा खूप राग आलाय, मी गेल्या वर्षी नववीतून दहावीत परीक्षा न देताच आलो. आता पुन्हा अकरावीत जाणार. यावर्षी मी खूप अभ्यास केला होता. आणि मला चांगले मार्क मिळवायचे होते. वर्षभर ऑनलाईन क्लास केले. वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका सोडवलेल्या पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. वर्गात पहिल्या पाचमध्ये यायचे होते. यावर्षी तर सरांची भेट झाली नाही आणि माझ्या मित्र मैत्रिणींचीसुद्धा. हे सर्व बोलत असताना त्याच्या डोळ्यात सुरुवातीला आत्मविश्वासाची चमक दिसत होती. पण दुसर्‍याच क्षणी तो नाराज झाला कारण त्याला वेगळं काही करायचं होतं.

याच प्रकारे मी बारावीच्या एका विद्यार्थ्याला बोललो, तो सुद्धा तेच सांगत होता की, खूप अभ्यास केला, पण फायदा झाला नाही.. अर्थात काही विद्यार्थ्यांना परीक्षा संकट वाटते, म्हणून त्यांना परीक्षा नको असतात. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा आवाहन वाटतात त्यांना परीक्षा हव्या असतात. पण आता तरी या काही गोष्टी शक्य नाहीत. शिवाय बारावीच्या परीक्षावर आधारित समोर कोणत्या शाखेला प्रवेश घ्यावा हे निश्चित होत असते. आणि करियर ठरते. बारावीच्या परीक्षा रद्द झाल्यामुळे काही गोष्टी समोर आल्या. त्या अशा की, वैद्यकीय, अभियांत्रिकी अशा विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश हे देशपातळीवर किंवा राज्य पातळीवर प्रवेश परीक्षांच्या निकालानुसार होतात. यासाठी बारावीच्या गुणांना अधिक महत्त्व असते. देशपातळीवर बारावी आणि प्रवेश परीक्षा या दोन्ही गुणांवर प्रवेश निश्चित होतो. यामुळे आता समोर करिअर करण्यासाठी निवडलेल्या क्षेत्रात कोणती पद्धत अवलंबली जाणार हा प्रश्न पालक आणि विद्यार्थी यांच्यासमोर आहे. यामुळे काही विद्यार्थी नैराश्याने ग्रासले जातील व मानसिक आरोग्याचे शिकार होतील असे तज्ञांचे मत आहे.

- Advertisement -

या सगळ्यांमध्ये आणखी एक मुद्दा आहे तो म्हणजे महाविद्यालयीन युवकांचा. या दोन वर्षात त्यांनासुद्धा महाविद्यालयाची पायरी चढता आली नाही. त्यांच्या परीक्षा होत आहेत, पण महाविद्यालयीन जीवन जगताना परीक्षा हेच उत्तर असू शकत नाही. हे लक्षात घ्यावे लागणार. यासाठी थोडा आपला महाविद्यालयीन जीवनाचा काळ आपण आठवून पाहू. अगदी महाविद्यालयात प्रवेश घेतल्यापासून ते पदवीपर्यंतची तीन वर्ष हा खरा सामाजिकरणाचा काळ असतो. आपल्याला स्वतःची ओळख व्हायला लागते, आणि याच काळात वेगळी ओळख मिळते. वेगवेगळ्या विषयांचे प्रात्यक्षिक ज्ञान आपल्याला इथेच मिळते. एनएसएस. एनसीसीचे होणारे कॅम्प, महाविद्यालयात होणारे वार्षिक स्नेहसंमेलन, वर्षभरात साजर्‍या होणार्‍या महापुरुषांच्या जयंत्या, त्यावर आधारित व्याख्यानांची सत्र, वक्तृत्व, वादविवाद, काव्यवाचन स्पर्धा, वेगवेगळ्या खेळातून महाविद्यालयाचे राज्य व देश पातळीवर होणारे नेतृत्व, युवक महोत्सव, क्रीडा महोत्सव, विज्ञान महोत्सव, एकूणच कला, क्रीडा, साहित्य, विज्ञान अशा वेगवेगळ्या उपक्रमांमधून नवीन काहीतरी विद्यार्थी शिकतात.

आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास महाविद्यालयातील प्राध्यापक प्रयत्नदेखील करत असतात. यातूनच विद्यार्थ्यांना आपल्यातील कौशल्य ओळखण्यास मदत होते. आणि ते त्यांचे करिअर घडवतात. वेगळ्यावेगळ्या क्षेत्रातील मित्र-मैत्रिणी इथेच भेटतात. ग्रंथालयातून वेगवेगळ्या पुस्तकांचा होणारा अभ्यास हे सर्व आयुष्याला नवीन दिशा देणारं असतं. एकूणच आपल्याला जगण्याचं तत्त्वज्ञान आजच्या काळात शाळा, महाविद्यालयातून मिळतं. पण कोरोनाने या सर्वांची गोळाबेरीज शून्य केली आहे. परिस्थिती पूर्वपदावर येईल हा आशावाद जरी असला तरी निघून गेलेल्या काळाला परत बोलवता येत नाही हेच सत्य.

इथे फक्त दहावी बारावी किंवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा प्रश्न नाही. शालेय विद्यार्थ्यांचा प्रश्न यापेक्षा जटिल आहे. या शैक्षणिक वर्षातील पहिली दुसरीचे विद्यार्थी तर शाळा काय असते हे माहीत न होताच पुढच्या वर्गात गेले. शहरी भागात किमान ऑनलाइन शिक्षण मिळत आहे. पण ग्रामीण भागातील आणि आदिवासी भागातील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. त्या ठिकाणी आजही साधी वीज पोहोचली नाही तिथे मोबाईल आणि ऑनलाईन शिक्षण तर मृगजळच. ज्या भागात थोड्या बहुत सुविधा आहेत तिथे विद्यार्थ्यांना अक्षरांची ओळख होत आहे. पण शाळा महत्त्वाची असते. सर्व गोष्टींना पर्याय देता येतील पण शाळेला सध्या तरी पर्याय देता येत नाही.

काही शिक्षक विद्यार्थ्यांना शिकता यावे म्हणून स्वयंस्फूर्तीने वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत. विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रवाहात ठेवण्यासाठी कृतिशील शिक्षक महाराष्ट्र हा शिक्षकांचा समूह सध्या ‘मस्ती की पाठशाला’ हा उपक्रम राबवत आहे. यात राज्यभरातून वीस हजार विद्यार्थी सहभागी झाल्याचे हा समूह सांगतो. महाराष्ट्र सरकारने हे शैक्षणिक वर्षसुद्धा ऑनलाईन पद्धतीने सुरू होणार असल्याचे जाहीर केल्यामुळे हा पर्याय शोधण्याचे या समूहाचे म्हणणे आहे. राज्यभरातून जिल्हानिहाय आणि माध्यमनिहाय गट तयार करून या उपक्रमात विद्यार्थ्यांना सामावून घेतले जात आहे. झूम व्हाट्सप, युट्युब या माध्यमांद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्यासाठी बाहुबलीनाट्य, कथा, गोष्टी, कागदकाम, चित्रकला, गणित विज्ञानातील गमतीजमती दाखवून उत्तम आरोग्यासाठी व्यायामही करून घेतला जात आहे.

अखेर हे सर्व शिक्षण मिळत आहे पण आभासी जगात. प्रत्यक्ष शाळेमध्ये जाऊन संवाद होतो, आणि प्रतिसाद मिळतो संवादातूनच कलागुणांना वाव मिळतो. उणीव भरून काढता येते. पण आज आपण प्रत्यक्ष होणार्‍या सर्वच गोष्टींना मुकलो आहोत. आपण काहीच करू शकत नाही. फक्त बरा-वाईट निर्णय आणि संकल्पाचे साक्षीदार होऊ शकतो.

- Advertisement -