घरफिचर्ससारांशअवांतर वाचनाचा अभाव!

अवांतर वाचनाचा अभाव!

Subscribe

शिक्षणाचे ध्येय आणि उद्दिष्टांमध्ये विद्यार्थ्यांचा मानसिक, शारीरिक, बौद्धिक विकास अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्याचे काम शिक्षणातून केले जाते. त्यासाठी केवळ पाठ्यपुस्तके पुरेशी ठरत नाहीत. शिक्षणाचा अर्थ पाठ्यपुस्तके शिकवणे असाही नाही, तर शिकण्यासाठी, शोधासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्याने वाचन कौशल्य प्राप्त केले की त्याने स्वत:च अवांतर वाचनापर्यंत पोहचण्याची गरज असते. शाळा स्तरावर पूरक वाचन महत्त्वाचे मानले आहे. आज विद्यार्थ्यांच्या मस्तकी अभ्यासाच्या नावाखाली प्रचंड तणाव आहे. मार्क हेच शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट ठरले आहे. त्यामुळे अवांतर पुस्तके वाचणे म्हणजे टाईमपास वाटू लागला आहे.

–संदीप वाकचौरे

शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येक शाळेत किमान काही सुविधांची उपलब्धता असण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक प्राथमिक शाळा आणि माध्यमिक विद्यालयात ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध असायला हवी. कायद्याच्या अंमलबजावणीस आरंभ होऊन आता सुमारे १२ वर्षे पूर्ण झालीत. असे असतानाही त्या सुविधा शंभर टक्के शाळांमध्ये उपलब्ध नाहीत. ज्या शाळांमध्ये ग्रंथालय सुविधा आहेत त्या गुणवत्तेच्या आणि पुरेशा प्रमाणात आहेत का याचा विचार करण्याची गरज आहे. ग्रंथालय म्हणजे केवळ पुस्तके नाहीत तर ग्रंथालये म्हणजे समाज समृद्धतेचा आणि व्यक्तीच्या मस्तकावर संस्कार करण्याचा प्रभावी मार्ग आहे. पुस्तके हा इतिहास असतो. त्याप्रमाणे पुस्तके भविष्यही असतात. पुस्तकांमुळे अनेकांच्या आयुष्याला उन्नतीचा राजमार्ग हाती लागला आहे. पुस्तके वाचणारा समाज अधिक शहाणा आणि विवेकी असतो.

- Advertisement -

आज आपल्याकडे वाचन दिन, सप्ताह आयोजित करावे लागतात, मात्र जीवनभर वाचनाचा संस्कार निर्माण करण्यात आपण अपयशी ठरलोत. समाजात दिसणारा हिंसाचार, द्वेष, मत्सर, भ्रष्टाचारासारख्या समस्या खरोखर संपुष्टात आणायच्या असतील तर आपल्याला पुस्तके वाचणारी माणसं निर्माण करावी लागतील. आज दुर्दैवाने पुस्तके हाती नाही आणि वाचनाचा संस्कार नाही. त्यामुळे अनेक लहान माणसांच्या सावल्या उंच पडू लागल्या आहेत. त्यामुळे समाजाचा र्‍हास होताना दिसतो. प्रतिष्ठेच्या पदावर बसूनही अनेकांनी आपले अस्तित्व गमावले आहे, प्रतिष्ठा हरवली आहे. सन्मान केव्हाच गमावला आहे. कारण मस्तकांची जडणघडण झालेली नाही.

शिक्षणाचे ध्येय आणि उद्दिष्टांमध्ये विद्यार्थ्यांचा मानसिक, शारीरिक, बौद्धिक विकास अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्याचे काम शिक्षणातून केले जाते. त्यासाठी केवळ पाठ्यपुस्तके पुरेशी ठरत नाहीत. शिक्षणाचा अर्थ पाठ्यपुस्तके शिकवणे असाही नाही, तर शिकण्यासाठी, शोधासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्याने वाचन कौशल्य प्राप्त केले की त्याने स्वत:च अवांतर वाचनापर्यंत पोहचण्याची गरज असते. शाळा स्तरावर पूरक वाचन महत्त्वाचे मानले आहे. आज विद्यार्थ्यांच्या मस्तकी अभ्यासाच्या नावाखाली प्रचंड तणाव आहे. मार्क हेच शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट ठरले आहे. त्यामुळे अवांतर पुस्तके वाचणे म्हणजे टाईमपास वाटू लागला आहे.

- Advertisement -

जीवनात जेव्हा ग्रंथ प्रवेश करतात, तेव्हा जीवनाला आकार येण्यास मदत होते. ग्रंथ माणसांची मस्तके घडवतात. पुस्तकांमुळे माणसांच्या जीवनाला अर्थपूर्णता येते, जगण्याचा अर्थ कळतो. जीवनाचे ध्येय निश्चित होण्यास मदत होते. पुस्तकामुळे मानवी संस्कृती, मानवाचा आणि जगाच्या इतिहासाचे आकलन होण्यास मदत होते. पुस्तक म्हणजे केवळ माहितीचा साठा नाही, तर पुस्तक वाचून माणसाला प्रेरणा मिळते. त्यातून ज्ञानाचा प्रवास घडतो. माणसांतील माणुसकीला जिवंत ठेवण्याचे कामही ग्रंथ करतात. पुस्तकातील जीवनकथा वाचताना अनेकदा डोळ्यांत अश्रू येतात. पुस्तके संवेदना, सहृदयता निर्माण करतात. साने गुरुजींची श्यामची आई वाचून अनेकांची जडणघडण झाली आहे. विवेकशीलता जागृत करण्याचे काम पुस्तके करीत आली आहेत.

पुस्तकांमुळे माणसं उलगडत जातात. पुस्तकामुळे माणसांच्या आयुष्याला निर्मळ वाटेचा प्रवास करणे शक्य होते. पुस्तके वाचता वाचता माणसंही वाचता येतात. एपीजे अब्दुल कलाम यांनी जीवनातील यशात पुस्तकांचा प्रभाव मान्य केला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर पेन थॉमस यांच्या ग्रंथाचा परिणाम होता. महात्मा गांधी यांच्या जीवनावर श्रीमद्भगवत गीतेचा प्रभाव होता. अब्राहम लिंकनसारख्यांच्या जीवनावर सतत पुस्तके प्रभाव टाकत आल्याचा इतिहास आहे. पुस्तकांच्या सहवासात असलेल्यांना विजयाची मस्ती येत नाही आणि पराभवाने खचून जाणे घडत नाही. पुस्तकांच्या सहवासाने कोठे संघर्ष करायचा आणि कोठे मौन धारण करायचे ही विवेकशीलता येते. काय बोलावे, काय बोलू नये, कसे बोलावे यांसारख्या अनेक गोष्टी सहजतेने रूजल्या जातात. जगप्रसिद्ध विचारवंत मार्क ट्वेन यांनी म्हटले आहे की, ज्यांच्या जवळ चांगली पुस्तके आणि चांगले मित्र असतील तर जीवन आदर्शाची वाटचाल करू लागते. पुस्तकात स्वतःला गुंतवून ठेवणे म्हणजे

स्वर्गसुखाचा आनंद घेणे आहे. आपण पुस्तकात रमतो तेव्हा त्यात स्वर्गसुखाचा आनंद अनुभवतो. पुस्तके माणसाला जगण्यासाठी लागणारी शक्ती देतात. विचाराची दिशा, सृजनाची वाट दाखवतात. माणसांतील संवेदनशीलता निर्माण करतात. संयमाचे भान देण्याचे काम पुस्तके करतात. पुस्तके म्हणजे मूल्यांची पेरणी आहे. पुस्तके माणसाला अधिक विज्ञानवादी आणि विवेकाच्या दिशेचा प्रवास घडवतात. पुस्तके माणसांची मने पेटवतात. आपल्या देशात क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिकांच्या लढ्यामुळे या देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि या देशातील लेखक, नाटककार, कवी यांनी आपल्या साहित्यातून जी विचारांची पेरणी केली त्यातून स्वातंत्र्यसमरासाठी अनेकांची मने पेटवली आहेत. ती मने पुस्तकात दडलेल्या विचाराने प्रज्वलीत झाली आहेत.

वर्तमानात हिंसा वाढते आहे. विविध कारणाने द्वेषही वाढत आहे. दोन समाजांत संघर्ष वाढत आहे. समाजात भ्रष्टाचार दिवसेंदिवस वाढत आहे. जातीभेदाच्या भिंती भक्कम होत आहेत. अशा वेळी त्यावर मात करायची असेल तर आपल्याला पुस्तकांची सोबत आवश्यक आहे. जगाच्या पाठीवर अनेक राष्ट्रप्रमुख आपला देश महत्त्वाचा मानतात. देशाशी थोडीही बेईमानी करण्यास धजावत नाहीत. मोठ्या पदावर असूनही कर्तव्यपरायणता जपतात. स्वत:ची कामे स्वत: करणे पसंत करतात. चुकून सरकारी एटीएमचा उपयोग करीत खासगी वस्तू खरेदी केली तर त्यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराला सर्वोच्च उमेदवारी गमवावी लागते. आपल्या पदाचा उपयोग करून पत्नीने कोणाला तरी लाभ दिला आणि ही बातमी कळल्यावर एखादा राष्ट्राचा माजी अध्यक्ष आत्महत्या करतो.

मग न्यायालयात केस नाही आणि निकाल नाही तरी केवळ आरोप झाला म्हणून स्वतःला संपविणारे राजकारणी जगात आहेत. अशा कितीतरी संवेदनशील माणसांनी आपला समाज बनला आहे. पैसा हे जीवनाचे सर्वस्व नाही. पुस्तके हीच जीवनाची संपत्ती आहे, असे मानणारी माणसं भोवतालात आहेत. जगाच्या पाठीवर अणुबॉम्बचा जनक म्हणून अवघे जग ज्यांना मानते ते जे रॉबर्ट ओपेनहायमरसारखे जगप्रसिद्ध वैज्ञानिक नेहमीच आपल्यासोबत भगवद्गीतेसारखा ग्रंथ बाळगत. कलामांची जीवनभराची संपत्ती तर पुस्तकेच होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात पुस्तकांचे स्थान अनन्यसाधारण होते. त्यांच्यासाठी पुस्तके म्हणजे जीव की प्राण होता. सर्व गेले तरी चालेल पण पुस्तके जीवनातून जाता कामा नयेत, असे ते म्हणत. पुस्तकांनी या माणसांच्या जीवनात परिवर्तन घडविले आहे. जगाच्या पाठीवर अशी अनेकांना प्रेरणा मिळाल्याने त्यांना आपले स्थान निर्माण करता आले आहे.

पुस्तकांनी जगाकडे पाहण्याची दृष्टी बदलली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर संस्कार आणि मूल्यांची पेरणी करायची असेल, सुयोग्य दृष्टिकोन विकसित करायचा असेल तर मुलांच्या हाती पुस्तक देण्याची गरज आहे. कोणाच्या मनावर काही लादण्याऐवजी त्याला स्वतःला विचार करता यायला हवा. त्याकरिता पुस्तके हाती देण्याशिवाय पर्याय नाही. जगाच्या पाठीवर प्रगत राष्ट्र निर्माण करायचे असेल तर तेथील नागरिक प्रगत हवेत. एकवेळ आर्थिक समृद्धता निर्माण करता येईल, पण माणसं समृद्ध करण्यासाठी आपल्याला पुस्तकांशिवाय दुसरा पर्याय नाही. प्रगतीसाठी अनेक देशांनी ग्रंथालये निर्माण केली. आपल्याला त्या स्वरूपात सार्वजनिक ग्रंथालय निर्माण करण्यात अपयश आले आहे. त्याच वेळी उद्याचे भविष्य जेथे घडते तेथे तरी पुस्तकांची गर्दी असायला हवी.

मुलांच्या हाती आज पुस्तके देणे म्हणजे उद्याच्या विकासाचा महामार्ग, उद्याची समृद्ध परंपरा निर्माण करणे आहे. आज माणसं माणसांसारखी वागत नाहीत. माणसांचा शोध घेण्याचा प्रयत्न होत आहे, पण भोवतालात तत्त्वहीन माणसांची गर्दी अनुभवता येते. याचे कारण तत्त्वनिष्ठ जगणे अनुभवणारी उंचीची माणसं पुस्तकातून मुलांच्या मस्तकात पोहचली नाहीत. त्यामुळे मस्तके घडली नाहीत. पुस्तके मस्तके घडवितात. ती आज न घडल्याने मनावर प्रभावहीन विचारही परिणाम करीत आहे. सत्याची कास सुटत चालली आहे. विवेकाची वाट हरवत चालली आहे. ज्ञानाची उपासना थांबली आहे. अशा वेळी विचार करण्याची गरज आहे.

राज्यातील उपलब्ध माहितीनुसार सुमारे एक लाख सहा हजार प्राथमिक शाळा आहेत. त्यापैकी ११ हजार ३२१ शाळांकडे ग्रंथालय सुविधाच उपलब्ध नाही. २८ हजार माध्यमिक विद्यालये असून १ हजार ४०२ शाळांना ग्रंथालये नाहीत. शाळा म्हणजे केवळ पाठ्यपुस्तक शिकवणे नाही. पाठ्यपुस्तके शिकणे हा एकूण शिक्षण प्रक्रियेचा एक भाग आहे. त्यामुळे ग्रंथालये आणि अवांतर वाचन शिक्षणाचा अविभाज्य भाग बनत नाहीत, तोपर्यंत शिक्षणाचे ध्येय साध्य होण्याची शक्यता नाही. विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रूजवण्यासाठी संस्काराचे वर्ग ही तात्पुरती मलमपट्टी आहे. लाचलुचपतचा कायदा असूनही भ्रष्टाचार थांबला नाही. कारण निर्मळ मनाची अंत:करणे घडविण्यात आपल्याला यश मिळू शकले नाही. त्यामुळे हाती पुस्तके देऊन मस्तके घडविण्यासाठी पावले टाकण्याची गरज आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -