घरफिचर्ससारांशलांबलेल्या ‘मान्सून’ पावसाची बदनामी

लांबलेल्या ‘मान्सून’ पावसाची बदनामी

Subscribe

देशातील सर्वच राज्यांत धुवांधार पाऊस कोसळत आहे. शेतीचे भयंकर नुकसान होत आहे. राज्यात जवळपास सर्व विभागात गारपीट झाली आहे. अवकाळी पाऊस कधीच असा तासंतास किंवा तीन तास, आठवडे -आठवडे किंवा महिनो-न-महिने चालत नाही. यामुळे नागरिकांना प्रश्न पडलाय कि याला ’लांबलेल्या मान्सून’चे नवे रुपडे म्हणायचे? अवकाळीच्या नावाने लांबलेल्या मॉन्सूनच्या पावसाची बदनामी अजून किती काळ चालणार ?

‘पुढील पाच दिवसांच्या कालावधीत ’अवकाळी’ बरसणार!’ अशा बातम्या प्रसिद्ध होत आहेत. ’अवकाळी’ पाऊस याचा अर्थ क्वचित-अनपेक्षितपणे-कुठल्याही सुचनेशिवाय येणारा पाऊस होय. अधिकृत यंत्रणा या गेल्या अनेक दशकांपासून सांगत आल्या आहेत की अवकाळी पाऊसाची सूचना किंवा अंदाज जाहीर करता येत नाही कारण तो अचानक येतो आणि जातो देखील! जर पुढिल पाच दिवस पाऊस कोसणार असेल तर तो अवकाळी पाऊस कसा म्हणता येईल?… मग प्रश्न हा पडतो कि महिनोन्महिने आणि अनेक आठवडे संपूर्ण देशभर कोसळत जो पडतो आहे तो अवकाळी पाऊस कसा असेल?

१३ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी पुण्यात सलग जवळपास तीन तास पाऊस झाला आणि लोक तासंतास ट्रॅफिकजाममध्ये अडकले. हे शास्त्रीयपणे सिद्ध करतेय कि क्यूमोलोनिंबस ढगांमध्ये मॉन्सूनच्या निम्बोस्ट्रेटस ढगांची सरमिसळ होत आहे. अवकाळी पाऊस कधीच असा तासंतास किंवा तीन तास, आठवडे -आठवडे किंवा महिनो-न-महिने चालत नाही असा शेकडो वर्षाचा इतिहास आणि अनुभव आहे. यामुळे नागरिकांना प्रश्न पडलाय कि याला ’लांबलेल्या मान्सून’चे नवे रुपडे म्हणायचे नाही तर हे दुसरे काय आहे? आणि अवकाळी च्या नावाने लांबलेल्या मॉन्सूनच्या पावसाची बदनामी अजून किती काळ चालणार ? नारोवा-कुं-जरोवा करीत चांगला मान्सून आणि दुष्काळ अश्या दोन्ही गोष्टी सांगत आणि पाच टक्के प्लस मायनस एरर सांगत ’अधिकृत डबलढोलकी’ बडवली जात असेल तर सामान्यजनांनी कोणाकडे पाहावे?

- Advertisement -

खरंतर मान्सून म्हणजे पाऊस! सध्या ’मान्सून’चाच पाऊस आहे हे छातीठोकपणे अधिकृतपणे सांगत शेतकर्‍यांचे नुकसान टाळणे शक्य नाही का?….मात्र बिनपावसाचा मान्सून असतो अशी नवी व्याख्या जनमानसात रूजविण्यासाठीचे २०१८ सालीचे व आधी ही झालेले प्रयत्न पाहून मान्सून देखील म्हणत असेल कि काय या मानवी ’कळा’ आणि अजून किती काळ शेतकरी सहन करेल या ’झळा’? ‘मान्सून’हा शब्द अरबी भाषेतून आला आहे. मौसिम या शब्दाचा अरबी भाषेत अर्थ ‘ऋतू’किंवा ‘हंगाम’असा होतो. नैर्ऋत्य मोसमी वार्यांना आणि त्यासोबत बरसणार्या पावसाला ‘मान्सून’ हे नाव ब्रिटिशांच्या आगमनानंतर प्राप्त झाले. समुद्रावरून येताना हे वारे मोठ्या प्रमाणात बाष्प आणतात. अनुकूल स्थितीमध्ये या बाष्पाचे रूपांतर ढगांमध्ये होते. या ढगांना योग्य तो थंडावा मिळाला की ते जलधारा बनून पडतात, त्यालाच आपण पाऊस म्हणतो आणि हाच तो ’मान्सूनचा पाऊस’ होय.

भारताच्या एकूण वार्षिक पावसात ७० टक्के वाटा हा एकट्या मॉन्सूनचा (नैर्ऋत्य मोसमी वारे) आहे. महाराष्ट्र राज्यात प्रत्येक वर्षी सरासरी १ हजार १४० पुर्णांक ३० मिलीमिटर पाऊस पडतो. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमनेश्वर तालुक्या मध्ये सर्वात जास्त म्हणजे सरासरी ३ हजार ५४८ मिलीमिटर पाऊस तर सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यामध्ये सर्वात कमी म्हणजे सरासरी ३२५ मिलीमिटर पाऊस पडतो होते स्पष्ट झाले आहे. भारतीय लोकसंख्येतील ६४ टक्के म्हणजे ८८ कोटी ३२ लाख इतकी जनता कृषिक्षेत्रावर अवलंबून आहे. शेतकर्‍यांचे उत्पन्न आणि त्यांची पिकांचे नियोजनाचा गाडा हा थेट या मॉन्सून व ’अंदाज’ नावाने हवामानाच्या (न) मिळण्यार्या माहितीवरच अवलंबून आहे.

- Advertisement -

खरंतर जून ते सप्टेंबर हा कागदोपत्री दफ्तरी नोंद होणारा मान्सून! परंतु २००५ सालापासून मान्सून पॅटर्न बदलाला हे अभ्यासाअंती सांगून आणि अधिकृतपणे स्विकारल्या नंतर परत घुमजाव करीत शेतकर्यांचे नुकसान करून आपण काय साध्य करणार आहोत? भारतीय अर्थव्यवस्थेला तडाखे बसत आहेत आणि अधिकृत संवेदनशीलता हलवली कि काय हा प्रश्न पडतो.

’एक्स’ चा ’सी’ आणि सह्याद्री हि गायब?

एक्स बँड डॉप्लर रडार यंत्रणा न लावता चिनी बनावटीचे सी बँड डॉप्लर रडार मराठवाड्यात लावतांनाचा घाट घातला जातो आहे. उत्तर महाराष्ट्राला एक्स बँड डॉप्लर रडार मिळू नये यासाठी दिल्लीच्या नकाशातून सह्याद्रीच्या पर्वत रांगा गायब करण्याचे कसब असणारे अधिकृत महाभाग या देशात आहे. ’एक्स’ चा ’सी’ आणि सह्याद्री हि गायब? हे महाराष्ट्रातील सत्य आहे यावर कुणीही कदाचित विश्वास देखील ठेवणार नाही. मान्सून पॅटर्न मध्ये काहीच बदल नाही हे थेट पंतप्रधानांच्या तोंडून वदवून घ्यायला देखील कमी करणार नाही हे वास्तव आहे.

दिशाभूल राजकिय नेतृत्वाची!

खरंतर भारतीय राजकिय नेतृत्व हे काही संशोधन क्षेत्रातील पंडित नाही. परीणामी त्यांची दिशाभूल करणे शक्य होते हे याआधी देखील दिसून आले आहे. जिथे रेड अलर्ट देत देशाच्या पंतप्रधानांना २०० मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस होणार असे सांगून नागपूरचा दौरा रद्द करण्याचे सामर्थ्य हवामान तज्ज्ञांमध्ये आहे त्याच वेळी हे ऊन पाडणारा सूर्य देखील साक्ष देत पहात आहे.

सध्या काश्मीर पासून पंजाब, हरीयाणा, दिल्ली, राजस्थान, गुजरात उत्तर व दक्षिणेकडील सात राज्यांसह मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील राज्यात एकाचवेळी कोसळत आहे. गंमत म्हणजे भारतभरात पाऊस सुरू असल्याचे हवामाना संदर्भात काम करणार्या अधिकृत यंत्रणांनी देखील आता प्रांजळपणे कबूल केले आहे. मात्र यामागे वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजे हिमालयाला वळसा घालत अफगाणिस्तान मधून येणारे वारे जबाबदार आहे असे सांगितले जाते आहे. गंमत म्हणजे ऑगस्ट २०२२ पासून एप्रिल २०२३ म्हणजे तब्बल ९ महिने कालावधीतील जवळपास दिड ते दोन महिने कालावधी सोडला तरी गेली सात महिने पेक्षा जास्त काळ हे वारे वाहत असतील तर हा नवीन शोध म्हणावा लागेल. बरं पश्चिमीवारे एकाचवेळी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत विविध राज्यांत पाऊस देत ईशान्येकडील सात राज्यांत देखील पाऊस देतात तेव्हा वार्याची दिशा आणि शेतकर्‍यांची दशा राजकीय नेतृत्वाने तरी राष्ट्रीय हित व जनहितासाठी समजून घ्यायला हवी.

*धोक्याचा इशारा!*

हवामान बदलांकडे दुर्लक्ष केले याची किंमत ऑस्ट्रेलिया देशातील सरकारला मोजावी लागली. संपूर्ण वर्षभरात कोसळणार्‍या पावसाच्या तीनपटीपेक्षा जास्त पाऊस अवघ्या २४ तासात कोसळला आणि जनक्षोभाच्या व क्रोधाच्या लाटेत सरकार दुवून सुपडा साफ झाले हे २०२२ चे वास्तव आहे. गेल्या ३० वर्षांपासून मान्सून व हवामानाचा अभ्यास करूनही अज्ञानाची जाणीव असलेल्या माझ्या सारख्या एका सर्वसामान्य हवामान अभ्यासकांच्या ज्ञानात वृद्धी होईल असे उत्तर अधिकृत यंत्रणा मधील ब्रम्हदेव कदाचित देणार नाही. परंतु राजकीय नेतृत्वाने तरी यांची गंभीरपणे दखल घेत आवश्यक आहे.

जगात फक्त २.७ % पिण्यायोग्य पाणी आहे. दक्षिण अफ्रिका या देशातील मुख्य शहर केपटाऊन हे जगातील पहिलं पाणी विरहित शहर म्हणून जाहीर झालं आहे, त्यांच्या सरकारने १४ एप्रिल २०२३ नंतर पाणी पुरवठा करू शकणार नाही. लातुरला देखील रेल्वेने पाणी पुरवठा करावा लागला होता असे मेससेजे सोशल मीडिया वर व्हायरल होऊन देखील आपण किती गंभीर आहोत ? हा प्रश्न आहे.

*मान्सूनच्या कळा आणि झळा*

सध्याचा पाऊस हा कधी ’अवकाळी’ तर कधी ’मान्सूनपुर्व’ असल्याचे वर्णन प्रसार माध्यमातून सांगितले जाते आहे. मान्सूनचा पॅटर्न बदला बरोबरच, शेतकरी हितासाठीचे सर्वसामान्य जनतेच्या ’थिंकिंग पॅटर्न’ मध्ये देखील बदलाची आवश्यकता आहे. ’एक्स्टेंडेड मान्सून’ देखील हे हताशपणे पहात नसेल ना ? म्हणूनच तर तो कोसळत आपले दु:ख व्यक्त करीत शेतकर्‍यांचे दुःख वाढवीत नसेल ना ?…. असे अनेक प्रश्न आहेत. २०२५ सालाकडे आपली वाटचाल सुरू आहे. ’सोलर मॅक्झिमा’ कदाचित भारत आणि महाराष्ट्रासह इतर देशात देखील ५० अंशाच्यावर तापमान नेऊ शकतो याची सर्वसामान्य जनतेला कल्पना नाही. येत्या काळात ’एक्स्टेंडेड मान्सून’ चा पाऊस कसा बरसात गायब होऊन वैशाख वणव्याने जनता होरपळून निघेल याचे उत्तर काळच देईल!

*अन्नसुरक्षा धोक्यात!*

’एक्स्टेंडेड मान्सून’ नाकारले तरी झालेल्या पावसाने नुकसान भरपाई आणि अन्नसुरक्षा यासाठी काय उपाययोजना आणि कृतीकार्यक्रम अधिकृतपणे जाहीर होतो हे पहावे लागणार आहे. आता फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल मध्ये होत असलेला पाऊस हा मान्सून नाही असे जरी क्षणभर गृहीत धरले तर मग तो संपूर्ण देशाच्या का आणि कसा कोसळतो आहे? समजा हा पाऊस होणार हे आधीच माहित होते तर हि माहिती शेतकर्यां पासून आणि राजकीय नेतृत्वापासून लपवीत ’लांबलेल्या पावसाची बदनामी’ का केले गेली ? महाराष्ट्रासह देशातील राज्याराज्यांत झालेले शेतीचे अपरिमित नुकसान भरून काढणे केवळ अश्यक्य आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला हादरे हा पाऊस देतो आहे. अन्नधान्याच्या नासाडीने घराघरातील किचनमध्ये महागाईच्या झळा पोहचणार हे देखील आता पक्के आहे. शेतकर्‍यांची फसवणूक झालेल्या नुकसानीची जबाबदारी, ’लांबलेल्या पावसाची बदनामी’ करणारी यंत्रणा अधिकृतपणे स्वीकारणार का? म्हणूनच दुष्काळाच्या झळा आणि मान्सूनच्या कळा यांचा धैर्याने मुकाबला करण्याची तयारी हवी!

–*(लेखक हवामान अभ्यासक आहेत)*

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -