घरफिचर्ससारांशभावभक्तीची अमृतगाथा .!

भावभक्तीची अमृतगाथा .!

Subscribe

वारकरी पंथालाच भागवत पंथ म्हणून ओळखले जाते. हा पंथ वैष्णव मार्गी आहे. विष्णू ही या पंथाची उपास्य देवता. असे असले तरी मराठी संस्कृतीने याचेही मराठीकरण करून विठ्ठल रूपातच विष्णूची पूजा केली. त्यामुळे भारतातील इतर वैष्णव पंथापेक्षा वारकरी पंथाचे हे महत्त्वाचे वैशिष्टे आहे. विठ्ठल भक्तीच्या माध्यमातून महाराष्ट्राचे समाजमन सुसंस्कारित करून भक्ती व रंजन या दोन्ही गरजा या संप्रदायाने भागवल्या. कीर्तनासारखे लोकमाध्यम प्रभावी करून आणि समाजमनाच्या मशागतीतून मराठी संतानी ज्ञान व भक्तीचा मळा फुलवला. म्हणूनच पंढरीची वारी, दिंडी आणि कीर्तन ही कला महाराष्ट्र संस्कृतिची मानबिंदू ठरली.

–डॉ. अशोक लिंबेकर

बुडती हे जन न देखवे डोळा या भूमिकेतून वारकरी संप्रदायाची पायाभरणी झाली. संत ज्ञानेश्वरांनी या भागवतधर्मरुपी भक्ती मार्गाची जरी मुहूर्तमेढ रोवली असली तरी; ज्ञानेश्वरांच्या आधीपासून विठ्ठल भक्तीची परंपरा होती. भक्त पुंडलिकाची मातृभक्ती आणि विठ्ठल भक्ती सर्वश्रुतच आहे .संत ज्ञानेश्वरांनी याच पंथाला संघटनात्मक व तत्वज्ञानात्मक अधिष्ठान दिले. किंबहुना या पंथाला लोकाभिमुख करण्याचे काम ज्ञानदेवादी संतानी केले.संत नामदेवामुळे वारकरी पंथ बहुजनापर्यंत पोहचला. त्यामुळेच नामदेवांना वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवतृक मानले जाते. महाराष्ट्रातच नाही तर पंजाब प्रांतात भगवी पताका व विठ्ठल भक्तीचा महिमा नेण्याचे कार्य त्यांनी केले. म्हणूनच आंतरभारतीची संकल्पना संतानी या कृतीतून केलेली दिसते. हा कालखंड यादव काळ म्हणून ओळखला जातो. देवगिरीचे यादव राजे हे वैदिक धर्माचे कट्टर पुरस्कर्ते होते.

- Advertisement -

या काळात अवास्तव कर्मकांडाचे इतके स्तोम माजले होते की यज्ञयाग, व्रतवैकल्ये, यातून तत्कालीन समाजाचे धार्मिक शोषण होत होते. यादव राजांचा प्रधान हेमाद्री पंडित याचा ‘चतुवर्ग चिंतामणी’ हा ग्रंथ याची साक्ष देतो. या ग्रंथात २ हजार व्रत-वैकल्याची माहिती देण्यात आली आहे. या वरून तत्कालीन धार्मिक परिस्थितीचे अनुमान आपण करू शकतो. सामान्य जनाची ही परिस्थिती पाहून, त्यांचे धार्मिक शोषण थांबविण्यासाठी हे भक्तीप्रवण व उपासना मार्गी पंथ महाराष्ट्रात उदयास आले. या पंथाने वैदिक परंपरेला विरोध केला नाही; तर या परंपरेतील अनिष्ठ धार्मिक प्रथावर प्रहार करून सुलभ भक्तीची शिकवण दिली.

भाष्यकाराते वाट पुसतु अशी जरी विनम्र जाणीव ज्ञानदेवाच्या मनात असली तरी प्रसंगी जे रुचले नाही, पटले नाही त्यांचे विनम्रपणे खंडन करण्याचे नैतिक धेर्य त्यांनी दाखवले.शंकराचायार्चे ब्रह्म सत्य जगन्मिथ्या या तत्वज्ञानाचे खंडन करून त्यांनी चिद्विलास या तत्वज्ञानाची मांडणी केली. ब्रह्म सत्य असेल, ईश्वर सत्य असेल तर त्यानेच निर्माण केलेला हा विश्वाचा पसारा म्हणजेच विश्वविलास खोटा कसा असेल ? हा रोकडा प्रश्न त्यांना पडला आणि त्यातूनच ज्ञानदेवाच्या चिद्विलासवाद या तत्वज्ञानाची निर्मिती झाली. अमृतानुभव हा ग्रंथ ज्ञानदेवांच्या या तत्वचिंतनाचा द्योतक आहे. विश्वामध्ये एकच आत्मतत्त्व व्यापलेले आहे, अशी अद्वैतवादी भूमिका ज्ञानेश्वर मांडतात.ते जगताला चिद्विलास म्हणजेच ब्रह्माची लीला मानून जगत हे ब्रह्मापासून वेगळे नाही, असे प्रतिपादन करतात. हे सांगण्यासाठी त्यांनी खूप सुंदर दृष्टान्त दिले. ते म्हणतात…

- Advertisement -

म्हणोनि वन्हि आणि ज्वाल | दोन्ही वान्हिची केवळ|तेबी मी गा सकळ | सबंधु वावो | तसेच ज्याप्रमाणे सोन्यापासून अलंकार बनविल्यानंतर त्याचे सोनेपण नाहीसे होत नाही. तसेच ब्रह्म आणि जगताचे आहे. यापुढे जाऊन जे जे भेटे भूत | ते ते मानिजे भगवंत | ही सर्वांभूती ईश्वर पाहण्याची सर्वव्यापी भूमिका ज्ञानदेव मांडतात. त्यांच्या या भूमिकेमागील प्रेरणा नाथपंथात आहे. नाथपंथीयांनी प्रथमच सर्व वर्णाश्रमियाना,स्त्री-शूद्रादिकांना आध्यात्मिक साधनेचा मार्ग खुला केला होता. ज्ञानदेवाची गुरुपरंपरा नाथपंथीय असल्याने या प्रेरणेतूनच वारकरी पंथाचे तत्वज्ञान निर्माण झाले . गहिनी प्रसादे निवृत्ती दातार |ज्ञानदेवा सार चोजविले | या उक्तीतून ही परंपरा लक्षात येते. नाथ संप्रदाय न सोडता व नाथ पंथातील सर्वस्व न स्वीकारता या पंथालाच त्यांनी वारकरी संप्रदायात विलीन केले. आणि एक नवा भक्तिमार्ग वारकरी पंथाच्या रूपाने प्रतिष्ठापित झाला. या अभिसरणातून हरिहराचे म्हणजेच शिव आणि विष्णू या देवांचे ऐक्यही त्यांनी साधले. ज्ञानेश्वरांची प्रयोगशीलता व समन्वयवादी दृष्टीचे दर्शन इथे घडते.

वारकरी संप्रदायाला तात्विक, सामाजिक, पारमार्थिक व वाड़मयीन अधिष्ठान देण्याचे महत्कार्य संत ज्ञानदेवांनी केले. त्यांची ही कृती सर्वाथाने बंडखोरीच होती म्हणूनच कवी बी यांनी याबाबत म्हटले आहे की, या बडे बंडवाल्यात, ज्ञानेश्वर माने पहिला, परंपरेच्या विरुद्ध केलेले हे कृत्य तत्कालीन धर्म मार्तंडाना कसे रुचणार? त्यामुळेच ज्ञानेश्वरापासून तुकोबापर्यंतच्या संतमंडळीना कर्मठ लोकांच्या प्रतिकाराला तोंड द्यावे लागले. वास्तविक पाहता मराठी संताच्या या कार्याकडे प्रबोधनाची चळवळ म्हणूनच पाहायला हवे होते; परंतु संत साहित्याकडे या दृष्टीकोनातून पाहण्यासाठी विसावे शतक उजाडावे लागले. आजही या पंथाकडे केवळ पारमार्थिक दृष्टीनेच पाहिले जाते. त्यामुळे संत साहित्यातील विश्वात्मकता, सामाजिकता, भौतिकता, कलात्मकता व ऐहिकता या अंगाकडे दुर्लक्ष झाले. भागवत धर्माच्या व्यासपीठावरून विश्वात्मक देवाला साकडे घालणारे ज्ञानदेव अखिल विश्वाच्याच कल्याणाची चिंता वाहत होते. वैश्विकीकरणाचा पहिला आवाज मराठीतील संत साहित्यातून आणि वारकरी पंथाच्या माध्यमातून जगभर घुमला होता हे दुर्लक्षिता येणार नाही.

वारकरी पंथालाच भागवत पंथ म्हणून ओळखले जाते. हा पंथ वैष्णव मार्गी आहे. विष्णू ही या पंथाची उपास्य देवता. असे असले तरी मराठी संस्कृतीने याचेही मराठीकरण करून विठ्ठल रूपातच विष्णूची पूजा केली. त्यामुळे भारतातील इतर वैष्णव पंथापेक्षा वारकरी पंथाचे हे महत्त्वाचे वैशिष्टे आहे. विठ्ठल भक्तीच्या माध्यमातून महाराष्ट्राचे समाजमन सुसंस्कारित करून भक्ती व रंजन या दोन्ही गरजा या संप्रदायाने भागवल्या. कीर्तनासारखे लोकमाध्यम प्रभावी करून आणि समाजमनाच्या मशागतीतून मराठी संतानी ज्ञान व भक्तीचा मळा फुलवला. म्हणूनच पंढरीची वारी, दिंडी आणि कीर्तन ही कला महाराष्ट्र संस्कृतिची मानबिंदू ठरली.

मराठी माणसाला अस्मानी व सुलतानी संकटाच्या काळातही लाचार होऊ न देता त्याला जगण्याची उर्जा दिली. दर आषाढीला पांडुरंगाची उर्जा घेऊन मराठी माणूस नको खेद करू कोणत्या गोष्टीचा |पती लक्ष्मीचा जाणतसे | असे म्हणत तुझी चिंता त्यासी सर्व आहे या संत वचनावर विसंबून राहतो. हा मानसिक आधार नसता तर किती जीवन यात्रा संपल्या असत्या? त्यामुळेच वारकरी संप्रदाय म्हणजे मराठी माणसाचे सर्वाथाने उर्जाकेंद्र आहे. तेराव्या शतकापासून ते आजपावेतो हा भक्तीगंगेचा प्रवाह अखंडितपणे प्रवाहित आहे. ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि सकळ संतानी ह्या भागवतधर्म रुपी मंदिराच्या समतेची, ऐक्याची पताका सदैव फडकत ठेवली आहे. याचे सार्थ वर्णन संत बहिणाबाईने केले आहे. संत कृपा झाली |इमारत फळा आली|. ज्ञानदेवे रचिला पाया|उभारिले देवालया|| नामा तयाचा किंकर |तेणे केला हा विस्तार || जनार्धन एकनाथ |खांब दिला भागवत || तुका झालासे कळस |भजन करा सावकाश ||

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -