घरफिचर्ससारांशमहापुरुषांविषयी गरळ कशासाठी!

महापुरुषांविषयी गरळ कशासाठी!

Subscribe

एकीकडे देशाचा आणि राज्याचा झपाट्याने विकास होत असल्याचे दावे सत्ताधार्‍यांकडून केले जात असताना दुसरीकडे याच सत्ताधार्‍यांकडून महापुरुषांच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्ये करून वातावरण बिघडवले जात आहे. मूळ मुद्यांना बगल देण्यासाठी अशी वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत, हे जरी सर्वश्रुत असले तरीही त्यातून वाद उद्भवत असल्याने संबंधितांचे ईप्सित साध्य होत आहे.

– राकेश मुंडावरे

देशासह आपले महाराष्ट्र राज्य जर प्रगतीच्या दिशेने झेप घेत असेल तर झेप घेण्यासाठी पंखात बळ देणार्‍या युवकांना प्रोत्साहन मिळेल अशी वक्तव्ये सत्ताधार्‍यांकडून व्हायला हवीत. किंबहुना विकासाला प्रोत्साहन देत वादग्रस्त विषयांना तिलांजली देण्याचे प्रथम कर्तव्य सत्ताधारी पक्षांचेच आहे. विकासाला प्रोत्साहन देतानाच बेरोजगारी, व्यसनाधिनता, महिलांवर होणारे अत्याचार, मागासवर्गीयांवर होणारे अत्याचार, शेतकर्‍यांच्या समस्या याकडेही लक्ष देणे क्रमप्राप्त आहे. प्रत्यक्षात गेल्या तीन ते चार महिन्यांपासून सोशल मीडिया, वृत्तवाहिन्या तसेच वर्तमानपत्र यांच्यात मात्र सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करून वाद ओढावून घेतला जात आहे.

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराजांसह शाहू, फुले, आंबेडकर तसेच इतर सर्व महापुरुष हे राज्यातील युवकांचे आदर्श व प्रेरणास्थान आहेत आणि त्यांच्याबद्दल अशी वक्तव्ये करून नेमके काय साध्य होणार? मला येथे महापुरुषांबद्दल जाणीवपूर्वक नमूद करावेसे वाटत आहे की, शौर्य व धैर्याची मूर्ती, भारताचे शूर पुत्र छत्रपती शिवाजी महाराज एक महान देशभक्त आणि कुशल प्रशासक होते. एकीकडे ते खूप सामर्थ्यवान होते, तर दुसरीकडे ते दयाळूपणासाठीदेखील ओळखले जातात. महाराष्ट्राच्या रयतेच्या मनावर त्यांनी अधिराज्य गाजवले. अशा छत्रपती शिवरायांना कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या शौर्याच्या गाथा येणार्‍या प्रत्येक पिढीला मोठ्या अभिमानाने सांगण्यात येतील. म्हणून आम्ही आज छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहोत, परंतु जर आमच्या या आदर्शाप्रतीच सातत्याने कुणी गरळ ओकत असतील तर ती आम्ही सहन तरी किती काळ करायची? आणि का म्हणून करायची?

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे सर्व क्षेत्रातील कार्य अलौकिक आहे. सामाजिक सुधारणेबरोबरच राजर्षींनी साहित्य, कला, कुस्ती, शेती सुधारणा, जलप्रकल्प उभारणी अशा विविध क्षेत्रांमध्ये अजोड कामगिरी केली आहे. आजही त्यांच्या कार्याची ओळख शहरातील भव्य अशा वास्तूंमधून प्रकर्षाने समोर येते. खासबाग कुस्त्यांचे मैदान असो, साठमारी असो, जनतेसाठी सुरू केलेले छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटल असो वा त्यांच्या उदार आश्रयाखाली सुरू असलेल्या सांस्कृतिक संस्थांच्या इमारती असोत; त्या नेहमीच प्रेरणादायी ठरत आहेत. त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक उच्च दर्जाचे तत्त्वज्ञ, समाजसुधारक, क्रांतिकारक आणि भारतीय राज्यघटनेचे निर्माता आहेत. भारतरत्न पुरस्काराने सन्मानित झालेले डॉ. भीमराव आंबेडकर यांनी समाजातील जातीभेद दूर करण्यात मोठे योगदान दिले. त्यांचे आयुष्य खूप संघर्षपूर्ण होते आणि सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात त्यांनी भारतासाठी अविस्मरणीय योगदान दिले, म्हणूनच त्यांना आधुनिक भारताचा निर्मातादेखील म्हटले जाते. आज महिला अभिमानाने प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहेत आणि शिक्षणाचा वारसा पुढे घेऊन जात आहेत. त्याची सुरुवात ज्या आधुनिक महापुरुषाने करून दिली ती व्यक्ती म्हणजे भारतातील आधुनिक समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले.

- Advertisement -

पुण्याला मुलींची पहिली शाळा सुरू करून आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी सुशिक्षित केले. देशातील पहिली शिक्षिका असण्याचा मान सावित्रीबाई फुले यांना मिळाला. अशा थोर समाजसेवक आणि समाजसुधारकांचे नाव आणि त्यांचे विचार हे नेहमीच आपल्याला विकासाच्या वाटेवर पुढे जाण्यासाठी मार्गदर्शक ठरतात. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जात आपली दिशा योग्य आहे हे माहीत असेल तर अगदी समाजाचे टक्केटोणपे खातही तितक्याच कणखरपणे पुढे जायला शिकले पाहिजे आणि हेच आपल्या कृतीतून महात्मा जोतिबा फुले यांनी दाखवून दिले. महात्मा जोतिबा फुले हे अत्यंत महान होते. त्यांचे विचारही तितकेच कणखर आणि महान होते. ते आपल्याला नेहमीच प्रेरणा देतात. संपूर्ण देशवासीयांना दिशा देणारे आणि प्रत्येकाला स्वाभिमानाने जगायला शिकवणार्‍या या महापुरुषांबद्दल सातत्याने वादग्रस्त विधाने करून काय साध्य होणार? त्यांनी घालून दिलेल्या आदर्शाला धक्का लावण्याचा कुणाचा हेतू असेल आणि तो काही प्रमाणात साध्य जरी झाला तरी त्यातून फलप्राप्ती काय याचा प्रत्येकाने विचार करायला हवा.

आज शिक्षण क्षेत्रात भारतानेदेखील इतर देशांच्या बरोबरीने प्रगती केली आहे. जागतिक दर्जाचे मोठमोठे प्रकल्प आज आपल्या देशात येत आहेत. त्यावर लक्ष केंद्रित करुन देशातील युवकांना रोजगाराचा संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, परंतु आपले नेते या गोष्टींकडे कानाडोळा करीत नको ते वक्तव्य करून राज्यातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे कुठेतरी थांबले पाहिजे. देशात अन्य विषय महत्त्वाचे असताना त्यावर न बोलता मोठमोठ्या पदांवर बसलेली सुज्ञ नेतेमंडळी महापुरुषांबद्दल चुकीच्या शब्दांचा वापर करून बोलत आहेत. त्यातून जनतेला भडकवण्याचा प्रयत्न करीत आहेत. खरोखरंच हे अतिशय निषेधार्ह आहे.

पक्ष वा संघटना कुठलीही असो प्रत्येकाने भान ठेवूनच बोलले पाहिजे. महापुरुष व त्यांची कामगिरी हा चेष्टेचा विषय नसून अभिमानाचा विषय आहे. आपण सदैव आपल्या महापुरुषांचे ऋणी असले पाहिजे. आज अख्ख्या जगात आपल्या महाराष्ट्रातील व देशातील महापुरुषांना मानणारे लोक आहेत. इतर देशातील लोक आपल्या महापुरुषांचा व इतिहासाचा अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी भारतात येतात यापेक्षा अभिमानाची गोष्ट दुसरी काय असणार? पण त्याची किंमत आपल्या नेतेमंडळींना नाही हे दुर्दैवच म्हणावे. या सर्वांचा विरोध हा तर होणारच. त्यातून काही विपरीत घडू नये, त्याचे तीव्र पडसाद उमटू नयेत असे जर खरोखरंच राज्यकर्त्यांना वाटत असेल, तर सर्व नेत्यांनी महापुरुषांविषयी आदरानेच बोलावे, अन्यथा विनाश जवळ आला म्हणून समजा.

(लेखक सामाजिक कार्यकर्ते आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -