घरफिचर्ससारांशही दांभिकता नव्हे काय?

ही दांभिकता नव्हे काय?

Subscribe

श्रद्धेच्या नावाने अंधश्रद्धेचा बाजार मांडणार्‍या एका भोंदू बाबाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने उघडे पाडले. त्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार केली, मात्र अंनिसच्या या कृतीविरोधात काही हिंदुत्ववादी लोकांनी नाशकात आंदोलन केले. आंदोलन करणार्‍यांनी अंनिसची भूमिका मनापासून समजून घेतली तर कदाचित त्यांचे गैरसमज दूर होतील.

भारतीय राज्यघटनेतील भाग चार ए मधील कलम ५१ ए मध्ये भारतीय नागरिकाची जी मूलभूत कर्तव्ये नमूद केलेली आहेत, त्यामध्ये इतर मूलभूत कर्तव्यांप्रमाणेच शास्त्रीय दृष्टिकोन, मानवता व अभ्यासू वृत्ती यांची वाढ करणे, असे एक मूलभूत कर्तव्य नमूद आहे. हे पुन्हा सांगण्याचे कारण एवढेच की मागील काही दिवसांत शेजारच्या राज्यातून एक व्यक्ती महाराष्ट्रात आली. या व्यक्तीने अध्यात्माच्या नावाने कार्यक्रम घेतला. अध्यात्माचा कार्यक्रम असल्याने त्याला विरोध करण्याचे काहीही कारण नव्हते, मात्र ही व्यक्ती लोकांच्या मनातील विचार, समस्या तिला प्रत्यक्ष न सांगताही ती ओळखते. हा चमत्कारच आहे, अशी अफवा जाणीवपूर्वक पसरवली गेली. त्यावर महाराष्ट्र अंनिसने आक्षेप घेतला. महाराष्ट्र अंनिसच्या कार्यपद्धतीप्रमाणे ह्या व्यक्तीच्या विरोधात पोलिसांत रितसर निवेदन देऊन तो करीत असलेला चमत्कार सिद्ध करण्यासाठी आव्हान दिले. मग मात्र त्याने पळ काढला.

प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही. श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धा बळकट करून पिढ्यान्पिढ्या ज्यांची रोजीरोटी चालू आहे, चैनबाजी चालू आहे आणि त्यांच्या या सर्व सुखवस्तू जीवनाला मुख्य अडथळा म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कारणीभूत आहे. त्यांनी या पळ काढलेल्या भोंदूबुवाला धर्माचा रंग दिला. या मूठभर मंडळींनी धर्माच्या नावाने सामान्य जणांना धार्मिक आवाहन करून अंधश्रद्धा निर्मूलन समिती बरखास्त करा आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा रद्द करा, अशी मागणी शासनाकडे करण्यासाठी नुकतेच नाशिकमध्ये गोदावरीच्या तिरी आंदोलन घडवून आणले. खरंतर अंधश्रद्धा या प्रत्येक धर्मात कमी-अधिक प्रमाणात असतात आणि आजही आहेत. समाजाच्या आणि व्यक्तीच्या विकासातील त्या एक प्रमुख अडथळा असतात. त्यांचे निर्मूलन करणे, त्यांच्याबाबत सातत्याने विविध मार्गांनी जनजागरण करणे अगत्याचे असते. तरच त्यांना अटकाव बसतो. त्यांचा प्रभाव कमी होतो. त्यातून समाजाचे अनेक प्रकारचे शोषण, हानी टळते. म्हणून अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करावे लागते.

- Advertisement -

सामाजिक तळमळीपोटी व समाजाच्या भल्यासाठी अनेक धर्मातील अनेक संत-समाजसुधारकांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम त्यांच्या त्यांच्या परीने विविध माध्यमातून आणि पद्धतींनी केले आहे.

महाराष्ट्रामध्येही अंधश्रद्धांचे समाज जीवनातील मळभ दूर करण्याचे काम संत तुकाराम, महात्मा फुले, संत गाडगेबाबा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बहिणाबाई चौधरी अशा अनेक थोर व्यक्तींनी केले आहे. त्यांच्या या कृतिशील विचारसरणीचा वारसा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मागील ३४ वर्षांपासून संघटितपणे व भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत राहून महाराष्ट्रात समर्थपणे चालवत आहे. यात काम करणारे कार्यकर्ते हे विविध समाज स्तरातील असून स्वतःचा वेळ, श्रम, पैसा खर्च करून ते हे काम करीत असतात. प्रासंगिक कार्यक्रम, उपक्रमासाठी जो पैसा लागतो तो समाजातील या कामाबाबत तळमळ असणार्‍या आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामावर ठाम विश्वास असणार्‍या दानशूर व्यक्ती जाणीवपूर्वक यथाशक्ती योगदान देत असतात.

- Advertisement -

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासारखे दूरदृष्टीचे नेतृत्व आणि उत्तम संघटन कौशल्य लाभलेल्या व्यक्तीच्या पुढाकारातून ही चळवळ साधारण ३४ वर्षांपूर्वी पुण्यात सुरू झाली. त्याच पुण्यामध्ये नऊ वर्षांपूर्वी डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा भररस्त्यात निर्घृण खून करण्यात आला, मात्र तरीही कार्यकर्त्यांनी कच न खाता धाडसाने हे काम चालू ठेवले, वाढविले आणि त्याचा विस्तारही केला. त्यामुळे समाजात देवाधर्माच्या, अध्यात्माच्या नावाने चाललेली भोंदूगिरी मोठ्या प्रमाणात आटोक्यात आल्याचे आज चित्र आहे.

सतत १८ वर्षे सनदशीर मार्गाने विविध प्रकारे संघर्ष व पाठपुरावा करून अंनिसने शासनाला जादूटोणाविरोधी कायदा करण्यास अनुकूल केले.

समाजातील विविध जाती-पोटजातींमध्ये छुप्या पद्धतीने कार्यरत असलेल्या जातपंचायतींच्या क्रूर आणि अन्यायकारक न्यायनिवाड्यांना पायबंद घालण्यासाठी सहा वर्षांपूर्वी सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा शासनाकडून मंजूर करून घेण्यात चळवळ यशस्वी झाली. या दोन्ही कायद्यांचा समाजाला मोठ्या प्रमाणात आज फायदा होत आहे आणि भविष्यातही होणार आहे यात अजिबात शंका नाही.

समाजातील अनिष्ट, अमानुष, अघोरी प्रथा परंपरांविरोधात महाराष्ट्र अंनिसने सतत आवाज उठविला. जनजागृती, प्रबोधन, सत्याग्रह, संघर्ष केला. कार्यकर्त्यांनी असह्य त्रास, यातना सहन केल्या. शिक्षण व्यवस्थेत व समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन हे मूल्य मोठ्या प्रमाणात विकसित व्हावे म्हणून दरवर्षी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर हजारो सप्रयोग कार्यक्रम सादर केले जातात. राज्यघटनेने व्यक्तीला बहाल केलेले श्रद्धा, उपासना अशा मूल्यांचे स्वातंत्र्य जपत त्याचा आदर करून फलज्योतिष, चमत्कार अशा थोतांड बाबींना जाहीरपणे आव्हान दिले जाते. तरीही अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाबाबत आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा हा अमुक एकाच धर्माच्या विरोधात असल्याची अफवा, आवई आणि हाकाटी जाणीवपूर्वक उठवली जात आहे, पसरवली जात आहे.

महाराष्ट्र अंनिसने सातत्याने १८ वर्षे पाठपुरावा केल्यानंतर महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अध्यादेश २०१३ हे विधेयक डिसेंबर २०१३ मध्ये पारित करून लागू केले. अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा रद्द करण्याची मागणी जे लोक आंदोलन करून शासनाकडे करीत होते,

प्रसारमाध्यमांना आक्रास्तळेपणाने प्रतिक्रिया देत होते त्यांच्या एकाच्याही तोंडून या कायद्याचे संपूर्ण नाव, शीर्षक जनसामान्यांना ऐकायला मिळाले नाही. विशेष म्हणजे या कायद्यात धर्म या संज्ञेचा एका शब्दानेही उल्लेख नाही. त्यांच्यापैकी कुणीतरी हा कायदा नजरेखालून घालायला हवा होता. म्हणजे हा कायदा अमुक एका धर्माच्या विरोधात आहे असे खोटारडेपणाने जाहिररित्या सांगितले गेले नसते. अंधश्रद्धा या श्रद्धेच्या क्षेत्रातील काळाबाजार असतात. लोकांच्या धर्मश्रद्धेचा, देवभोळेपणाचा आणि अध्यात्मिक ओढीचा गैरफायदा घेऊन समाजातील काही लबाड मंडळी स्वतःच्या स्वार्थासाठी हा काळाबाजार सातत्याने आणि वेगवेगळ्या स्वरूपात भरवतात आणि खुलेआम बिनदिक्कतपणे चालवतात. त्यांना चाप बसावा, त्यांच्यावर जरब बसावी, त्यांच्यात धाक निर्माण व्हावा, जेणेकरून जनसामान्यांचे देवाधर्माच्या, अध्यात्माच्या नावाने केले जाणारे, होत असलेले शोषण, फसवणूक थांबावी यासाठी प्रामुख्याने हा कायदा तयार करण्यात आला आहे.

मागील नऊ वर्षांमध्ये या कायद्यांतर्गत दीड हजारांहून अधिक गुन्हे दाखल झाले असून त्यामध्ये जवळपास सर्वच धर्मातील भोंदूबुवांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. म्हणून तो फक्त एकाच धर्माच्या विरोधात आहे, असे खोटे सांगणे याला दांभिकपणा याव्यतिरिक्त दुसरा शब्द नाही.

आजपर्यंत ज्या गुन्ह्यांचे निकाल लागले आहेत, त्यामध्ये भोंदूबुवांना जबरी शिक्षाही न्यायालयाने सुनावल्या आहेत. समाजातील उपद्व्यापी, मतिमंद, चैनखोर घटकांना अर्थार्जनासाठी भोंदूगिरी, बुवाबाजीचा धंदा बरकतीचा वाटतो. त्यांच्यापैकी अनेकांच्या चमत्कारसदृश्य कृतींचा बोलबाला केला जातो. अफवा पसरवल्या जातात. त्यांचे स्तोम पद्धतशीरपणे वाढवले जाते. त्याचा परिणाम म्हणून समाजात बुवाबाजीचे पीक जोमाने वाढू लागते. त्यातून व्यसने, व्याभिचार आणि पैशांची उधळमाधळ होत राहते.

अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा रद्द करा, अशी मागणी करणार्‍यांना हे अपेक्षित आहे काय?

हा कायदा कोणत्याही धर्माच्या विरोधात नसून प्रत्येक धर्मातील भोंदूगिरीच्या विरुद्ध उभा ठाकलेला आहे. आंदोलनकर्त्यांना हेच नको आहे काय? कोणीतरी ठोंब्या, अर्धवेडा मनुष्य कोणाच्या तरी मनातील चार गोष्टी सांगतो, त्यावरून तो चमत्कारी बुवा ठरतो. त्याला आव्हान दिले की तो पळ काढतो. खरंतर चमत्कार कधीच घडत नसतात. चमत्कारसदृश्य गोष्टी सरावाने जमू शकतात, पण ते चमत्कार नसतात, ती एक कला असते. सरावाने ती जमते. जादूगार जादूचे प्रयोग करतात, मात्र चमत्कार घडला असे ते कधीच सांगत नाहीत. मी चमत्कार करतो, दाखवतो, असे सांगणारी व्यक्ती बदमाश किंवा लबाड असते. त्यामागे त्याची बनवेगिरी, हातचलाखी, सराव, विज्ञानाच्या नियमांचा वापर किंवा रासायनिक पदार्थाचा वापर त्याने बेमालूमपणे केलेला असतो.आधुनिक विज्ञानाच्या उपलब्ध कसोट्यांवर चमत्कार सिद्ध करण्याचे आव्हान दिले की अशी व्यक्ती पळ काढते असा संघटनेचा नेहमीचा अनुभव आहे.

मागील काही दिवसांत अध्यात्माच्या नावाने कार्यक्रम घेण्यासाठी महाराष्ट्रात उतरलेल्या अशा भोंदूबुवाला संघटनेने आव्हान दिल्यानंतर त्याने पळ काढला, पण हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही. त्याला धर्माचा रंग दिला गेला. धर्माच्या नावाने जनसामान्यांमध्ये संभ्रम निर्माण केला गेला. महाराष्ट्र अंनिसच्या विरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले गेले.

श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धा पसरवून त्या बळकट करून त्याद्वारे ज्यांच्या पिढ्यान्पिढ्या पोसल्या गेल्या, आजही ज्यांची रोजीरोटी अशा फसवेगिरीच्या व लबाडीच्या धंद्याच्या माध्यमातून चालू आहे, त्यांनाच अंधश्रद्धा निर्मूलन समिती बरखास्त करा आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा रद्द करा, यासाठी सार्वजनिक ठिकाणी जाहीरपणे आंदोलन करण्याची गरज निर्माण झाली आहे. भारताच्या राज्यघटनेलाच ते आव्हान देत आहेत ही बाबही त्यांच्या लक्षात येत नाही. खरंतर शासनानेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करायला हवी. खरंतर सतीप्रथेला विरोध करणार्‍या प्रवृत्ती या याच विचाराच्या होत्या, असं इतिहास सांगतो.

महाराष्ट्र अंनिसच्या वतीने मागील तीन दशकांहून अधिक काळ अंधश्रद्धा निर्मूलनासारखे समाज परिवर्तनाचे प्रमुख काम केवळ महाराष्ट्रातल्या समाज जीवनातच नव्हे तर देशात आणि परदेशातही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे साहजिकच जनसामान्यांच्या मनात महाराष्ट्र अंनिसबाबत आपुलकी, जिव्हाळा, विश्वास बळकट झाला आहे. विविध स्वार्थाने प्रेरित होऊन देवाधर्माच्या आणि अध्यात्माच्या नावाने भोंदूगिरी करणार्‍यांना आणि तशा थापा मारणार्‍यांना महाराष्ट्रातील सामान्य, सुज्ञ माणूस कधीच बळी पडणार नाही याची पक्की खात्री आहे.

–(लेखक महाराष्ट्र अंनिसचे प्रधान सचिव आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -