घरफिचर्ससारांशरंगोत्सव आणि खाद्योत्सव!

रंगोत्सव आणि खाद्योत्सव!

Subscribe

होळीला पोळी झाली की दुसर्‍या दिवशी म्हणजे धूळवडीला नळी पाहिजेच. या मटणाचेही जातनिहाय वैशिष्ठ्य असते. काही असलं तरी मटण शिजवताना त्यात भाजलेला कांदा, आले, लसूण, कोथिंबीर यांचे वाटण, चटणी आणि गरम मसाला घातलेला असतो. कोल्हापूर जरा कोकणपट्ट्यात येत असल्यामुळे मटण विशेषत: रस्सा बनवताना त्यात ओल्या नारळाचा सढळ हाताने वापर केलेला असतो. धूळवडीच्या दिवशी शाकाहारी लोकांकडेही वडीची आमटी, मासवडी, गोळ्याची किंवा सांडग्याची, बटाट्याची दूध आमटी असे तिखटजाळ.. मसालेदार प्रकार बनतात.

मार्च महिना…हा भारतीय महिन्यातला शेवटचा महिना फाल्गुन..या सुमारास, पळस, पांगारा, सावर आणि अनंत प्रकारच्या रंगीबेरंगी आणि गंधभरल्या फुलांनी आणि गाणार्‍या पाखरांनी सृष्टी जणू भारून गेलेली असते. ‘फागुन पौर्णिमा-फगवाह’ म्हणजे तर या वसंतातल्या रंगोत्सवाची सम्राज्ञी. हा सण संपूर्ण उत्तर आणि ईशान्य भारतात जवळ जवळ आठवडाभर साजरा करतात. या काळातला आसामातला ‘दोलोत्सव’ ही तर पर्यटकांसाठी पर्वणीच असते.

फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच होळी…होळी म्हटलं की मला आठवते ती बरसाणा, या राधेच्या जन्मगावातली ‘लाठमार होळी’, असे म्हणतात की श्रीकृष्ण आणि त्याचे मित्र नंदगावातून ज्यावेळी राधिकेला आणि तिच्या मैत्रिणींना रंग लावण्यासाठी आले..खरे तर त्यावेळी राधिका आणि तिच्या मैत्रिणी..वसंतोत्सवासाठी छान सजलेल्या होत्या.. त्यामुळे त्यांनी त्या कन्हैय्या आणि त्याच्या सख्यांना…काठ्या मारून हाकलून दिले…पण नंतर सगळ्यांनीच एकमेकांवर मनसोक्त रंग उधळले आणि घिवर, ठंडाई, लस्सी, मालपुवा, चंद्रकला गुंजिया, धुस्का पुरी, भांग पकोडे.. अशा होळीच्या खास पदार्थांचा आस्वाद घेतला.

- Advertisement -

आजही ही प्रथा तिथे होळी पोर्णिमेच्या अगोदरच्या आठवड्यापासून पाळली जाते. संपूर्ण उत्तर भारतात नव्या सुनेची आणि बाळाची पहिली होळी साजरी करतात. सुनेसाठी केशरी काठाची पांढरी साडी आणि बाळासाठी तसेच झबले शिवतात. त्यांच्या अंगावर केशर आणि गुलाल उधळतात आणि रंगीबेरंगी साखरेच्या माळा आणि नानाविध खाद्यपदार्थांची अगदी रेलचेल करतात. आपल्यासाठी होळी आणि पुरणपोळी हे समीकरण अतूट आहे. मऊसूत, पातळ आणि एकसारखं पुरण पसरलेली…अशी पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातली पीठावरची किंवा तेलावरची पुरणपोळी…दूध आणि तूपाबरोबर खायची असते.

तर विदर्भातील गलेलठ्ठ साखरेची पुरणपोळी… .फक्त तूप आणि तुपाबरोबर खायची.. ही पुरणपोळी पचवायची तर कवठाची चटणी, वडाभात आणि कढी हवीच… पण खरे सांगू ..मला सर्वात आवडणारी पुरणपोळी म्हणजे…खानदेशातला पुरणाचा खापरावर केलेला पुरणाचा मांडा…एक मांडा चार जणात खावा..इतका मऊ की ओठात विरघळावा. पण मांडाच काय पुरणपोळीही बनवायला कसलेल्या सुगरणीचा हात लागतो. ज्या बापड्यांना हरभर्‍याच्या डाळीचा त्रास होतो त्यासाठी मुगाची विशेषत: हिरव्या मुगाची पुरणपोळी बनते.

- Advertisement -

हल्लीच्या शाही लग्नातही तळहाताएवढी आणि जराशी गुबगुबीत..भरपूर बदाम आणि काजूची पूड घातलेली हिरव्यागार मुगाची लुसलुशीत पुरणपोळी हा वैशिष्ठ्यपूर्ण पदार्थ असतो.

दक्षिण भारतात तिला पारप्पू’ म्हणतात. या पारप्पूमध्ये ओले खोबरेही भाजून घातलेले असते, हे खोबरे घातलेले पारप्पू, पातळ आणि (पोळी) किंचित चामट आणि चवदार असते खरे..पण त्याला पुरणपोळी म्हणणे जीवावर येते.

काही लोक होळीसाठी नवसाचे म्हणून कडबू बनवतात त्यांनी आंध्रातला पुरणम् बुरेलू’ हा पदार्थ करून पहावा..या बुरेलूमध्ये सारण पुरणाचेच असते, पण त्यात खोबर्‍याचे तुकडे, काजू आणि बेदाणेही घातलेले असतात. पुरणाचे गोळे करून इडली/डोशासाठी केलेल्या पीठात ते बुडवून तळतात. खुसखुशीत आवरण आणि मऊ गोड सारण असलेला हा पदार्थ गरम आणि गार कसाही खाल्ला तरी छान लागतो. कोल्हापूर, सांगली आणि सातारा इथल्या खवैय्यांना, पुरणपोळीबरोबर ‘कटाची आमटी’ हवी. चित्पावनांच्यात त्यात चिंच, भाजलेल्या जिर्‍या-खोबर्‍याची पूड आणि गरम मसाला पडतो तर बाकी जातीतल्या कटाच्या आमटीत कांदा, लसूण, आलं आणि प्रत्येक घरातलं वैशिष्ठ्य म्हणजे त्यात ती कोल्हापूर स्पेशल ताजी चटणी (तिखट) घातलेली असते.

कोल्हापूर भागात, वर्षभराची म्हणून ही चटणी, याच हंगामात करून ठेवतात त्यासाठी कांदा, लसूण, कोथिंबीर तळून आणि वाटून घेतात, मग त्यात मसाले आणि तिखट पडतं. हे मसाले आणि त्यांचे प्रमाण प्रत्येक घरात वेगवेगळे असते त्यामुळे प्रत्येक घरातल्या आमटी आणि भाजीची चव वेगवेगळी तरीही झणझणीत असते.

होळीला पोळी झाली की दुसर्‍या दिवशी म्हणजे धूळवडीला नळी पाहिजेच. या मटणाचेही जातनिहाय वैशिष्ठ्य असते. सोनारबुटी म्हणजे खास सोनारांसाठी मटणाचे बारीक तुकडे मिळतात. मराठ्यांकडे किंचित मोठे… असं काही असलं तरी मटण शिजवताना त्यात भाजलेला कांदा, आले, लसूण, कोथिंबीर यांचे वाटण, चटणी आणि गरम मसाला घातलेला असतो. कोल्हापूर जरा कोकणपट्ट्यात येत असल्यामुळे मटण विशेषत: रस्सा बनवताना त्यात ओल्या नारळाचा सढळ हाताने वापर केलेला असतो.

धूळवडीच्या दिवशी शाकाहारी लोकांकडेही वडीची आमटी, मासवडी, गोळ्याची किंवा सांडग्याची, बटाट्याची दूध आमटी असे तिखटजाळ.. मसालेदार प्रकार बनतात.

खरे तर वसंत ऋतू संपूर्ण जगभरात साजरा होतो. वेगवेगळ्या प्रकारचे सॅलडस्, पाय, कुकीज…अशा सर्व पदार्थांचा निवांतपणे आस्वाद घेत…गाणे बजावणे…कविता…नृत्य यांच्या संगतीत वसंताचे जोशात स्वागत केले जाते. भौगोलिक स्थान कोणतेही असले तरी या सणातून मिळणारा संदेश असतो… ‘अंतिमत: वाईटावर चांगल्या गोष्टींचाच विजय होणार आहे, ही मनोमन श्रध्दा ठेवून… आयुष्यातले निरनिराळे रंग …फुलवत रहा…उधळत रहा…

–मंजुषा देशपांडे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -