घरफिचर्ससारांशसमुद्र किनार्‍यांना ‘काळ्या पाण्याची शिक्षा’

समुद्र किनार्‍यांना ‘काळ्या पाण्याची शिक्षा’

Subscribe

तेलविहीरींमधून बाहेर पडणारे तेलाचे तवंग समुद्रातील जीवसृष्टी आणि किनार्‍यांसाठी फास ठरत असतानाच आता तेलमिश्रित वाळुच्या गोळ्यांचं मोठं संकट उभं ठाकलंय. पालघर, वसई, अलिबागच्या समुद्र किनार्‍यांसह गिरगाव आणि जुहू चौपाटीदेखील या नव्या संकटात सापडलीय. पावसाळ्यात अन्नाच्या शोधात समुद्रकिनारी आलेल्या जलचरांसाठी हे तेलगोळे मृत्यूचा सापळा ठरताहेत. त्यामुळे जलसृष्टी संकटात सापण्यापूर्वीच तेल कंपन्यांसह राज्य सरकारनेही या गंभीर प्रकाराकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.

समुद्रातल्या तेल विहिरीमधून कच्च्या तेलाची गळती होत असल्याने हे संकट निर्माण झालंय. महाराष्ट्रात दोन महिन्यांपूर्वी आलेल्या तौक्ते वादळानंतर समुद्र किनार्‍यांवर तेलाचे तवंग आणि वाळुमिश्रित तेलगोळे तयार झाल्याचं दिसून आलं. सर्वाधिक समस्या ही मच्छिमारांना सहन करावी लागली. पूर्वी नितळ पाण्यातून अगदी सहज निघणारं जाळं आता मात्र या तवंगामुळे हातातून निसटू लागलं, हातांवर तेलाचे काळे थर येऊ लागले. बोटी खराब झाल्या आणि दुसरीकडे मासे, खेकडे, स्टार फिश, ऑक्टोपस, जेलीफिश, कासव अशा जलचरांचा श्वास कोंडू लागला. याच काळात समुद्रकिनार्‍यांवर लाखो मृत माशांचा खच दिसला होता.

समुद्र आणि नद्या या जीवनदायी प्रवाहांना अनेक वर्षांपासून जलप्रदूषणाचं ग्रहण लागलंय. हे ग्रहण सुटण्यापूर्वीच आता नवनवी संकटं निर्माण होत आहेत. औद्योगिक कारखान्यांमधून बाहेर पडणारे प्रदूषित घटक, ड्रेनेजचं पाणी, कपडे, टायर, चपला आणि मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक हे सारं काही नद्यांमध्ये टाकलं जातंय. याच नद्या जेव्हा समुद्राला जाऊन मिळतात, तेव्हा हा संगम समुद्रातल्या जीवसृष्टीसाठी ’काळ्या पाण्याची शिक्षा’ ठरते. प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण विभाग अशा सर्वच संबंधित विभागांना याची संपूर्ण माहिती आहे. प्रदूषणाचे स्त्रोतही माहीत आहेत. मात्र, त्यानंतरही प्रदूषणाचे प्रवाह मात्र थांबलेले नाहीत. सर्वाधिक प्रदूषण हे शहरी भागांमधून होत असल्याने त्या-त्या राज्य सरकारांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना जलप्रदूषण नियंत्रणासाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देत उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची वेळ आलीय.

- Advertisement -

तौक्ते वादळानंतर आता पावसाळ्यातील जलस्त्रोतांचा प्रभाव आणि वेगाने वाहणारे वारे यामुळेही पुन्हा हीच समस्या उद्भवलीय. विशेषतः पालघर आणि वसईत समुद्र किनार्‍यांवर सर्वाधिक वाळुमिश्रित तेलगोळे निर्माण झालेत. विशेष म्हणजे अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे डहाणूसह तलासरी आणि पालघर तालुक्यात वाळूमिश्रीत तेलाचे गोळे तयार झाले आहेत. हा तवंग तातडीने दूर करावा, यासाठी नॅशनल फिशर वर्कर फोरमने या समस्येकडे राज्य सरकारचं लक्ष वेधलंय. या फोरमने आजवर पर्यावरण विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ, मेरीटाइम बोर्ड यांच्याकडे अनेकदा तक्रार केलीय. मात्र, संबंधित विभागांनी एकदाही ही बाब गांभिर्याने घेतलेली नाही. त्यामुळे मच्छिमारांनी जनआंदोलनाची तयारी सुरू केलीय. समुद्रात साचलेलं हे तेल वर्षातून साधारणत: तीन ते चारवेळा किनार्‍यावर येतं. हेच तेल मच्छीमारांच्या जाळ्या आणि दोरखंडाला चिकटत असल्यानं जाळी आणि दोरखंड खराब होण्याचं प्रमाणही वाढलंय. त्यामुळे मच्छीमार आर्थिक संकटात सापडलेत.

तौक्तेच्या प्रकारानंतर खुद्द मुख्यमंत्र्यांनी या तेलगोळ्यांची दखल घेत नगरविकास विभागाला पत्र देत हे किनारे स्वच्छ करण्याचे आदेश दिले होते. आता समस्येची पुनरावृत्ती सुरू झाल्याने यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे आराखडा तयार करण्याची गरज आहे. पालघरच्या मच्छिमारांनी जी भूमिका घेतलीय, तशा आंदोलनांची सर्वच ठिकाणी गरज निर्माण झालीय. कारण, नागरिक आवाज उठवत नाहीत तोपर्यंत लक्षच द्यायचं नाही, अशी ’सरकारी मानसिकता’ आपल्याकडे तयार झालीय. ही मानसिकता आता काळानुरुप बदलावी लागणार आहे. दुर्दैवं एवढंच की, तंत्रज्ञान आणि जनरेशन बदलतेय मात्र सरकारी कार्यपद्धतीत तितक्या वेगाने बदल होताना दिसत नाहीत. नव्या पिढीने हायटेक साधनांच्या माध्यमातून, तंत्रज्ञानाच्या वापराने या आव्हानांवर मात करण्यासाठी सज्ज होण्याची गरज आहे. अन्यथा, आव्हानांची मालिका एक दिवस मानवाच्या अस्तित्त्वालाच संकटात टाकेल. त्यामुळे ‘जगा आणि जगू द्या’ या एकमेव तत्वावर आपल्या सर्वांना काम करावं लागेल. निसर्ग आणि पर्यावरणाच्या प्रत्येक घटकाला जगण्यासाठी त्यांचं विश्व अबाधित ठेवायचं आणि त्यासोबत त्याच्या अनुकूल आपण जगायचं, हाच एकमेव शाश्वत पर्याय मानवासमोर आहे.

- Advertisement -

हे आहे समस्येचं मूळ
मुंबई हायसह ओएनजीसींच्या समुद्रातल्या प्रकल्पात तेल विहिरींमधून तेल वाहतूक करताना, तसेच तेल बाहेर काढण्याच्या प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची गळती होते आणि हे तेल समुद्रात जातं. याशिवाय तेलवाहतूक करणार्‍या मोठ्या जहाजांमधून निकृष्ट तेल समुद्रात फेकून दिलं जातं. अनेकदा वादळात सापडलेली जहाजांचा अपघात होतो आणि त्यातलं सर्व तेल समुद्रात जातं. पुढे लाटांसोबत हेच तेल समुद्रकिनारी येतं आणि वाळुला चिकटतं. लाटांच्या दबावाने या चिकट बनलेल्या वाळूचे गोळे तयार होतात.

अन्यथा, वादळ, दरडींपाठोपाठ समुद्रसंकट
बेसुमार उत्खननामुळे दरडी कोसळण्याचं प्रमाण वाढलंय, पर्यावरणाच्या र्‍हासामुळे मानवासह निसर्गाला वादळांचा तडाखा बसू लागलाय. जलप्रदूषणाची ही समस्या यापुढेही कायम राहिली तर भविष्यात एखादं भीषण समुद्रसंकट आपल्यावर चाल करून आलं तर प्रतिक्रिया व्यक्त करायलाही संधी मिळणार नाही. निसर्गाचं रौद्ररुप किती भीषण असतं हे गेल्या सहा महिन्यांत अवघ्या भारताने पाहिलंय. भल्यामोठ्या इमारती, पूल, रस्ते हे मानवनिर्मित क्षणात उद्ध्वस्त करत निसर्गाने आपलं अस्तित्व सिद्ध केलंय.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -