घरफिचर्ससारांशथांबला तो...

थांबला तो…

Subscribe

मधला एक काळ होता जग थांबण्याचा. हातातले सगळे कामधंदे सोडून बसलेले धोत्रेमास्तरसुध्दा तेव्हा जगाबरोबर थांबले होते. त्यांची शाळा थांबली होती. पुस्तकं थांबली होती. खडू थांबला होता. फळा थांबला होता. डस्टर थांबलं होतं. काही दिवस त्यांचा मोबाइलसुध्दा इतका थांबला होता की तो स्विच ऑफ आहे ह्याचंही धोत्रेमास्तरांना भान नव्हतं.

धोत्रेमास्तरांच्या ह्या मोबाइलनेच एके दिवशी त्यांचा घात केला. पुस्तकं, फळा, खडू थांबला तरी मोबाइल चालू हवा असं धोत्रेमास्तरांच्या डोक्यावरच्या मास्तराने फर्मान काढलं. त्याबरहुकूम धोत्रेमास्तरांना आपला सेकंडहॅन्ड फोन ह्यापुढे स्विच ऑफ राहणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागली.

- Advertisement -

त्याआधी मोबाइल फोनचा आणि धोत्रेमास्तरांचा छत्तीसचा आकडा होता. मोबाइल हा अनेक दुर्गुणांनी भरलेला मित्र असून तो सदाचाराचा मार्ग सोडून दुराचारच नव्हे तर स्वैराचाराच्या वाटेवर आणून सोडतो असं धोत्रेमास्तरांचं पाठ्यपुस्तकी मत होतं. मोबाइलमुळे अवघं जग कसं बिघडण्याच्या मार्गावर आहे, ह्या विषयावर डोंबिवलीच्या पलिकडचा प्रकाशक मिळवून ते मोबाइलसारखंच स्लिम पुस्तक लिहिण्याच्या बेतात होते. पण नंतर घरातल्या, वस्तीतल्या, समाजातल्या आणि मुख्य म्हणजे शाळेतल्या लोकांच्याही मुठीत मोबाइल दिसू लागल्यामुळे धोत्रेमास्तरांनाही त्यांच्या आयुष्यातल्या एका वळणावर ही स्वैराचाराची वाट पत्करावी लागली.

अर्थात, धोत्रेमास्तरांनी त्या स्वैराचारातूनही नवी वाट शोधली. त्यांनी मोबाइल चालू ठेवण्याच्या वेळा ठरवल्या. सदासर्वकाळ आपण कुणासाठीही खुले राहणार नाही, असा मेसेज त्यांनी कॉन्टॅक्ट लिस्टमधल्या सर्वांना पाठवून दिला. त्याप्रमाणे कामाचे तास आणि त्यांनंतर घरी पोहोचेपर्यंतची काही मिनिटं इथपर्यंतच त्यांचा मोबाइल चालू राहायचा. त्यानंतर पूर्वीची शिवसेना जशी महाराष्ट्र कडकडीत बंद करायची तसा धोत्रेमास्तरांचा मोबाइल बंद म्हणजे बंद…ठार स्विच ऑफ!

- Advertisement -

मधल्या काळात लॉकडाउन झालं. सगळी दुकान, मॉल, पानटपर्‍या बंद झालं. त्यात धोत्रेमास्तरांची शाळाही बंद झाली. आता तर मोबाइल बंद ठेवण्याचा धोत्रेमास्तरांना बिनशर्त परवानाच मिळाला. धोत्रेमास्तरांना वाटलं, आता खरंच जग थांबलं आहे. आपण शाळेत मुलांना ‘थांबायचं नाय, आता थांबायचं नाय’ असं जे शिकवलं ते अनाठायी ठरलं. त्या तासाला जितके विद्यार्थी हजर होते ते आता आपल्याला रस्त्यात थांबवून घेराव घालतील की काय, अशी बाळबोध शंकाही त्यांच्या अजाण मनाला पुसट स्पर्श करून गेली.

अख्खं जग थांबल्यामुळे त्यांना वाटलं की आता सगळंच थांबणार म्हणजे शिक्षण थांबणार, आरक्षण थांबणार. शोषण थांबणार. उपोषण थांबणार.

पुढे जाऊन त्यांना असं वाटलं की आता भाषणही थांबणार. पण भाषण थांबलं तर राजकारणातल्या कलाकारांचं पोषण कसं होणार? त्यांच्या मनात शून्य प्रहरात आपली अशीच एक वाह्यात शंका डोकावून गेली.

…म्हणजे आता ट्विट बंद होणार, टूलकिट बंद होणार, सोशल मीडियाच्या होळीत दररोज चारी बाजूंनी येणारी धुमसती लाकडं बंद होणार. पुरोगाम्यांकडून प्रतिगाम्यांचं केलं जाणारं प्रबोधन आणि प्रतिगाम्यांकडून पुरोगाम्यांसाठी केलं जाणारं विचारमंथन थांबणार.

धोत्रेमास्तरांकडे त्यांच्या मनातल्या गोळीबंद शंकांची लांबलचक यादी तयार होऊ लागली.
चला, बरं झालं, आता वर्तमानपत्रात सत्ताधार्‍यांविरुध्द विरोधकांची टीका थांबणार, विरोधकांबद्दलचं सत्ताधार्‍यांचं आकलन थांबणार, पब्लिक पर्सेप्शन थांबणार, नॅरेटिव्ह सेट होणं थांबणार. जुन्या असो की नव्या, पण चौकटी मोडायच्या थांबणार, उन्हाळी-हिवाळी-पावसाळी- कोणत्याही सत्रात नवे पायंडे पडणं थांबणार. सत्र लांबणं किंवा झटपट गुंडाळणं थांबणार. सभात्याग थांबणार. हक्कभंगाचा प्रस्ताव थांबणार. राजदंड पळवणं थांबणार, चापान थांबणार, मुळात चहापानावरचा बहिष्कार थांबणार…धोत्रेमास्तरांच्या मनातल्या शंका थांबतच नव्हत्या.

स्वत:शीच डोळा मिचकावत धोत्रेमास्तर पुटपटले, ‘…च्यामारी म्हणजे सरकार पाडण्यासाठी होणारे प्रयत्नही थांबणार.’
‘…म्हणजे आमदार पळवणंसुध्दा थांबणार?’ हे पुटपुटताना धोत्रेमास्तरांनी ओठ चावला आणि हळुच इकडेतिकडे पाहिलं.
स्वत:शीच असं पुटपुटत जात असताना धोत्रेमास्तरांना अचानक आठवलं, ‘आपलं ते ‘थांबला तो संपला’ हे तत्वज्ञान शिकवणंसुध्दा थांबणार.’

…पण नंतर धोत्रेमास्तरांनी स्वत:ला समजवलं, ‘अहो मास्तर, जिथे तुमचं अख्ख जग थांबणार तिथे तुमच्या अक्षरसाहित्यातलं तत्वज्ञान तरी कुठल्या निर्जन सर्व्हिस रोडवर चरैवेती चरैवेती म्हणून एकटं चालत राहणार? जिथे साहित्यसंमेलनंच थांबणार तिथे साहित्यसंमेलनाचा गोरज मुहूर्त पाहून होणारे वाद तरी कुठे होणार?’
स्वत:ची अशी समजूत काढत काढत धोत्रेमास्तर आपल्या घरी पोहोचले. खिशातला मोबाइल काढून तो स्विच ऑफ आहे की नाही ते त्यांनी पाहिलं. हातपाय धुवून आरामखुर्चीत रेलणार इतक्यात दारात सरकारी वेषातला एक माणूस आला.
‘कमिटी कधीची तुम्हाला तिकडं फोन करतीय, पन तुमचा मोबाइल बंद सापडतुय,‘ सरकारी माणूस म्हणाला.
‘का?…आता कमिटीने काय काम काढलं?’ धोत्रेमास्तरांनी विचारलं.
‘कमिटीला वरून आर्डर आलीय की पोरांना मोबाइलवरून शिकवा,’ सरकारी माणसाने ठसक्यात सांगितलं.
‘…अच्छा म्हणजे जग थांबायला तयार नाही तर…’ धोत्रेमास्तर स्वत:शी कुजबुजले.
पुढच्याच क्षणी धोत्रेमास्तरांनी आपला मोबाइल सुरू केला…आणि न थांबता ते मुलांना शिकवत सुटले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -