घरफिचर्ससारांशटीम इंडियापेक्षा मिताली मोठी कशी?

टीम इंडियापेक्षा मिताली मोठी कशी?

Subscribe

अडीच वर्षांपूर्वी (डिसेंबर 2018) मिताली राज आणि तत्कालीन प्रशिक्षक रमेश पोवार यांचा खटका उडाला आणि स्टार प्लेअर मितालीने पोवार यांच्यावर पक्षपातीपणाचे आरोप केले होते. त्यांच्यातील वाद इतके विकोपाला गेले की आरोप, प्रत्यारोप होत राहीले. मला सलामीला पाठवलं नाही, तर मी निवृत्त होईन अशी धमकी मिताली वारंवार देत असं पोवार यांनी तेव्हा बोलून दाखवलं होतं. परिणामी पोवार यांचीच उचलबांगडी झाली. मात्र मिताली अजूनही संघात आहेच. आगामी इंग्लंड दौर्‍यात एक कसोटी तसेच 3 वनडे लढतीत मिताली राज भारतीय संघाची कर्णधार आणि रमेश पोवार प्रशिक्षक असतील! आता या दोघांचे सूर कसे जुळतात, हे पाहण्यासारखे असेल.

भारतीय क्रिकेटमध्ये ‘सुपरस्टार’ संस्कृती जोपासली जात आहे याची प्रचिती अलीकडेच आली ती भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदाच्या निवडीवरून! वूर्केरी रामन यांची प्रशिक्षक पदावरून उचलबांगडी करून रमेश पोवार यांची त्या पदावर वर्णी लावण्यात आली. कर्णधाराच्या मर्जीनुसार प्रशिक्षक निवडला जातो. माजी क्रिकेटपटूही वादात भर घालत असतात ही बाबदेखील लक्षात घ्यायला हवी. कुंबळेच्या जागी रवी शास्त्री हे प्रकरणही सर्वश्रुत आहेच. प्रशिक्षकपदावरून डच्चू मिळाल्यावर रामन यांनी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांना मेलद्वारे आपली कैफियत सादर केली आणि याची प्रत त्यांनी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख राहुल द्रविड यांनाही सादर केली. भारतीय महिला संघातील काही लाडावलेल्या खेळाडूंमुळे संघाची घडी विस्कटते आणि त्याचा परिणाम संघाच्या कामगिरीवर होतो. कटकारस्थान करून प्रशिक्षकपदावरून हटवण्यासाठी खास मोहीम उघडण्यात आली, त्यांचे इरादे सफल झाले तरीदेखील बीसीसीआयने हे गैरप्रकार रोखण्यासाठी तातडीने पावले टाकायला हवीत, असे रामन यांनी मेलमध्ये नमूद केले आहे.

एका प्रतिथयश खेळाडूची खुशामत करण्याचं धोरण काही हितसंबंधितांनी अवलंबले असून त्या खेळाडूलाही त्यातच धन्यता असेल तर प्रशिक्षकाचं काही चुकलं का याचा निर्णय आपणच घ्यावा, असं रामनने म्हटलं आहे. महिला संघाच्या प्रशिक्षकपदाचा संगीत खुर्चीचा खेळ अनेक वर्षे सुरूच आहे. गेल्या 4 वर्षातील रमेश पोवार हा पाचवा प्रशिक्षक! पूर्णिमा राव, तुषार आरोठे, रमेश पोवार, वूर्केरी रामन, रमेश पोवार, असा हा क्रम आहे. खेळाडूंच्या दडपणामुळे चारदा प्रशिक्षक बदलण्यात आले. या दरम्यान भारताने दोनदा वर्ल्ड कपची फायनल गाठली (WC वनडे 2017 आणि T-20 WC 2020). प्रशिक्षक बदलाच्या संगीत खुर्चीच्या खेळामुळे खेळाडूंच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्यास नवल ते काय? यासाठी बीसीसीआयला काही अंशी जबाबदार धरावं लागेल.

- Advertisement -

जवळपास 9 महिन्यानंतर बीसीसीआयने महिला क्रिकेटपटूची श्रेणीवार (अ, ब, क ) यादी अलीकडेच जाहीर केली. अ श्रेणी (50 लाख रू ) ब श्रेणी (30 लाख रू ) आणि क श्रेणी (10लाख रू ) असं निश्चित केलं. संघाची कर्णधार मिताली राजची अ मधून ब श्रेणीत घसरण झाली आहे! हरमनप्रीत कौर, स्मृती मंधना, पूनम यादव या तिघीनाच अ श्रेणीत स्थान मिळालं आहे! ऑक्टोबर 2020 ते सप्टेंबर 2021 या कालावधीसाठी हा करार आहे. दीड दशकापासून म्हणजेच 2006 पासून महिला क्रिकेटचं प्रशासन बीसीसीआयकडे आलं पण त्यात फारशी आत्मियता बीसीसीआयने दाखवली नाही त्यामुळे महिला क्रिकेट उपेक्षित राहिलं!

पूर्णिमा राव ही भारतीय महिला संघाची अखेरची महिला प्रशिक्षक. 2017 मध्ये तिची या पदावरून हकालपट्टी करण्यात आली. तिचे अनुभव विदारक आहेत! सुपरस्टार खेळाडूंचं वलय निर्माण होतं त्यांचा प्राधान्यक्रम ठरलेला असतो. त्यामुळे संघात वाद निर्माण होतात अन हे सारं टाळण्यासाठी खेळाडूंवर नियंत्रण हवं आणि त्याचबरोबर माजी महिला खेळाडुंना दूर ठेवायला हवं असं पूर्णिमाला वाटते. पूर्णिमानंतर बडोदेकर तुषार आरोठे याची प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली. महिला क्रिकेटमध्ये प्रचंड राजकारण चालते असं म्हटलं जातं. सगळ्यांना चूप करण्याचा प्रयत्न केला जातो आणि याला बहुतांशी कारणीभूत आहेत माजी निवृत्त महिला क्रिकेटपटू.

- Advertisement -

त्याचं खेळाडूशी पटलं नाही तर उचलबांगडी अटळ! आणि यासाठीच माजी महिला खेळाडूंना दूर ठेवायला हवं अशी तुषारची धारणा असून रामनला अजून एक संधी मिळायला हवी होती असं त्याला वाटतं. दीड वर्ष रामनच प्रशिक्षक आहे पण कोरोनामुळे एक वर्ष वाया गेलं कारण सगळं काही ठप्प झालं होतं. नीतू डेव्हिडच्या निवड समितीने घोळ घातला अन त्याचा फटका भारतीय संघाला बसला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात भारतीय महिला संघाला वनडे आणि टी -20 मालिकेत पराभवाला सामोरे जावं लागलं त्यात रामन यांची फारशी चूक नव्हती निवड समितीच्या उफराट्या निर्णयाची झळ भारतीय संघाला बसली आणि रामन यांना पायउतार व्हावं लागलं.

तुषारनंतर आलेल्या रमेश पोवारची प्रशिक्षकपदी ही दुसरी इंनिंग! अडीच वर्षांपूर्वी रमेश पोवारची प्रशिक्षक पदावरून हकालपट्टी करण्यात आली तेव्हा मदनलाल यांची प्रतिक्रिया बघा ते म्हणाले, जर प्रशिक्षकाची बदली करायची असेल तर खेळाडूंची मर्जी सांभाळणारा त्यांचे ऐकणाराच प्रशिक्षक नेमलेला बरा! तेच मदनलाल आता क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य असून त्यांनीच रामनची संधी न देताच तडकाफडकी बदली केली. मदनलाल यांच्याबरोबर आर. पी. सिंग, सुलक्षणा नाईक यांचा तीन सदस्यय क्रिकेट सल्लागार समितीत समावेश होता. पण या समितीने रामनसहित 8 जणातून रमेश पोवार यांच्या गळ्यात प्रशिक्षक पदाची माळ घातली.

तुषार आरोठेनेही या पदासाठी अर्ज केला होता! अडीच वर्षांपूर्वी (डिसेंबर 2018) मिताली राज आणि तत्कालीन प्रशिक्षक रमेश पोवार यांचा खटका उडाला आणि स्टार प्लेअर मितालीने पोवार यांच्यावर पक्षपातीपणाचे आरोप केले होते. त्यांच्यातील वाद इतके विकोपाला गेले की आरोप, प्रत्यारोप होत राहीले. मला सलामीला पाठवलं नाही, तर मी निवृत्त होईन अशी धमकी मिताली वारंवार देत असं पोवार यांनी तेव्हा बोलून दाखवलं होतं. परिणामी पोवार यांचीच उचलबांगडी झाली. मात्र मिताली अजूनही संघात आहेच. आगामी इंग्लंड दौर्‍यात एक कसोटी तसेच 3 वनडे लढतीत मिताली राज भारतीय संघाची कर्णधार आणि रमेश पोवार प्रशिक्षक असतील! आता या दोघांचे सूर कसे जुळतात, हे पाहण्यासारखे असेल.

पुढच्या वर्षी 2022 मध्ये होणारी वर्ल्ड कप स्पर्धा माझी अखेरची स्पर्धा असेल असे सुतोवाच मिताली राजने केले असून ती चाळीशीत प्रवेश करेल. इतकी वर्ष भारतीय महिला क्रिकेट मितालीच्या छायेतच वावरत होती, असेच चित्र आहे. क्वचित प्रसंगी मितालीचा जागतिक दर्जाची महिला क्रिकेटपटू म्हणून गौरव झाला. पण,असे प्रसंग विरळच. मात्र या मोठ्या कालावधीत भारतीय महिला क्रिकेट संघ मोठा होण्याऐवजी मिताली मोठी होत गेली. मुख्य म्हणजे एकूणच तिची कामगिरी ही संघापेक्षा स्वतःला मोठी करणारी होती. बरीच वर्षे संघात असल्याने तिची एक प्रकारे ‘मी सांगेन ती पूर्व दिशा’, अशी मनमानी सुरु आहे. प्रशिक्षक कोण आहे, याचा तिला कधी फरक पडला नाही. प्रशिक्षक बदलत गेले, मिताली मात्र संघात अजूनही आहे. याचा मोठा फटका भारतीय महिला संघावर होऊन टीम काही मोठी झालेली दिसली नाही. आता निवड समितीने याचा गंभीरपणे विचार करायला हवा.

2017 महिला वर्ल्ड कप स्पर्धेचे प्रथमच लाईव्ह थेट प्रक्षेपण इंग्लंडमधून भारतात करण्यात आलं त्याला पुरस्कर्ते लाभले, महिला क्रिकेटपटूना परदेशातील टी 20 स्पर्धेत (बिग बॅश ) खेळण्यासाठी निमंत्रणे येऊ लागली. त्यांच्या मानधनात वृद्धी झाल्यामुळे आर्थिक स्थैर्य लाभले, समाजातील त्यांचे स्थान उंचावले. महिला क्रिकेटला अधिक बरकत येण्यासाठी खेळाडू-प्रशिक्षक यांच्यातील मतभेद मिटून सुसंवाद घडायला हवा आणि त्यासाठी बीसीसी आयने झटपट कृती करायला हवी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -