निसर्गाविरुद्ध ‘ओटीटी’चे ब्रम्हास्त्र !

ब्रह्मांडामधील प्रत्येक जीवित अथवा मृत गोष्टीला नष्ट करू शकते ते ब्रम्हास्त्र.. ‘ओव्हर द टॉप’ (ओटीटी) हे असेच एक ब्रम्हास्त्र आहे ज्याचा वापर भारतात होतो आहे. एखाद्या राष्ट्राकडे केवळ शस्त्र व सैन असून चालत नाही. तर सद्सद्विवेकबुद्धीने शस्त्राचा वापर योग्यवेळी करणारी जिगरबाज जनता व युवापिढी देखील राष्ट्राची खरी संपत्ती असते. परंतु आज ओटीटीच्या वापराने आपल्या देशातील नव्या पिढीला विचारांनी नपुंसक बनवले जात आहे. त्यातून ही पिढी कामांध, गुन्हेगार व विकृत प्रवृत्तीची बनविण्यासाठी काही शक्तींचे प्रयत्न सुरू आहेत. खरंतर भारताविरुद्ध हे छुपे युद्ध आहे.

ज्या ठिकाणी ब्रह्मास्त्र पडते त्या ठिकाणासून अनेक मैलांपर्यंत याचा प्रभाव बनून राहतो. पुराणांमध्ये सांगितलं आहे की, ब्रह्मास्त्र पडलेल्या ठिकाणी गवताचे पातेसुद्धा उरत नाही. ब्रह्मास्त्र आपला प्रभाव यानंतर अनेक वर्षे चालू ठेवते, अन या प्रभावात ते ठिकाण वाळवंट बनते. अगदी तसेच ओटीटी तंत्रज्ञान देशातील लढवैया पिढीला निष्प्रभ बनवित देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. ओटीटी कसे काम करते हे समजून घेणे अगदी सोपे आहे. केबल, डिश अँटिना, सॅटेलाईट कनेक्शन आदी पारंपरिक मार्गाना फाटा देत थेट इंटरनेटच्या माध्यमातून मोबाईल, कॉम्प्युटर वा लॅपटॉप, टीव्ही या तिन्हींवर ओटीटी वापरता येते. अप्लिकेशन इन्स्टॉल करत मोबाईल बरोबरच कॉम्प्युटरवर वेबसाईटच्या मदतीने ओटीटी वापरता येते. स्मार्ट टीव्हीवरदेखील ओटीटी वापर सहज शक्य होतो. इंटरनेटवर कुठल्याही एका देशाचे नियंत्रण नाही. तसेच जागतिक पातळीवर सांस्कृतिक विविधतेमुळे कुणाचे बंधनदेखील नाही आणि हाच खरा राष्ट्रीय धोका आहे. आर्थार्जन करणार्‍या तरुणांबरोबरच तरूणी व महिला वर्गाला टार्गेट करण्यासाठी मग चित्रपट, टेलिव्हिजन मालिका आणि आता ओव्हर द टॉप म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर सर्रासपणे होतो आहे.

सप्टेंबर 2020 च्या आकडेवारीनुसार जगात इंटरनेट वापरणार्‍यांची सरासरी टक्केवारी 53.6 टक्के आहे. भारतात जगाच्या सरासरीपेक्षा जास्त म्हणजे 54.26 टक्के इतके लोक इंटरनेट वापरतात. तुलनेत मोठ्या देशांत कुवैतमध्ये 98 टक्के, दक्षिण कोरियात 96 टक्के लोक इंटरनेट वापरतात. मात्र या देशांप्रमाणेच राष्ट्रीय सुरक्षेला असलेला धोका ओळखून तसेच क्रयशक्ती नष्ट करण्यासाठी कार्यरत ओटीटी प्लॅटफॉर्मवर कडक सरकारी नियम, निर्बंध व त्यांची अंमलबजावणी या गोष्टींकडे 138 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भारतानेदेखील पावले उचलायला सुरूवात केली आहे. खरं तर ही बाब स्वागतार्ह मानायला हवी.

भारतात सर्वाधिक धुमाकूळ घालत लोकप्रिय आणि जुना ओटीटी म्हणजे नेटफ्लिक्स होय. 29 ऑगस्ट 1997 ला सुरू होऊन अवघ्या दोन वर्षांत जगाला इंटरनेटद्वारे सेवा देत नेटफ्लिक्सने 2010 मध्ये भारतात प्रवेश केला. नेटफ्लिक्स हा टीव्ही आणि सिनेमे यांच्यासाठी खरा स्पर्धक ठरत असतानाच अ‍ॅमेझॉन प्राईम, हॉटस्टार, फायरस्टिक हेदेखील जोडीला उतरले. बॉलिवूडच्या ‘सॉफ्टपोर्न’ चित्रपटांशी स्पर्धा करत आंबट शौकिनांनादेखील ‘लक्ष्य घटक’ बनवित ओटीटीने भारतात अल्पावधीत पाय पसरले. आता तर नैसर्गिक सानिध्यात राहणार्‍या आफ्रिकन देशातदेखील त्यांच्या ‘उद्धारा’साठी चक्क मोफत ओटीटी पुरविण्याचा निर्णय काही कंपन्यांनी घेतला आहे. ओटीटी वापर वाढण्यासाठी एक महिन्याचे फुकट ट्रायल देत आधी सवय लावायची व नंतर सेवा चालू ठेवण्यासाठी पैसे भरून नोंदणीची अट ही अनेक गृहकलहाचे कारण व राष्ट्रीय डोकेदुखी बनत आहे.

ओटीटी वापराचे घातक परिणाम व्यक्तीवर कसे होतात हे समजून घ्यायला हवे. मेंदूतील हायपोथॅलेमस हा चेतासंस्था म्हणजे नर्व्हस सिस्टीमला जोडलेला असलेला भाग होय. आजूबाजूच्या वातावरणात होणार्‍या बदलानुसार हायपोथॅलेमस हे शरीराचे तापमान नियंत्रणात बरोबरच हार्मोन सिक्रेशन, झोप व इतर क्रियांचे नियंत्रण करते. यात बिघाड झाला की मनुष्य आजारी पडतो. ओटीटीवरील कामोत्तेजक व इतरही कार्यक्रम हे डोपामाइन स्त्रवण्यासाठी कारणीभूत ठरतात तसेच इतरही हार्मोनमध्ये अस्थिरता आणतात.

हार्मोन किंवा संप्रेरक म्हणजे रक्तातील पदार्थ होय जे शरीरातील अंतस्त्रावी ग्रंथीमध्ये तयार होतात. रक्ताद्वारे शरीरात हळूवारपणे चालणार्‍या अनेक क्रियांचे नियंत्रणाचे कार्य असंख्य हार्मोन्स करीत असतात. डोपामाइन हेदेखील असेच एक हार्मोन होय. जागतिक आरोग्य संघटनेच्या आवश्यक औषधांच्या यादीमध्ये डोपामाइन हे आज समाविष्ट झाले आहे. खरं पाहिले तर मानवी आनंदाची ती एक कुपी आहे. मात्र ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखविल्या जाणार्‍या कामोत्तेजक घटना व दृश्यांमुळेदेखील डोपामाइन व इतर हार्मोनल तसेच एंजाइमचे शरीरातील अनियंत्रित स्त्रवणे हे मानवी जीवनासाठी हानिकारक ठरतात. परिणामी ओटीटी सिरीजची ओढ निर्माण होत ओटीटीची व्यसनाधीन बनत चाललेली पिढी हीच खरी गंभीर राष्ट्रीय समस्या आहे.

खरंतर सृष्टीचक्र सुरू राहण्यासाठी प्रजनन आणि त्यासाठी आवश्यक कामजीवन ही एक नवनिर्माण करणारी सुंदर व आनंददायी नैसर्गिक प्रक्रिया होय. मात्र ओटीटीच्या माध्यमातून पोहोचणार्‍या चांगल्या गोष्टींचा अपवाद वगळता सृष्टीचे नियम मोडत अतिशय ओंगळवाणी दृश्ये दाखविली जातात. यातून मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न ओटीटीच्या माध्यमातून होतो हे नाकारुन चालणार नाही.

ओटीटी वापराने आज देशातील नवीन पिढी विचारांनी नपुंसक बनत चालली आहे. कामवासनेने ओतप्रोत भरलेली कामांध, गुन्हेगारी व विकृत प्रवृत्तीची बनविण्यासाठी ओटीटीचा वापर सर्रासपणे केला जातो. खरंतर भारताविरुद्ध हे छुपे युद्ध आहे. डिस्क्लेमर म्हणून काही सेकंद मेसेज दाखविला की आपणास कायदेशीर मान्यता मिळाली आहे, अशा आविर्भावात ओटीटी प्लॅटफॉर्मवर अक्षरशः नंगा नाच दाखविला जातो आहे. जनता या जाळ्यात अडकत उरलेली संस्कारी कुटुंबव्यवस्था देखील मुळासकट उद्ध्वस्त केली जात आहे. कोरोना काळात भरपूर वेळ लॉकडाउनने उपलब्ध करून दिला आहे. अशा वेळी तहान-भूक व झोप विसरून रात्ररात्र जागत ओटीटीच्या आहारी गेलेल्या युवापिढीला गुंतवून ठेवले आहे. अमेरिका जगावर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील असताना आता ड्रॅगनदेखील जग जिंकण्यासाठी आसुसला आहे.

कोरोना व्हायरस चीनच्या वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमधून जैविक अस्त्राप्रमाणे मानवी शरीरावर व मनावर जगभर हल्ला करीत आहे. चीनच्या फिशिंग मिलसाठी सिएरा लिओन या पश्चिम आफ्रिकेतील देशाने करार केला आहे. समुद्रातील अडीचशे एकर किनारपट्टीवर भर टाकून बांधकाम करीत बंदरगाह उभारणी चीन ‘कायदेशीर’मार्गाने करत आहे. चीनसारखा देश आफ्रिकेतील सागरी भूमी विकत घेऊन थांबला नाही तर श्रीलंकेला आपल्या कवेत घेत आहे. सीमेवरील शत्रू भारताला चोहोबाजूंनी घेरू पाहत आहे. प्रत्यक्ष युद्ध पुकारत थेट देशावर हल्ला झाल्यानंतर देशांतर्गत लढायला कुणी नसेल आणि देश काबीज करणे परकीय शक्तींना सहज शक्य होऊ शकते हे सांगण्यासाठी कुणा मानसशास्त्रज्ञाची गरज नाही.

येत्या काळात राष्ट्रहित गांभीर्याने लक्षात घेत सरकार कठोर पावले उचलेल अशी आशा आहे. सृजनशील व विधायक कार्य करीत राष्ट्रीय हित जपणारी पिढी घडविण्यासाठी सोशल मीडियावर कडक निर्बंध लावत सर्व ओटीटी प्लॅटफॉर्मवर आधार क्रमांकाच्या सहाय्याने वयाची वारंवार खातरजमा करणे गरजेचे बनले आहे. यात वारंवार दोषी आढळल्यास व्यक्तींच्या बँक खात्यातील सर्व रक्कम सरकारी तिजोरीत जमा करण्याचे आदेश देता येईल. कायदेशीर पळवाटांतून मार्ग काढणार नाही यासाठी ओटीटी परवानगी देताना राष्ट्रीय हिताला प्राधान्य देण्याशिवाय तरणोपाय नाही.