Eco friendly bappa Competition
घर फिचर्स सारांश अधोगतीकडे नेणारी पेपरफुटी !

अधोगतीकडे नेणारी पेपरफुटी !

Subscribe

आज शिक्षणात जर शिक्षकच विद्यार्थ्यांना वाममार्गाला घेऊन जाण्यासाठी प्रोत्साहित करीत असतील, तेच गैरप्रकारासाठी पावले टाकत असतील तर समाजाने कोणाकडून अपेक्षा ठेवायच्या हा खरा प्रश्न आहे. शिक्षक प्रश्नपत्रिका फोडून कॉपी करण्यासाठी प्रोत्साहित करीत आहेत. विशिष्ट शाळांमध्ये दहावीच्या वर्गात विद्यार्थ्यांचे अधिक प्रवेश का होतात? आपला जिल्हा बदलून त्याच शाळेत विद्यार्थी प्रवेश का घेतात? असे प्रकार केल्याने संस्थाचालकांचे खिसे भरले जात असतील, मात्र यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासावरील विश्वास उडून जाईल. असे गैरप्रकार विद्यार्थ्याच्या व्यक्तिगत आयुष्यासोबत समाजासाठीही घातक आहेत.

राज्यात दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. या परीक्षा शालेय जीवनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरत आहेत. एका अर्थाने विद्यार्थ्याच्या शालेय जीवनातील सार्वत्रिक स्वरूपातील ही पहिलीच परीक्षा असते. भविष्यातील व्यावसायिक अभ्यासक्रम निवडीसाठी बारावीच्या परीक्षेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. एका अर्थाने जीवनाच्या यशस्वीतेसाठी बारावी ही अधिक महत्त्वाची पायरी ठरत आहे. त्यामुळे मुलांकडून पालक ज्या अपेक्षा करीत आहेत त्यासाठी बारावीचे मार्क महत्त्वाचे आहेत. ते मार्क विद्यार्थ्याला मिळावे यासाठी सर्वच व्यवस्था काम करीत आहे. पालकांना मुलांच्या यशस्वी जीवनासाठी मार्क हवे आहेत.

शाळांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी मुलांना मार्क आणि शंभर टक्के निकाल हवा आहे. शिकवणीवाल्यांना बाजारातील मार्केटसाठी मुलांना मार्क हवे आहेत. आपल्या आईबाबांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्क हवे आहेत. मार्कांच्या स्पर्धेत खरे शिक्षण हरवले आहे. शिक्षण विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठीच्या व्यावसायिक जडणघडणीच्या दृष्टीने महत्त्वाचे म्हणून मार्क हवे आहेत. शिक्षणातून माणूस घडवायचा असतो, असे सांगितले जात होते. शिक्षणाची उद्दिष्टे विवेक, शहाणपण, शांतता निर्माण करणे आहे. राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेमाचा संस्कार करणे आहे. विद्यार्थ्यांच्या आतमध्ये जे काही दडले आहे त्या सुप्त गुणांचा विकास करणे आहे.

- Advertisement -

ही सर्व उद्दिष्टे केवळ आदर्शवादी शिक्षणाची वाट ठरत आहेत. यातील शिक्षणातून काही साध्य करावे म्हणून प्रयत्न होत आहेत का? आमची शाळा शिक्षणातून ‘माणूस’ घडवते अशी जाहिरात करणारी शाळा नाही. त्याउलट आम्ही लाखो रुपयांचे पॅकेज मिळविणारे अभियंते, डॉक्टर घडवतो, असे सांगणार्‍या शाळा, महाविद्यालयांच्या जाहिराती भोवताली दिसतात. जे शिक्षण लाखो रुपयांचे पॅकेज देते ते खरे शिक्षण ही व्याख्या मनावर अधिराज्य करीत आहे. शिक्षण ज्ञानकेंद्रित बनण्याऐवजी ‘पॅकेज’केंद्रित झाले आहे. शिक्षणाच्या ध्येयाचा प्रवास जेव्हा बदलतो तेव्हा शिक्षणात गैरप्रकार घडणारच. आज पैसा हे सर्वस्व बनत चालल्याने गैरमार्गासाठी परीक्षेचे पेपर फोडणे घडत आहे. गैरप्रकारावर आळा घालण्यासाठी पोलीस सुरक्षा, वरिष्ठ अधिकारी वर्गाची नियुक्ती, भरारी पथके यांच्या उपाययोजनांपेक्षा शिक्षणातून निर्मळ मने घडविण्यावर अधिक भर देण्याची गरज आहे.

यावर्षी राज्य सरकारने कॉपीमुक्त अभियानास आरंभ केला आहे. त्यासाठी मोठी तयारी केली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासारखे दोन आयएएस आणि आयपीएस अधिकार्‍यांच्या समन्वयातून गैरप्रकाराला आळा घालण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्याचबरोबर इतरही अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. अशा उपाययोजना केलेल्या असतानादेखील पेपर फुटलेच. तसेच समाजमाध्यमांतही पेपर व्हायरल झाले. या प्रकरणात शिक्षक दोषी असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

समाजमाध्यमांवर पेपर व्हायरल करताना राज्यभरासाठी व्हॉट्सअ‍ॅप गट स्थापन करण्यात आला होता. यात शिक्षकांना जबाबदार धरून त्यांना अटक करण्यात आली आहे. पैशांसाठी प्रश्नपत्रिका फोडण्यात आल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांतून पुढे आले आहे. शिक्षकांनी प्रश्नपत्रिका फोडण्याचे धाडस का बरे केले असेल? यामागे शाळांचे निकाल उंचावण्यापेक्षा व्यक्तिगत पैशांची भूक अधिक असण्याची शक्यता आहे. हे सर्व करताना आपण पैशांसाठी एखाद्या नैतिक व्यवस्थेचा प्रवास अधोगतीच्या दिशेने घेऊन जात आहोत याचे काहीच वाटू नये याला काय म्हणावे? शिक्षण हे राष्ट्र व समाजनिर्मितीचे साधन आहे. हे काम काही आपोआप घडत नाही. त्याकरिता व्यवस्थेतील सर्वाधिक महत्त्वाचा घटक असलेला शिक्षक महत्त्वाचा दुवा आहे.

शिक्षकाची जेवढी उंची असते तेवढीच उंची शिक्षण, समाज आणि राष्ट्राची असते. त्यामुळे शिक्षकी पेशाची मूल्यव्यवस्था कोणत्याही परिस्थितीत हरवता कामा नये. शिक्षक वर्गावर्गात शिक्षण प्रक्रियेतून जी पेरणी करतो तीच पेरणी उद्या उगवणार आहे. त्यामुळे पुस्तक शिकवता शिकवता गाभाघटक, जीवन कौशल्य, मूल्यांची पेरणी करण्याचे काम करीत असतो. त्या पेरणीतून उद्याचा समाज उभा राहणार आहे. विनोबा भावे म्हणायचे की, विद्यार्थी पुस्तकातून फार काही शिकत नाही. विद्यार्थी शिक्षकांच्या वर्तनातून अधिक शिकत असतात. आपल्याला समाज घडवायचा असेल तर शिक्षणात आचार्य हवे आहेत. आचार्यांचे आचरण हेच विद्यार्थ्यांसाठी पुस्तक असेल. आचरणाची वाट हीच विद्यार्थ्यांसाठी जीवनअनुभूती असेल. त्यामुळे आचार्य म्हणजे जीवन मूल्यांची कार्यशाळा आहे.

आज शिक्षणात जर शिक्षकच विद्यार्थ्यांना वाममार्गाला घेऊन जाण्यासाठी प्रोत्साहित करीत असतील, तेच गैरप्रकारासाठी पावले टाकत असतील तर समाजाने कोणाकडून अपेक्षा ठेवायच्या हा खरा प्रश्न आहे. शिक्षक प्रश्नपत्रिका फोडून कॉपी करण्यासाठी प्रोत्साहित करीत आहेत. विशिष्ट शाळांमध्ये दहावीच्या वर्गात विद्यार्थ्यांचे अधिक प्रवेश का होतात? आपला जिल्हा बदलून त्याच शाळेत विद्यार्थी प्रवेश का घेतात? शंभर टक्के पास होण्याची हमी तर दिली जात नाही ना? त्या शाळांचा निकाल शंभर टक्के कसा लागतो? येथे जे विद्यार्थी पास होतात ते इतर शाळांमध्ये पास का होत नाहीत. असे प्रकार केल्याने संस्थाचालकांचे खिसे भरले जात असतील, मात्र यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासावरील विश्वास उडून जाईल.

वाममार्गानेदेखील आपल्याला यश मिळवता येते हा विचार विद्यार्थ्यांच्या मनात दृढ होणे त्याच्या व्यक्तिगत आयुष्यासोबत समाजासाठीही घातक आहे. त्यामुळे या संदर्भाने शासनाने विचार करण्याऐवजी व्यवस्थेतील मनुष्यबळाने अधिक गंभीर होत विचार करायला हवा. विद्यार्थ्यांच्या गैरप्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे घडत असेल तर समाजाचा र्‍हास जवळ आला आहे असे समजायला हरकत नाही. शिक्षण बिघडले की समाजातील सर्व मूल्यव्यवस्था ढासळते हे लक्षात घ्यायला हवे. शिक्षणाच्या मूल्यविचार धारेवरच समाज उभा राहत असतो. त्यामुळे केवळ परीक्षेतील गैरप्रकार एवढाच तो विचार नाही हे लक्षात घ्यायला हवे.

एकीकडे शाळा आणि शिक्षक हे प्रकार करीत असल्याचे उघड होत आहे, तर दुसरीकडे पालकच आपल्या पाल्याला कॉपी करण्यासाठी मदत करीत आहेत हेही माध्यमांतून समोर आले आहे. पालकांना आपल्या पाल्यांना अधिक मार्क हवे आहेत. याचे कारण त्यांना त्यांच्या अपेक्षा पाल्यांच्या माध्यमातून पूर्ण करायच्या आहेत. मुलांना आपण कॉपी करण्यास मदत केली तर कदाचित त्याला अधिक मार्क मिळतील, पण उद्या तो ज्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार आहे त्यासाठी लागणारे कौशल्य कॉपीने उत्तीर्ण झाल्यामुळे ती त्याला प्राप्त नसल्याने तिथे यश मिळण्याची शक्यता नाही. तेथेही कॉपी करून उत्तीर्णता प्राप्त केली तर प्रत्यक्ष जीवनात हाती केवळ पदवी मिळेल. हाती कोणत्याही प्रकारचे कौशल्य, ज्ञान नसल्याने नोकरी मिळण्याची शक्यता कमी होते. अलीकडे मार्कशीटवर असलेला विश्वास हरवत चालला आहे. त्यामुळे मार्कशीटवर मार्क कितीही असले तरी मुलाखत, प्रात्यक्षिक परीक्षांना सामोरे जावे लागत आहे.

व्यवसाय करायचा म्हटले तरी अभ्यास न करताच उत्तीर्ण झाल्याने कौशल्यविरहित माहितीने यश मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे पदवी घेतली तरी अपेक्षांची परीपूर्ती होण्याची शक्यता नाही. कॉपी करून आपण स्वत:च स्वत:ची फसवणूक करीत आहोत. पालक म्हणून आपण आपल्या पाल्याला कष्ट करण्याच्या वृत्तीपासून दूर घेऊन जात आहोत. विद्यार्थ्यांमधील प्रामाणिकपणाच आपण संपुष्टात आणत आहोत. पालकच पाल्याच्या जीवनात प्रकाशाची नाही तर अंधाराची वाट निर्माण करण्यासाठी हातभार लावत आहेत, हे अधिकच धक्कादायक आहे. त्यामुळे पाल्याच्या जीवनातील अंध:काराला पालक जबाबदार असणार आहेत. अशी वाममार्गी मदत करण्याऐवजी त्याच्यामध्ये स्वत:च्या शक्तीची ओळख होण्यासाठी पालकांनी प्रयत्न केले तर त्याला प्रकाशाची वाट निश्चितच सापडेल यात शंका नाही. पालक म्हणजे संस्काराची वाट दाखविणारे मार्गदर्शक असतात. पालकत्वाचा अर्थ जाणून न घेता वाट चालल्याने आपणच आपल्या हाताने पाल्याच्या भविष्यावर घाला घालत आहोत. येथे तर पालकच मुलांना जीवनाच्या अपयशाची वाट दाखवत आहेत हे लक्षात घ्यायला हवे.

अशा स्वरूपाचा मार्ग निवडल्याने मुलांचे भविष्य उद्ध्वस्त करीत आहोत. यातून मुलांचा अभ्यासावरील विश्वास उडेल. चांगल्या शिक्षकांच्या मनी निराशा येईल. समाजाचा शिक्षणावरील विश्वास उडेल. मूल्यांचा र्‍हास दिसू लागल्यावर शिक्षणाकडून तरी अपेक्षा कशा ठेवायच्या, असा प्रश्न पडेल. त्यामुळे आजच समाजाने विचार केला नाही तर उद्याच्या अंधारलेल्या व्यवस्थेतून आशेचा किरण दिसण्याची शक्यता नाही. एखाद्या देशाचा प्रवास अधोगतीच्या दिशेने व्हायचा असेल तर त्या देशासाठी कोणत्याही शस्त्रांची गरज नाही. त्या देशातील शिक्षण व्यवस्थेला ग्रहण लावले आणि गुणवत्ता ढासळण्यासाठीचे प्रयत्न झाले की देशाची अधोगती आपोआप सुरू होते. आपला हा प्रवास त्याच दिशेने मानायचा का? अप्रामाणिक माणसांमुळे कधीच चांगला समाज आणि राष्ट्र उभे राहू शकत नाही.

- Advertisment -