सेल्फी बिल्फी नो डाऊट, जस्ट पाऊट

काही जण शाळा, कॉलेज चुकवून समुद्रकिनारी फिरायला जातात. तिथे लाटा जिथे सर्वात जास्त उसळत असतात त्यांच्या जमेल तेवढे जवळ जाऊन सेल्फी घेण्याचा प्रयत्न करीत असतात. जणू ती लाट आपल्या डोक्यावर आणि आपण दिमाखात उभे राहून फोटो काढून घेण्याच्या प्रयत्नात असतात. तिथे ड्युटीवर असलेले पोलीस जिवाच्या आकांताने समजावून सांगत असतात, पण या मामू लोकांना काही समजतं का आजकालच्या फॅशनचे असं बोलून आपली सेल्फी काढण्यात अगदी मग्न होऊन जातात. यात फोन किंवा व्यक्ती त्या लाटेच्या ओघात वाहत जाताना दिसतात. घरी पालक आपल्या एकुलत्या एका मुलाची वाट पाहत बसतात.

–अर्चना दीक्षित

काय फॅशन आहे राव ही आजकाल? या फॅशनचे जन्मदाते कोण आहे, देव जाणे. बस संधी मिळाली की बॅगेतून फोन बाहेर येतो आणि सेल्फी काढायला हात पुढे सरसावलेले दिसतात आणि चुकून जरी कोणी म्हटलं की मला नाही येत सेल्फी घेता. झालं, पुढचे काही क्षण त्या व्यक्तीचे शाब्दिक क्लासेस सुरू होतात. ‘अय्या तुला सेल्फी घेता येत नाही. कशी ग बाई तू. किंवा कसला आहेस यार तू. कुठल्या जमान्यात वावरत असतोस. ही एकदम लेटेस्ट फॅशन आहे ना. मग तुझ्या स्मार्ट फोनचा काय उपयोग. किंवा अगदी चुल्लूभर पानी में डूब जा, असंदेखील म्हटलं जातं.

या सेल्फीसाठी लोक संधीसाधू झाले आहेत. आज काय तर सूर्योदय मस्त दिसत आहे. मग पार्श्वभूमीवर सूर्य आणि पुढे आपण उभे राहून आपला फोटो डार्क आला तरी चालेल पण पाऊट करून फोटो सोशल मीडियावर सूर्य डोक्यावर यायच्या आत हा फोटो गेला पाहिजे याची जणू स्पर्धाच सुरू होते. मग काय तर पहिला चहाचा कप हातात घेऊन त्या कपाजवळ पाऊट करून फोटो काढून स्टेटस अपडेट करण्यात येते. बरेच वेळा या नादात ओठाला चटका बसतो, पण पावट्याचा, हे हे म्हणजे त्या पाऊटचा फोटो काढणं जणू अगदी गरजेचे असल्यासारखे वागत असतात.

कधी काय तर म्हणे टुडे इज माय बर्थडे, विश मी हॅपी बर्थडे, असं म्हणत केक कट करून त्याचा तुकडा हातात घेऊन पावटा फोटो घेणार. मग अय्या दादू हॅपी बर्थडे असं म्हणत धाकटी बहीण तोच केक दादूला फासणार. मग पावट्याजवळ जाऊन पाऊट करून फोटो घेणार आणि स्वतःच्या इन्स्टाग्रामवर टाकणार. इतकेच काय तर बायका, पुरुषदेखील तितकेच या भलत्या फॅशनच्या आहारी गेलेले दिसतात. संध्याकाळी फिरायला जातात आणि तिथे आपल्या आजूबाजूला असलेल्या इतर महिलांना एकत्र करून ग्रुप सेल्फीसाठी उत्साहाने सहभागी होताना दिसतात. अनेकदा फिरणं बाजूला राहून जाते, पण सेल्फीची संधी कोणी चुकवत नाहीत.

पुरुषदेखील अबे चल ना आज का दिन सेलिब्रेट करते है, माझं प्रमोशन झाले आहे ना. ऑफिसमध्ये काम करीत असल्याने कॉफीचा कप हातात घेऊन चिअर्स म्हणून पाऊट करून सेल्फी घेऊन बायकोला तो फोटो पाठवून बातमी कळवतात. घरगुती समारंभातदेखील सगळे एकत्र येऊन आधी त्या सेल्फीकरिता अक्षरशः जीव कासावीस करतात. दात नसलेली आजीसुद्धा मग पाऊट करून तयार असते. हे सर्व गमतीजमतीपर्यंत ठीक आहे हो, पण या सर्व गोष्टींचा जेव्हा अतिरेक व्हायला लागला की त्याचे चुकीचे परिणाम होताना दिसतात. रस्त्यावर मधेच उभे राहून आजूबाजूला गाड्या येत असतानादेखील सेल्फीसाठी उतावळे होत असतात. त्यात कधी हातातून फोन सटकून रस्त्यावर पडतो आणि फोनचे दोन तुकडे होतात.

काही जण शाळा, कॉलेज चुकवून समुद्रकिनारी फिरायला जातात. तिथे लाटा जिथे सर्वात जास्त उसळत असतात त्यांच्या जमेल तेवढे जवळ जाऊन सेल्फी घेण्याचा प्रयत्न करीत असतात. जणू ती लाट आपल्या डोक्यावर आणि आपण दिमाखात उभे राहून फोटो काढून घेण्याच्या प्रयत्नात असतात. तिथे ड्युटीवर असलेले पोलीस जिवाच्या आकांताने समजावून सांगत असतात, पण या मामू लोकांना काही समजतं का आजकालच्या फॅशनचे असं बोलून आपली सेल्फी काढण्यात अगदी मग्न होऊन जातात. यात फोन किंवा व्यक्ती त्या लाटेच्या ओघात वाहत जाताना दिसतात. घरी पालक आपल्या एकुलत्या एका मुलाची वाट पाहत बसतात.

काही जण खास ट्रेकिंगला जातात. तिथे मिळेल, दिसेल किंवा वाटेल त्या ठिकाणी थांबून सेल्फी काढत असतात. ही यातली काही पावटी पोरं किंवा यांच्या नादाला लागलेल्या पावट्या पोरी, अहो म्हणजे पाऊट करून सेल्फी काढणारा समुदाय, डोंगरमाथ्यावर अशा ठिकाणी थांबून सेल्फी काढत असतात, जिथून सेल्फी काय पण ते सेल्फ पण परत येऊ शकत नाहीत. तेवढ्यासाठी वाटते हो हे सेल्फी बिल्फी, पाऊट वगैरे एका मर्यादेपर्यंत ठीक आहे हो, पण अतिरेक व्हायला लागला की परिणाम घातक होऊ शकतात याची जाणीव असावी, एवढेच वाटते बरं का!