घरफिचर्ससारांशपुण्य नाही पाप घडतंय...

पुण्य नाही पाप घडतंय…

Subscribe

सेवा किंवा दान म्हणून दानशूरांनी सिग्नलवर हात पुढे करून उभ्या राहणार्‍या सुदृढ माणसांना जसं अपंग केलंय, अगदी तसंच काहीसं पशुपक्ष्यांबाबत होतंय. चारा खाणार्‍या गायींना आम्ही आता पोळ्या, भात खाऊ घालू लागलोय. चिमण्या, कावळे, कबुतर यांच्यासाठी फीडर्स आणि स्वतंत्र भांडी ठेवू लागलोय. पण, कधी विचार केलाय की, ही सवय त्यांना त्यांच्या मूळ अधिवासापासून पारखी करतेय? आपलं हे दातृत्त्व त्यांना अधू करत चाललंय?

पशूपक्ष्यांच्या मूळ अधिवासात हस्तक्षेप करुन त्याची वाट लावायची आणि नंतर वाताहत झालेल्या या जिवांची कनवाळू वृत्तीने काळजी घ्यायची, यात कसलं आलंय दातृत्वं? एखाद्या पक्ष्याच्या पिलाला माणसांचा स्पर्श झाला की ते आपण स्वतःच आपल्या पिलाला संपवतात, असं सांगितलं जातं. त्यात शब्दशः तथ्य नसलं तरीही, त्यामागील पूर्वीच्या पिढ्यांचा उद्देश मात्र अगदी योग्य होता, हे नीट अभ्यास केला की पटतं.

प्रत्येक जिवाला निसर्गतःच त्याच्या उदरभरणाची क्षमता लाभलेली असते. ही क्षमता निर्माण करण्यासाठी तो जीव जे प्रयत्न करतो, त्यातून त्याचा शारीरिक आणि बौद्धिक विकास होत असतो. याच सवयीतून त्यांची जनुकीय संरचना कायम राहून पुढच्या पिढ्यांमध्ये ती रुजत असते. म्हणजे चिमणीने काय खावं, कावळ्याने काय खावं हे आता आपण ठरवू आणि भरवू लागलोय. म्हणजे त्यांच्या डीएनएमधील प्रोग्रॅमच आपण बदलतोय. उरलेला भात, बाजरी, पोळ्यांचे तुकडे आयते मिळाल्याने पक्षी ते खातात, भरवतात आणि पिलांनाही पुढे जाऊन त्याचीच सवय लागते. याचाच अर्थ मानवी हस्तक्षेपामुळे मूळ सवयीत बिघाड होत चाललाय. दाणा-पाणी शोधण्यासाठी घरापासून दूर जाऊन पुन्हा घराकडे परतणार्‍या चिमण्या, कावळे, कबुतर, मुनिया, बुलबुल, पोपट, माकड, खार, गायी यांना आपण परावलंबी बनवत चाललोय. यातूनच त्यांच्यातील चपळता, क्षमता यांवर परिमाण होत असल्याचं संशोधनातून दिसून आलंय.

- Advertisement -

उंबर, पिंपळ, वड, बाभूळी अशी उंचच उंच, मोठी झाडं आता फार कमी झालीत. त्यांत घरटी करून राहणार्‍या पक्ष्यांना नाईलाजाने सिमेंटच्या जंगलाची वाट स्वीकारावी लागतेय. त्यांच्या दुबळेपणाचा फायदा घेत आपण पुण्य मिळतंय या भावनेने त्यांना माणसाचं अन्न माणसाच्याच हाताने भरवलं जातंय. परदेशात मात्र असं खाऊ घालण्यावर बंदी आहे. आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीने निसर्गाच्या सानिध्यात माणसाचा अधिवास सांगितला असला तरीही, दुर्दैवाने आज माणसांच्या सानिध्यात निसर्गाच्या अधिवासाचा प्रवास सुरू झालाय. काही लोकांच्या बेगडी पक्षीप्रेमामुळे मुलांमध्ये आजार बळावू लागलेत. म्हणूनच वेळ आलीय मुलांना मुलांसारखी आणि पक्ष्यांना पक्ष्यांसारखं राहू देण्याची.

माणसांचं दातृत्त्व हे अपंग, वृद्ध, जखमी आणि भरकटलेल्या पशुपक्ष्यांसाठी असावं. दुष्काळात पाणी ठेवण्यापुरतं असावं. उगाचच प्रत्येक जीवाला भरवण्याच्या प्रेमातून पुण्य नव्हे, आपल्या हातून पाप घडतंय, याची जाणीव ठेवण्याची वेळ आलीय. पशुपक्ष्यांना आपल्या हातून भरवण्यापेक्षा याच हातांनी चार झाडं लावली तर त्यांच्या पिढ्या वर्षांनुवर्षे मूळ स्वभावाप्रमाणे जगतील आणि तुम्हालाही जगवतील!

- Advertisement -

कबुतरांमुळे श्वसनविकार
ठाणे, मुंबई, पुणे, नागपूर अशा सर्वच मोठ्या शहरांमध्ये मोठमोठ्या इमारतींवर शेकडोच्या संख्येने कबुतरांनी आपलं बस्तान मांडलंय. माणसांच्या उपकारामुळे (?) त्यांची संख्या प्रचंड वाढतेय. मात्र, याच कबुतरांची विष्ठा माणसांमध्ये श्वसनविकारांना कारणीभूत ठरतेय. अनेक ठिकाणी यातून मोठी दुर्गंधी आणि घाण तयार होते. याच पार्श्वभूमीवर मुंबईसह ठाणे महापालिकेनेही थेट आदेश काढत कबुतरांना दाणे भरवणार्‍यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा दिला होता. दिवसभर गूटुर्गू करणार्‍या या कबुतरांनी घरट्यांसाठी आता एसीसाठी खिडकीत बसवले जाणारे युनिट्सदेखील सोडले नाहीत. त्यामुळे झाडांवर कबुतराचं घरटं दिसतच नाही.

माकड ठरताहेत स्थूलतेचे बळी
गड, शिखर अशा उंच ठिकाणी अगदी सहज वावर असलेल्या माकडांना पर्यटक गंमतीने वेफर्स, कुरकुरे, मसालेदार पदार्थ, उकडलेली मक्याची कणसं खायला देतात. सप्तश्रुंगी गड, खंडाळा घाट, लेण्याद्री गणपतीचा डोंगर अशा अनेक ठिकाणी हे चित्र आपल्याला दिसतं. आपल्या या कृत्रिम मदतीमुळे ऐतखाऊ झालेल्या माकडांची चपळता खूप कमी झालीय. विशेष म्हणजे हे फास्ट फूड खाऊन माकडांमध्येही स्थुलता अर्थात ओबेसिटी दिसू लागलीय. चपळता आणि अत्यंत चतुरपणामुळे ओळखली जाणारी माकडं काहीशी आळशी झालीत. कारण, रोज उठायचं आणि एका ठराविक ठिकाणी बसायचं, बास्स… पर्यटकांची वर्दळ सुरू झाली की बसल्या जागी सगळं मिळतं, मग कडेकपारीतून भटकंती कशासाठी, हा विचार त्यांच्याही मनात येत असावा. पुढे हीच माकडं जेव्हा नैसर्गिक संकट अथवा त्यांच्याच अन्य टोळ्यांमुळे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी झाडांवरुन, कडेकपारीतून उड्या मारण्याचा ते प्रयत्न करतात. अशावेळी अधिक वजनाने तोल जाऊन त्यांचा मृत्यू होण्याच्या घटना घडल्या आहेत. हीच माकडं चमचमीत खाण्यासाठी आक्रमक बनतात, थेट हातातून पिशव्या घेऊन लंपास करतात, तर कधी त्यासाठी हल्ले करतात. मग, त्यांच्याबद्दल मनातल्या मनात जे काही बोललं जातं, ते सांगायला नको.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -