घरफिचर्ससारांशमौनाच्या भाषेतील प्रकट उच्चार

मौनाच्या भाषेतील प्रकट उच्चार

Subscribe

कवी राजू देसले यांच्या कविता व्यक्ती म्हणून आत्मकेंद्रित जरी असल्या तरी या आत्मवंचनेत अडकलेल्या नाहीत. एक व्यक्ती म्हणून प्रत्येकाचा असणारा संघर्ष प्रातिनिधिक स्वरूपात हा कवी मौनाच्याच भाषेला ‘अवघेचि उच्चार’ म्हणून आपल्यासमोर मांडतो आहे. ह्या कवितेच्या आशयाचा विचार संत तुकारामांच्या तुका म्हणे होय मनासी संवाद, इथपर्यंत जावून पोहोचल्यासारखा जाणवतो. स्वत:च्या सुप्त मानसिक कोलाहलाचा शोध हा कवी कविता या माध्यमातून घेत असल्याने साहजिकच त्या जिवंत वाटतात.

कॉपर कॉईन प्रकाशनाने काढलेल्या कवी राजू देसले यांच्या ‘अवघेचि उच्चार’ या कवितासंग्रहाची सध्या कविता विश्वात जोरदार चर्चा आहे. कवी म्हणून स्वत:ची अभिव्यक्ती कवितेतील प्रतिमांद्वारे दाखविण्याचा त्यांचा विचार व्यक्तिमनाचे प्रतिबिंब आहे. त्यांच्या कवितेत आलेल्या प्रतिमा ह्या त्यांना उच्चार वाटतात. ह्या त्यांना स्वत:ची अभिव्यक्ती वाटते.

त्यांच्या कवितांच्या शीर्षकाचा विचार केला तर त्यात मौनाच्या लाटा, शोक, संवाद, उदगार, मौनाचं झाड व अशी इतर अनेक शीर्षके आपल्याला सापडतील. याचाच अर्थ अंतर्मनाशी त्यांचा चाललेला संवाद आणि त्याची समष्टीशी नाळ जोडण्याचा हळूवार प्रयत्न या कवितांमधून होतो. हे जाणवू शकेल. याद्वारे कवी संवाद करू पाहतो. ही कवितेची भाषा वरवर जरी मौनाची वाटत असली तरी खोलवर रूजलेल्या संवादी प्रवाहाचा विचार त्यातून आपल्याला हळूवारपणे वाहताना दिसू शकेल.

- Advertisement -

उदाहरणार्थ मौनाचं झाड या कवितेत ते म्हणतात की,

चिंतनाचा झरा रंगातून
सर्वदूर
चित्र काही म्हणून पाहते
चौकटीबाहेरही

- Advertisement -

तसेच याच आशयाची मात्र तरीसुद्धा स्वत:चं वेगळेपण दर्शविणारी उदगार ही कविता अत्यंत महत्वपूर्ण ठरते ते तिच्या विश्वात्मक समेसाठी! त्यात ते म्हणतात की,

आविष्कारानंतर येणारं थकलेपण
हलके हलके निथळत जातं
खोल
आत आत
अमूर्त मनाकडे..

याचाच अर्थ कवी स्वत:च्या मनाचे विरेचन करण्यासाठी कवितेचा आधार घेवून जगू पाहतो आहे. कारण, कविताचं कवीच्या जीवन आशयाचे जणू सूत्र आहे हे आपल्याला कळू शकेल.
उदाहरणार्थ अस्वस्थ वर्तमान या कवितेत ते म्हणतात की,

परमेश्वराने आजकाल
मौन धारण केलंय
अस्वस्थ वर्तमानाच्या
पार्श्वभूमीवर बहुधा

या काव्यसंग्रहातील कवितेतील आशय व अभिव्यक्ती यांचा विचार केला असता ही कविता मौनाला प्रकट करू पाहते. मौनाची काव्यभाषा देऊ पाहते. मौन हाच एक आशयाने भरलेला भरीव असा जणू शब्द आहे हे त्यांच्या अनेक कवितांमधून आपल्याला कळू शकेल. तसेच या कवितासंग्रहात आलेल्या इतर कविता जसे की व्हायोलीन, पेंटर, कोलाज, मोनालिसाच्या फसलेल्या हास्याची कविता, यांचा विचार केला असता कवी अशा अनेक माध्यमांना स्वत:ला व्यक्त करण्यासाठी जवळ करू पाहतो आहे. मात्र तो ती व्हायोलिन करूणेचं फुलपाखरू होण्यासाठी वापरतो किंवा तो कोलाजचा वापर रंगभान हरवलेल्या चित्रकारासाठी वापरतो. म्हणजेच प्रचलित माध्यमांचा प्रचलित अर्थ नाकारून त्यांना स्वत:चा वेगळा अर्थ देवून स्वत:ला शोधण्याचा प्रयत्न ह्या कवितांमधून होताना दिसतो.

ह्या कविता व्यक्ती म्हणून आत्मकेंद्रित जरी असल्या तरी या आत्मवंचनेत अडकलेल्या नाहीत. एक व्यक्ती म्हणून प्रत्येकाचा असणारा संघर्ष प्रातिनिधिक स्वरूपात हा कवी मौनाच्याच भाषेला ‘अवघेचि उच्चार’ म्हणून आपल्यासमोर मांडतो आहे. ह्या कवितेच्या आशयाचा विचार संत तुकारामांच्या तुका म्हणे होय मनासी संवाद, इथपर्यंत जावून पोहोचल्यासारखा जाणवतो. स्वत:च्या सुप्त मानसिक कोलाहलाचा शोध हा कवी कविता या माध्यमातून घेत असल्याने साहजिकच त्या जिवंत वाटतात. उदाहरणार्थ सृजन दिंडी या कवितेत ते म्हणतात की,

आत कोसळणार्‍या अविरत घडामोडी
आणि अंत:स्वराची रूणझुण घेऊन
सृजन दिंडीचा प्रवास
उजेडाकडे ..

या ठिकाणी उजेड हा फक्त प्रकाश या अर्थाने आलेला नसून उच्चाराचे निमित्त साधून जे काही चैतन्यमय असेल ते शोधण्याच्या अर्थाने आलेला आहे. कारण कवी इथल्या वैभवाच्या खानदानी दंतकथेत (नॉश्ताल्जिया)अडकत नाही. तसेच खांद्यावर यातनांचा क्रुस घेऊन तो आतमध्ये दडलेल्या भयाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. त्यांची (मुकसंवाद) ही कविता त्यांच्या कवितासंग्रहाजवळ अधिक जाणारी ठरते. त्यात ते म्हणतात की,

‘त्यानं शीळ मारली की
अख्खं रान त्याच्याशी
गुजगोष्टी करतं…’

अशा स्वत:च्या गुजगोष्टी अवघेचि उच्चाराच्या माध्यमातून प्रकट करू पाहणार्‍या कवीच्या प्रतिभाविष्काराचा वाचनानंद जरूर घ्यायला हवा.

–अमोल गुट्टे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -