वेळ

मनुष्याने पृथ्वीवर पहिले पाऊल टाकल्यापासून काळ समय किंवा वेळ याविषयीची जाण त्याला आली आहे. वेळेचे महत्त्व काय असते हे आपण अनेकांकडून, अनेक वेळा, अनेक प्रकारे ऐकले आहे. वेळ हा छोट्या छोट्या गोष्टींनी तयार होत असतो. किती वाजले? हा प्रश्न आपण प्रथम केव्हा ऐकतो? कोणाकडून ऐकतो? लहानपणी आईवडील किंवा शिक्षकांकडून. ते आपल्याला घड्याळ शिकवत असतात तेव्हा. मग पुढे शाळा, कॉलेजात. त्यानंतर नोकरी- व्यवसायात आपल्याला आयुष्यभर घड्याळ पाहतच धावपळ करावी लागते.

मध्यंतरी सोशल मीडियावर एक खूप छान पोस्ट आली होती. अशीच कथेच्या स्वरूपात. एक तरुण होतकरू मुलगा नोकरीच्या इंटरव्ह्यूला निघालेला असतो. छान आवरून बिवरून. वेळेवरच निघतो, पण वाटेत त्याची गाडी पंक्चर होते. आजूबाजूला पंक्चर काढण्याचे दुकान नाही. तसाच गाडी कुठेतरी सुरक्षित ठिकाणी लावतो. बस स्टॉपवर येतो. तिथेही गर्दी. रिक्षाही नाही. तिकडे इंटरव्ह्यूची वेळ जवळ आलेली. तो घड्याळात बघतो, अंदाज घेतो आणि सरळ पायी निघतो.

जवळपास चार किमी अंतर चालून तो त्या ऑफिसमध्ये पोहचतो तेव्हा त्याचा पार अवतार झालेला असतो. कपड्याची वाट लागलेली असते. विस्कटलेल्या केसांनी, घामाघूम अवस्थेत तो कसाबसा इंटरव्ह्यू देतो. आपली निवड होण्याची शक्यता नाही अशी मनाची तयारी पण करतो, पण तो मुलगा सिलेक्ट होतो. इंटरव्ह्यू घेणारे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतात. ती म्हणजे त्याची वेळेची असलेली बांधिलकी. दिलेल्या वेळेवर हजर राहणे या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीला त्याने दिलेले महत्त्व.

मनुष्याने पृथ्वीवर पहिले पाऊल टाकल्यापासून काळ, समय किंवा वेळ याविषयीची जाण त्याला आली आहे. वेळेचे महत्त्व काय असते हे आपण अनेकांकडून, अनेक वेळा, अनेक प्रकारे ऐकले आहे. वेळ हा छोट्या छोट्या गोष्टींनी तयार होत असतो. किती वाजले? हा प्रश्न आपण प्रथम केव्हा ऐकतो? कोणाकडून ऐकतो? लहानपणी आईवडील किंवा शिक्षकांकडून. ते आपल्याला घड्याळ शिकवत असतात तेव्हा. मग पुढे शाळा, कॉलेजात. त्यानंतर नोकरी-व्यवसायात आपल्याला आयुष्यभर घड्याळ पाहतच धावपळ करावी लागते. धंदा-व्यवसायातील प्रगती असो की नोकरीतील वाटचाल सारं काही घड्याळाकडे पाहूनच होत असते.

‘यशस्वी कसे व्हावे?’..‘पैसा कसा कमवावा?’ याच धर्तीवर वेळ कसा वाढवावा.. कमीत कमी वेळेत अधिक कामे कशी करावी, अशा पुस्तकांची सध्या बाजारात चलती आहे. त्यात वेळ कसा वाचवायचा आणि आपल्या कामकाजासाठी अतिरिक्त वेळ कसा निर्माण करायचा याच्या युक्त्या प्रयुक्त्या सांगितल्या जातात. उदा. जलद गतीने वाचन करणे, जलद गतीने ऐकणे, थोडक्यात लिहिणे, इच्छा असेल तर सर्व काही साध्य होते. अगदी वेळही निर्माण करता येतो हे साध्या साध्या उदाहरणांतून ही पुस्तके सांगतात. एकाहून जास्त क्रियांचे एकत्रिकरण केल्यास एकूण वेळेत बचत होते. एकावेळी एकापेक्षा अधिक कामे केल्याने हातात जास्त वेळ शिल्लक राहतो. त्या वेळात आपण इतर कामे करू शकतो. वेळेची तूट बर्‍याच वेळा बुद्धीच्या आधारे भरून काढता येते. असे कितीतरी साधे, सोपे उपाय आपल्याला या पुस्तकांमधून वाचायला मिळतात.

थोडक्यात काय तर वेळ निर्माण करणे हे एक शास्त्र आहे आणि ते शिकणे गरजेचे आहे. त्यासाठीच वेळ काढावा लागतो. मनात आले तर कितीही आणि केव्हाही वेळ काढता येतो. यशस्वी व्हायचे असेल तर प्रत्येकाला वेळेची कमतरता दूर करावीच लागेल. सध्याचे युग स्पर्धेचे आहे. त्यामुळे कोणतेही काम अधिक वेगात कसे करता येईल हेच प्रत्येक जण पाहत असतो. कुठलेही जास्त काम मग तो अभ्यास असो, शिकवणे असो, उत्पादन असो, जनसंपर्क असो कमी वेळेत करणे हाच मानवाचा सतत प्रयत्न राहणार आहे हे निश्चित. वेळ पाळणे म्हणजेच वक्तशीरपणा. लहानपणी मी बघायचो की एक आजोबा दुपारी एक वाजता आमच्या गल्लीतून जात असत. त्यांचं कसलं तरी दुकान होतं. ते दुपारी एक वाजता जेवायला घरी जात. आमच्या दारावरून जाण्याचा टाईम म्हणजे एक वाजून पाच मिनिटे.

एक पाच म्हणजे एक पाचच. एक मिनिटही मागे नाही आणि पुढे नाही. एखादवेळी कोणाचं घड्याळ मागे पुढे झालं असेल तर त्यांच्या जाण्या येण्याच्या वेळेवरून ते घड्याळ लावायचे. त्यांच्या या वक्तशीरपणाचं कौतुक करणारेही होते आणि नावं ठेवणारेही होते. घड्याळाचे, वेळेचे गुलाम म्हणून त्यांच्यामागे बोलणारेही होते. हे त्यांनाही माहीत होतं. तोंडावर कधी कोणी बोललाच तर त्यावर त्यांचं एकच उत्तर असे,

मी वेळेचा गुलाम नाही..
मी वेळेचा मालक आहे…

–सुनील शिरवाडकर.