महाराष्ट्रात वैर लडाखमध्ये सैर

मर्यादा सोडून राजकारण म्हणजे काय हे जर भविष्यात कुणाला अभ्यासायचे असेल तर त्यांनी सद्यस्थितीतील राजकारण अभ्यासावे. राजकारणात कुणाच्या व्यंगावर, आजारावर भाष्य करायचे नसते हा अलिखित नियमच असतो. किंबहुना ही नैतिकता पाळल्यानेच महाराष्ट्राचे राजकारण प्रगल्भ होत गेले, परंतु सध्या या नितीमूल्यांना तिलांजली देऊन शिवराळ भाषेचा सर्रासपणे वापर सुरू झाला आहे. यातून राजकारणाची खालावलेली पातळी दिसून येते. महत्वाचे म्हणजे एकीकडे ही एकमेकांची विरोधक मंडळी राजकीय व्यासपीठांवर एकमेकांवर तुटून पडत असताना दुसरीकडे हीच मंडळी अन्य प्रदेशात एकत्र येऊन स्नेहभोजनाचा आनंद लुटताना दिसते, मात्र यातील ‘बिटविन द लाईन’ लक्षात न घेता कार्यकर्ते एकमेकांची गच्ची धरतात, हाणामारी करतात. त्याचवेळी नेतेमंडळी स्नेहभोजन, स्नेहसंवादात व्यस्त असतात हे अलिकडे दिसून आले आहे.

‘अमर प्रेम’ चित्रपटातील एक गाणं प्रसिद्ध आहे. ‘ये क्या हुआ कैसे हुआ’.. हे गाणं अनेकांच्या ओठांवर आजही असते. परंतु आजकाल हे गाण टिव्हीवरच्या बातम्या बघून गुणगुणलं जातंय. आपण जे समजतो ते तसं कधीच नसतं आणि आपण ज्या गोष्टीचा स्वप्नातही विचार करत नाही, तसंच घडतं हे आजच्या राजकारणात पावलोपावली दिसून येत आहे. खरं तर महाराष्ट्राचं राजकारणानेच आता वेगळं वळण घेतलं आहे.

काही दिवसांपूर्वी हनुमान चालीसा पठणावरून अपक्ष आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा यांच्याविरुद्ध शिवसेनेने अक्षरश: आग ओकली. त्यांनीही शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्यातून हा वाद शिगेला पोहचला होता. वाद पेटलेला असतानाच ‘शिवसेनेच्या नादाला लागाल तर वीस फूट खोल खड्ड्यात पुरणार’ अशी सिंहगर्जना संजय राऊत यांनी केली आणि आता खरा सामना बघायला मिळणार असं गृहितक सर्वसामान्यांच्या मनात बांधलं गेलं. वाद शिगेला पोहचला. त्यातून धक्काबुक्की झाली. हाणामारी झाली. रडारडी झाली.

परंतु काही दिवसातच आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा हे लडाखमध्ये खासदार संजय राऊतांशी गप्पा मारताना दिसले. संसदेच्या संरक्षण समितीचे हे सदस्यांची देहबोली बघता काही दिवसांपूर्वीच्या घडामोडी या जणू कपोकल्पित होत्या असा भास व्हावा. लडाखमधील त्यांची भेट निव्वळ योगायोग म्हणून बघितली जावी का? नुसत्या गप्पा नाही तर सोबत स्नेहभोजन घेऊन ही मंडळी सेल्फी घेतानाही दिसली. हे ‘सेल्फिश’ राजकारण मात्र कार्यकर्त्यांना दिसलंच नाही. दुसरी घटनाही अशीच आहे.

केतकी चितळे नावाची विदुषी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या वॉलवर शरद पवारांविषयी काहीबाही बरळली. हे बरळणं खरं तर कुणालाच रुचलं नाही. या बरळण्याहून वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांवर टीकास्त्र सोडत असताना राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांसारख्या कट्टर विरोधकांनी शरद पवारांसह कोणत्याही ज्येष्ठ नेत्याविषयी असे अनुदगार काढणे चुकीचेच आहे हे स्पष्ट केलं. संबंधितावर कारवाई करण्याची मागणी करून त्यांनी आपलं मोठंपण सिद्द केलं. राजकारणातील शत्रू हे वैयक्तिक जीवनात एकमेकांचे वैरी कधीच नसतात हे या घटनेवरून दिसून आले, परंतु कार्यकर्ते अशा घटनेतून बोध घेतानाच दिसत नाही.

फ्रेंच तत्त्वज्ञ व्हाल्टेअरने फ्रान्समधील अनियंत्रित राजेशाही, स्वार्थी धर्मगुरू आणि विलासी उमरावांवर कडाडून हल्लाबोल केला होता. दोन हजारहून अधिक पुस्तके लिहिणारा व्हाल्टेअर म्हणतो, ‘एखाद्या माणसाचे आणि माझे विचार एकमेकांशी जुळत नाहीत, तो माझ्या विरूद्ध बोलतोय, ते मला आवडत नाही पण तरीही त्याला थांबवण्याचा प्रयत्न कोणी केला तर मी तसे प्रयत्न करणार्‍यांच्या विरूद्ध जाईन! कारण माझ्याविरूद्ध बोलणार्‍यालाही बोलण्याचा मूलभूत हक्क आणि अधिकार आहे. त्याचं बोलणं ऐकून घेण्याची क्षमता निर्माण होणं गरजेचं आहे.’ इतके उदात्त विचार मांडणारे परदेशी राजकीय तत्वज्ञ आणि दुसरीकडे वैयक्तिक आयुष्यात राजकारण विसरणारे महाराष्ट्रातील नेतेमंडळी.

या मंडळींची ही ‘दुटप्पी’ भूमिका बघून कार्यकर्त्यांच्या तळपायाची आग मस्तकी जाऊ शकते, परंतु राजकारणातील वैर बाजूला ठेवून संवाद साधने ही महाराष्ट्राची परंपरा आहे, हे प्रत्येकाने समजून घ्यावे. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांनी यातून एकच बोध घ्यावा की, आपण सुद्धा राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करावे आणि इतर वेळेला आपल्या वैयक्तिक आयुष्यावर त्याचा कुठल्याही प्रकारे परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी. माणसा माणसामध्ये मतभेद असावेत मनभेद असू नये, असं महाराष्ट्राचं राजकारण शिकवतं. काही दिवसांपूर्वी एकमेकांविरुद्ध बोलणारे हे राजकीय नेते कट्टर विरोधक असले तरी ते वेळेला एकत्र येतात ती महाराष्ट्राच्या विकासासाठी सकारात्मक बाब म्हणावी.

–अमोल वाघमोडे