हुशार विद्यार्थ्यांचा पोटासाठी आटापिटा!

पारंपरिक अभ्यासक्रमासाठी असलेल्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त राहत आहेत. सध्या गुणवत्ता असली तरी हाताला काम देणारे अभ्यासक्रम हवे आहेत. ज्ञानाच्या गरजेइतकीच पोटाची भूक महत्त्वाची आहे. ती भूक शिक्षण क्षमवत असेल तर विद्यार्थी तिथेही प्रवेश घेण्यास तयार आहेत. पोटासाठी कष्ट करण्याची हिंमत नवी पिढी दाखवत आहे हे कौतुकास्पद आहे, मात्र ज्ञानवंत विद्यार्थी केवळ नोकरी व पैशांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमाची निवड करणार असतील तर त्यात समाजाचे व राष्ट्राचेही नुकसान आहे हेही लक्षात घ्यायला हवे. क्षमता असलेले, हुशार, विद्वान, ज्ञानसंपन्न विद्यार्थी हाच आपल्या राष्ट्राचा ठेवा आहे.

राज्यात कौशल्य व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढताना दिसत आहे, मात्र जो अभ्यासक्रम तत्काळ हाताला काम देऊन पैसा उपलब्ध करून देईल, पोटाची भूक क्षमवेल त्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. शंभरपैकी शंभर गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांनी आयआयटीसारख्या अभ्यासक्रमाची वाट चालण्याची गरज असताना हे विद्यार्थी आयटीआयसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेत आहेत. गुणवत्ता असली तरी जगण्याचे वर्तमानातील प्रश्न वेगळे आहेत हे लक्षात घेऊन विद्यार्थी मार्ग निवडत आहेत. एकीकडे आयटीआयसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमाला क्षमतेपेक्षा अधिक मोठ्या प्रमाणावर अर्ज आले आहेत. त्याचवेळी शिक्षक होण्यासाठी लागणार्‍या अध्यापक विद्यालयातील प्रवेशासाठी एकूण क्षमतेच्या ५० टक्केही अर्ज आलेले नाहीत. जे आले आहेत त्यातही गुणवत्तेचा फार मोठा आलेख उंचावला नसणे हे कशाचे द्योतक मानायचे? दुसरीकडे पारंपरिक अभ्यासक्रमासाठी असलेल्या जागाही मोठ्या प्रमाणावर रिक्त राहत आहेत.

सध्या गुणवत्ता असली तरी हाताला काम देणारे अभ्यासक्रम हवे आहेत. ज्ञानाच्या गरजेइतकीच पोटाची भूक महत्त्वाची आहे. ती भूक शिक्षण क्षमवत असेल तर विद्यार्थी तिथेही प्रवेश घेण्यास तयार आहेत. पोटासाठी कष्ट करण्याची हिंमत नवी पिढी दाखवत आहे हे कौतुकास्पद आहे, मात्र ज्ञानवंत विद्यार्थी केवळ नोकरी व पैशांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमाची निवड करणार असतील तर त्यात समाजाचे व राष्ट्राचेही नुकसान आहे हेही लक्षात घ्यायला हवे. क्षमता असलेली, हुशार, विद्वान, ज्ञानसंपन्न विद्यार्थी हाच आपल्या राष्ट्राचा ठेवा आहे. उद्याची अर्थव्यवस्था ही ज्ञानमय अर्थव्यवस्था असणार आहे. त्यासाठी हुशार विद्यार्थ्यांचा अधिकाधिक उपयोग संबंधित क्षेत्रात होण्याची गरज आहे, मात्र त्याकडे होणारे दुर्लक्ष चिंताजनक म्हणायला हवे.

राज्यात गेल्या काही वर्षांत आयटीआयसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेशासाठी स्पर्धा उंचावत आहे. त्यासाठीचे प्रवेश ऑनलाईन सुरू करण्यात आले आहेत. येथे असणारी स्पर्धा दिवसेंदिवस वाढत आहे. खरेतर या अभ्यासक्रमाला मिळणारे प्रवेश आणि मिळणारे प्रमाणपत्र म्हणजे हमखास नोकरी असे चित्र शंभर टक्के नाही, मात्र किमान येथे प्रवेश घेऊन कौशल्य प्राप्त केले तर हमखास धंदा तरी करता येईल ही विद्यार्थ्यांमध्ये भावना वाढत आहे. त्यामुळे पारंपरिक अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. राज्यातील पारंपरिक अभ्यासक्रमाच्या लाखो जागा रिक्त आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रम आणि इतरही अभ्यासक्रमाची स्थिती समाधानकारक आहे असेदेखील नाही. अगदी डीएड्, बीएड्सारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमाला क्षमतेपेक्षा कमी अर्ज येत असल्याने येईल त्याला प्रवेश असे चित्र आहे.

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचेही फारसे समाधानकारक चित्र नाही. तिथेही मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त असल्याचे विविध अहवाल सांगत आहेत. त्यामुळे या परिस्थितीचा गंभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. राज्यातील अभियांत्रिकी पदविकेसाठी १ लाख ०२ हजार २२४ प्रवेश क्षमता आहे. त्यापैकी ६९ हजार ७०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. पदवीसाठी १ लाख ३७ हजार ५०८ प्रवेश क्षमता आहे, त्यापैकी ८६ हजार ९५२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. पदव्युत्तर ५ हजार १५२ जागा असून त्यापैकी ४ हजार ११६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. म्हणजे राज्यात २ लाख ४४ हजार ८८४ प्रवेश क्षमता आहे. त्यापैकी १ लाख ६० हजार ७७६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे, म्हणजे आपल्याच राज्यातील ८४ हजार ११६ जागा रिक्त आहेत, तर पारंपरिक महाविद्यालयातील कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेकडील ओढा आटलेला आहे.

राज्यात ४ लाख ७३ हजार ९१९ पदवी आणि पदव्युत्तर प्रवेश क्षमता आहे. त्यापैकी २ लाख ७८ हजार ८६३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे, म्हणजे कला शाखेतील १ लाख ९५ हजार ०५६ विद्यार्थ्यांच्या जागा रिक्त आहेत. विज्ञान शाखेच्या ३ लाख ३४ हजार २२२ प्रवेश क्षमता असून त्यापैकी २ लाख १५ हजार ८१२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. येथे १ लाख १८ हजार ४१० जागा रिक्त आहेत. वाणिज्य शाखेकरिता ४ लाख ६१ हजार ४१० प्रवेश क्षमता आहे, त्यापैकी ३ लाख ३१ हजार ०२६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. या शाखेच्या १ लाख ३० हजार ३८४ जागा रिक्त आहेत. राज्यात बीएड्साठी एकूण २७ हजार ३५२ प्रवेश क्षमता असून त्यापैकी १० हजार ६२१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. कमी अधिक प्रमाणात वास्तुशास्त्र, वैद्यकीय, विधी, कृषीसारख्या विविध पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागांची स्थिती आहे. हे अभ्यासक्रम व्यावसायिक असूनही विद्यार्थ्यांचा कल मात्र आयटीआयपेक्षा कमी आहे हे विशेष.

राज्यात आयटीआय व्यावसायिक अभ्यासक्रमाला सुमारे ३ लाख ८ हजार ४३९ विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत. हे अर्ज प्रवेश क्षमतेपेक्षा निश्चित कितीतरी पट अधिक आहेत. यातील ८६.६४ टक्के विद्यार्थी आहेत, तर १३.५७ टक्के विद्यार्थिनी आहेत. ०.००२ टक्के तृतीयपंथीय विद्यार्थी आहेत. यात शंभर टक्के गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ५३ इतकी आहे. ९६ ते ९९ टक्के गुण मिळविणारे विद्यार्थी २ असून ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणारे ३५३ विद्यार्थी आहेत. ८६ टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करणारे ३ हजार ५९९ विद्यार्थी असून ८१ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणारे विद्यार्थी १२ हजार १४९ इतके आहेत. ७६ टक्क्यांपेक्षा अधिक गुण असलेले विद्यार्थी २३ हजार ६२२ इतके आहेत. ७१ टक्क्यांपेक्षा अधिक गुण असलेले ३३ हजार ४७० विद्यार्थी आहेत. ६६ टक्क्यांपेक्षा अधिक गुण असलेली विद्यार्थी संख्या ४९ हजार ९१६ इतकी आहे.

६१ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणारे ४४ हजार ५६७ विद्यार्थी आहेत. ५६ टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण ४४ हजार ८११ असून ५१ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ९२ हजार ७०७ इतकी आहे. ४० टक्क्यांपेक्षा कमी गुण असणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण ११ हजार ९११ इतके आहे. या आकडेवारीवर नजर टाकली तर लक्षात येते की राज्यातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांचा ओढा आयटीआय अभ्यासक्रमाला आहे. त्यापलीकडे ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणारे विद्यार्थी ७३ हजार २४८ आहेत. एकूण अर्जापैकी २४ टक्के विद्यार्थी उच्चश्रेणीतील आहेत हे विशेष. राज्यात दुसरीकडे डीटीएडसारख्या अभ्यासक्रमाला सुमारे ३२ हजार ६४७ विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे, मात्र या जागांसाठी केवळ १५ अर्ज प्राप्त झाले आहेत.

राज्यात सद्यस्थितीत ५९६ अध्यापक विद्यालये आहेत. कधीकाळी या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणे दुरापास्त होते. संस्थाचालक व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश देताना लाखो रुपये कमावत होते. गुणवत्ता यादीतील विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेत होते. त्यामुळे राज्यात कधीकाळी या अभ्यासक्रमाला सुमारे एक लाखापेक्षा अधिक विद्यार्थी प्रवेश क्षमता होती. आज अध्यापक विद्यालयांची संख्या घटली आहे. या अभ्यासक्रमाला क्षमतेपेक्षा कितीतरी पट अधिक अर्ज येत होते. लाखो विद्यार्थी प्रवेशाची प्रतीक्षा करायचे आणि त्याचवेळी ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण असले तरी प्रवेश मिळेल याची खात्री नसायची. आज या अभ्यासक्रमाची अवस्था म्हणजे किमान आवश्यक गुणापर्यंत असलेले विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. काही ठिकाणी तर अगदी दोन-तीन वेळा नापास झालेल्या विद्यार्थ्यांनादेखील प्रवेश मिळत आहेत. हे चित्र भविष्यातील शिक्षणासाठी निराशाजनक आहे, मात्र असे का घडत आहे याचा विचार करायला हवा.

उद्याचा भारत ज्यांनी घडवायचा आहे तिथे कमी गुणवत्तेचे विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. त्यामुळे उद्याच्या काळात शिक्षणाची प्रक्रिया तरी गुणवत्तापूर्ण कशी होईल, हाही प्रश्न आहे. त्यात आपण ज्यांना हुशार म्हणतो अशी मुले परिस्थितीअभावी व्यावसायिक कौशल्याच्या क्षेत्रात येत असतील तर ती गोष्ट निश्चितच त्या क्षेत्रासाठी चांगली असली तरी भविष्यातील ज्या बौद्धिक गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांची गरज भासणार आहे त्या क्षेत्रात मोठी उणीव निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे. आपल्या देशात संशोधनाच्या क्षेत्रात फार काही समाधानकारक चित्र नाही. अनेक क्षेत्रात गुणवत्तेची माणसं हवी आहेत, पण तिथे ती कमी आहेत. सृजनात्मकतेने नाविन्याची वाट चालणार्‍या वाटा आपल्याकडे फारशा तुडविल्या जात नाहीत हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे सद्यपरिस्थितीचा अभ्यास करीत धोरण घेण्याची गरज निर्माण झाली आहे. उच्च शिक्षणाची वाट अधिक महागडी होत असल्याने गुणवत्ता असलेली मुले तिकडे दुर्लक्ष करीत आहेत याचाही विचार व्हायला हवा.