घरफिचर्ससारांशनवरात्रोत्सवात सोशल मीडियाचा धोका!

नवरात्रोत्सवात सोशल मीडियाचा धोका!

Subscribe

नवरात्री खरे तर स्त्री शक्तीचा जागर, आदिमाया आदिशक्तीचे पूजन करून स्वतःमधील धैर्य सामर्थ्य आध्यात्मिक प्रगती साधण्याचा उत्सव, उपवास करून आपल्यातील संयम, सोशिकता पडताळण्याचा कालावधी. परंतु रोज नवनवीन रंग, त्यानुरूप मेकअप, दागदागिने घालून सामाजिक माध्यमातून आपले फोटो प्रसिद्ध करणे यामध्ये महिला युवती जास्त व्यस्त दिसतात...त्यामध्ये काही वावगे असण्याचे कारणच नाही. पण अतिउत्साहाच्या भरात आपण कुठे स्वतःच्याच समस्या वाढवत तर नाही ना याचाही विचार या काळात करणे गरजेचे आहे.

आजकाल अँड्रॉइड मोबाईल, लॅपटॉपच्या माध्यमातून सोशल मीडियाचे अ‍ॅप्लिकेशन्स वापरत नाही असे बोटावर मोजण्याइतके आहेत. लहान मुलांपासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत आज प्रत्येक जण स्मार्ट फोनशी परिचित आहेत. मोबाईल आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. महिलादेखील मोठ्या प्रमाणात दैनंदिन, कार्यालयीन कामकाजासाठी, व्यावसायिक कारणांसाठी, करमणुकीसाठी विविध अ‍ॅप्लिकेशन वापरताना दिसतात. टेकनॉलॉजी जशी दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे तसेच सोशल मीडियावर होणारे प्रेम प्रचंड वेगाने वाढत आहे. ऑनलाईन प्रेम करण्याचा नवा ट्रेंड सध्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. वास्तविक सामाजिक माध्यमातून आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात, माहिती होतात या प्लॅटफॉर्मचा सुयोग्य वापर जर करता आला तर आपण खूप काही आत्मसात करू शकतो.

अनेक सकारात्मक विषय, व्यवसाय, शिक्षण, सामाजिक कार्य, आध्यत्मिक माहिती, आरोग्य या सारख्या असंख्य गोष्टी आपल्याला समाज माध्यमातून मिळतात. महिला तर अतिशय उत्साहाने नवीन नवीन अ‍ॅप्लिकेशन शिकून, त्याबद्दल माहिती घेऊन ती हिरीरीने वापरतात. महिला कुतूहलापोटी अनेक व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इंस्टाग्राम अशा समूहात सामील होतात. मोठ्या प्रमाणात माहितीचे आदानप्रदान, गप्पा, फोटो, व्हिडिओ एकमेकांना शेअर करून सगळ्यांशी आपण कनेक्ट आहोत, अपडेटेड आहोत. आपल्याला समाजातील अनेक जण ओळखतात. आपल्याशी संवाद साधायला उत्सुक असतात. आपण सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आणि अ‍ॅक्टिव्ह आहोत याचा महिलांना सार्थ अभिमान वाटतो.

- Advertisement -

अशा अ‍ॅप्लिकेशनमधील ग्रुप्स विषयी जर बघितलं तर, आपण जॉईन केलेल्या किंवा आपल्याला अ‍ॅड केल्या गेलेल्या ग्रुपमधील सर्व व्यक्तींचा आपल्याला परिचय नसतो. फारफार तर ग्रुप अ‍ॅडमिनला आपण थोडंफार ओळखत असतो. अनेक ग्रुपमध्ये समूहातील सदस्यांनी त्यांचे नाव, गाव त्यांच्या नंबर समोर ठेवलेले नसते. त्यामुळे कोणकोण समूहात आहे याची बेसिक कल्पनासुद्धा आपल्याला नसते. कोणाचेही बॅकग्राऊंड, ठाव ठिकाणा उद्योग, व्यवसाय आपल्याला माहिती नसतो. अशा परिस्थितीमध्ये महिला खूपच बेसावध पद्धतीने ग्रुपवर वावरताना दिसतात. काहीवेळा ग्रुपमध्ये असलेले काही पुरुष सदस्य महिला सदस्यांना विनाकारण वैयक्तिक मेसेज, फोन करताना दिसतात. यावेळी महिला कोणत्या पद्धतीने कसा प्रतिसाद देते यावर पुढील कथानक अवलंबून असते. आपण पाहतो की सध्या अनेक प्रेम कथांचा जन्म सोशल मीडियामधूनच होतो. प्रेमाच्या आणि प्रेम करण्याच्या संकल्पनामध्ये आमूलाग्र बदल आताशा झालेला दिसतो.

सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असलेल्या महिलांना वैयक्तिक मेसेज, फोन केले जातात, त्यांच्याशी ओळख वाढवली जाते, त्यांच्या फोटोचं कौतुक केलं जातं आणि त्यांच्याशी सातत्याने संवांद ठेवायला सुरुवात होते. वैयक्तिक माहितीचीदेखील देवाणघेवाण होते. सामाजिक माध्यमातून भेटणारी, ओळख झालेली प्रत्येक नवीन व्यक्ती चुकीची किंवा त्रासदायक नक्कीच नसते. पण काहीवेळा चुकीच्या लोकांना प्रतिसाद दिला गेल्यास, त्यांचा हेतू लक्षात न आल्यास, अथवा जास्तच विश्वास ठेवला गेल्यास महिलांना स्वतःच्याच अशा उतावीळपणे वागण्याचा त्रास सहन करावा लागतो.

- Advertisement -

आपली जी स्वप्न, जे विचार, ज्या अपेक्षा प्रत्यक्ष जीवनात पूर्ण होत नसतात त्या पूर्ण करण्याकडे प्रत्येकाचा कल असतो. त्यात काही चुकीचं नाही, प्रत्येकाचं स्वतःचं असं एक मन असतं. ज्यामध्ये तो स्वतःच्या फॅन्टसी पूर्ण करण्याची स्वप्न पाहत असतो. आजकाल मोबाईलमुळे, अनेकांच्या संपर्कात राहता येत असल्यामुळे, नवीन नवीन अ‍ॅप्लिकेशनमार्फत संवाद साधने सोपे झाल्यामुळे आपली स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रत्येक जण धडपडताना दिसतोय. सामाजिक माध्यमातून जी आभासी दुनिया आपल्याला खुणावत असते तिच्या किती आधीन जायचं हे ठरवणं प्रत्येकाला जमेलच असं नाही.

महिला मुळातच भावनाप्रधान असल्याने त्यांना या स्वरूपाच्या आभासी प्रेमाची पटकन भुरळ पडते. महिलांना हे समजत नाही की जरी त्यांनी अशा प्रकारच्या ऑनलाईन प्रेम प्रकरणात भावना गुंतवल्या असतील तरी त्या कोणत्या मर्यादेपर्यंत असाव्यात? चॅटिंग करताना आपली तसेच समोरच्याची भाषाशैली, भाषेचा दर्जा किती घसरू द्यावा, समोरून चुकीचा व्हिडिओ अथवा फोटोची मागणी झाल्यास ती पूर्ण करावी का? ज्या व्यक्तीला आपण प्रत्यक्ष ओळखत नाही, भेटलेलो नाही किंवा अतिशय अल्पपरिचय ज्या व्यक्तीबाबत आपल्याला आहे, त्याला आपले स्वतःचे अश्लिल फोटो अथवा व्हिडिओ अथवा आपली वैयक्तिक माहिती अतिशय कमी कालावधीच्या परिचयात पाठवणे कितपत योग्य आहे? समोरील व्यक्ती याचा गैरवापर करणे, ब्लॅकमेल करणे हा विषय तर खूपच वेगळा आहे यावर आपण सध्या तरी बोलणार नाही.

हे सगळे करत असताना महिला मात्र समोरच्या व्यक्तीसोबत चॅटिंगवर केलेलं हितगुज खरं समजून आपल्या सर्व भावना, विश्वास, प्रेम समर्पित करून त्याच्या ऑनलाईन मागण्या पूर्ण करीत असते. आभासी आणि ऑनलाईन प्रेम पण महिला समरस होऊनच करते कारण ती त्या व्यक्तीपासून शरीराने दूर असली तरी मनाने पूर्ण गुंतलेली असते. पुरुष मात्र अशा प्रेमाला किती गांभीर्याने घेतात, त्यांच्या भावना तितक्यात समर्पित असतात का, की केवळ काही मिनिटांसाठी असे फोटो, व्हिडिओ एन्जॉय करून ते विसरून जातात. अशा प्रकारचे सामाजिक माध्यमातून केले गेलेले स्त्री पुरुषाचे प्रेम, पुरुषाने महिलेकडे याच माध्यमातून केलेल्या विविध मागण्या, भेटण्याचे, फिरण्याचे केलेले प्लॅन, दिलेली वचन किती तात्पुरती आणि पोकळ असतात हे समुपदेशनाला आलेल्या अनेक प्रकरणांमधून लक्षात येते.

महिलांनी स्वतःलाच अशा प्रकरणात गुंतू न देणे रास्त राहील असे वाटते. कारण सोशल मीडियाचा वापर करताना जो काही प्रोटोकॉल आपल्याकडून किंवा समोरच्या कडून वेळीच पाळला गेला नाही तर असा भावनांचा ऑनलाईन खेळ सुरू होतो. मग प्रेमात पडायला वेळ लागत नाही. व्हॉट्सअ‍ॅपवरील ईमोजीदेखील किती पटकन वापरतो आपण! मग त्या इमोजीचा अर्थ काय, त्यातून काय प्रकट होते याचा थोडासुद्धा विचार आपण करीत नसतो. आपण कोणताही विचार न करता पाठवलेले ईमोजी, विविध इमेज, वैशिष्ठ्यपूर्ण चित्र समोरच्याच्या मनात काय विचार आणि भावना निर्माण करतात याची जाणीव महिलांनी तसेच पुरुषांनीदेखील ठेवणे आवश्यक आहे. अनेकदा पुरुषही चुकीचा हेतू ठेऊन संबंध प्रस्थापित करणार्‍या महिलांना प्रमाणापेक्षा जास्त प्रतिसाद देऊन स्वतःच्या समस्या वाढून घेतात.

आपल्याला समोरची व्यक्ती पूर्णपणे ओळखू आल्याशिवाय, ती खरंच त्या दर्जाची असल्याशिवाय, तिचं आणि तुमचं भविष्यातील नातं खरंच कायमस्वरूपी टिकू शकणार असल्यास, त्या नात्याला प्रत्यक्षात आणण्याची दोघांची हिंमत आणि तयारी असल्याशिवाय, ती तुमच्या भावनांची कदर करणारी असल्यास, तसेच फक्त आणि फक्त तुम्हाला खरंच वास्तविक आयुष्यात साथ देण्यासाठी सकारात्मक असल्याशिवाय असं कोणताही ऑनलाईन प्रेम प्रकरण मग ते लग्नाअगोदरचं असो अथवा लग्न झाल्यानंतरचं विवाहबाह्य असो, कोणत्याही वयोगटातील स्त्री पुरुषांमधील असो, महिलांनी ते पुढे नेणं म्हणजे एखाद्यासाठी फक्त ंआणि फक्त टाइमपासचे साधन बनून राहण्यासारखं आहे. समोरच्या व्यक्तीची आपण प्रायोरिटी आहोत का, असलो तरी किती प्रमाणात, त्याच्या आयुष्यात, मनात आपले स्थान काय, अस्तित्व काय हे जाणून घेऊननच पुढे मार्गक्रमण करणे योग्य राहील असे वाटते.

आपल्या शाश्वत आयुष्यात कोण किती काळ खर्‍या अर्थाने कायमस्वरूपी राहणार आहे याची शहानिशा केल्याशिवाय अशा कोणत्याही समाज माध्यमाच्या प्लॅटफॉर्मवरून तयार झालेले नाते संबंध, व्हर्चुअल शारीरिक संबंध आपल्या खर्‍या आयुष्यालादेखील डॅमेज करतात. ऑनलाईन रिलेशनशिपमध्ये समोरच्याची गरज संपली, तुमच्यातील इंटरेस्ट संपला की ती व्यक्ती तुम्हाला टाळायला सुरुवात करते, तुमच्याशी न बोलण्याची विविध कारणं आणि सबबी सांगू लागते. तुम्ही स्वतः त्या व्यक्ती पुढे लाचार होऊ लागतात आणि तुमची मन:स्थिती बिघडायला सुरुवात होते.

त्यामुळे रिलेशनशिप कोणतीही असो ती जर प्रत्यक्षात येणार असेल आणि प्रामाणिकपणे मनापासून दोघेही इन्व्हॉल होणार असतील तरच ती पुढे नेण्यात अर्थ आहे. आपल्या सोयीसाठी, कामासाठी आपण मोबाईल वापरत आहोत आणि त्यातून काही सकारात्मक ज्ञान, माहिती मिळाली तर ती आत्मसात करणार आहोत याची पूर्ण जाणीव महिलांनी ठेवणे आवश्यक आहे. हाच मोबाईल आपल्या दुःखाचे कारण बनू शकतो, आपली मानसिकता पूर्णपणे बिघडवू शकतो, आपलं कौटुंबिक, सामाजिक आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो याची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे असे वाटते. या ऑनलाईन प्रेमप्रकरणात दोन्ही बाजूने सगळ्या स्टेप्स इतक्या पटापट घेतल्या जातात आणि त्या फिजिकल लेवलला जाऊन पोहचतात की त्यात कोणतीही प्रेमाची भावना, प्रेम फुलवण्याची प्रक्रिया, जीव लावणं, एकमेकांची काळजी घेणं, एकमेकांना पूर्ण समजून घेणं, एकमेकांचे स्वभाव तसेच गरज समजून घेणं, दोघांची जुळत असलेल्या नात्यासाठी कितपत तयारी आहे, ते नातं निभावण्याची कितपत मनापासून इच्छा आहे हे जाणून घेणं याला वेळच घेतला जात नाही.

यामुळे अशा ऑनलाईन प्रेमकहाण्या जितक्या वेगाने पुढे जातात तितक्याच वेगाने त्यातलं नावीन्य संपूर्ण त्या संपुष्टातदेखील येतात. खर्‍या, निष्पाप आणि प्रांजल प्रेमाची अनुभूती अशा प्रकरणात अनुभवायला मिळत नाही. अतिशय प्रॅक्टिकल पद्धतीने, महिला प्रोफेशनल असल्यासारखं महिलांना गृहीत धरून त्यांना या ऑनलाईन संबंधात पुरुषाकडून अनुभव मिळतोय. ऑनलाईन प्रेम, संबंध फक्त आपल्याला काहींना काही नवीन फिजिकल पाहायला मिळेल त्याचा वरचेवर आनंद घ्यायला मिळेल, चार दोन रोमँटिक डायलॉग मारले की महिला स्वतःच्या सगळ्या मर्यादा ओलांडू शकते, असे समजून आणि यासाठीच केले जातात का? ही गोस्ट विचारात घेणे आवश्यक आहे.

पुरुषांकडून अनैतिक मार्गाने पैसे उकळण्यासाठी देखील सोशल मीडियाचा चुकीचा वापर महिला करताना दिसतात. अनेक चांगल्या घराण्यातील, नावलौकिक असलेले पुरुष अशा महिलांच्या प्रलोभनातून स्वतः ला वाचवण्यास असमर्थ ठरतात. पण अशा ठराविक महिलांमुळे सर्वच महिलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन दूषित होतोय. सर्वसामान्य महिलेलादेखील त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागतो. अशा ठराविक वर्गातील महिलांसोबत समस्त स्त्री जातीलाच पुरुष चुकीच्या अर्थाने पाहतो आणि तिला इतकी खालच्या दर्जाची वागणूक मिळते ज्याची तिने कधी कल्पना केलेली नसते. पुरुष कोणत्याही महिलेला ओळखताना कोणता निकष लावतो हे त्याच्या वैयक्तिक विचारसरणीवर आणि कुवतीवर अवलंबून असते, त्याच्या पूर्वअनुभवावर अवलंबून असते किंवा त्याने आजूबाजूला पाहिलेल्या उदाहरणांवर त्याच महिलेविषयीच मत तो ठरवत असतो. सगळेच पुरुष सारखे नसतात हेही तितकंच सत्य आहे.

पण जर त्यांना कोणताही कटू अथवा अप्रिय अनुभव कोणत्याही स्त्रीकडून आलेला असेल, तर तो प्रत्येक वेळी, प्रत्येक स्त्रीला त्याच मापात तोलू शकतो. त्यामुळे समस्त महिला वर्गाची ही नैतिक आणि सामाजिक जबाबदारी आहे की, आपण समाजात ताठ मानेने जगू शकू, आपल्या घराण्याचे नाव मोठे करू शकू यावर काम करावे. एखादी स्त्री जेव्हा बदनाम होते तेव्हा ती तिच्या माहेरच्या, सासरच्या, स्वतःच्या कुटुंबालादेखील अप्रत्यक्षपणे बदनाम करीत असते. आपल्या मुलांना त्यांच्या मित्र परिवारात, आपल्या नवर्‍याला त्याच्या गणगोतात मान खाली घालायला लागेल असे वर्तन आपल्या हाताने होणार नाही याचा सर्वतोपरी प्रयत्न महिलांनी करणे अपेक्षित आहे. त्यामुळेच कोणत्याही माध्यमातून प्रकट होताना स्त्रियांनीसुद्धा आपल्यातील स्त्रीत्वाचा कोणीही सहजासहजी अपमान करणार नाही, आपल्याबद्दल चुकीचे समज करून घेणार नाही आणि कुणी आपल्या भावनांचा गैरवापर करणार नाही, आपण स्वतः च्या नजरेत उतरणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.

–मिनाक्षी जगदाळे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -