अनोळखी अण्णा!

आमच्याकडल्या तळ्यावर जॉगिंगसाठी येणारे अण्णा हे अण्णा म्हणून ओळखले जायला लागले तेच मुळी आपल्या राळेगणसिध्दीच्या अण्णांमुळे.

अण्णांच्या आंदोलनात अण्णा टेकलेल्या लोडाशी बसून, अण्णांच्या आसपास रेंगाळत राहून, अण्णा चॅनेलचंपूंना बाइट देताना अण्णांच्या मागे राहून अण्णांना मिळणार्‍या प्रसिध्दीत आडवा मारून घेणारे एव्हाना बरेच लोक सापडतील. पण आमच्या ह्या अण्णांनी असला कोणताही आडवाउभा प्रकार केला नाही. त्यांनी अण्णांच्या मागेपुढे कधीच केलं नाही. ते अण्णांना कधीच भेटले नाहीत, कशाला, त्यांनी अण्णांना कधी ह्याची देही ह्याची डोळा पाहिलंही नाही की अण्णांच्या कोणत्याही उपोषणाचा द एन्ड होताना अण्णांच्या ग्लासात मोसंबी पिळली नाही.

…पण तरीही आमच्या तळ्यावर त्या अण्णांइतकेच हे अण्णा प्रसिध्द झाले. कार्य सिध्दीस नेण्यास श्री समर्थ असतो तसं हल्ली आपलं व्यक्तिमत्व बिनकामाचं निघालं तरी कार्य प्रसिध्दीस नेण्यास कुणीतरी लागत असतो. आमच्या ह्या अण्णांच्या मागे असा कोणताही समर्थ हात नसतानाही अण्णा तळ्यावर प्रसिध्द पावले ते त्या अण्णांमुळेच.

राळेगणसिध्दीचा मर्यादित मंच मागे टाकून अण्णा जेव्हा राष्ट्रीय मंचावर तळपू लागले तेव्हा इथे आमच्या तळ्यावरच्या अण्णांचंही नाव उजेडात येऊ लागलं, किंबहुना त्या अण्णांमुळेच आमच्या अण्णांचं ‘तळ्यावरचे अण्णा’ असं बारसं झालं. राष्ट्रीय राजकारणात, समाजकारणात त्या अण्णांची चलती सुरू झाल्यावर आमच्या ह्या अण्णांची तळ्यावर बोलती सुरू झाली असं म्हटल्यास वावगं ठरू नये.

त्या अण्णामुंळे आता आपल्या राष्ट्रीय राजकारणातल्या जुन्या दुखण्यांवर एकदम जालीम औषध सापडलं आहे असं आमच्या ह्या अण्णांना वाटू लागलं. तळ्यावर जॉगिंगला येताना भल्या पहाटे हे अण्णा ‘मी अण्णा‘ची टोपी डोक्यावर चढवून येऊ लागले. देशातल्या दोन नंबरच्या पैशाचा आता निकाल लागणार ह्याबद्दल त्यांच्या मनात आता यत्किंचितही संदेह राहिला नाही. अण्णांनी उपोषणाची गर्जना केली की सगळ्यांचं कसं मांजर होतं ह्याच्या कहाण्या ते तळ्यावर सगळ्यांना तिखटमीठ लावत सांगू लागले.

एकदा तर अण्णांची महती सांगताना ते एका निवृत्त ‘भाई’ला म्हणाले, ‘अहो, तुमची कसली हो दहशत, खरी दहशत आमच्या अण्णांची. त्यांनी नुसतं येतो म्हटलं की फायलीवर टपाटप सह्या होतात. सगळे नामदार, जमादार त्यांच्या मालकांपेक्षा अण्णांच्या हार्दिक स्वागतासाठी केबिनचा दरवाजा उघडा ठेवून सज्ज राहतात.’
त्या अण्णांची ख्याती आणि महती ते तळ्यावर येणार्‍या कुणालाही म्हणजे राजकारणात रस असणार्‍या-नसणार्‍या कुणाही गण्यागंपूला सांगू लागले.

ह्या अण्णांनी त्या अण्णांचा डंका पिटायला घेतलेला असतानाच त्या अण्णांनीही तिकडे आंदोलनांच्या नावाने चांगभलं करायला सुरूवात केली. तिथे अण्णा कॅमेर्‍यांसमोर, सभासमारंभांमध्ये प्रस्थापितांच्या खुर्च्यांचे नटबोल्ट सैल व्हावेत इतक्या डेसिबल क्षमतेचे फटाके फोडू लागले. परीक्षेचा पेपर संपल्यावर पर्यवेक्षकाने भराभर विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका गोळा कराव्यात तसे मंत्र्यांचे राजीनामे गोळा करू लागले.

पुढे पुढे तर ते अण्णा कोणत्याही प्रकारच्या खेळपट्टीवर भल्याभल्यांची अचूक यॉर्कर टाकून विकेट घेऊ लागले, मॅचविनर, जायंटकिलर लोकांचे कर्दनकाळ ठरू लागले तसतशी तळ्यावरच्या अण्णांच्या डोक्यावरची ‘मी अण्णा‘ची टोपी मोराच्या पिसार्‍यासारखी फुलू लागली.

दोन्ही अण्णांचे ते दिवस खरंच सुगीचे सुरू होते. दिला आंदोलनाचा नारा की हलली फाइल, केला उपोषणाचा पुकारा की झाले प्रकल्प संमत, असं सगळं चारी बाजूंनी अनुकूल वातावरण होतं. आजुबाजूचे नेते सरसेनापती, जाणते राजे होत असताना अण्णा ‘दुसरा गांधी’ झाले. तळ्यावरचे अण्णाही मग मागे राहिले नाहीत. त्यांनी घड्याळातला मिनिटकाटा लावून वॉक घेता घेता दुसर्‍या स्वातंत्र्याची हाक दिली.

पुढे तर त्या अण्णांच्या आंदोलनाची कार्यकक्षा विस्तारली. बुलेट ट्रेनने कमी वेळात मोठं अंतर पार करावं तसं अण्णांच्या आंदोलनाने राळेगणसिध्दीहून थेट रामलिला मैदान गाठलंं. इकडे तळ्यावरच्या अण्णांना तर त्या अण्णांनी रामलिला मैदान गाठल्या गाठल्याच ते मारल्याचा भास झाला. त्या अण्णांच्या झंझावातापुढे आता सगळ्या भ्रष्ट आणि दुष्टांचा पालापाचोळा होणार ह्याची ह्या अण्णांना मनोमन खात्री पटली.

हे सगळं रीतसर सुरू असताना म्हणजे विकेटवर सेट होऊन त्या अण्णांची तडाखेबंद बॅटिंग सुरू असतानाच सत्तेचं स्टेडियम बदललं आणि अण्णांसमोरच्या गोलंदाजाची षटकांमागून षटकं निर्धाव जाऊ लागली. कुणा ऋषीला कुणा मेनकेची दृष्ट लागावी तसं ते दृष्य दिसू लागलं.

अण्णांचं आंदोलन-उपोषण हे दुधारी शस्त्र अचानक गहाळ झालं. मोसंबीचा रस फ्रिजमध्ये तसाच पडून राहू लागला. अण्णांनी आंदोलन-उपोषणाचा इशारा दिला की सदर्‍यावर जाकिटं चढवलेली हेवीवेट माणसं त्यांची समजूत काढायला येऊ लागली. अण्णांचीही समजूत निघू लागली. अण्णाही समजू लागले. समजूनउमजून वागू लागले. साधकबाधक बोलता बोलता साजूकनाजूक बोलू लागले.

इकडे आमच्या तळ्यावरचे अण्णा आता वॉक थोडा कमी घेऊ लागले. ‘मी अण्णा‘ची टोपी डोक्यावरून उतरवू लागले आणि दुमडून खिशात ठेवू लागले.
परवा त्या अण्णांना त्यांच्या विश्वसनीयतेबद्दल कुणा पत्रकाराने प्रश्न विचारला तर ते अण्णा काहीच म्हणाले नाहीत. अण्णा गप्प राहिले. अण्णांच्या वतीने दुसर्‍याच कुणी उत्तर देताना प्रश्नोत्तराची गरजच नसल्याचं म्हटलं.
इकडे ह्या अण्णांना तळ्यावर वॉकला येणार्‍या लोकांनी नमकं त्याचबद्दल हटकलं तर हे अण्णाही काहीच बोलले नाहीत. गप्प राहिले. देशात अभिव्यक्तीस्वातंत्र्य असल्याचं माहीत असतानाही हे अण्णा गप्प राहिले. बहुतेक ह्या अण्णांनी त्या अण्णांच्या मौनाला अव्यक्त कोरस दिला.