Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश कर्नाटकातील नाट्यपरंपरा!

कर्नाटकातील नाट्यपरंपरा!

कर्नाटक राज्यातील तुमकुर जिल्ह्यात गुब्बी नावाचं एक तालुक्याचं गाव आहे. देशातल्या कुठल्याही गावासारखंच एक गाव. पण या गावाचं वैशिष्ठ्य म्हणजे तिथली नाटक परंपरा आणि या परंपरेचा महत्वाचा भाग म्हणजे ‘गुब्बी श्री चेन्नबसवेश्वर नाटक मंडळी’ ही नाट्यसंस्था. तिचे संस्थापक श्री गुब्बी वीरन्ना यांची एकशे एकोणतीसावी जयंती नुकतीच होऊन गेली. दीडेक वर्षापूर्वी गुब्बीला जाऊन ‘रंग कारन्थ’ या नाट्यसंगीताचा प्रयोग सादर करण्याचा योग जुळून आला होता. त्या निमित्ताने श्री. गुब्बी वीरन्ना यांची नात आणि प्रसिद्ध अभिनेत्री बी. जयश्री यांच्याशी कर्नाटकातील नाट्यपरंपरेविषयी भरपूर बोलणं झालं होतं. त्या गप्पांमधून कर्नाटकातला जो नाटकाचा इतिहास समजला, तो थोडक्यात या लेखातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

Related Story

- Advertisement -

जगभरातल्या सगळ्या भाषांमधल्या साहित्यात नाटकाला मानाचे स्थान आहे. संस्कृत, ग्रीक आणि इंग्रजी या प्राचीन आणि प्रसिद्ध भाषांच्या संदर्भात तर हे शंभर टक्के खरं आहे. काव्येषु नाटकम् रम्यम, नाटकेषु शकुंतला हे प्रसिद्ध वचन तर नाटक हे साहित्याचं सर्वात सुंदर असं रूप आहे आणि कालिदासाच्या सगळ्या नाटकांपैकी त्याचं ‘अभिज्ञान शाकुन्तल’ हे सर्वोत्तम नाटक आहे, यावर शिक्कामोर्तब करतं. नाटकन्त साहित्य हे वचन सुद्धा नाटकाचे साहित्यातले स्थान अधोरेखित करते. खूपशा विद्वानांचं असं मत आहे की, एखाद्या प्रदेशाची संस्कृती माहीत करून घ्यायची झाल्यास त्या प्रदेशात होणार्‍या नाटकांचा अभ्यास करणं पुरेसं आहे.

दुस-या अंगाने म्हणायचं तर, त्या त्या प्रदेशाचं संगीत, साहित्य, नृत्य, कला, शिल्प, जीवनशैली आणि जगण्याशी निगडित सगळ्या घडामोडींचं दर्शन नाटक या एकाच माध्यमातून घेता येऊ शकतं. त्या दृष्टीने, नाटक हे खर्‍या अर्थाने सामान्य माणसांचं विद्यापीठ आहे. लोकांच्या दैनंदीन जगण्याचं प्रतिबिंब नाटकात पडत असतं. लोकांचं मनोरंजन करणं, त्यांच्या सारासार विवेकबुद्धीचं नियमन करणं, चांगल्या वाईटाचं निर्देशन करणं आणि त्यांच्या सृजनशक्तीला चालना देणं, ही नाटक या माध्यमाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. म्हणूनच कुठल्याही कालखंडात जगातल्या प्रत्येक देशात नाटक आपलं स्वत:चं असं महत्व राखून आहे.

- Advertisement -

सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी आपल्या देशात, भारतात, भास, कालिदास, भवभूति, श्रीहर्ष आणि शुद्रक हे मोठे कवी जगप्रसिद्ध नाटकं लिहून प्रसिद्ध पावले. भासांची ‘स्वप्नवासवदत्त’, ’प्रतिमा’ आणि ‘पंचारत्र’ ही नाटकं त्यांच्या दैवी प्रतिभेची उदाहरणे म्हणून नावाजली गेली. कालिदासाचं ‘शाकुन्तल’, भवभूतिचं ‘उत्तररामचरित’ आणि शुद्रकाचं ‘मृच्छकटीक’ या नाटकांची गणना तर जागतिक साहित्यातले मैलाचे दगड म्हणून केली जाते. भासांच्या नाटकांतील नाट्यमयता, कालिदासाच्या नाटकातील वर्णने, भवभूतीच्या नाटकातील भाव-भावनांचं दर्शन आणि शुद्रकाच्या नाटकातील नावीन्य….भारतीय प्रतिभेची ही देदीप्यमान लेणी आहेत.

या पार्श्वभूमीवर जर आपण कर्नाटकातल्या नाटकाचा इतिहास तपासून पाहिला, तर ‘मित्रावींदा गोविंदा’ हे तिथलं पहिलं नाटक असल्याचं दिसून येतं. तथापि, संशोधकांच्या म्हणण्यानुसार या नाटकाच्या आधीसुद्धा नाटकं लिहिली गेली असावीत. ते असो. पण कन्नड भाषा सोडता तमिळ, तेलुगू आणि मल्याळम सारख्या इतर दक्षिणी भाषांमधील साहित्यातही विपुल नाटकं का लिहिली गेली नाहीत? याचं एक प्राथमिक कारण असावं ते असं की, दक्षिण भारतातल्या द्रविडियन संस्कृतीत यक्षगान आणि भागवतासारख्या लोककला पूर्वापार प्रसिद्ध होत्या. आजही या लोककलांचे आविष्कार कर्नाटकातील म्हैसूर, मंगळूर, कारवार आणि आसपासच्या प्रदेशात होतांना दिसून येतात. काहींचं तर असंही म्हणणं आहे की, हीच यक्षगानाची परंपरा पुढे मराठी नाटक आणि रंगभूमीसाठी पथदर्शक ठरली.

- Advertisement -

कर्नाटकची आजवरची राज्य सरकारे सुद्धा साहित्य, संगीत, नृत्य, नाटक, चित्रकला आणि शिल्पकला या विविध कलामाध्यमांचा विकास साधण्यावर लक्ष केंद्रित करत आली आहेत. म्हैसूरमध्ये दिमाखात उभी असलेली वास्तू आणि तिथे होणारे कलाविषयक उपक्रम हे सरकारच्या या प्रयत्नांचे पुरावे म्हणायला हवेत. नृत्य, नाटक, संगीत आणि एकूण सांस्कृतिक उपक्रमांच्या प्रसाराच्या कामात ते मोलाची मदत करत आहे.

समकालीन कन्नड साहित्यातही कथा, कादंबरी आणि कवितांसोबत नाटक विपुल प्रमाणात लिहिले जातेय. याचे प्रारंभिक श्रेय श्री. गुब्बी वीरन्ना यांनी स्थापन केलेल्या गुब्बी नाटक कंपनीला नक्कीच जाते. बी. एम. श्रीकांतय्या यांनी ‘अश्वत्थामन’ आणि ‘परशिकरु’ या त्यांनी लिहिलेल्या नाटकांमधून ग्रीक शोकांतिकांचा परिचय कन्नडीगांना करून दिला. कैलासम सारख्या लेखकाने तर त्याच्या ‘तोल्लु गत्ती’, ‘होम रूल’ आणि ‘एकलव्य’ सारख्या नाटकांतून कन्नड रंगभूमीवर अंतर्बाह्य बदल घडवून आणला.

गेली सत्तर वर्षे गुब्बी श्री चेन्नबसवेश्वर नाटक मंडळी कलेच्या सेवेत आपलं योगदान देत आहे. त्यांनी सुरुवातीच्या काळात केलेली ‘कुरुक्षेत्र’, ‘कृष्णलीला’, ‘कबीरदास’ आणि ‘अक्कामहादेवी’ या पौराणिक नाटकांची आठवण काढताना आजही इथले जुने जाणते रसिक स्मरणरंजनात रमताना आढळतात. ‘सदारामे’ आणि ‘गुलेबकावली’सारख्या नाटकांचे प्रयोग तर संस्थेच्या प्रारंभापासून ते आजवर अनेक वेळा सादर झाले आहेत. लोकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. इतक्या वर्षांत या नाटकांची लोकप्रियता तसुभरही कमी झालेली नाही. संस्थेच्या सुरुवातीपासून ते त्यांच्या अंतकाळापर्यंत वेगवेगळ्या भूमिका साकारण्यात श्री. गुब्बी वीरन्ना यांनी दाखवलेला अथक उत्साह हा या संस्थेच्या आजवरच्या प्रवासातला ठळक बिंदू आहे. विशेषत: त्यांनी केलेल्या विनोदी भूमिकांमुळे ते जनमानसात प्रसिद्ध होते. श्री. गुब्बी वीरन्ना यांच्याशिवाय आणखीही बरेच नामवंत कलाकार गुब्बी नाटक मंडळी या संस्थेने कन्नड रंगभूमीला दिले. श्री. सी. बी. मल्लाप्पा, श्री. एम. एन. गंगाधर राव, श्रीमती बी. जयम्मा, स्वर्गीय जी. सुन्दरम्मा आणि इतर अनेक मान्यवर कलाकारांनी संस्थेचा नावलौकिक वाढवण्यात आपापले योगदान दिले.

बदलत्या काळाच्या मागणीनुसार, गुब्बी नाटक मंडळीनेही आपलं क्षितिज विस्तारत सिनेमा निर्मितीच्या क्षेत्रात आपलं पाऊल टाकलं आणि कन्नड सिनेमाच्या संदर्भात एका दमदार वाटचालीचा आरंभ केला. आजवर केलेल्या सिनेमांपैकी ‘सुभद्रा’, ‘सदारामे’, ‘हेमारेड्डी मल्लम्मा’, ‘गुणसागरी’ आणि ‘बेदारा कन्नाप्पा’ ही काही ठळक नावं आहेत. नाट्यक्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल नाटकरत्न श्री गुब्बी वीरन्ना यांना भारताच्या राष्ट्रपतींनीसुद्धा सन्मानित केलं होतं. वीरन्ना यांचा तो सन्मान एका अर्थाने कन्नड रंगभूमीचाच सन्मान होता, असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. कन्नड रंगभूमीवरील श्री गुब्बी वीरन्ना नाटक मंडळीचा प्रभाव हा असा होता आणि आजही तो तितकाच टिकून राहिला आहे.

- Advertisement -