Eco friendly bappa Competition
घर फिचर्स सारांश द डिसाईपल : मातीत मुरणारा पाऊस

द डिसाईपल : मातीत मुरणारा पाऊस

Subscribe

आपल्याकडं जेव्हा सिनेमा कळत नाही तेव्हा त्याला आर्ट फिल्मच लेबल लावलं जातं आणि मग सुरुवात होते दिग्दर्शकाच्या साध्या दृश्यांतही रूपक शोधण्याची स्पर्धा ... द डिसाईपल नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाल्यानंतर असंच काही चित्र पाहायला मिळालं. द डिसाईपल हा सामान्य प्रेक्षकांनाही सहज समजेल असा सिनेमा आहे, यात फार डोकं लावून बघण्याची काहीही गरज नाही. डिसाईपलचा अर्थ होतो अनुयायी किंवा शिष्य, शास्त्रीय संगीत शिकणार्‍या शरद नेरुळकर (आदित्य मोडक ) याची ही कथा आहे.

आपल्याला सध्या गतीचं वेड लागलंय, भोवताली घडणार्‍या प्रत्येक गोष्टीला वेग हवायं, कुठल्याच गोष्टीला वेळ द्यायला फावला वेळच शिल्लक राहिला नाहीये …. एका गाण्यात 7 वर्षाचा नायक 21 चा होताना पाहणं…आपल्यासाठी नवीन नाही. पण आता आपला दृष्टिकोन अधिकच बदललाय, कथेत दर क्षणाला ट्विस्ट नसेल तर ती कथा कंटाळवाणी वाटायला लागते. पण या सर्वात आपण एक गोष्ट सहज विसरतो की, अशा झटपट ट्विस्ट घेणार्‍या कथा, वेगात घडणारी कथानकं आपल्याला फार काळ लक्षात राहत नाहीत, अपवाद वगळता त्यांचा काही विशेष प्रभावदेखील आपल्यावर पडत नाही. चैतन्य ताम्हणे हे नावं मराठी सिनेरसिकांसाठी नवीन राहिलेलं नाही, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कोर्ट सिनेमानंतर त्याच्या पुढच्या सिनेमाकडून देखील तितक्याच अपेक्षा होत्या आणि त्या पूर्ण झाल्यात असं म्हणायला हरकत नाही. जगभरातील मोठ्या चित्रपट महोत्सवांत त्याच्या नवीन सिनेमाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळालाय, भारताकडून ऑस्करसाठी पाठविण्यात येणार्‍या सिनेमांच्या मुख्य शर्यतीतदेखील हा सिनेमा होता.

सिनेमात कौतुकास्पद अनेक गोष्टी आहेत, पण या सर्वात एक गोष्ट जी त्याच्या कोर्ट सिनेमातदेखील भावली होती, ती म्हणजे सिनेमॅटोग्राफी… या सिनेमात कॅमेरा बहुतांश सीन्सवेळी स्थिर ठेवलाय, इतका स्थिर की नजर हटत नाही. दिवसा प्रचंड गोंगाट असलेली आणि रात्री कमालीची शांत दिसणारी मुंबई यात दाखवलीय…दुसरी गोष्ट म्हणजे सिनेमाची कथा, या कथेत कुठले मोठे ट्विस्ट येत नाही, ना कथेला अधिक रंजक बनविण्याचा प्रयत्न केला जातो, हा सिनेमा कलेची आराधना करणार्‍या एका शिष्याविषयी आहे. शास्त्रीय संगीत आणि त्याची उपासना करणार्‍या कलावंतांबद्दल भाष्य करतो. हा सिनेमा बघण्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल, थोडा संयम ठेवावा लागेल, कारण इथं झटपट काहीच घडत नाही. शास्त्रीय संगीतावर सिनेमा असला तरी कथेत ना बंदिश बँडिट्सप्रमाणे रिमिक्स गाणी घातलीत, ना इथं शिष्याला गंडा बांधण्यासाठी मेणबत्त्या लावून रियाज करायचाय, या सिनेमात कुणाला कुणाचं घराणं ही नकोय ना कुणाला गाण्यातून पाऊस पाडायचाय, हा सिनेमा म्हणजे एका शिष्याचं व्यक्तिचित्रण आहे, जो शास्त्रीय संगीत शिकतोय, त्याच्या आयुष्यात घडणार्‍या गोष्टी या आपल्या कलेशी प्रामाणिक असणार्‍या प्रत्येक कलाकारांच्या आयुष्यात थोड्या फार फरकाने घडत असतात, त्याच घटनांचं चित्रण म्हणजे द डिसाईपल.

- Advertisement -

आपल्याकडं जेव्हा सिनेमा कळत नाही तेव्हा त्याला आर्ट फिल्मच लेबल लावलं जातं आणि मग सुरुवात होते दिग्दर्शकाच्या साध्या दृश्यांतही रूपक शोधण्याची स्पर्धा … द डिसाईपल नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाल्यानंतर असंच काही चित्र पाहायला मिळालं. द डिसाईपल हा सामान्य प्रेक्षकांनाही सहज समजेल असा सिनेमा आहे, यात फार डोकं लावून बघण्याची काहीही गरज नाही. डिसाईपलचा अर्थ होतो अनुयायी किंवा शिष्य, शास्त्रीय संगीत शिकणार्‍या शरद नेरुळकर (आदित्य मोडक ) याची ही कथा आहे. कथा सुरु होते 2006 च्या दरम्यान, जिथे शरद आपल्या गुरुजींकडे म्हणजेच पंडित विनायक प्रधान (अरुण द्रविड ) यांच्याकडे शास्त्रीय संगीत शिकतोय. शरद प्रामाणिक मेहनत करून संगीत शिकण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याला त्यात अपेक्षित यश मिळत नाहीये, या क्षेत्रात काही गोष्टी आपल्यात जन्मतःच असायला हव्यात, शरदकडे ते नाही आणि ही बाब त्याच्या गुरुजींनादेखील ठाऊक आहे. पण ते आपली नि:स्वार्थ सेवा करणार्‍या शरदला नेहमीच सांभाळून घेतात.

शरदला पूर्णवेळ नोकरीदेखील नाहीये ना त्याला पूर्णवेळ रियाज करता येतोय, पण तरीही हार न मानता तो प्रयत्न करतोय. त्याला शास्त्रीय संगीताचा धंदा आवडत नाही ना त्याला ध्येयाशी तडजोड करणं आवडतं, सिनेमात बालपणातला शरददेखील दाखवलाय जिथे त्याचे वडील त्याला संगीत शिकवताय. त्याच्या वडिलांना शास्त्रीय संगीतात अपेक्षित यश मिळालं नव्हतं, पण आपण ते यश मिळवू असा शरद विश्वास आहे. या सर्वात आणखी एक गोष्ट शरदकडे आहे, ती म्हणजे माईंची भाषणं … शास्त्रीय संगीतातील मोठं नाव असलेल्या विदुषी सिंधूबाई जाधव (सुमित्रा भावे) ज्यांना गाण्यांची किंवा भाषणांची रेकॉर्डिंग करणं आवडत नव्हतं, त्यांच्या काही भाषणांची लपून केलेली रेकॉर्डिंग शरदच्या हाती लागलीये आणि तो त्या रेकॉर्डिंग ऐकत असतो. विशेषतः रात्रीच्या वेळी बाईक चालविताना मुंबईच्या शांत रस्त्यावर शरदच्या कानात घुमणारा माईंचा आवाज प्रभाव पाडतो.

- Advertisement -

सिनेमाचा दुसरा भाग हा साधारणतः 2018 दरम्यानचा आहे. जिथे शरद आता बराच बदललाय, वयासोबत त्याच्या वागण्यातही बदल झालाय. ज्याला शास्त्रीय संगीताचा व्यवसाय करणं आवडत नव्हतं तो आता त्याचे क्लास घेतोय, दिवाळी पहाटसाठी कार्यक्रम शोधतोय, लोकांना स्वतःच्या शोजचे पास वाटतोय. आपलं काही होईल .. ही आशा त्याने आता बर्‍यापैकी सोडलीये, अजूनही तो गुरुजींकडे जातो आणि त्यांची काळजी घेतोय. त्याच्या या प्रवासासोबतच एका म्युजिक रिऍलिटी शोमध्ये गाणार्‍या बंगाली मुलीचा ट्रॅक जोडलाय जो जमून आलाय. शरदच्या रोजच्या स्ट्रगल सोबत त्या मुलीचा प्रवास दाखवलाय, एक बंदिश गाणारी मुलगी नंतर शोमध्ये कशी गाणी गाते आणि त्यातून तिला कसं यश मिळतं, हे सिनेमात दाखवलंय. जसं मी आधीही म्हटलं की, सिनेमात खूप वेगात काहीच घडत नाही पण ज्या गोष्टी घडतात त्या विचार करायला लावणार्‍या आहेत. बॅकग्राउंड स्कोअर आणि सिनेमॅटोग्राफी दोन्हीही जमून आले आहेत. सिनेमाची सिनेमॅटोग्राफर म्हणून मायकल सोबोंस्कीने काम केलं आहे. सिनेमाचा निर्माता विवेक गोंबेर आहे ज्याने या आधी कोर्ट आणि सर सिनेमातसुद्धा काम केलंय.

चैतन्य ताम्हणेंच्या कोर्ट आणि द डिसाईपल दोन्ही सिनेमांची कास्टिंग ही त्याची स्पेशालिटी आहे. लोक कलावंतांची भूमिका करण्यासाठी कोर्टमध्ये ज्याप्रमाणे वीरा साथीदार यांची निवड केलीय, अगदी तसंच शास्त्रीय संगीत गाणार्‍या पात्राची भूमिका करण्यासाठी ‘द डिसाईपल’मध्ये आदित्य मोडकची निवड केलीये, जो स्वतः शास्त्रीय संगीत गातो. सिनेमात शरदच्या गुरुजींची म्हणजेच पंडित विनायक प्रधान यांची भूमिका करणारे डॉक्टर अरुण द्रविड हे शास्त्रीय संगीतातील मोठं नाव आहे. या सगळ्यात एक अजून व्यक्तिरेखा आहे ज्याचा उल्लेख केल्याशिवाय सिनेमा पूर्ण होऊ शकत नाही, सिनेमात माई एकदाही पडद्यावर दिसत नाही, पण त्यांचा आवाज सतत कानात घुमत राहतो. सुमित्रा भावेंचा आवाज या भूमिकेसाठी अतिशय समर्पक वाटला आहे. कारण हा आवाज या आधी कुठं जास्त ऐकता आला नाहीये. त्यांचे पॉज घेऊन बोलणे आणि उच्चार दोन्हीही भावतात. द डिसाईपल हा नेहमीच्या मराठी सिनेमांपेक्षा वेगळा आहे. हा सिनेमा एक अनुभव आहे, पण हा अनुभव वादळीवार्‍यासह जमिनीवर कोसळणार्‍या आणि वाहून जाणार्‍या मुसळधार पावसासारखा नाहीये, तो हळुवार पडणार्‍या पावसाप्रमाणे आहे जो जमिनीत मुरतो. अशा या पावसाचा अनुभव एकदा घ्यायला हरकत नाही.

- Advertisment -