स्ट्रोक!…

‘हॅलो…झाली का?…सुरू झाली?…हॅलो…हॅलो… ‘

‘हॅलो, काय सुरू काय झाली?…सकाळचे आठ वाजलेत…इतक्या सकाळीच सुरू करायला काय वेड लागलंय काय? इतक्या सकाळी आधी कुणी सुरू करतं काय?‘

‘अहो, असं काय करताय, ती सकाळी आठ वाजताच सुरू करायला पहिजे…एक मिनिट पुढे नाही आणि एक मिनिट मागे नाही…बरोबर आठ वाजताच सुरू व्हायला पाहिजे…सगळ्यांच्या घरात आठ वाजताच सुरू होते…एव्हाना इतर सगळ्यांच्या घरी सुरू पण झाली असेल… ‘

‘इतर सगळ्यांची आठ वाजता सुरू होत असेल हो…आमची सकाळी आठ वाजता? कधीच नाही, सकाळी आठ वाजता सुरू करण्याची पद्धत आमच्यात नाही, तुम्हाला सांगून ठेवतो…आता ह्या वयात कामधंदा नसला म्हणून काय झालं?…सकाळी आठ वाजताच सुरू करायची?…मुळीच नाही!…पोरंबाळं, लेकीसुना घरात आहेत…हां, रात्रीचे आठ म्हणाल तर ठीक आहे!… ‘

‘अहो, रात्रीच्या आठचं नाही म्हणत मी…सकाळचे आठ वाजलेत…तुम्ही सुरू तर करा… ‘

‘काही झालं तरी मी रामप्रहरी आठ वाजता सुरू करणार नाही…काही तरीच काय…‘

‘अहो, इतक्यात कोण तुल्यबळ आहे, कोण एकतर्फी आहे ते तरी कळेल… ‘

‘सकाळी सकाळी कोण कसलं तुल्यबळ आणि कोण कसलं एकतर्फी…‘

‘अहो, तुम्ही लावा तर खरं…‘

‘हे बघा, आता हे जरा जास्तच होतंय हां…लावा तर खरं काय लावा तर खरं…‘

‘अहो, टीव्ही लावा म्हणतोय मी…आज निवडणुकीचा निकाल आहे ना?…मतमोजणी सुरू झाली असेल…तुम्हाला काय वाटलं मी काय सुरू करा म्हणतोय!…मी जरा बाहेर आहे म्हणून विचारतोय…हॅलो…हॅलो…‘

‘अच्छा, निवडणुकीचा निकाल होय!…लावतो…मला वाटलं, आपल्या त्या स्टॉकबद्दल काही म्हणताय…‘

‘हां…हे बघा…पोस्टल बॅलटची मोजणी सुरू आहे…दोघंही उन्नीस-बीस आहेत…‘

‘मग ते सुरुवातीपासून एकतर्फी होईल म्हणत होते त्यांचं काय होणार?…‘

‘हां, आता ते चारने पिछाडीवर पडलेत… ‘

‘आं? पिछाडीवर पडलेत?…पण ते तर म्हणत होते की आम्ही सुरुवातीपासून आघाडी घेणार आहोत…आणि लोक पण म्हणत होते की त्यांनी तिथे पैशांचा पाऊस पाडलाय म्हणून?…‘

‘त्यांना म्हणायला जातंय काय?…त्यांनी पाऊस मोठा पाडला, पण पैसा खोटा झाला…बरं, एक मिनिट, एक मिनिट…आता त्यांचा आकडा थोडा वाढलाय, पण ह्यांचा आकडा इतक्यात चौपट पुढे गेलाय…कसली सुरुवातीपासून आघाडी घेणार म्हणताहेत…‘

‘त्यांचा कुणी माणूस आहे की नाही तिथे?‘

‘कशाला?…त्यांच्या पिछाडीवर भाष्य करायला?‘

‘तो म्हणतोय…हा आधीचा कल आहे…नंतर बघा…‘

‘त्याने हाताची घडी घातलीय का?‘

‘हो, घडी घातलीय, पण तशाच तो बाह्या सारख्या सरसावतोय…‘

‘बाह्या सरसावताना काय म्हणतोय…‘

‘बुलंद गर्जना करतोय…म्हणतोय, घड्याळात बारा बाजू द्या, दुपारनंतर आमची संख्या वाढते की नाही ते पहा…‘

‘पण आधी काय म्हणाला होता?…‘

‘आधी म्हणाला होता, पोस्टल बॅलट संपू दे, मग पहा…थांबा, होल्ड करा हां, काय तरी तावातावाने सांगतोय…‘

‘काय सांगतोय?‘

‘म्हणतोय, अजून बर्‍याच फेर्‍या आहेत…अजून शेवटचा निकाल यायचाय…आमचा विजय नक्की आहे… ‘

‘आता ताजा आकडा काय आहे?… ‘

‘आता तसे फार नाहीत, पण आकडे एकमेकांच्या जवळ आलेत…‘

‘कितीचा फरक आहे दोन्ही आकड्यांत?‘

‘सत्तावीसचा आहे…‘

‘मग आता त्याने बाह्या जरा जास्तच सरसावल्या असतील!‘

‘हो…आता तो म्हणतोय, बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं की नाही, आमचा घोडा आधी थोडा धिम्या गतीने पळत होता…पण आता तो टप्प्याच्या जवळ येतोय…नंतर बघा कसा चौखुर उधळेल तो!…अहो, आमच्या कार्यकर्त्यांनी तितकं काम केलं आहे तिथे गेली चार वर्षं… ‘

‘पण आता आकडे कोणत्या गतीने पळताहेत?‘

‘आता त्यांचा घोडा खरंच उधळलाय हो…आता त्याने शंभरी गाठलीय…‘

‘मग आता बाह्या सरसावण्याचा वेगसुद्धा वाढला असेल!… ‘

‘बाह्या सोडा, आता अँकर मुलीचा आवाज टिपेला पोहोचलाय…‘

‘खरंय खरंय…मला माझ्या फोनमध्ये तिचा आवाज स्पष्ट ऐकू येतोय…पिछाडीवर पडलेला घोडा अचानक उधळल्याचा आनंद तिला झालाय का?…बाह्या सरसावणार्‍यापेक्षा तिलाच जास्त हर्षवायू झालेला दिसतोय!…‘

‘अरे व्वा…तुम्ही बरोबर ओळखलंत हो… ‘

‘ती घोडेवाल्यांची सेंच्युरी…घोडेवाल्यांची सेंच्युरी असं केवढ्या जोराने किंचाळतेय? स्पष्ट ऐकू येतंय मला मी बाहेर असतानासुद्धा!… ‘

‘आता पुन्हा बाह्या सरसावल्या गेल्या आहेत…‘

‘आता आम्ही सहज दोनशे आकडा पार करणार असंच म्हणत असेल ना तो?‘

‘हो, हो…तो म्हणतोय आता आम्ही बहुमत मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करतो आहोत…आता सरकार आमचंच येणार! आता आमचा मास्टरस्ट्रोक बसणार…पण अररर्र….‘

‘का?…काय झालं?‘

‘बाही खाली गेली…‘

‘का?…पोत्यातल्या वाटाण्यासारखा आकडा घरंगळला की काय?…‘

‘आकडा खाली आला…घोडा बसला… ‘

‘शंभरच्या खाली लोंबकळायला लागलाय?‘

‘लोंबकळतोय कसला?…शंभरच्या आतच अडकून पडलाय!…‘

‘तो काय म्हणतोय…आपला बाह्या सरसावणारा?… ‘

‘तो काय म्हणणार!…आता हाताची घडी घातलीय त्याने… ‘

‘…आणि तोंडावर बोटसुद्धा ठेवलं असेल त्याने?…‘

‘नाही, बोट बाहीवर ठेवलंय…‘

‘आता काय म्हणणं आहे त्याचं?…‘

‘आता म्हणे, आम्ही आमच्या पराभवाचं आत्मचिंतन करू…आम्ही कुठे कमी पडलो त्याचा शोध घेऊ…‘

‘…पण थोड्या वेळापूर्वी मास्टरस्ट्रोक मारू म्हणाला होता ना ?… ‘

‘…पण अचानक प्लास्टरस्ट्रोक बसला त्याला तो तरी काय करणार! ‘