घरफिचर्ससारांशमानवी मन आणि पाऊस

मानवी मन आणि पाऊस

Subscribe

पाऊस हा मानवी मनाला उभारी देणारा मुख्य घटक. पावसाच्या आगमनाने सृजनसृष्टी कशी उल्हसित होते हे काही वेगळे सांगायला नको. आकाश मळभ होऊ लागलं की, मन चिनभिन होऊन जातं, पण मनाला लागणारी काहूर भीती ही येणार्‍या पावसाची नांदी आहे. मला पाऊस हा माणसाच्या मनाला व्यक्त करणारे साधन वाटतो. पावसाचे आणि माणसाच्या सुख-दुःखाचे गाणे अखंडपणे बरसत असते. मनाच्या भावना व्यक्त करताना मनातले मळभ जितके दाटून येते, तितक्या येणार्‍या सरी जोरदार असतात. ते मळभ हळूहळू गडद होत जाते आणि एकदाचे अश्रूच्या रूपाने व्यक्त होते.

बाहेर सुरु असणारी काहिली, इकडून तिकडे उगाच पक्षी उडत आहेत. समोरचा रस्ता प्रचंड आग ओततो आहे. डोक्यावरचा पंखा जीवाच्या रामरामाला फिरतो आहे. त्याने फेकलेली हवा आता कमालीची उष्ण जाणवू लागली आहे. समोरच्या झाडावरचं पान हलत नाही. ह्या सगळ्या वातावरणामुळे माणसाच्या मनाला मरगळ आली आहे. वाचणार्‍याला वाचू वाटू नये आणि लिहिणारा हात आता थबकला आहे. माणसाच्या मनाचा, त्यात उठणार्‍या भावनांचा हा समोरच्या सृष्टीत होणार्‍या बदलाचा एक सहसंबंध असतोच. आणि त्या त्या प्रसंगी तो अनाहूतपणे दिसून येत असतो. माणसाचा या पंचमहाभूताशी इतका जवळचा संबंध येतो की, त्यात होणार्‍या बदलांची त्याने आपल्या भोवती कोरलेल्या या ना त्या प्रसंगाशी त्याचे नाते जास्त अधोरेखित होत असते.

पाऊस हा त्या मानवी मनाला उभारी देणारा मुख्य घटक. पावसाच्या आगमनाने सृजनसृष्टी कशी उल्हसित होते हे काही वेगळे सांगायला नको. आकाश मळभ होऊ लागलं की, मन चिनभिन होऊन जातं पण मनाला लागणारी काहूर भीती ही येणार्‍या पावसाची नांदी आहे. मला पाऊस हा माणसाच्या मनाला व्यक्त करणारे साधन वाटतो. पावसाचे आणि माणसाच्या सुख-दुःखाचे गाणे अखंडपणे बरसत असते. मनाच्या भावना व्यक्त करताना मनातले मळभ जितके दाटून येते, तितक्या येणार्‍या सरी जोरदार असतात. ते मळभ हळूहळू गडद होत जाते आणि एकदाचे अश्रूच्या रूपाने व्यक्त होते अगदी ग्रेस यांच्या कवितेसारखं. ग्रेस यांना आईच्या विरहासाठी या पावसाचा किती मोठा आधार घ्यावा लागला. त्यांनी मानवी मनाच्या आत असणारा दुःखाचा कप्पा पावसाच्या एका सरीच्या माध्यमातून व्यक्त करत असताना

- Advertisement -

पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली दुःखाच्या मंद सुराने.

आदिम काळातल्या या भावना माणसाने पावसाला साक्षी ठेऊन जपल्या आहेत. माणसाच्या आयुष्यात पाऊस हा एक उत्सव बनून येतो. घरात उत्सव असला की, तसा माणूस तनमन एक करून त्या उत्सवाचे स्वागत करायला सज्ज होतो. तसाच काहीसा हा उत्सव. पण हा उत्सव केवळ तनाने नाही तर मनाने साजरा करता येतो. कित्येक संकल्पांना सुरुवात करण्याचा हा उत्सव साजरा करण्यासाठी सामान्य माणूस आकाशात मळभ दिसू लागले, त्या मळभामुळे मनात काहूर माजू लागलं की, हळूच आभाळाकडे बघू लागतो आणि कोसळ…बाबा, कोसळ लवकर, ह्या पावसाच्या येण्याची हीच बांधिलकी त्याने वर्षानुवर्ष जपली आहे आणि आताही जपतो आहे. पाऊस हा मानवी मनाच्या जाणिवा आणि काहीशा नेणिवादेखील व्यक्त करतो.

- Advertisement -

सृजन काळाचा व्यापक भाग हा पावसाने व्यापून आहे. त्याला सृष्टीच्या कर्तेपणाची जाणीव आहे. मानवी मनाचे असंख्य कंगोरे पावसाच्या माध्यमातून व्यक्त होत असतात. राग, लोभ, आनंद-दुःख यातील सगळ्या भावना पाऊस ह्या एका प्रतिकाशी एकरूप झालेल्या असतात. कुठल्या एका संध्याकाळी उन्हाच्या झळा खाऊन तप्त झालेली सृष्टी एका क्षणात कात टाकते. चारी बाजूने धूळ उडू लागते, हलकेच वारा वाहू लागतो. त्या वार्‍याच्या सोबतीला गडद होणारी संध्याकाळ. तेव्हाचा सूर्यास्तदेखील वेगळा. त्या गडद होणार्‍या सांजेसारखा. निरामय, अकल्पित. श्वास रोखून धरायला लावणारा. याचवेळी माणसाच्या मनात एक तृप्त भावना झंकारते. त्याची काहिली पळून जाते. इतका वेळ त्याच्या मनातले ते निराशेचे मळभ निघून जाते. आणि तेव्हा कोसळणार्‍या सरींचा तो चाहता होऊन जातो. त्या मृद्गंधात त्याची गात्रे मिसळून जातात. ती अव्वल दर्जाची वांच्छ्ना त्यावेळी तो अनुभवत असतो. ही खुललेली भावना गेल्या कित्येक वर्षाची.

मानवी मनाची आणि पावसाची गुंतागुंत मांडणारी एक कथा मला पावसाबद्दल नेहमीच आठवत आली, माणसाला स्वप्नात पाऊस दिसत असेल का ? मानवी मन आहे , त्याला मानवी मनाची इतकी स्वप्न पडतात तर त्याला स्वप्नात पाऊस का दिसत नसेल? पाऊस किंवा पाण्याशी निगडीत काही स्वप्नात दिसलं तर शुभ मानलं जातं. पण हेमिंग्वेच्या मनाला ते पटत नसावं.

घराच्या समोरच्या बाल्कनीतून संततधार सुरू झाली की, पावसाशी निगडित ह्या कथा अगदी काल परवा घडून गेल्या असाव्यात असं वाटतं. माणसाच्या मनातील आनंदाला पावसाने एका उन्मादकपणे जेवढे व्यक्त केले आहे तेवढेच त्याने माणसाच्या मनात भीती, व्यथा, एक विलक्षण कोलाहल या सगळ्याला एका वेगळ्या पातळीवरून मांडले आहे. त्यातील हेमिंग्वे मला खूप आवडतो. वर्डस्वर्थ जेवढा मला प्रिय आहे, त्याच्या कितीतरी पटीने मला हेमिंग्वे आवडतो. त्यात मानवी मनाचे कंगोरे शोधण्याची आस मला नेहमीच जाणवत आली आहे, त्यात दैववाद असेल, तो त्याने कितपत अनुभवला हे मला नक्की सांगता येणार नाही, पण पावसाचे रूपक आणि मानवी मनाचा मोठा कॅनव्हास त्याने मांडलेली फेअरवेल टू द आर्म्स ही कादंबरी मला नेहमी आठवत आली आहे. कॉलेजच्या दिवसात ही कादंबरी वाचलेली.

त्या कादंबरीची नायिका म्हणजे कँथरीन, तिला सतत स्वप्नात पाऊस दिसायचा. ती आपल्या प्रियकराला म्हणायची की, ह्या पावसात कधी मी स्वतःला मृत झालेली बघते तर कधी मी तुला मृत झालेली बघते. हेमिंग्वे इथे पावसाचे मानवी मनातल्या त्या भीतीच्या भावनेला दाखवण्यात खूपच यशस्वी झाला आहे, त्याने कँथरीनच्या मनात पावसाविषयी असणारी भीतीची आणि अस्थिरतेची भावना इतकी तरल मांडली की, त्या क्षणी तो पाऊस नको वाटतो. पण मानवी मनाच्या मनातल्या पावसाला पुन्हा एकदा विशिष्ट लयीत बसवून त्याची मानवी मूल्यांशी केलेली तुलना इथे किती वेगळी वाटते ते बघा.

कँथरीन त्या स्वप्नाचा अर्थ लावायचा प्रयत्न करते. पण ह्या स्वप्नाचा अर्थ तिला लागत नसतो. कँथरीन गर्भवती असते तेव्हा तिथल्या देशात युद्धाला सुरुवात होते. तिचा प्रियकर-फेड्रिक तिला तिच्या प्रसूतीवेणा लागताच हॉस्पिटल गाठण्याचा प्रयत्न करताना ते युद्ध, ती हाणामारी, डोंगर, नदी सर्व पार करतो पण हे करत असताना त्यांच्या साथीला पाऊस हा एक साथीदार असतो. ह्या सर्व संघर्षाला पाऊस साक्षीदार असतो. फेड्रिक्स, तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो, कँथरीन बाळाला जन्म देते आणि ती स्वतः मरते. कँथरीनचे बाळ आणि मृत प्रेयसीचा निरोपं घेऊन, फेड्रिक्स सर्वस्व गमावल्यासारखा तिथून निघतो. विशेष म्हणजे तेव्हादेखील धुवाधार पाऊस पडत असतो. तेव्हा कँथरीनच्या स्वप्नाचा अर्थ त्याला कळतो ‘…..Sometimes I see myself dead in rain’ कादंबरी संपते पण मानवी मनातील पावसाबद्दल असणारी ही अनाम भावना आपण कधी विचारात घेत नाही. पाऊस असाही कधी मानवी मनात घोंघावत असेल का ?. कँथरीनच्या मनातील द्वंद्वाला हेमिंग्वेने पावसाचे माध्यम घेऊन किती वेगळ्या पद्धतीने शब्दबद्ध केलं आहे.

अस्थिरता, त्यातील घुसमट ही मानवी मनाचे कच्चे दुवे त्यामागे भीती ही आलीच. ह्या भीतीला मानवी मनाने किती घेरले असेल याचा अंदाज ही कादंबरी वाचल्यावर येईल, पाऊस म्हणजे चैतन्य, सर्जनशील, तो सुखमय अनुभव देणारा याचं वर्णन सगळ्यात आलं आहे, पण ती आई होती म्हणुनी, घनव्याकूळ मीही रडलो. त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवीत होता. अशी भावना जेव्हा मानवी मनात येते तेव्हा ह्या सुखाच्या दुःखाच्या कल्पनेच्या पलीकडे माणसाला अजून काही सांगायचे आहे का किंवा यातून निर्माण होणारी कुठली भावना मानवी मनात दडली असेल याचा अंदाज घेणे तसे अवघड असते.

कधी कधी ह्या सगळ्या मानवी मनाच्या भावना बाजूला ठेऊन वाटते की, आकाशातून पडणार्‍या ह्या जलधारा कोणाला कशा वाटाव्यात ह्या त्याच्या त्याच्या त्याने मानलेल्या पावसाच्या रूपावर आहेत. ती कथा नव्हती काय?, सात आंधळे आणि हत्तीची, त्यात हत्ती नेमका कसा हे कोणाला कळलेच नाही, जो तो आपल्या मनाप्रमाणे हत्ती कसा हे मानून घेतो, त्यामुळे माणसाच्या मनाला हा पाऊस कसा वाटेल याची नक्की शाश्वती आपण कशी देऊ शकणार हा प्रश्न आहे. ग्रेस यांना तो दुःखाच्या मंद सुराने आल्यासारखा वाटला तर कवी वसंत सावंतांना त्याला शब्दात पकडता आले नाही आणि सौमित्रला तो चक्क डोळ्यासमोर ऋतू बदलताना वाटला. कोणाला कसा वाटावा हा ज्याचा त्याचा प्रश्न ….मला आजही तो माझा लहानपणी चुकामुक झालेला सखा, पण दरवर्षी चैतन्यमय आणि तितकाच लाघवी वाटतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -