घरफिचर्ससारांशट्रेडिशनकडून ट्रेण्डकडे!

ट्रेडिशनकडून ट्रेण्डकडे!

Subscribe

‘अज्ञानाच्या अंध:कारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी.!’.. उटण्याचा सुवास, अभ्यंग स्नान, अंगणात सडा-रांगोळी, लुकलुकता आकाशकंदील, मातीचे रुबाबदार किल्ले, कोरे करकरीत नवीन कपडे, स्वादिष्ट फराळ आणि फटाक्यांची आतषबाजी असा सगळा उत्साही बाज असलेली दिवाळी आता काहीशी बदललेली दिसते. लोकांच्या धावत्या व बदलत्या जीवनशैली सोबतच सण-उत्सव साजरे करण्याची शैलीदेखील बदलत गेली. जुन्या परंपरांच्या नावाने नाके मुरडणार्‍या पिढीने या परंपरांमागचे शास्त्रीय कारणच कधी समजून घेतले नाही. त्यामुळे दिवाळी ‘ट्रॅडिशन’कडून ‘ट्रेण्ड’कडे वळली. पण त्यात दिवाळीची अस्सल मजा कुठेतरी हरवली गेली हेदेखील तितकेच खरे.

दिवाळी म्हणजे आनंद, दिवाळी म्हणजे मांगल्य, दिवाळी म्हणजे तेजाची दुनिया, नवं चैतन्य, नवी ऊर्जा देणारा सण.. दिवाळी हा एकमेकांना गोड शुभेच्छा देण्याचा सण! काही वर्षांपूर्वीची दिवाळी आठवून बघा. दिवाळीत सर्वजण एकत्र येऊन सण साजरा करत असू. प्रत्यक्ष भेट शक्य नसेलच तर खास शुभेच्छापत्र तयार करून ती पाठवली जात. आप्तस्वकीयांची ख्याली खुशाली विचारतांनाच त्यांनी दीर्घायुष्याच्या शुभेच्छाही देण्याची परंपरा याच शुभेच्छापत्रातून जोपासली जात होती. त्यामुळे दिवाळीची शुभेच्छा पत्र मोरपिसासारखी जपून ठेवली जात. कित्येक वर्ष ती शुभेच्छापत्र ‘खास आठवण’ म्हणून बघितली जात. या शुभेच्छापत्रांचा स्पर्श म्हणजे ते पाठवणार्‍या मायेच्या माणसाचा स्पर्श असेच समजले जात. पण काळ बदलला, तशी शुभेच्छा देण्याचे साधनही बदलले. शुभेच्छापत्रांची जागा मोबाईलच्या फॉरवर्डेड मेसेजने घेतली. बर्‍याचदा आपण काय शुभेच्छा दिल्या आहेत, हे वाचण्याची तसदीदेखील मेसेज पुढे ढकलणारा घेत नाही. त्यातून शुभेच्छा पोहचतात, पण शुभेच्छापत्रासारख्या भावना मात्र पोहचत नाही, हे प्रकर्षाने जाणवते.

दिवाळीला पूर्वी चिखलमातीचे किल्ले बनवण्याची लहान मुलांमध्ये स्पर्धा लागायची. संपत्ती, समृद्धी, सत्ता आणि प्रगतीचे प्रतीक म्हणून महाराष्ट्राच्या संस्कृतीत किल्ल्यांना महत्वाचे स्थान आहे. घराबाहेर अंगणात बांधले जाणारे हे किल्ले शालेय मुलांच्या भावविश्वातील आनंदाचा ठेवा होते. दिवाळी सुरू होण्यापूर्वी अनेक घरातून यावर्षी कोणता किल्ला बांधायचा म्हणून चर्चा केली जायची. शिवरायांच्या गडकिल्यांची पुस्तके, मासिके शोधली जायची. किल्ल्याचा आकार, भव्यता लागणारे साहित्य याचा विचार केला जायचा आणि मग बालगोपाळ उत्साहाने ते बांधायचे. अगदी तहान भूक हरवून, चिखल मातीची पर्वा न करता अनेक चिमुकले हात किल्ला बांधण्यात मग्न व्हायची.

- Advertisement -

विटा रचणे, चिखल मातीने त्या थापणे, किल्ल्यातील महत्वाच्या बाबी दर्शविणे व त्याला आकार देणे ही सगळी कलाकुसर केली जायची. त्यात गुहा, बुरुज, महाल अशा बाबींचा समावेश त्यात असायचा. दिवाळीतील ही किल्ले म्हणजे नुसता खेळ, मनोरंजन वा कल्पकताच नव्हती तर किल्ले बांधण्याच्या कृतीतून महाराष्ट्रातील ऐतिहासिक पराक्रमाचा वारसा जतन आणि संवर्धन करण्याचे काम अनेक वर्षे केले गेले. पण हळूहळू रेडीमेड किल्ले उपलब्ध झाले. प्लास्टिकचे सैन्य त्यात बसवले जाऊ लागले. त्यानंतर टीव्हीतील मनोरंजनाने बालगोपाळांच्या मेंदूवर इतका पगडा घेतला की मग किल्ले बनवणे हे ‘बोअरिंग’ वाटू लागले. पालकांनीही मग मुलांना किल्ले का बनवायचे हे सांगणे सोडून दिले आणि त्याची परिणती म्हणजे आता बर्‍याच ठिकाणी किल्ले बनवण्याची मज्जा विस्मृतीत जात आहे.

प्रत्यक्ष दिवाळीचा दिवस आला की पहाटे सगळेच लवकर उठायचे. थंडी खूप असायची. बालमंडळी उठायच्या किती तरी आधी घरातली वडीलधारी माणसं उठलेली असत. तुळशीकडे, उंबर्‍यावर, न्हाणीघरात दिवे लावलेले असायचे. आंघोळीचं पाणी तापवायचा हंडा छान स्वच्छ घासून त्याच्या तोंडाला घरच्या गोंड्याचा हार घातलेला असायचा. मग आजी एक-एक करून सर्वांना तेल लावायची. ज्याचं तेल लावून आधी झालं, त्याला आधी अंघोळीचा मान मिळायचा.

- Advertisement -

महिलावर्ग अंगणात सडा घालून छान ठिपक्यांची रांगोळी काढत. पण काळाच्या ओघात अंगण छोटं छोटं होत गेलं. आता तर घराच्या उंबर्‍यासमोरची चार फरशीची जागा म्हणजेच अंगण. मग या छोट्याशा जागेत डिझायनर चाळणीने इंस्टंट रांगोळी काढली जाते. हाताच्या मुठीने काढली जाणारी लक्ष्मीचे पाऊले स्टिकर्सच्या स्वरूपात चिटकवली जात आहे. पण या रांगोळीकडे कौतुकाने पाहणारी मंडळीच दिसत नाही. कारण जी रांगोळी काढताना स्त्रीचं मन रमलंच नाही, त्या रांगोळीत उत्सवाचे रंग तरी कसे भरले जाणार? झेंडूच्या फुलांनी सुशोभित केली जाणारी घरे -दरवाजे आता चायनीज झगमग करणार्‍या लाइट्सने सजवले जातात. पूर्वी वडीलधार्‍या व्यक्तींकडून लहान मुलांना आकाशकंदील बनविण्याचे धडे दिले जात.

परंतु आता घरगुती आकाशकंदील इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे. दारातील मातीच्या पणत्यांची जागा ही प्लॅस्टिकच्या वॉटरप्रुफ पणत्यांनी आणि चायनीज कॅण्डल्सनी घेतली आहे. फटाक्यांची आतषबाजीचेही स्वरुप बदलत आहे. लवंगी फटाक्यांसारख्या प्रसिद्ध फटाक्यांचे अस्तित्वच आता लुप्त होत आहे. कुणी फटाके लावलेच तर कुठून हा फटका लावत बसला असे म्हणण्याची वेळ येते. ‘दिवाळी सण मोठा नाही आनंद तोटा’ असे म्हणण्याऐवजी ‘हाच आवाज मोठ्ठा, लावा हाच तोट्टा’ असे म्हणणे वावगे ठरणार नाही. गेल्या काही वर्षांपासून आवाजी फटाके कमी झाले असले तरी आकाशात रंगाची उधळण करणार्‍या फटाक्यांची मागणी वाढतच चालली आहे. याने कानठळ्या बसत नसल्या तरी वायुप्रदुषण प्रचंड वाढते आहे. नाक, डोळे, घसा व फुफ्फुंसांचा त्रास सहन करावा लागतो.

जसे आपण मोठे होत गेलो तसा दिवाळी सणसुध्दा छोटा-छोटा होतोय. त्याचे स्वरूप बदलत जातेय. दिवाळीचा आनंद, उत्साह, शास्त्र-परंपरा याची जागा शॉपिंग, एन्जॉय आणि सेलिब्रेशनने घेत आहे. दिवाळीत आपण नवेनवे ट्रेण्ड आणत गेलो आणि आपले ट्रॅडिशन बदलत गेलो. बदल स्वीकारत पुढे चालणे हा समाजाचा स्वभावच आहे, मात्र आनंदाच्या या नव्या मार्गावर चालताना छोट्या गोष्टीमधून मिळणारा आनंद आणि शास्त्रोक्त परंपरा या आपल्या आठवणींच्या मिठीतून कायमच्या निसटू नये हीच अपेक्षा!

–प्रियंका भुसारे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -