घरफिचर्ससारांशतुर्की-सीरिया भूकंप शास्त्रज्ञांच्या नजरेतून

तुर्की-सीरिया भूकंप शास्त्रज्ञांच्या नजरेतून

Subscribe

तुर्कस्तानला भूकंपाचा धोका आहे. कारण ते पृथ्वीचे कवच बनवणार्‍या अ‍ॅनाटोलियन, अरेबियन आणि आफ्रिकन या तीन टेक्टोनिक प्लेट्सच्या छेदनबिंदूवर आहे. अरेबिया प्लेट उत्तरेकडे युरोपमध्ये सरकत आहे आणि यामुळे ज्यावर तुर्की वसलेले आहे ती अनाटोलियन प्लेट पश्चिमेकडे ढकलली जात आहे. टेक्टोनिक प्लेट्सच्या हालचालीमुळे त्यांच्या सीमेवरील फॉल्ट झोनवर (तडे गेलेले दोषक्षेत्र) दबाव निर्माण होतो. हा दाब अचानक सोडल्याने भूकंप आणि हादरे होतात. टेक्टोनिक प्लेट्सच्या सततच्या हालचालींमुळे या भागात दरवर्षी अनेक भूकंप होतात. आताचा भूकंप विशेषतः मोठा आणि विनाशकारी आहे. कारण त्यामध्ये प्रचंड प्रमाणात ऊर्जा सोडण्यात आली होती, असे या भूकंपाच्या शास्त्रीय अभ्यासातून दिसून येत आहे.

–सुजाता बाबर

सीरियाच्या सीमेजवळ तुर्कस्तानच्या आग्नेय भागात अत्यंत मोठा भूकंप नुकताच झाला आहे. हा संहारक भूकंप सर्वांनाच धक्का देऊन गेला, अजूनही देत आहे. हजारोंच्या संख्येने बळी गेलेले मृतदेह पाहून सामान्य माणूस जात-धर्म-देश-प्रदेश हा विचार करण्यापलीकडे गेला आहे. सर्व माध्यमांमधून फिरत असलेली छायाचित्रे, व्हिडीओ पाहून अंगावर सरसरून काटा येतो. अशा तीव्र घटना संपूर्ण जगावर दुःखाचे आणि वेदनेचे सावट आणतात.

- Advertisement -

अशा घटनांचा तात्काळ शास्त्रीय अभ्यास केला जातो आणि भविष्यात आपण या घटनांपासून कसे स्वतःला वाचवू शकतो याचे पर्याय शोधणे सुरू होते. भूकंपशास्त्रज्ञदेखील सीरियातील भूकंपावर अभ्यास करीत आहेत. भूकंपाच्या लाटांमुळे जमीन हादरते. या हादरण्याचे मोजमाप करणार्‍या भूकंपमापकांवरील डेटावरून समजते की ६ फेब्रुवारीच्या पहाटे घडलेल्या घटनेची तीव्रता मोमेंट मॅग्निट्यूड स्केलवर १० पैकी ७.८ इतकी होती. मोमेंट मॅग्निट्यूड अंदाज लहान ते मोठ्या भूकंपांसाठी रिक्टर तीव्रतेइतकेच असतात. भूकंप मोजण्याचे आपल्याला सामान्यतः रिक्टर स्केल परिचयाचे आहे, परंतु केवळ मोमेंट मॅग्निट्यूड स्केल हे मॅग्निट्यूड ८ आणि मोठ्या घटना अचूकपणे मोजण्यास सक्षम आहे. मॅग्निट्यूड लॉगरिदमिक स्केल बेस १० वर आधारित असतात. या भूकंपाच्या लाटा जगभरातील सेन्सरद्वारे टिपल्या गेल्या होत्या. युनायटेड किंगडमसारख्या दूरच्या ठिकाणांसह युरोपमधून या लाटा स्पष्ट जाणवल्या होत्या.

हा भूकंप खरोखरंच प्रचंड मोठा होता. स्त्रोत किंवा केंद्रबिंदूपासून बाहेरच्या दिशेने वाहणार्‍या ऊर्जेमुळे होणार्‍या हादर्‍यांमुळे जवळपास राहणार्‍या लोकांवर आधीच भयंकर परिणाम झाले आहेत. बर्‍याच इमारती कोसळल्या आहेत. दोन देशांमध्ये किमान पाच ते सहा हजार लोक मरण पावले आहेत आणि गॅस पाईपलाईनला आग लागल्याचे वृत्त आहे. ऐतिहासिक स्थळ आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या गझियानटेप किल्ल्याचा एक भागदेखील नष्ट झाला आहे. सुमारे २२०० वर्षांपूर्वी बांधलेला हा किल्ला शक्तिशाली भूकंपानंतर कोसळला.

- Advertisement -

पहिल्या भूकंपामधून जागे होत नाही तोवर मध्य तुर्कीमध्ये दुपारच्या जेवणाच्या सुमारास ७.५ रिक्टर स्केलचा दुसरा मोठा भूकंप झाला. हा भूकंप इथे का झाला? तुर्कस्तानच्या या भागाला भूकंपाचा धोका आहे. कारण ते पृथ्वीचे कवच बनवणार्‍या अ‍ॅनाटोलियन, अरेबियन आणि आफ्रिकन या तीन टेक्टोनिक प्लेट्सच्या छेदनबिंदूवर आहे. अरेबिया प्लेट उत्तरेकडे युरोपमध्ये सरकत आहे आणि यामुळे ज्यावर तुर्की वसलेले आहे ती अनाटोलियन प्लेट पश्चिमेकडे ढकलली जात आहे.

टेक्टोनिक प्लेट्सच्या हालचालीमुळे त्यांच्या सीमेवरील फॉल्ट झोनवर (तडे गेलेले दोषक्षेत्र) दबाव निर्माण होतो. हा दाब अचानक सोडल्याने भूकंप आणि हादरे होतात. नुकताच झालेला हा भूकंप अनाटोलियन आणि अरेबियन प्लेट्समधील सीमेवरील प्रमुख दोषक्षेत्रांपैकी एकावर झाला असण्याची शक्यता आहे. एकतर पूर्व अ‍ॅनाटोलियन फॉल्ट किंवा डेड सी ट्रान्सफॉर्म फॉल्ट. हे दोन्ही स्ट्राइक-स्लिप फॉल्ट्स आहेत. स्ट्राइक-स्लिप फॉल्ट्स हे उभे तडे असतात जिथे ब्लॉक्स बहुतेक आडव्या दिशेने हलवले जातात.

टेक्टोनिक प्लेट्सच्या सतत हालचालीमुळे या भागात दरवर्षी अनेक भूकंप होतात. आताचा भूकंप विशेषतः मोठा आणि विनाशकारी आहे. कारण त्यामध्ये प्रचंड प्रमाणात ऊर्जा सोडण्यात आली होती. युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हेमध्ये म्हटले आहे की, १९७० पासून या स्थानाच्या २५० किमी परिसरात मॅग्निट्यूड ६ पेक्षा मोठे भूकंप झाले आहेत. ६ फेब्रुवारीची घटना या क्षेत्राने यापूर्वी अनुभवलेल्या घटनांपेक्षा लक्षणीयरीत्या मोठी आहे. या प्रदेशातील सर्वात मोठ्या भूकंपाच्या म्हणजे ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या दुप्पट ऊर्जा यावेळी निर्माण झाली आहे. आपल्याला माहीत असलेले रिक्टर स्केल जुने आहे. आधुनिक भूकंपशास्त्रज्ञ मोमेंट मॅग्निट्यूड स्केल वापरतात, ज्यामध्ये भूकंपाद्वारे सोडलेल्या ऊर्जेचे प्रमाण कळते. या स्केलमध्ये प्रत्येक टप्प्यावर ३२ पट जास्त ऊर्जा सोडली जाते. याचा अर्थ असा की ७.८ तीव्रतेचा भूकंप या प्रदेशात साधारणपणे होऊ शकणार्‍या अधिक मध्यम तीव्रतेच्या ५ भूकंपांच्या १६००० पट जास्त ऊर्जा निर्माण करतो.

भूकंपाची ऊर्जा एका ठिकाणाहून किंवा केंद्रस्थानावरून येत आहे असे आपण मानतो, परंतु खरेतर संपूर्ण ऊर्जा दोषक्षेत्राच्या हालचालीमुळे निर्माण होत असते. भूकंप जितका मोठा असेल तितके दोषक्षेत्र आजूबाजूला ढकलले जाते. या ७.८ तीव्रतेच्या भूकंपामुळे १९० किलोमीटर लांब आणि २५ किलोमीटर रुंद क्षेत्रामध्ये हालचाली झाल्या असण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा की खूप मोठ्या क्षेत्रामध्ये हादरे जाणवले असतील. मालमत्तेचे नुकसान करण्यासाठी पुरेसे असलेले तीव्र ते हिंसक हादरे टेक्टोनिक प्लेट सीमेवर आणि त्याच्या ईशान्येकडे सुमारे ८० किमी अंतरापर्यंतच्या आसपासच्या भागातील ६ लाख १० हजार लोकांना जाणवले असतील. भूकंपाच्या स्थानावरून सुमारे ८१५ किलोमीटर दूर असलेले तुर्कस्तानचे सर्वात मोठे शहर इस्तम्बूल तसेच ८०० किलोमीटर अंतरावरील इराकमधील बगदाद आणि ९५० किलोमीटर अंतरावरील इजिप्तमधील कैरोपर्यंत हलके हादरे जाणवले आहेत.

अशा मोठ्या भूकंपांनंतर अनेक लहान भूकंप होतात, ज्यांना आफ्टरशॉक म्हणून ओळखतो. असे नंतरचे लहान भूकंप होतात. कारण पृथ्वीचे कवच मोठ्या भूकंपामुळे निर्माण झालेल्या तणावातील बदलांशी जुळवून घेत असते आणि त्यातून लहान हादरे बसतात. हे आफ्टरशॉक घटनेनंतर अनेक दिवस किंवा अगदी काही वर्षेदेखील जाणवत राहतात. आग्नेय तुर्कस्तानमध्ये सुरुवातीच्या हादर्‍यानंतर अवघ्या १२ तासांत ६.० पेक्षा जास्त तीव्रतेचे आणखी तीन भूकंप झाले. पहिला ६.७ तीव्रतेचा होता, जो पहिल्या धक्क्यानंतर केवळ ११ मिनिटांनी घडला आणि शेकडो लहान तीव्रतेचे आफ्टरशॉक आले.

दुसरा ७.५ तीव्रतेचा भूकंप उत्तरेकडे वेगळ्या परंतु लगतच्या सुर्गू या दोषक्षेत्रावर झाला. तांत्रिकदृष्ठ्या जरी तो पहिल्या भूकंपामुळे उद्भवला असण्याची शक्यता असली तरीही हा एक स्वतंत्र भूकंप म्हणून मोजण्याइतपत शक्तिशाली होता. तो त्याच्या स्वत:च्या आफ्टरशॉकची मालिकाच निर्माण करेल. आफ्टरशॉक्स सामान्यतः मुख्य धक्क्यापेक्षा बरेच लहान असले तरी त्यांचे तितकेच विनाशकारी परिणाम होऊ शकतात. पहिल्या भूकंपामुळे नुकसान झालेल्या पायाभूत सुविधांचे आणखी नुकसान होऊ शकते. यामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण होतो. या मोठ्या भूकंपांचे परिणाम या प्रदेशात राहणार्‍या लोकांना पुढे अनेक महिने किंवा वर्षे जाणवत राहतील. हे नुकसान भरून येणे अवघड असते. आपण अशी आशा करू शकतो की सध्या सुरू असलेल्या आफ्टरशॉक्सदरम्यान तुर्की आणि सीरियाला चालू असलेल्या बचावकार्यामध्ये आंतरराष्ट्रीय मदत लवकरात लवकर मिळो. अखेर मुद्दा मानवतेचा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -