घरफिचर्ससारांश...दोन गाणी, दोन आठवणी

…दोन गाणी, दोन आठवणी

Subscribe

मधुकर जोशी म्हटलं की सगळ्यात आधी त्यांचं कोणतं गाणं आठवत असेल तर ‘झिम झिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात, प्रियावीण उदास वाटे रात.’ या गाण्याची गंमत अशी की कित्येक गाण्यांच्या मैफिलीत बरेच निवेदक या गाण्याचं निवेदन करताना ‘रिमझिम झरती श्रावणधारा’ असा उल्लेख करतात, बर्‍याच गायिकासुध्दा ‘रिमझिम झरती’ असंच गातात. पण मधुकर जोशींनी तो शब्द ‘झिम झिम’ असा लिहिला होता...आणि तो शब्द तसाच्या तसाच उच्चारला जाण्याबाबत ते आग्रही होते. दुसरी एक आठवण आहे, लता मंगेशकर यांनी गायलेल्या ‘अब तक छुपाये रखा, शोला दबाये रखा.’ या गाण्याची.

लॉकडाऊन संपलेला नाहीय. कोरोनाचा काळ ओसरलेला नाहीय. रस्ते अजून सुनसान आहेत. …आणि जुन्याजाणत्या संगीतरसिकांच्या दृष्टीने एक बेसूर बातमी येऊन ठेपली आहे. त्या काळातले एक जुने गीतकार मधुकर जोशींचं निधन झालं असल्याची ही बातमी आहे.

मधुकर जोशी म्हटलं की सगळ्यात आधी त्यांचं कोणतं गाणं आठवत असेल तर ‘झिम झिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात, प्रियावीण उदास वाटे रात.’

- Advertisement -

या गाण्याची गंमत अशी की कित्येक गाण्यांच्या मैफिलीत बरेच निवेदक या गाण्याचं निवेदन करताना ‘रिमझिम झरती श्रावणधारा’ असा उल्लेख करतात, बर्‍याच गायिकासुध्दा ‘रिमझिम झरती’ असंच गातात. पण मधुकर जोशींनी तो शब्द ‘झिम झिम’ असा लिहिला होता…आणि तो शब्द तसाच्या तसाच उच्चारला जाण्याबाबत ते आग्रही होते. झिम झिम हा शब्द पावसातल्या थेंबांची अधिक मंद गती दाखवतो असं त्यांचं म्हणणं होतं.

मधुकर जोशींनी लिहिलेल्या या गाण्याबाबतचा आणखी एक किस्सा आहे…मधुकर जोशी हे गाणं लिहीत असताना संगीतकार दशरथ पुजारींनी त्यांना पसंत पडलेला एक शेर ऐकवला. तो शेर होता – अभ्र ए बहार जरा थम के बरसना, जरा आने दे मेरे यार, फिर जम के बरसना. (अशाच अर्थाचं महंमद रफींनी जे गाणं गायलं होतं त्याचे शब्द होते, बरखा रानी, जरा चम के बरसो, मेरा दिलबर जा न पाये, झुम कर बरसो.) या शेरमध्ये असलेला आशय आपण करत असलेल्या या गाण्यात कुठेतरी यावा असं पुजारींनी मधुकर जोशींना सुचवलं. मधुकर जोशींनीही पुजारींची ती सूचना मान्य केली…आणि ‘रिमझिम झरती श्रावणधारा’ या गाण्यातल्या एका अंतर्‍यात लिहिलं- प्रासादी ह्या जिवलग येता, कमळमिठीमध्ये भृंग भेटता, बरस असा की प्रिया न जाईल, माघारी दारात, प्रियाविण उदास वाटे रात.

- Advertisement -

मधुकर जोशी आज गेले, पण त्यांची ही आठवण आणि त्यांची अनेक गाणी आपल्या कायम आठवणीत राहतील हे नक्की! करोनाच्याच या काळात माझ्या अशाच एका सिने जगतातल्या वादक मित्राचा फोन आला. माझ्या या मित्राचं वय झालेलं असलं तरी गिटार वाजवायला बसला की त्याच्या वयाची निशाणी कुठल्या कुठे उडून जाते!
…तर त्याच्याशी बोलता बोलता अमर अकबर अँथनी या त्या काळातल्या एका गाजलेल्या सिनेमाचा विषय निघाला आणि त्याने त्या सिनेमातल्या एका गाण्याचा धमाल किस्सा सांगितला. त्याने ज्या गाण्याचा किस्सा सांगितला ते गाणं काही अजरामर, माइलस्टोन वगैरे पंथातलं नव्हतं. गाण्याचे शब्द होते, देख के तुझ को दिल डोला हैं, गॉडप्रॉमिस हम सच बोला हैं, ओ हम को तुम से हो गया हैं प्यार, क्या करे, बोलो तो जिये, बोलो तो मर जाये.

या सिनेमात अमिताभ बच्चन, विनोद खन्ना आणि ऋषी कपूर होते आणि त्यांच्या नायिका होत्या परवीन बाबी, शबाना आझमी आणि नितू सिंग. हे गाणं या सहाही जणांवर चित्रित होणार होतं. संगीतकार होते लक्ष्मिकांत-प्यारेलाल. त्यांनी अमिताभसाठी किशोरकुमार, विनोद खन्नासाठी मुकेश आणि ऋषी कपूरसाठी महंमद रफींना पाचारण केलं. साहजिकच, परवीन बाबी, शबाना आझमी आणि नितू सिंग या तीन नायिकांसाठीही ते वेगवेगळ्या गायिकांना बोलवतील अशी सगळ्यांची खात्री होती. पण लक्ष्मिकांत-प्यारेलालच्या मनात तसं अजिबात नव्हतं. त्यांनी त्या तिन्ही गायिकांसाठी एकाच बाईंचा आवाज वापरायचं ठरवलं होतं…आणि तो आवाज होता लता मंगेशकरांचा. तो सिनेमा तसं पाहिलं तर मल्टिस्टार, बिग बजेट होता. म्हणजे काटकसर करण्याचाही प्रश्न नव्हता, पण तरीही लक्ष्मिकांत-प्यारेलालचं म्हणणं होतं- सिनेमातल्या त्या तिन्ही नायिकांना एकच गायिका आवाज देणार आणि तो आवाज द्यायला लता मंगेशकरच असणार!

ते गाणं लिहिलं होतं आनंद बक्षींनी. त्यांनी कितीतरी गाणी कितीतरी संगीतकारांकडे लिहिली होती, पण त्यांनाही असा प्रकार घडल्याचं कधी आठवत नव्हतं. लक्ष्मिकांत-प्यारेलाल तीन वेगवेगळ्या नायिकांसाठी एकाच गायिकेला का बोलावताहेत हा त्यामुळे त्यांनासुध्दा पडलेला प्रश्न होता. त्यांना अगदीच राहवलं नाही म्हणून त्यांनीसुध्दा एकदा भीत भीत लक्ष्मिकांत-प्यारेलालकडे तो विषय काढला. पण लक्ष्मिकांत-प्यारेलाल या दोघांनीही काही बोलण्याचेही कष्ट घेतले नाहीत. फक्त नकारार्थी मान हलवली.

झालं, हे गाणं गाण्यासाठी लता मंगेशकरांना निरोप गेला. स्वत: लता मंगेशकरांनीही, नायिका तीन असताना मला एकटीलाच का बोलवलं, असा प्रश्न लक्ष्मिकांत-प्यारेलालना विचारलाच. पण लक्ष्मिकांत-प्यारेलालनी त्यांना हे गाणं तुम्ही आणि तुम्हीच गायचं असं सांगितलं. पण गाणं गाण्यापूर्वी त्यांना जी सूचना केली ती अशी – तुम्ही वेगवेगळ्या गायिकांसाठी आवाजात वेगळेपण आणलं नाहीत तरी ठीक आहे, फक्त गाण्यात एक ओळ या तिन्ही नायिकांसाठी समान आहे तिथे मात्र तुम्ही तुमच्या आवाजात थोडी जादू करा.

लता मंगेशकरांनीही त्या गाण्यात लक्ष्मिकांत-प्यारेलालची आज्ञा तंतोतंत पाळली आणि ज्या ओळीत लक्ष्मिकांत-प्यारेलालनी थोडं वेगळेपण आणायला सांगितलं होतं ती अशी काही गायली की बस् रे बस्…एव्हाना उत्सुकता वाढली असेल म्हणून ती ओळ सांगायलाच हवी…ती ओळ होती, ‘अब तक छुपाये रखा, शोला दबाये रखा.’
करोनाच्या या खडतर काळात हे असं काही कानावर आलं, काही आठवलं ते तुम्हाला सांगितलं इतकंच!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -