घरफिचर्ससारांशतो, ती आणि पाऊस...

तो, ती आणि पाऊस…

Subscribe

मानसीचा एकेक शब्द विनयचं काळीज चिरत जात होता. त्याला नकोसे भास होऊ लागले. फुलांच्या ताटव्यावर फुलपाखरासारखी मनसोक्त बागडणारी ही मुलगी. आज कोणत्या वळणावर येऊन थांबलीय? जिनं केवळ एका वर्षातच त्याच्या हृदयात आपला एक स्वतंत्र कोपरा तयार केला होता. जिच्या गाण्यानं मनावरचा सारा ताण कुठल्याकुठे भूर्रकन उडून जायचा. अगदी सर्वसामान्यच मुलगी. पण तरीही ती सुंदरतेची मूर्ती होती. मनानं आणि विचारानं ती अप्सरेलाही लाजवणारी होती.

‘‘Very good Vinay. पुढच्या आठवड्यात तुझ्या increment चं काम होऊन जाईल. अगदी hundred percent. उद्या हवं असेल, तर एक दिवस leave घेऊ शकतोस.’’

विनय ‘Thank you Sir’ असं म्हणाला आणि अत्यानंदात केबीन बाहेर पडला. बॉस अगदी त्याच्या मनातलं बोलला होता. कारण आज त्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस होता. आज त्याच्या आवडत्या व्यक्तीसोबत त्याची ‘डेट’ होती. मुग्धा त्याच्याच office मध्ये कामाला होती. विनयचा गोड, मिश्किल स्वभाव, त्याचं रुबाबदार दिसणं आणि त्यापेक्षाही त्याच्या प्रेमकवितांना ती भुलली होती.

- Advertisement -

खरंतर, तिनेच त्याला पहिलं ‘प्रपोज’ केलं आणि त्याने तर नकार द्यायचा प्रश्नच नव्हता. एवढी सुंदर, लावण्यवती आणि त्याच्या कवितांना उस्फुर्द दाद देणारी मुग्धा त्याला पहिल्याच नजरेत आवडली होती. पण ‘कसं बोलावं’ या एका प्रश्नामुळे त्याची गाडी काही पुढे ढकलत नव्हती. आता तो प्रश्न तिनेच सोडवला होता. पाच वाजताची भेट होती. पण मुग्धाला थोडा उशीर होणार होता. म्हणून मग तिनेच त्याला पुढे जायला सांगितलं. तसंही त्यालाही एक काम होतं. म्हणून तो नजरेचा एक प्रेमळ कटाक्ष मुग्धावर टाकून निखिलसोबत office बाहेर पडला.

पाऊस आताच पडून गेल्यामुळं सगळीकडे चिखल झाला होता. विनयनं काम आटोपून आतुरतेनं त्याची बाईक ‘हॉटेल आरंभ’ च्या पार्किंग यार्डमध्ये नेऊन उभी केली. आता ‘काय बोलावं, कसं बोलावं’, असा विचार करत तो आनंदाच्या लाटेवर स्वार होता.

- Advertisement -

तेवढ्यात, एक मऊशार हात त्याच्या खांद्यावर पडला. त्या अचानक झालेल्या स्पर्शानं तो शहारून विचारांच्या तंद्रीतून बाहेर आला. पण त्याला माहीत होतं, की ही मुग्धाच असणार. म्हणून त्यानं तिकडे वळून न पाहता आताच जुळवलेल्या शब्दांना तिच्यासमोर मांडलं.

तू घन हो फुलांचे
मी होतो बेफाम वारा सुगंधी
तू बरसत राहा मी वाहत राहतो
होऊन तुझाच बंदी…

वाह्, अजून तो गोडवा, ती तडफड तसूभरही कमी झाली नाहीय तुझी, विनया…
त्या शेवटच्या शब्दामुळे विनय आता खरोखरच तंद्रीतून बाहेर आला. कारण हा आवाज मुग्धाचा नव्हता आणि तसा अनोळखीही नव्हता. परत ते ‘विनया’ म्हणून हाक मारणं… त्याने मागे वळून पाहिलं आणि…
काय रे विनया, ओळखलं की नाहीस मला? कसा ओळखशील म्हणा. आता त्याला इतकी वर्षं लोटलीत. बरं, मी बसू का इथे? तुझी हरकत नसेल तर…

असं म्हणत ती त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसली. विनय स्तंभित होऊन तिच्याकडे पाहत राहिला. मानसी. बारावीच्या एका वर्षातली ओळख. अभ्यासात हुशार आणि अकाऊंट तर तिचा अगदी आवडता विषय. पुढे जावून तिला C.A. करायचं होतं. तिला गायनाचीही आवड होती. विनयच्या अनेक कविता ती चाल लावून म्हणायची. तशी निखळ मैत्री होती त्यांची. पण फक्त अभ्यासाविषयीच. कधीतरी कवितेला आणि गाण्याला दाद मिळायची एकमेकांकडून, तेवढंच. दोघांच्याही मनात खूपकाही चाललेलं असायचं. पण मन मोकळं करून बोलणं, कधी जमलंच नाही त्याला आणि तिलाही. पण आता बोर्डाच्या परीक्षेनंतर ती जेव्हा भेटेल, तेव्हा मनातलं बोलायचं, असं त्यानं पक्क ठरवलं.

पण ती वेळ कधीच आली नाही. कारण त्याला समजलं, की तिचं लग्न झालंय. घरच्यांनी जबरदस्तीनं लावून दिलंय. आई असेपर्यंत तिला शिकायला मिळालं. पण आई गेल्यावर तिच्या वडिलांनी तिचं लग्न लावून आपला बोजा हलका केला. मुलगा मुंबईला लिफ्टमन होता. लग्नात हुंडा वगैरे द्यावा लागला नाही, त्यामुळे तिच्या दारुड्या बापाचं फावलं. विनयने तिचा कुठे पत्ता वगैरे मिळतोय का, याची सगळीकडे चौकशी केली. पण शेवटी कंटाळून त्यानं तो विषय तिथेच थांबवला. ‘असेल तिथं सुखी असेल, मग झालं. तसंही आमच्यात तेवढं काही नव्हतंच.’ असं म्हणत त्यानं स्वतःला शांत केलं. आज तीच मानसी त्याच्यासमोर उभी होती.

आयुष्याच्या एका वेगळ्या अध्यायाची सुरुवात करताना…
‘काय रे ओळखलंस की नाही?’ तिने पुन्हा प्रश्न केला.
‘हो, हो. तुला कसा विसरेन मी? पण तू अशी अचानक, तीही इथे?’

काही नाही रे. इथे बाजूलाच आली होते. म्हटलं थोडं कॉफी पिवून जाऊ. बाहेर निघताना तू दिसलास. मी चटकन ओळखलं. तसा फार काही बदल झाला नाहीय तुझ्यात. बाकी कसा ठिक आहेस ना तू? आणि काय करतोस सध्या? कुठे असतोस? आणि इथं कोणाची वाट बघत थांबलास?

तिने पावसासारखी प्रश्नांची बरसात केली. विनय त्या प्रश्नांत भिजून अगदी ओलाचिंब झाला होता. आठवणींनी त्याचा कंठ दाटून आला. त्याने आपला आजपर्यंतचा प्रवास तिच्यासमोर मांडला.

वाह् छान. खुप सुंदर रे. पण शेवटी तिलाच पुढाकार घ्यावा लागला ना. बरं झालं. नाहीतर… तिनं वाक्य अर्ध्यावरच थांबवलं. पुढचं वाक्य त्यालाही कळून चुकलं होतं. कारण तिच्या डोळ्यातील दाटलेला पाऊस त्याला स्पष्ट दिसत होता.
दोन क्षण शांततेत गेले. मग काहीतरी आठवून तो म्हणाला, अगं हो खरं, तुझे ‘अहो’ कुठेत? परीक्षेनंतर थेट लग्न करून

मोकळी झालीस तू. काही सांगितलंही नाहीस.
आठवणींची आवराआवर करत ती म्हणाली, अचानकच ठरलं रे. बाबांच्या आग्रहापुढे मी काहीच करू शकले नाही. सारं काही अपूर्णच राहिलं रे.

तिच्या शेवटच्या वाक्यानं त्याच्या काळजात चर्र झालं.
आणि मिस्टर… त्यानं पुन्हा विषयाला हात घातला. पण वाक्य संपण्याआधीच ती म्हणाली,
गेल्यावर्षीचा पाऊस त्याच्या आयुष्यातला शेवटचा पाऊस ठरला. घरी परतत असताना गटारात पडून तो गेला. तसंही वर्षभरात लिव्हर फुटून मरणारच होता. तो जरा लवकर गेला एवढंच. पण जाण्याआधी तीन पोरांचं झोळीत दान टाकून गेला.

तिचा एकेक शब्द त्याचं काळीज चिरत जात होता. त्याला नकोसे भास होऊ लागले. फुलांच्या ताटव्यावर फुलपाखरासारखी मनसोक्त बागडणारी ही मुलगी. आज कोणत्या वळणावर येऊन थांबलीय? जिनं केवळ एका वर्षातच त्याच्या हृदयात आपला एक स्वतंत्र कोपरा तयार केला होता. जिच्या गाण्यानं मनावरचा सारा ताण कुठल्याकुठे भूर्रकन उडून जायचा. अगदी सर्वसामान्यच मुलगी. पण तरीही ती सुंदरतेची मूर्ती होती. मनानं आणि विचारानं ती अप्सरेलाही लाजवणारी होती.
मग गाणं वगैरे चालूय ना? C.A. करणार होतीस. त्याचं काय झालं? विनय एका नाजूक विषयाला हात घालत म्हणाला.

जडावलेल्या पापण्या फुलपाखरासारख्या फडफडवत ती म्हणाली, आयुष्य म्हणजे एक गूढ, अनाकलनीय संगीत असतं रे. वेळच्यावेळी मनाच्या तारा छेडता आल्या, तरच त्यातून सुमधुर प्रेमगीत जन्म घेऊ शकतं. नाहीतर आयुष्याचं विरहगीत होतं. रटाळ, भकास आणि निरस. आता हेच गाणं आळवत असते मी. मुलांच्या रडगाण्यात माझं हे गाणं कुठल्याकुठे विरून जातं. शिकायचं खूप होतं रे. नावं कमवायचं होतं. पण… राहूदे. नातेवाईकांचा, कुटुंबाचा कोणताच आधार नसलेल्या माझ्या मुलांना जगवणं, हेच माझं आद्य कर्तव्य. माझं दुःखं त्यांनी का भोगावं? आता मिळेल ते काम करते. चार जणांचं पोटं भरायचं असतं मला.

विनय अगदी पाषाणासारखा थंड पडून होता. डोक्याच्या नसा तडतडत उडत होत्या. काहीतरी विलक्षणच घडत होतं. अगदी कल्पनेच्या पल्याडचं.

ती शांतता भंग करत तिच पुन्हा म्हणाली, चला हाफिसर, आता निघते मी. लांब सायनला जायचंय. मुलं वाट बघत असतील. तू काळजी घे हं तुझी आणि हो, आता मुग्धाचीही. तुझं कोणंतही स्वप्न माझ्यासारखं अपूरं ठेवू नकोस. मुग्धाला खुपसार्‍या शुभेच्छा कळव आणि वेळीच बोलल्याबद्दल माझ्याकडून अभिनंदनही कर. चल बाय. असं म्हणत ती उठली. एक मंद स्मित करून त्याला डोळे भरून पाहिलं आणि मग चालू लागली. तो काही क्षण तसाच स्तंभित झाला. इतक्यात काहीतरी आठवलं. तो तिच्या मागून गेला. पण आता ती अगदी लांबवर जाऊन पोहोचली होती.

बाजूचा एक माणूस तिच्या कंबरेला हाताचा विळखा घालून चालत होता. तिने जिना चढता चढता पाठीमागे वळून पाहिलं. तेवढ्यातच, पाऊस सुरू झाला. खूप काही साठवलेलं मोकळं करत असल्यासारखा. बरसून बरसून अगदी चिखल करून टाकणारा. त्या पावसात त्याच्या हातातलं मघाशी तिच्या पर्समधून पडलेलं ‘आरंभ लॉज’ चं व्हिजिटींग कार्ड वितळून गेलं. ‘तुफान वादळामुळे मी येऊ शकत नाही’, असं सांगणारा मुग्धाचा कॉल मात्र ओरडून ओरडून आता शांत झाला होता अन् इथे वादळाला अजून जोर चढला होता.

– श्रेयश शिंदे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -