घरफिचर्ससारांशहिंसक वेबसिरीजचा हिडीस हैदोस !

हिंसक वेबसिरीजचा हिडीस हैदोस !

Subscribe

आपल्याला हिंसा आवडते नव्हे तर फक्त तीच जास्त आवडते, कदाचित या मागे भारतात घडलेलं स्थित्यंतर कारणीभूत असू शकतो, पण तरीही हे टाळून चालणार नाही की आपण असं वागतो. भारतात सद्यस्थितीला बनविल्या जाणार्‍या अनेक वेब सिरीज, सिनेमे हे गुन्हेगारी, रक्तपात आणि सेक्स या विषयांभोवतीच फिरणारे असतात. कदाचित वेगळे काही बनत असतील ही पण हिट होणारे मात्र हेच विषय असतात, यामागे कारण काय ? गेल्या काही वर्षात हे प्रमाण इतकं का वाढलं ? प्रेक्षक म्हणून आपण हिंस्त्र झालोय की आपल्याला हिंस्त्र बनवलं जातयं ? असे चित्रपट आणि सिरीज आपल्याला हिंस्त्र बनवू शकतात का? ही गिधाड मानसिकता नेमकी आहे तरी काय आणि ही जन्मते कशी ? तिचाच घेतलेला हा आढावा.

व्यक्तीचा विचार करण्याची पद्धत आणि त्याच्या आवडीनिवडी या वेगवेगळ्या असतात, कलेच्या बाबतीत तर ही भिन्नता ठळकपणे दिसून येते. भारतीय सिनेमाचा प्रेक्षक मोठा आहे आणि त्यांच्या आवडीनिवडी व विचारातील भिन्नता त्याहूनही मोठी आहे. प्रत्येक कलाकाराचा वेगळा प्रेक्षक, सिनेमांच्या विविध विषयांचा वेगळा प्रेक्षक, भाषेचा प्रेक्षक प्रेक्षकांमध्ये असणारे हे वैविध्य दुसरीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात आढळत नाही. भारतातील प्रेक्षकांच्या आवडीनिवडी या काळानुरूप बदलत गेल्याचे पाहायला मिळते, पण तरीही सिनेमातील एक प्रकार असा होता ज्याला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा प्रतिसाद उत्तम राहिला आहे, सिनेमातील हा प्रकार भारतीय प्रेक्षकांच्या मूळ स्वभावाशी संबंधित असल्याने नेहमीच याला मिळणारा प्रतिसाद इतरांपेक्षा अधिक राहिलाय. गेल्या काही काळात म्हणजे ओटीटीच्या आगमनानंतर तर याचा प्रेक्षक वर्ग प्रचंड वाढलाय आणि ज्याला प्रेक्षक मिळाला, त्याची निर्मिती देखील वाढते हेच आपल्याकडे यशाचं गणित आहे. भारतीय लोकांना फारच सहिष्णु किंवा शांत वैगरे मानले जाते, पण तरीही ज्या घटना आपण आजूबाजूला घडताना पाहतो त्यावरून तरी हे साफ खोटं आहे, असं वाटायला लागतं.

रस्त्यावर स्कुटीवरून एखादा पडला आणि त्याला खरचटलं, तर ते पाहायला होणारी गर्दी आणि त्याच रस्त्यावर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार मृत पावला तर होणारी गर्दी यात फार मोठा फरक आहे. एकंदरीत काय तर आपल्याला हिंसा आवडते नव्हे तर फक्त तीच जास्त आवडते, कदाचित या मागे भारतात घडलेलं स्थित्यंतर कारणीभूत असू शकतो, पण तरीही हे टाळून चालणार नाही की आपण असं वागतो. भारतात सद्यस्थितीला बनविल्या जाणार्‍या अनेक वेब सिरीज, सिनेमे हे गुन्हेगारी, रक्तपात आणि सेक्स या विषयांभोवतीच फिरणारे असतात. कदाचित वेगळे काही बनत असतील ही पण हिट होणारे मात्र हेच विषय असतात, यामागे कारण काय ? गेल्या काही वर्षात हे प्रमाण इतकं का वाढलं ? प्रेक्षक म्हणून आपण हिंस्त्र झालोय की आपल्याला हिंस्त्र बनवलं जातयं ? असे चित्रपट आणि सिरीज आपल्याला हिंस्त्र बनवू शकतात का? ही गिधाड मानसिकता नेमकी आहे तरी काय आणि ही जन्मते कशी ? तिचाच घेतलेला हा आढावा.

- Advertisement -

भारत आणि इतर देशातील सिनेमा पाहणारा प्रेक्षक यांची तुलना कधीच होऊ शकत नाही, याच मुख्य कारण म्हणजे आपल्याकडं असणारं वैविध्य जे आपल्या आवडीनिवडीवर परिणाम करतं. मग इथे हा देखील प्रश्न उद्भवतोच की जर भारतातील प्रत्येक प्रेक्षकांच्या आवडीनिवडी या वेगवेगळ्या आहेत, तर मग मी सरळ गुन्हेगारी आणि सेक्स हे विषय लोकांना आवडतात, असं सांगून कसा मोकळा होऊ शकतो? याचं कारण आहे यांना मिळणार्‍या प्रतिसादात १३५ कोटी लोकसंख्येच्या देशात समजा ३५ कोटी लोकं सिनेमा पाहत असतील आणि त्या पैकी २० कोटी लोकांना केवळ हेच विषय आवडत असतील, तर इथे तुलनेने संख्या जास्त असल्याने त्याच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तर सुरुवातीपासून भारतीय प्रेक्षकाला तीन गोष्टीचं आकर्षण होतं, सेक्स, ग्लॅमर आणि गुन्हेगारी आपल्याला आकर्षण त्याच गोष्टीचं असतं ज्या एकतर आपल्याला कधी मिळत नाही आणि दुसरी अशी जी आपल्या जीवनाचा भाग बनली आहे.

आता सेक्स ही बाब आपल्याकडे अजूनही लग्नाआधी मिळत नाही आणि अर्धा भारत दारिद्य्र रेषेखाली जगत असल्यानं गुन्हेगारी सोबत त्यांचा दैनंदिन संबंध येतोच. आजूबाजूला साड्या घातलेल्या किंवा झाकलेल्या स्त्रिया पाहण्याची सवय असणार्‍याला जेव्हा स्कर्ट घातलेली बाई पडद्यावर दिसू लागली तेव्हा त्याचं तिच्याकडं आकर्षित होणं साहजिक होतंच, म्हणून सुरुवातीच्या काळात आपल्याकडे ग्लॅमरला बराच प्रतिसाद मिळाला. अनेक बी ग्रेड सिनेमे हाऊसफुल होतानाचा काळ तुमच्यापैकी अनेकांनी अनुभवला असेल. त्याच काळात गुन्हेगारी विश्वावर आधारित सिनेमे येऊ लागले. १० गुंडांना एकत्र मारणारा अमिताभ लोकांना आवडू लागला आणि त्याचेदेखील प्रेक्षक बनले. पण आता सगळंच बदलून गेलय. प्रत्येकाच्या हातात आलेल्या स्मार्ट फोनने लोकांनादेखील स्मार्ट केलंय. घरच्यांची नजर चुकवून लपून छपून बी ग्रेड सिनेमे पाहायला जाणार्‍यांच्या हातातच आता सर्वकाही मिळालंय. सेन्सॉर नसल्याने त्यांचेही भागते आणि यांचे ही, त्यांना प्रेक्षक हवा असतो आणि यांना असा कंटेंट, मागणी तसा पुरवठाचा हा सिद्धांत पुरेपूर वापरून असेच कंटेंट वारंवार बनवले जातात.

- Advertisement -

गेल्या काही काळात भारतात सुपरहिट ठरलेल्या सिनेमांची आणि वेब सिरीजची यादी काढली तर आपल्याला लक्षात येईल की, सध्या कुठला कंटेंट लोकांना आवडतो आहे. सेक्रेड गेम्सपासून मिर्झापूरपर्यंत प्रत्येक हिट होणार्‍या बहुतांश सिरीजमध्ये गुन्हेगारी आणि सेक्स या दोन गोष्टी केंद्रस्थानी आहेत. आता या सिरीज पाहण्यासाठी आपल्याला थिएटरमध्ये जावं लागत नाही, आपल्या हातात असलेल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आपल्याला हा सर्व कन्टेन्ट उपलब्ध होतो. मग याचे प्रेक्षक कोण? वेबसिरीज असो किंवा सिनेमा त्याची निर्मिती होण्यापूर्वीच त्याचा टार्गेट ऑडियन्स ठरवला जातो. ओटीटीवर येणार्‍या सर्व कन्टेन्टचा मुख्य टीजी हा भारतातील तरुणवर्ग आहे, ज्यांचं वय आता १६ ते ३० नसून १४ ते ३० झालंय. हा असा तरुणवर्ग आहे ज्यांच्या हातात स्मार्टफोन आहे, असा तरुणवर्ग ज्याने भोवताली गुन्हेगारी घडताना पाहिलंय, म्हणून त्याला त्यात रस आहे.

सोबतच लग्नाआधी सेक्स त्याला मिळत नाही, म्हणून त्याबद्दलच कुतूहल देखील त्याला आहे. या तरुणाला शिव्या देणारा नायक आवडतो, कदाचित त्याने भोवताली तेच पाहिलं आहे. गायतोंडे, कालीन भैय्या यांसारखे पात्र त्याला आदर्श वाटायला लागतात. अशाच तरुणांच्या आवडी लक्षात घेऊन स्टोरीज बनवल्या जातात. त्यांच्या केंद्रस्थानी सेक्स आणि गुन्हेगारी हेच विषय ठेऊन त्यांना सादर केलं जात. प्रेक्षक त्या कथेशी स्वतःला रिलेट करतात आणि ती मालिका सुपरहिट ठरते. सध्या सर्वत्र हेच सगळं सुरु आहे आणि हा पॅटर्न मोडून वेगळं काही करण्याची गरज कुठल्याही दिग्दर्शक अथवा निर्मात्याला वाटत नाही. आता मुद्दा हे विषय हिट होण्याचा, तर यामागे कारण आहे, वेबसिरीजमध्ये हाताळले गेलेले विषय. उदाहरणार्थ, आधी जातीव्यवस्थेवर सिनेमा यायचा त्यात थोडीशी हिंसा असायची, आता फक्त हिंसेवर सिरीज येते आणि त्यात थोडा सामाजिक विषय हाताळलेला दिसतो. म्हणजे मूळ मुद्दा सांगायचा वेगळा आणि दाखवायचा वेगळा, हेच कारण आहे की, यांना मिळणारा प्रतिसाद चांगला असतो.

ओटीटीवर प्रदर्शित होणार्‍या कंटेंटला भारताबाहेर देखील प्रेक्षक आहे, जगात जिथेजिथे हिंदी भाषा कळते तिथेतिथे हा कंटेंट पाहिला जातो. इंटरनेटवर सहज उपलब्ध असल्याने याला कुठलीही बंधनं नाही. भारतीय वेबसिरीज बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान यांसाख्या देशांसोबतच इराण, दुबईच्या काही भागात देखील पाहिल्या जातात. बांगलादेश, पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान यांसारख्या देशातील सद्यस्थिती पाहता त्यांना हा कन्टेन्ट नक्कीच आवडेल असा आहे. ज्या देशात गुन्हेगारी आणि रक्तपात हा सामान्य नागरिकांच्या जीवनाचा भाग बनला आहे, त्यांच्याशी असा कंटेंट रिलेट होतो. अशाप्रकारे ओटीटीवर प्रदर्शित होणार्‍या गुन्हेगारी आणि सेक्स विषयावर आधारित मालिकांना बाहेरूनदेखील चांगला प्रतिसाद मिळतो. फक्त भारताचा विचार केला तर हा देश फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटरवर दिसणार्‍या भारतापेक्षा नक्कीच वेगळा आहे. अशा वेबसिरीजना मिळणार्‍या प्रतिसादाचे कारण भारतीयांच्या मूळ मानसिकतेत आणि समाज रचनेत दडलेले आहे. शिक्षण घेऊनही डोक्यात असलेली जाती व्यवस्था, गुन्हेगारी ही काही केल्या जात नाही. गरिबी पिच्छा सोडत नाही आणि जिथे गरिबी येते तिथे जगण्याचा संघर्ष येतो आणि याच संघर्षातून कधीकधी जन्माला येते गुन्हेगारी, हीच गुन्हेगारी मग जगण्याचा भाग होऊन जाते आणि जेव्हा आपलंच चित्रण पडद्यावर पाहायला मिळतं तेव्हा त्याला प्रतिसाद मिळतो.

भारतीय सिनेमाच्या सुरुवातीच्या काळापासून जर गुन्हेगारीवर आधारित सिनेमे येत होते तर मग आताच त्यावर आक्षेप का ? हा देखील प्रश्न उपस्थित केला जातो. याला कारण आहे त्या सिनेमात दाखविलेला खलनायक, तुम्ही जुन्या हिंदी सिनेमातील खलनायकाला कधी पाहिलंय का ? त्याचे दोन चेहरे असायचे, एकात तो प्रामाणिक किंवा सभ्य दाखवला जायचा आणि दुसर्‍या चेहर्‍यात त्याची क्रूरता दिसायची. जनतेसमोर व्यवसाय करणारा व्यावसायिक, राजकारणी किंवा समाजसेवक अशा पात्रांच्या आड त्याचे गोरखधंदे असायचे, कधी याचा विचार केलाय का, की नेमकं हे का असायचं ? याला कारण होतं, लोकनिंदेची भीती… आपलं सत्य बाहेर येण्याची भीती आणि हे रील लाईफमध्ये कायम दाखवलं गेलं आहे. अगदी आजही बर्‍याच सिनेमात खलनायक असाच दाखवला जातो, पण या उलट सध्या प्रदर्शित होणार्‍या अनेक वेबसिरीज आणि सिनेमात खलनायक हा बेधडक दाखवला जातो, तो पोलिसांची दिवसा ढवळ्या हत्या करतो, तो गृहमंत्र्याच अपहरण करतो, तो काहीही करू शकतो तेही कुठल्याही भीती शिवाय. खलनायकाची ही प्रतिमा प्रेक्षकांच्या मनात तयार केली जाते आहे आणि खलनायकाची ही प्रतिमा आपल्याला बिनधास्त वाटते हे विशेष. सिनेमे हे सामाजिक स्थित्यंतराचा भाग होते आणि आजही आहेत, पण सद्य:स्थितीत ज्या काही घटना पडद्यावर दाखवल्या जातात त्या खरंच याच स्थित्यंतराचे प्रतिनिधित्व करतात का ? ही बाब विचार करण्यासारखी आहे.

सिनेमा असो किंवा वेब मालिका प्रेक्षकांच्या मनावर प्रभाव तेव्हाच पडतो ज्यावेळी प्रेक्षक त्याच्या कथेशी संबंध जोडायला लागतो. जर सद्य:स्थितीत वेब सिरीज किंवा ओटीटीवर दाखविण्यात येणार्‍या कथांशी प्रेक्षक संबंध जोडू शकत असेल, तर याचा अर्थ की अशा कथा त्याने आपल्या आसपास घडताना पाहिल्या आहेत. या आधी प्रत्येक कलाकृतीला सेन्सॉरची कात्री असल्यानं कदाचित ते सत्य समोर येऊ शकत नव्हतं, पण आता ते बाहेर येतंय. फक्त इथे प्रश्न आपण ते सत्य पचविण्याइतपत प्रगल्भ झालो आहोत का? हा आहे. कारण पाताल लोकमध्ये आपल्याला गुन्हेगार बनण्याच आणि गुन्हेगारीच मूळ दिसलं की, गावात खुलेआम होणारे रेप? मिर्झापूरमध्ये सत्तेचा संघर्ष दिसला की डिस्कवरीवर प्रणय क्रीडा पाहून त्या सत्यात आणणारा कुलभूषण खरबंदा? हे आपल्याला ठरवायचं आहे. हिंसा प्रत्येकात असतेच, पण या वेबसिरीज त्याला खतपाणी घालताय की त्या हिंसेचे परिणाम दाखवून त्याबद्दल भीती निर्माण करताय, हे आपल्याला ठरवावं लागेल. मिर्झापूरचा दुसरा सिझन रिलीज झालाय, लवकरच फॅमिली मॅनचादेखील पुढचा सिझन येणार आहे, ओटीटीने कंटेंट दिलाय हे खरं आहे. पण तो कंटेंट विकताना सेक्स आणि रक्तपात बाय प्रोडॅक्ट असेल तर ठीक, पण जर त्यालाच मेन प्रोडक्ट म्हणून विकत असाल तर मात्र अवघड आहे.

-अनिकेत मस्के 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -