घरताज्या घडामोडीमानवतेसाठी जागर!

मानवतेसाठी जागर!

Subscribe

‘कविता’ साहित्यातील लोकप्रिय ठरलेला प्रकार. आज कविता अत्यंत आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय झाला आहे. कवितेच्या माध्यमातून उत्कट भावनांना वाट मोकळी केल्याने मनावरचं ओझं हलकं केलं जातं. विशेष करून तरुणवर्ग या लाटेत आला आहे. कवितेची वाट सोपी वाटत असल्याने या मार्गाने बहुसंख्य लोक जात असतात. वास्तविक कविता करणे हे सोपं काम नाही, परंतु पटकन सुचते कागदावर उतरते अशी धारणा कवींची झाली आहे. त्यामुळे कवी आणि कवितांची संख्या खूप झपाट्याने वाढली असून कविता बहरलेली दिसते. कविता वेगवेगळ्या प्रकारची असते. मनोरंजन आणि करमणूक करणारी कविता आनंददायी असली तरी क्षणभंगूर असते. याउलट बंडखोर, विद्रोही कवींची कविता दीर्घकाळ परिणाम करणारी, व्यापक अर्थाची, अंतर्मुख होऊन आपल्याला विचार करायला भाग पाडते. कविता प्रश्न विचारते, प्रश्नांची उत्तरे देते, समस्यांवरचे उपाय सुचवते. बदलत्या समाजरचनेबरोबर कविताही बदलली पाहिजे ही मात्र अपेक्षा असते. काही अंशी कवितेचे स्वरूप बदललेलं आहे, मात्र ही कविता समाज उपयोगी ठरत नसेल तर ती कुचकामी ठरते. हृदयाला भिडणारी अस्वस्थ कविता मुडदेही जिवंत करते.

अर्थात सगळ्याच कविता या इफेक्टिव्ह असतातच असं नाही, परंतु ज्या काही परिणामकारक असतात त्याच्यातून सामाजिक बदल होत असतो. प्रत्येक जण आपल्या पुण्यकर्माने आपण अनंत काळ आठवणीत जिवंत राहावं या धडपडीने आटापिटा करीत असतो. आपल्याला मिळालेल्या जीवनाचं सोनं करायचं की माती हे आपणच ठरवायचं असतं. अर्थात तो संस्काराचा भाग आहे. आपल्यावर काय संस्कार झाले आहेत अथवा करून घेतले आहेत या सर्वांवर आपली वैचारिक मतप्रणाली तयार होते. थोर क्रांतिकारक, समाजसुधारक, महापुरुष, संत-महात्मे यांच्या विचारसरणीवर चालताना मानव जीवितास धोका उत्पन्न होणार नाही याची मात्र काळजी घ्यावी लागते. त्याचबरोबर सामाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही याचंही भान ठेवावं लागतं. साहित्याची निर्मिती करताना सामाजिक संवेदना असावी. प्रसंगी प्रवाहाविरुद्ध जाण्याची तयारी ठेवावी लागते. अटळ असणार्‍या मरणाला न घाबरता डोक्याला कफन बांधून ताठ मानेने स्वाभिमान जागृत ठेवून जगायचं असतं. कशाचीही भीती न बाळगता समाज प्रबोधनासाठी मरण आलं तरी बेहत्तर अशी मनाची तयारी ठेवून जे लिहितात, जगतात ते धन्य होत. आपल्या साहित्यातून अन्यायाविरुद्ध ज्वालामुखी, उद्रेक व्हायलाच पाहिजे. मानवी मूल्य नाकारणारी जातीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक आणि प्रशासकीयसुद्धा जी व्यवस्था माणसाला बंदिस्त करून ठेवते तिच्यावर हातोडा उगारलाच पाहिजे. निरामय समाजाच्या निर्मितीसाठी ‘माझं साहित्य’ असं अंतिम ध्येय ठेवून लिहिणारे साहित्यिक आता उदयास येत आहेत.

- Advertisement -

अरुण घोडेराव हा नाशिकमधला मानवता, समता, बंधुत्वासाठी झगडणारा, माणुसकीची हाक देणारा, माणुसकीची गाणी गाणारा माणूस आणि माणसाचे या जगातील माणुसकीचं नातं अखंडीत राहण्यासाठी धडपडणार्‍या बंडखोर तडफदार कवींपैकी एक. माणुसकी, विषमता, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांच्या मनातील राग, द्वेष,चीड, संताप, उद्रेक, ज्वाला हा त्यांच्या कवितेचा गाभा आहे. ‘काफीरनामा आणि इतर कविता’ त्यांचा अलीकडेच प्रकाशित झालेला ६९ कविता असलेला दीर्घ काव्यसंग्रह आहे. कविता वाचल्यानंतर अंतर्मुख होऊन चिंतन करून इतरांना मात्र मंथन करायला लावणार्‍या अतिशय वेगळ्या शैलीच्या कविता आहेत. माणूस हा त्यांच्या कवितांचा प्राण आहे. त्यामुळे माणसांच्या गौरवासाठी, विकासासाठी, कोणाचीही भीडभाड न ठेवता, कुणालाही न घाबरता, न जुमानता त्यांनी लिहिलेल्या कविता अतिशय उद्बोधक आहेत हे कवितासंग्रहाच्या शीर्षकावरूनच आपल्या लक्षात येतं. ‘नाही रे’ किंवा वंचित वर्गाच्या उन्नतीसाठीचा जाहीरनामा जो समतेसाठी लढण्याकरिता आंदोलनासाठी, मोर्चासाठी कवितेतून हाक देतो.

आधुनिक युगात माणसं डोळस होण्याऐवजी अंधश्रद्धेकडे जास्त झुकलेली दिसतात. त्यामुळे स्वतःच्या कर्तबगारीवर विश्वास न ठेवता कोणीतरी आपलं भविष्य सांगेल त्या मार्गाने चालतात. जुन्या पुराण्या भाकड कथांवर विश्वास ठेवून अंधश्रद्धेचा मार्ग पत्करतात. कुणी झटपट श्रीमंत कसे होता येईल याचा मार्ग शोधतात आणि अंधश्रद्धेचे बळी ठरतात. आपल्यातली वैज्ञानिकता विसरून आपण अंधश्रद्धेच्या वाटेने जात आहोत. पाप-पुण्य, स्वर्ग-नरक या संकल्पनेत स्वार्थी होऊन गुरफटल्याने आपणच आपल्या विकासाचे दोर कापले आहेत. पूर्वी एक म्हण प्रचलित होती की, ‘असेल माझा हरी तर देईल खटल्यावरी.’ म्हणजे मी काहीच करणार नाही. माझ्या नशिबात जे आहे ते मला मिळणारच. यावर विश्वास ठेवल्याने, कर्तृत्व विसरल्याने आपण वाट बघतो कोणीतरी येईल. मग तो जटाधारी साधू असेल. तो आपला हात पाहील आणि आपला हात पाहिल्यानंतर आपले सगळे प्रश्न सुटतील. आपण त्याची वाट पाहतो. साधू येतो तो आपलं काम चोख करतो, पण आपण आपल्या स्वतःला असा प्रश्न का विचारत नाही की, जर खरचं त्या साधूला सगळंच कळतं? तर तो साधू संन्याशी का झाला? ‘कानगोष्टी’ या कवितेत अरुण घोडेराव अतिशय महत्त्वाचा कानमंत्र देतात. ते म्हणतात…

- Advertisement -

डोळस हो, चालव डोके, माणुसकीला विसरू नको, विज्ञान, नीती, निर्भयतेकडे पाठ कधी फिरवू नको; लोकशाही स्वातंत्र्याचा मार्ग नेहमी असतो, खुला भाकड कथांवरती विश्वास ठेवायचा नसतो मुला. सगळ्या अजस्त्र प्राण्यांवर मात करून त्यांना काबूत ठेवण्याची बुद्धी माणसाकडे आहे. म्हणून मनुष्यप्राणी श्रेष्ठ आहे, पण तरीही विषमतेच्या व्यवस्थेमध्ये माणसाला मात्र दूर लोटलं आहे. माणसापेक्षा इतरांना महत्त्व आलं आहे. माणूस हाडामासाचा असूनसुद्धा उपवासी, वनवासी असतो. झोपडीत, बिळात, खुराड्यात राहतो. एका बाजूला अन्नपाण्यावाचून तडफडतो, तर दुसरीकडे मात्र महालात राहणारे कैकांची पोटं भरतील इतकं अन्न फेकून देणारे. ही विषमता नाही काय? माणसांची घर भरलीत. घरातही माणसं असतात, पण त्या सगळ्याच माणसांना किंमत असते का?

सगळीकडे माणसंच माणसं असतात, परंतु त्या माणसांमध्ये माणुसकी आहे का, हा खरा प्रश्न असतो. ‘सत्य’ कवितेत कवी अत्यंत मार्मिक शब्दांत प्रश्न विचारतो…

आमच्याही घरात माणसं आहेत 

माणसांनाही मन आहे; 

मनात माणुसकी आहे काय?

 तेवढे मात्र विचारू नका…

जगात केवढी मोठी उलाढाल सुरू आहे, राहील. सर्व प्रक्रिया माणूसच करतो केवळ सत्ता संपत्तीसाठी. तरीही काही माणसांना किंमत नाही हे सत्य मात्र नाकारता येणार नाही. प्रत्येक जण स्पर्धा करतो सत्तेसाठी, पैशांसाठी. स्पर्धा मात्र माणुसकीसाठी होत नाही ही एक शोकांतिक आहे. ती शोकांतिका अरुण घोडेराव यांना अस्वस्थ करते आणि ती कवितेच्या माध्यमातून जगासमोर येते. जगात अनेक मोर्चे निघतात, धरणे होतात, आंदोलने होतात. कोणी ‘भारत जोडो यात्रा’ काढतो पण ‘माणूस जोडा यात्रा’ काढली तर निश्चितच माणसांमधला दुरावा, भेद मिटला जाईल. माणसांमधला संवाद वाढेल. भारतामध्ये विविध जातधर्म, पंथाची लोकं राहत असतात. त्यामुळे असाही मोर्चा निघावा की ‘जाती तोडा माणसं जोडा.’ माणसांचं राष्ट्र हे श्रेष्ठ आहे.

अनेकदा दोन समूहांमध्ये दंगल होत असते. दंगलीचं कारण वेगवेगळं असू शकतं. संवाद तुटला की दंगलीला सुरुवात होते. दंगल या कवितेत कवी अत्यंत सूचक शब्दांत विचारतो…

दंगल सुरू झाली अन् दंगलखोरांनी देवांच्या हातातली शस्त्रे आपापल्या हातात घेतली, देव गप्प राहिले त्यांची मूक संमती गाभार्‍यात हसली, धर्मातील कोणत्या मंगळ तत्त्वासाठी  दंगल सुरू झाली?

कवी म्हणतो की, हे कोडं मला उलगडलं नाही. मी पाहत राहिलो आणि माणसांचं हे जंगल दंगलीच्या वनव्यात बेचिराख झालं. दंगली साधारणतः जातीय, धार्मिक तेढ, तणाव निर्माण झाल्यानेच होत असतात. दंगलीमध्ये खूप मोठा विध्वंस होऊन सामाजिक आणि आर्थिक दोन्ही स्वरूपाची हानी होते. त्यामुळे विषमता गाडली पाहिजे आणि समता आणण्यासाठी आता वेळ आली आहे समतेच्या नांगराची, शास्त्रे-पुराणे जाळण्याची. समतेसाठी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक क्रांतीला सुरुवात केली. विषमतेविरुद्ध बंड पुकारला. सामाजिक समतेसाठी लढा दिला. आम्ही राष्ट्रपुरुषांना आदर्श मानतो. हीच आमची संस्कृती आहे. हेच आमचे संस्कार आहेत. आम्हाला या संस्कृतीचा अभिमान आहे. ही संस्कृती आम्हाला जपायची आहे. राष्ट्रपुरुषांच्या संवादाने, विचाराने माणसे जोडायची आहेत. संस्कृती या कवितेत कवी लिहितो…

दगडांचा मारा खात अन्

शेण अंगावर झेलित,

हातात पुस्तक बाळगणार्‍या चेहर्‍यात

आमची संस्कृती आहे.

विषमतावादी संस्कृती गाढण्यासाठी आम्हाला महापुरुषांचे विचार पेरावे लागतील. जातीयवाद गाडावा लागेल आणि ‘माणुसकीचा विजय असो ’अशी घोषवाक्ये तयार करावी लागतील.

मुंबईची ट्रेन किंवा लोकलला जीवनवाहिनी म्हटलं जातं. हजारो, लाखो प्रवासी दररोज लोकलने लोंबकळत, लटकत प्रवास करतात. सर्वसामान्यांना परवडणारी लोकल असली तरी जीवघेणा प्रवास लोकलनेच केला जातो. अगदी श्वास गुदमरतो, परंतु पर्याय नाही. किती गाड्या सोडायच्या स्टेशनवर थांबून हाही प्रश्न. म्हणून लटकत अर्धे बाहेर, अर्धे दरवाज्यात, श्वास गुदमरेपर्यंत माणूस लोकलने प्रवास करतो. पहाटे सुरू होणारी लोकल रात्री, मध्यरात्रीपर्यंत चालूच असते. लोकलचे वर्णन ‘लोकल’ या कवितेत अत्यंत हृदय हेलावणार्‍या शब्दांमध्ये केले आहे. आपण जेव्हा लोकलमध्ये प्रवास करतो तेव्हा रुळांच्या दोन्ही बाजूला सकाळी सकाळी बायका-पोरं, लहान-मोठी, आबालवृद्ध प्रात:र्विधीसाठी बसलेली पाहतो. झोपडपट्टी, खाडी, गटार सगळ्याचा वास घेत घेत सिग्नल आला की थांबते दुर्गंधीत. कवी अरुण घोडेराव म्हणतात…

हिरवा सिग्नल! तिच्या चाकातून वीज धावते,

 तेवढ्यात साखळीच्या हिसक्यावर तिचा आजका अन्

त्रयस्थ सुस्कारा, अरेरे! पडला बिचारा,

जांभया देत येतात चौघे जण.

मुंबईमधील लोकलने प्रवास करणार्‍यांना दररोज ही चित्रे पाहावयास मिळतात. ‘रोज मरे त्याला कोण रडे’ असं हे चित्र मुंबईच्या प्रवाशांना अजिबात नवीन नाही. संध्याकाळी परतताना वेगळे चित्र बघायला मिळतं. चौपाटीवरचे रंगीबेरंगी हृदय, अंधुक प्रकाशात जवानीचे रंग खरवडणार्‍या काळाच्या हातभर शिकारी! डोळेझाक तरी किती करावी, लोकांना आपलं स्टेशन येईपर्यंत पाहावं लागतं निमूटपणे. लाखो लोंबकळलेली पोट घेऊन लोकल धावत असते. माणसाचा प्रवास केव्हा, कुठे, कधी थांबेल काही सांगता येत नाही. लोकल सिग्नलला थांबते. माणसाचा सिग्नल केव्हा बिघडेल याचा नेम नाही.

अरुण घोडेराव सामाजिक चळवळीत काम करणारा कार्यकर्ता. पुरोगामी संस्था, संघटनांशी, चळवळीशी घट्ट नातं असल्याने त्यांच्या कवितेचा केंद्रबिंदू हा माणूस आहे. त्यांनी प्रत्यक्ष जीवन जगताना डोळे उघडे ठेवून जे पाहिलं, जे अनुभवलं ते सगळं या कवितेच्या रूपात मांडलं आहे. व्यवस्थेचे दांभिक रूप, संस्कृतीचा दुटप्पीपणा हा त्यांच्या चिंतनाचा विषय आहे. त्यातून निर्माण होणारी चीड, संताप शब्दांत व्यक्त करतात.

त्यांची कविता समता, मानवता, सामाजिक शांततेचा पुरस्कार करते. अरुण घोडेरावांची कविता ही माणुसकीचं गाणं गाते हे मात्र अंतिम सत्य आहे.

आपल्या मनोगतात ते लिहितात की, माणसाची व मानवाची निकोप व नैसर्गिक वाढ होण्यासाठी त्याच्या पायात व डोक्यात धर्मशास्त्राच्या शृंखला नसाव्यात आणि त्या असल्या तरी तटातट तुटाव्यात किंवा तोडाव्यात अशी माझी भावना आहे. कविता संग्रहाचे स्वागतच होईल. मुखपृष्ठ आकर्षित करून कविता वाचण्यासाठी भाग पाडतं.

 – प्रदीप जाधव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -