घरफिचर्ससारांशगुन गुन गुना रे गाना रे....

गुन गुन गुना रे गाना रे….

Subscribe

मधमाशी म्हटले की आठवतो तो लिंगोबाच्या डोंगरावर चढणारा नाग्या आणि त्याला चावलेल्या असंख्य मधमाश्या. मध हा अत्यंत गोड तरीपण औषधी म्हणून समजला जाणारा नैसर्गिक पदार्थ आहे. मध जेवढा आवडतो किंवा हवाहवासा वाटतो तितकेच आपण मधमाश्यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करीत असतो. मधमाश्यांचे पोळे दिसले की जरा चार हात दूरच राहतो. इमारतीमध्ये पोळे तयार झाले की लगेचच कोणाला तरी बोलावून ते पोळे काढून टाकतो, पण ही मधमाशी कितीतरी उपयुक्त असलेली कीटक जातीतील एक जीव आहे. विशेषतः शेतकर्‍यांसाठी, जंगलांसाठी तर अगदी अविरत सेवकच!

–सुजाता बाबर

मधमाश्यांवर जगभरात अनेक ठिकाणी सातत्याने संशोधन सुरू असते. याचे मुख्य कारण म्हणजे तिची उपयुक्तता. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी, इर्विन येथील शास्त्रज्ञांनी सेलोफेन मधमाश्यांबद्दल नुकताच एक उल्लेखनीय शोध लावला आहे. कीटक जगतातून ज्ञात असलेल्यापैकी मधमाश्यांचे मायक्रोबायोम्स हे सर्वात किण्वनकारक आहेत. कीटकांचे मायक्रोबायोम म्हणजे आहे तरी काय? कीटक-संबंधित मायक्रोबायोटा हा जटिल सूक्ष्मजीव समूहाचा (बॅक्टेरिया, बुरशी, प्रोटिस्ट, विषाणू आणि नेमाटोड) बनलेला आहे, जो विविध जैविक कार्ये करतो. उदा. कीटकांच्या आतड्याच्या मायक्रोबायोममध्ये प्रोटोझोआ, बुरशी, आर्किया आणि बॅक्टेरिया यांचा समावेश होतो.

- Advertisement -

भूगर्भीय दीमकांच्या मागच्या भागाचा जवळपास ९० टक्के भाग प्रोटिस्टांनी व्यापला आहे. प्रोटिस्ट प्रजातीमध्ये एकल-पेशी जीव, जसे की प्रोटोझोआन किंवा साधा शैवाल येतात. या वैशिष्ठ्यांमुळे मधमाश्यांच्या संशोधनावर सर्व शास्त्रज्ञांचे लक्ष असते. या मधमाश्या त्यांची जमिनीच्या आतमध्ये घरटी बनवण्यासाठी सेलोफेनसारखी सामग्री वापरतात म्हणून यांना सेलोफेन मधमाश्या असे म्हटले जाते. या मधमाश्या त्यांच्या आश्चर्यकारक वर्तनासाठी आणि परागकण वाहक म्हणून त्यांच्या महत्त्वाच्या पर्यावरणीय भूमिकेसाठी ओळखल्या जातात. आता संशोधकांनी त्यांच्या जीवशास्त्राचा आणखी एक पैलू उघड केला आहे, ज्यामुळे त्यांच्याबद्दलचे आकर्षण अजूनच वाढले आहे.

फ्रंटियर्स इन मायक्रोबायोलॉजीमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार सेलोफेन मधमाश्या त्यांच्या संततीसाठी एक द्रव अन्न “ब्रू” करतात, ज्याला ब्रूड पेशी म्हणतात. भिजवून, उकळवून आणि किण्वन करून बिअर बनवण्याच्या प्रक्रियेला ब्रू असे म्हणतात. या मधमाश्यांच्या बाबतीत महत्त्वाचा पैलू म्हणजे किण्वन किंवा सोप्या भाषेत आंबवण्याची प्रक्रिया. या ब्रूड पेशींच्या मायक्रोबायोमवर लॅक्टोबॅसिली बॅक्टेरियाचे वर्चस्व असते. दही, सॉरक्रॉट आणि आंबट ब्रेड यांसारख्या पदार्थांना आंबवण्याच्या भूमिकेसाठी लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया महत्त्वाचे असतात. संशोधकांना असे आढळून आले की हे जीवाणू सेलोफेन मधमाश्यांच्या अन्न तरतुदींमध्ये अत्यंत सक्रिय आहेत. हे जीवाणू अळ्या विकसित करण्यासाठी पोषक तत्त्वांचा स्रोत म्हणून महत्त्वाची भूमिका बजावतात.

- Advertisement -

टोबिन हॅमर, पर्यावरणशास्त्र आणि उत्क्रांती जीवशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक आणि प्रमुख लेखक यांच्या मते हा शोध खूपच उल्लेखनीय आहे. आपल्याला माहीत आहे की लॅक्टोबॅसिली अन्नाच्या किण्वनासाठी महत्त्वाचे आहेत, परंतु जंगली मधमाश्यादेखील अशाच प्रकारे त्यांचा वापर करतात हे शोधणे खरोखर आश्चर्यकारक आहे. मधमाश्यांच्या २०००० प्रजातींपैकी बहुतेकांना त्यांचे अन्न फुलांमधील मध आणि परागकणांपासून मिळते, परंतु या सेलोफेन मधमाश्यांसाठी लॅक्टोबॅसिलीही खरोखरंच महत्त्वपूर्ण असावेत. ते शाकाहारी प्राण्यांपासून सर्व भक्षकांमध्ये प्रभावीपणे विकसित झाले आहेत.
अभ्यासात असेही आढळून आले आहे की सेलोफेन मधमाश्यांच्या अन्न तरतुदींमध्ये इतर मधमाशी प्रजातींच्या तुलनेत जास्त जीवाणू बायोमास आहे. यांच्यामुळे ब्रूड पेशींना असामान्य किण्वित सुवास येतो. सेलोफेन मधमाश्यांच्या या विलक्षण समृद्ध लॅक्टोबॅसिलीचे वर्चस्व असलेल्या मायक्रोब्रुअरीजचा त्यांच्या आरोग्यावर तसेच ते राहत असलेल्या परिसंस्थेच्या पर्यावरणावर महत्त्वपूर्ण सकारात्मक परिणाम होऊ शकतात.

सेलोफेन मधमाश्या उत्स्फूर्त किण्वन नावाची एक पद्धती वापरतात हे शोधून काढणे महत्त्वाचे आहे. याच्या मदतीने सॉकरक्रॉटसारखे (मिठाच्या पाण्यात भिजवून केलेले कोबीचे लोणचे) काही आंबवलेले पदार्थ तयार केले जातात. पिढ्यान्पिढ्या स्टार्टर कल्चर पुढे नेण्याऐवजी यामध्ये फुलांमध्ये सर्वव्यापी असलेल्या लॅक्टोबॅसिलीच्या जंगली जातींचा वापर केला जातो. याचा अर्थ असा की कोणतीही कृत्रिम पद्धती न वापरता यासारखे किण्वन आधारित सहजीवन विकसित होऊ शकते. या मधमाश्यांना काय खास बनवते तर ते म्हणजे त्या लॅक्टोबॅसिलीची चांगली वाढ होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करतात. नवीन संशोधनामध्ये हे शोधून काढले आहे.

या संशोधनावरून लक्षात येते की कीटकांच्या मायक्रोबायोम्सचा अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मधमाश्यांची जगभरातील परिसंस्थांमध्ये मोठी भूमिका असूनही पक्षी आणि सस्तन प्राण्यांसारख्या अधिक परिचित प्राण्यांच्या संशोधनाला प्राधान्य दिल्याने मधमाश्यांच्या संशोधनाकडे विशेष लक्ष दिले जात नाही. सूक्ष्मजीव आणि त्यांचे कीटक यजमान (होस्ट) यांच्यातील गुंतागुंतीच्या परस्परक्रिया समजून घेऊन शास्त्रज्ञ या महत्त्वाच्या कीटकाचे जीवशास्त्र आणि ते राहतात त्या परिसंस्थेबद्दल नवीन दृष्टी देऊ शकतात.

मधमाश्यांविषयी मॅकफ्रेडरिक आणि सहकार्‍यांनी याविषयी पूर्वीदेखील एक संशोधन केले होते. वन्य मधमाश्यांशी संबंधित जीवाणूंचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी टेक्सासमधील आणि कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधन कॅम्पसमधील दोन ठिकाणच्या जंगली मधमाश्या आणि फुले गोळा केली. पारंपरिक वर्गीकरणाचे विश्लेषण करून जीनोमिक डीएनए अनुक्रमाने तीन नवीन लॅक्टोबॅसिलस प्रजातींना वेगळे करण्यात यश मिळाले. यांचा मधमाश्यांशी संबंधित बॅक्टेरिया लॅक्टोबॅसिलस कुंकेईशी जवळून संबंध दिसून आला होता. या तीन नवीन जातींना वेगवेगळी नावे देण्यात आली.

एका जातीला नैसर्गिक अधिवासातील मधमाश्यांच्या अभ्यासातील योगदानाचा सन्मान करण्यासाठी चार्ल्स डी. मिचेनर यांचे नाव देण्यात आले – लॅक्टोबॅसिलस मिचेनेरी. फिलीप टिम्बरलेक यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या परिसरातील नदीच्या किनारी असलेल्या स्थानिक मधमाश्यांचे वर्गीकरण केले आहे आणि त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी दुसर्‍या जातीला लॅक्टोबॅसिलस टिम्बरलेकी हे नाव देण्यात आले. तिसर्‍या जातीचे नाव आहे लॅक्टोबॅसिलस क्वेन्यूया. सेसिल प्लॅटॉक्स-क्वेनू या वैज्ञानिकेने हॅलिक्टिड मधमाश्यांच्या सामाजिक जीवशास्त्राविषयीची आपली समज वाढविण्यात योगदान दिले आहे. तिच्या सन्मानार्थ हे तिसरे नाव देण्यात आले आहे.

मधमाश्यांच्या आतड्यांमध्ये राहणारे सिम्बायोटिक बॅक्टेरिया अन्न पचवण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करून मधमाश्यांच्या आरोग्यास प्रोत्साहन देतात असे मानले जाते. मधमाश्या आणि भुंग्याच्या तुलनेत जरी वन्य मधमाश्या फुलांच्या वनस्पतींच्या परागीभवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्या तरी या वन्य कीटकांशी संबंधित सूक्ष्मजीव समुदायांबद्दल फारशी माहिती नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. यात भरीव संशोधन केल्यास आपल्याला लागणारे किण्वनकारक नैसर्गिकरित्या उपलब्ध होऊ शकतील. कृत्रिम किण्वनकारक बनविण्याला लागणारा खर्च आणि त्यातील कृत्रिमतादेखील यामुळे कमी होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -