Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश त्यांनी लढाई जिंकली, आम्ही बढाई मारतो!

त्यांनी लढाई जिंकली, आम्ही बढाई मारतो!

महापुरुष हे कुणी अवतारी पुरुष नसतात. त्यांच्याकडे कोणती दिव्य शक्ती नसते किंवा कोणते चमत्कार करण्याचीही त्यांच्याकडे वेगळी शक्ती नसते. तेही तुमच्या आमच्यासारखेच सामान्य असतात. पण त्यांचा त्याग मोठा असतो. समर्पण मोठे असते. तत्वासाठी त्यांनी मोजलेली किंमत मोठी असते. त्यासाठी त्यांना जे जे सहन करावे लागले, त्याची ते कुणाकडेही तक्रार करत बसत नाहीत. मान अपमान याची चिंता करत बसत नाहीत. कुणी आपली तारीफ केली पाहिजे, याची अपेक्षा करत बसत नाहीत. ’कुणी निंदा, कोणी वंदा, अमुचा जनहिताचा धंदा’ हेच त्यांचं व्रत असते. नेमकं हेच आपल्यासारख्या लोकांना झेपत नाही. कळलं असेल तरी वळत नाही आणि म्हणून मग आपण चमत्कारी किंवा दैवी शक्ती होती, अशा प्रकारचं वलय अशा महापुरुषांच्या नावाला जोडून मोकळे होतो.

Related Story

- Advertisement -

कोणताही महापुरुष त्या त्या काळाची निर्मिती असतो. काल त्याला काय वाटलं, उद्या त्याला काय वाटेल आणि परवा त्याला काय निर्णय घ्यावा लागेल, ह्या गोष्टी बरेचदा परिस्थितीवर अवलंबून असतात. त्यामुळे कुणीही अगदी आईच्या पोटातूनच महापुरुषाच्या भूमिकेत पैदा झाला असं होत नाही. त्याच्यावर झालेले संस्कार, त्यांच्यासमोर निर्माण झालेली परिस्थिती आणि त्याच्या जीवनविषयक निष्ठा, ह्यानुसार त्याचे निर्णय बदलत जातात. ह्याला कोणतीही व्यक्ती अपवाद नाही.

आज ज्यांना आपण महापुरुष म्हणतो किंवा मानतो ते सारे सुरुवातीला सामान्य व्यक्तीच होते, मग ते गरिबाच्या झोपडीत जन्माला आले असो, की राजमहालात! त्यामुळे अर्थातच कुणीही परिपूर्ण नसतो आणि तसा अट्टाहास देखील कुणी करू नये किंवा तसा दावाही करण्यात अर्थ नाही.

- Advertisement -

काळ बदलत जातो, परिस्थिती बदलत जाते, समाज बदलत जातो. तसतसे जुने विचार, जुन्या धारणा, जुने संकेत बदलत जातात. नव्या गोष्टी आपण स्वीकारत जातो. नव्या प्राथमिकता समोर येतात. जो समाज हे स्वीकारतो, काळाशी समरस होऊन स्वतःत बदल करून घेतो, तो नेहमीच परिस्थितीवर स्वार होतो. जे कुणी आमचा इतिहास महान म्हणून गोडवे गाण्यामध्येच गुंतून पडतात, भविष्याचा विचार करून पुढील नियोजन करण्यात ज्यांना स्वारस्य नसते, ते फारसे पुढे जाऊ शकत नाहीत.

त्यामुळे महापुरुषांना सुद्धा वेळोवेळी आपापल्या भूमिका बदलाव्या लागलेल्या आहेत. प्रत्येकवेळी त्यांनी घेतलेली भूमिका परिपूर्णच असेल असे नाही. ह्याला कोणताही महापुरुष अपवाद असू शकत नाही. काळ अनंत आहे. जीवन व्यापक आहे आणि जग एवढं मोठं आहे, की त्यात एकाच वेळी असंख्य आणि भिन्न विचारप्रवाह कार्यरत असतात. आपल्या ज्ञानाचा, नजरेचा आणि आकलनाचा आवाका जसा असेल तसंच जग आपल्याला दिसू लागते. तशाच घटना मोठ्या वाटतात, तसेच आपले महापुरुष देखील मोठे वाटतात.

- Advertisement -

समजा शिवाजी महाराज आजच्या काळात जन्मले असते, तर, त्यांनी काय केलं असतं? किंवा हाच प्रश्न दुसर्‍या तर्‍हेनं बघा, आज शिवाजी महाराज निर्माण होऊ शकतात का? भगतसिंग आज असते तर काय केलं असतं? महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या भूमिका आजच्या काळात नेमक्या काय असत्या? भगवान बुद्धांनी नेमकं काय केलं असतं? तेव्हा वागले तसेच नेमके आजही वागले असते का?

अर्थात, महापुरुषांच्या संवेदना, जीवन निष्ठा, सामाजिक भान, सामाजिक बांधिलकी निर्विवाद असल्यामुळे, काळ कुठलाही असो, त्यांनी समाजाच्या हिताचाच विचार केला असता, ह्यात संशय नाही. पण त्यांच्या लढाईची दिशा मात्र नक्कीच वेगळी असती.

कल्पना करा आज कुणी गांधींना फर्स्ट क्लासच्या डब्यातून फेकून दिलं असतं का? नदीच्या पाण्यावरून भांडण नको.. युद्ध नको, अशी बुद्धाची भूमिका तेव्हा होती आणि संसदेला युद्ध हवे होते. हाच मुख्य वाद होता. संसदेच्या भूमिकेशी असहमती दर्शविल्यामुळे आज बुद्धाची प्रॉपर्टी जप्त झाली असती का? किंवा तेवढ्यासाठी त्यांच्या परिवाराला जेलमध्ये जाण्याची परिस्थिती निर्माण झाली असती का? आणि मग पर्यायानं बुद्धाला संसार सोडून निघून जाण्याची वेळ आली असती का? किंवा बलात्कारी अथवा फितूर लोकांच्या बद्दल शिवाजी महाराजांना तेव्हा सारखी कारवाई आज करता आली असती का? आणि केलीच असती तर, समाजाला ती मान्य झाली असती का?

तात्पर्य काय की, कोणत्याही महापुरुषाच्या जगण्याचा सारांश हा आपल्या प्रेरणेचा विषय असला पाहिजे. पण आपण घटनांना महत्त्व देतो. त्यातच अडकून पडतो.

महापुरुष हे कुणी अवतारी पुरुष नसतात. त्यांच्याकडे कोणती दिव्य शक्ती नसते किंवा कोणते चमत्कार करण्याचीही त्यांच्याकडे वेगळी शक्ती नसते. तेही तुमच्या आमच्यासारखेच सामान्य असतात. पण त्यांचा त्याग मोठा असतो. समर्पण मोठे असते. तत्वासाठी त्यांनी मोजलेली किंमत मोठी असते. त्यासाठी त्यांना जे जे सहन करावे लागले, त्याची ते कुणाकडेही तक्रार करत बसत नाहीत. मान अपमान याची चिंता करत बसत नाहीत. कुणी आपली तारीफ केली पाहिजे, याची अपेक्षा करत बसत नाहीत. ’कुणी निंदा, कोणी वंदा, अमुचा जनहिताचा धंदा’ हेच त्यांचं व्रत असते.

नेमकं हेच आपल्यासारख्या लोकांना झेपत नाही. कळलं असेल तरी वळत नाही आणि म्हणून मग आपण चमत्कारी किंवा दैवी शक्ती होती, अशा प्रकारचं वलय अशा महापुरुषांच्या नावाला जोडून मोकळे होतो. आपण सामान्य माणूस आहोत, त्यांच्यासारखी आपली ताकद नाही, असं म्हटलं की आपोआपच आपल्याला पळवाट काढता येते. आपण त्यांची पूजा केली, आंधळी भक्ती केली, त्यांच्या नावाचा उदोउदो केला, त्यांचे फोटो छापले, पुतळे बांधले, मंदिरं उभी केली, की आपलं काम सोपं होऊन जातं.

महापुरुषांचं जीवन प्रेरणा घेण्यासाठी असते, केवळ घोषणा देण्यासाठी नव्हे.. किंवा त्यांच्या नावानं दादागिरी करण्यासाठीही नव्हे ! एखाद्या महापुरुषाबद्दलचा आदरभाव आणि त्यातून निर्माण होणारा अभिमान ही गोष्ट नैसर्गिक आहे. ती समजून घेता येईल. पण अभिमानाचं पर्यवसान घमेंड किंवा उन्मादामध्ये होता कामा नये. हे भान आपल्याला जेवढ्या लवकर येईल आणि त्यानुसार आपण कृती करायला लागू, तेवढाच आपल्या जगण्याला अर्थ प्राप्त होईल. महापुरुषांच्या त्यागाचंही सार्थक होईल.

त्यांनी लढाई जिंकली, आम्ही बढाई मारतो
किल्ले तयांनी बांधले, आम्ही सफेदी मारतो !

एक सर्वात सोपा मार्ग आहे, जो महापुरुष आपल्याला सर्वात प्रिय असेल, त्याचा आदर्श नजरेसमोर ठेवायचा.. त्याप्रमाणे जेवढं जमेल तेवढं वागायचं, जगायचं आणि त्याची सुरुवात स्वतःपासून करायची ! हे जर आपण प्रामाणिकपणे केलं, तर मग बढाई मारत फिरण्याची गरजच पडणार नाही.

- Advertisement -