घरफिचर्ससारांशवैज्ञानिक मनोवृत्तीचा चंद्रोदय कधी!

वैज्ञानिक मनोवृत्तीचा चंद्रोदय कधी!

Subscribe

आपल्याकडे व्यक्ती किंवा समाज यांच्या जीवनामध्ये जेव्हा चांगले किंवा वाईट घटना घडण्याची शक्यता निर्माण होते, तेव्हा अनेकवेळा घटनेमागील कार्यकारणभाव लक्षात न घेता, त्याची उत्तरे परंपरेने होत आलेल्या संस्कारात, ज्ञानात, दैवी उपाय आणि उपचार करून शोधण्याचा प्रयत्न केला जातो. आताही तसेच झाले. म्हणजे एका बाजूला विज्ञानाच्या साह्याने, अथक परिश्रम करून आपले शास्त्रज्ञ-तंत्रज्ञ अवकाश मोहीम आखून, भारताला पहिल्या क्रमांकावर पोहोचवत होते, तर दुसर्‍या बाजूला आमचे काही बांधव अवैज्ञानिक, दैवी गोष्टी करण्यात स्वतःला सामुदायिकपणे गुंतवून घेत होते. समाजाच्या वैज्ञानिक मनोवृत्तीच्या अपरिपक्वतेचे आणि अविकसितपणाचेच हे लक्षण आहे, असेच खेदाने म्हणावे लागेल.

–डॉ. ठकसेन गोराणे

भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोमधील शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, प्रशासन, कर्मचारी यांच्या एकूणच समर्पित व संघटित अथक परिश्रमाचे ऐतिहासिक सुयश म्हणजे चांद्रयान-३ चे चंद्रावर यशस्वी लँडिंग! म्हणून हे सर्वजण मनःपूर्वक अभिनंदनास पात्र आहेत. तमाम भारतीयांचा आनंदाने आणि अभिमानाने उर भरून यावा, अशीच ही ऐतिहासिक घटना! संशोधन क्षेत्रात अशा मोहिमा राबवण्यासाठी प्रचंड मोठे आर्थिक पाठबळ लागते. भारतीयांच्या श्रमातून उभ्या केलेल्या रकमेतून ही ऐतिहासिक मोहीम यशस्वी झाली, याचा एक सार्थ अभिमान आपणा सर्वांना आहेच, मात्र आपल्याकडील पूर्वापर सरंजामी मनोवृत्तीप्रमाणे एखादे यश मिळवण्यासाठी संघटितपणे प्रयत्न केलेल्या सर्वांना मनमोकळेपणाने त्याचे श्रेय देण्याऐवजी आपण एका व्यक्तीला त्याचे श्रेय देतो.

- Advertisement -

हे आपल्याकडील वैज्ञानिक मनोवृत्तीचे अविकसित रूप आहे. वैज्ञानिक मनोवृत्ती ही केवळ विज्ञानाच्या क्षेत्रापुरतीच मर्यादित नाही, तर ती जीवनाच्या सर्वच क्षेत्रात आवश्यक असते आणि आहे. एखाद्या घटनेमागील कार्यकारण संबंध शोधण्यासाठी त्या घटनेचे निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती, स्पष्टीकरण, प्रयोग, विश्लेषण, निष्कर्ष अशा सर्व घटकांची पुन्हा पुन्हा पडताळणी, चिकित्सा, तपासणी, मूल्यमापन अशा बाबी कराव्या लागतात. चांद्रयान-३ च्या मोहिमेतही हे सर्व घटक अतिशय काटेकोरपणे तपासले गेले, पाळले गेलेले आहेत. म्हणून मोहीम यशस्वी झालेली आहे.

कोणत्याही क्षेत्रात गगनाला गवसणी घालणारे यश मिळवायचे असेल, तर बुद्धीचा कस लावावा लागतो. भावनांवर संपूर्णपणे नियंत्रण ठेवावे लागते. तरच ते शक्य होते. त्यासाठीच मानवी व्यवहारात वैज्ञानिक मनोवृत्ती निर्माण करून ती जाणीवपूर्वक विकसित करण्याचे कष्ट घ्यावे लागतात. हे सांगण्याचे कारण असे की चांद्रयान-३ हे चंद्रावर उतरण्यासाठी काही तास शिल्लक असताना इस्रोची सर्व टीम डोळ्यात तेल घालून जागरूकपणे लक्ष ठेवून होती, मात्र त्याचवेळी चांद्रयान, चंद्रावर सुखरूप उतरावे यासाठी समाजातील विविध धर्माचे अनेक लोक त्यांच्या त्यांच्या श्रद्धास्थानाजवळ पूजापाठ करणे, होमहवन करणे, नमाज पढणे, प्रार्थना करणे अशी विविध दैवी कर्मकांडे करण्यात व्यस्त होते. अनेक प्रसार माध्यमातून त्यांचे प्रक्षेपणही केले जात होते.

- Advertisement -

वास्तविक भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला श्रद्धा जपण्याचे, उपासना करण्याचे स्वातंत्र्य जरूर दिलेले आहे, पण हे स्वातंत्र्य केव्हा, कधी, कुठे, कसे उपभोगावे याबद्दल काही नियम, अटी घातलेल्या आहेत. आता कोणी म्हणेल चांद्रयान, चंद्रावर सुखरूप पोहोचण्यासाठी केल्या अनेक लोकांनी प्रार्थना, पूजाअर्चा, नमाज तर काय बिघडले? त्यांच्या असे करण्याने कोणत्या सार्वजनिक कायदा सुव्यवस्थेचा, आरोग्य व्यवस्थेचा, सार्वजनिक नीतिमत्तेचा प्रश्न निर्माण झाला, त्यात कुठे अडथळा आला? माणसाला जसे मन आहे, तसे समाजालाही सार्वजनिक, सामूहिक समाजमन आहे. जेव्हा समाज सामुदायिकपणे अवैज्ञानिक आणि दैवी, अंधश्रद्धायुक्त कर्मकांडे करू लागतो, तेव्हा त्याचे मानसिक आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे समाजाची वैज्ञानिक मनोवृत्ती विकसित होण्यात मोठा अडथळा निर्माण होतो.

आपल्याकडे व्यक्ती किंवा समाज यांच्या जीवनामध्ये जेव्हा चांगले किंवा वाईट घटना घडण्याची शक्यता निर्माण होते, तेव्हा अनेकवेळा घटनेमागील कार्यकारणभाव लक्षात न घेता, त्याची उत्तरे परंपरेने होत आलेल्या संस्कारात, ज्ञानात, दैवी उपाय आणि उपचार करून शोधण्याचा प्रयत्न केला जातो. आताही तसेच झाले. म्हणजे एका बाजूला विज्ञानाच्या साह्याने, अथक परिश्रम करून आपले शास्त्रज्ञ-तंत्रज्ञ अवकाश मोहीम आखून, भारताला पहिल्या क्रमांकावर पोहोचवत होते, तर दुसर्‍या बाजूला आमचे काही बांधव अवैज्ञानिक, दैवी गोष्टी करण्यात स्वतःला सामुदायिकपणे गुंतवून घेत होते. समाजाच्या वैज्ञानिक मनोवृत्तीच्या अपरिपक्वतेचे आणि अविकसितपणाचेच हे लक्षण आहे, असेच खेदाने म्हणावे लागेल.

धर्माच्या, अध्यात्माच्या नावाने केल्या जाणार्‍या अशा अशास्त्रीय, निरर्थक, दैवी कर्मकांडांनी जर विविध क्षेत्रातील मोहिमा यशस्वी झाल्या असत्या, तर सर्व कसं झटपट व विनासायास घडलं असतं!! अभ्यास करण्याची, मेहनत घेण्याची गरज पडली नसती. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर आहे ३ लाख ८४ हजार किलोमीटर! स्वत:भोवती आणि पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी चंद्राला २७.३ दिवस लागतात. सेकंदाला एक किलोमीटर एवढ्या वेगाने तो पृथ्वीभोवती फिरतो. चंद्राचा व्यास ३४७५ किलोमीटर आहे. चंद्राचे वस्तुमान ७.३५३÷१० चा २२ वा घात इतके आहे.

अशी बरीचशी माहिती विज्ञानाच्या साह्याने आपल्याला आज उपलब्ध झालेली आहे. चंद्रावर वातावरण नाही. त्यामुळे अवकाशातून पडणार्‍या उल्का चंद्रावर आदळतात. तेथे विवरं पडतात. म्हणजेच खड्डे पडतात. पृथ्वीवरून हे दृश्य अतिशय विलोभनीय दिसते. त्यामुळे अनेकांच्या प्रेम भावना उफाळून येणे साहजिकच आहे. सुखद चांदणे आणि शीतल चंद्रप्रकाश कुणाला आवडत नाही? अनेक धर्मांच्या, अनेक भाषांच्या लोकांनी त्यांचे आणि चंद्राचे नाते त्यांच्या लोकजीवनाशी, तेथील ऋतुमानांशी, भावभावनांशी, संस्कृतीशी, धर्मातील विविध चालीरीती, कर्मकांडे यांच्याशी जोडलेले आहे. असे नाते लोकांचे जीवन उन्नत करत असेल, विकसित करत असेल, तर त्याला आक्षेप घेण्याचेही कारण नाही.

फल ज्योतिषाच्या काल्पनिक भविष्य कथनावरून व्यक्तीच्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या नक्षत्रात असेल त्याला त्या व्यक्तीचे जन्मनक्षत्र म्हणतात. चंद्र रोज एका नक्षत्रामध्ये असतो. कुंडलीत आणि जन्मपत्रिकेत त्याला स्थान दिलेले आहे. व्यक्तीला चंद्रबळ नावाचे काहीतरी अदृश्य बळ असते. व्यक्तीच्या जीवनावर ते बळ चांगला, वाईट परिणाम घडवते. पृथ्वीवर कर्मकांड करून हा परिणाम कमी-अधिक करता येतो. चंद्रग्रहणात तर अनेक अंधश्रद्धायुक्त पथ्ये, धार्मिक कर्मकांडे करण्याची शिफारस केलेली आहे. ते जर पाळले नाही, तर अतिशय अनिष्ट परिणाम व्यक्तीला भोगावे लागतात, अशी भीतीही घातलेली असते. चंद्र हा निर्जीव गोळा असूनही तो मानवी जीवनावर प्रभाव गाजवतो, असे अनेक प्रकारे खोटे सांगून व्यक्तीच्या आणि समाजाच्या अज्ञानाचा व अगतिकतेचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणात विविध प्रकारे शोषण केले जाते.

आता भारताचे चांद्रयान-३ हे चंद्रावर उतरलेले आहे. म्हणून फलज्योतिषाकडे जाणार्‍या व्यक्तीने फलज्योतिषाला असे विचारायला हवे की, जर भारतीय बनावटीचे चांद्रयान-३ हे नुकतेच चंद्रावर उतरलेले आहे. म्हणजे तिथे जमीन आहे. ती निर्जीव आहे, तर अशा निर्जीव चंद्राचा माझ्या किंवा समाजाच्या जीवनावर चांगला किंवा वाईट परिणाम कसा काय होऊ शकतो? पण असा प्रतिप्रश्न याचकांकडून फलज्योतिषाला विचारला जाणार नाही, हे फलज्योतिषाला चांगलेच माहीत आहे. कारण येथील व्यक्ती आणि समाजामध्ये वैज्ञानिक मनोभावाची मोठ्या प्रमाणात अपरिपक्वता आहे, हे फलज्योतिषी चांगलेच जाणून आहेत.

चांद्रयान-३ हे अवकाशात प्रक्षेपित करण्यापूर्वी त्याची लहानशी प्रतिकृती भारतातील प्रख्यात लोकदेवतेला अर्पण करण्यात आली. त्यात इस्रोचे काही लोकही सामील होते. ती घटनाही प्रसारमाध्यमांनी इमानेइतबारे प्रसारित केली. जेव्हा सर्वांच्या समोर अशाप्रकारची अवैज्ञानिक कृती जबाबदार व्यक्तींकडून घडते, तेव्हा बोट तरी कुणाकडे दाखवावे, हा गंभीर प्रश्न पडतो. वैज्ञानिक दृष्टिकोन हे मूल्य मानवी जीवनाच्या सर्वच क्षेत्रात वापरता येते, त्याद्वारे घटना तपासता येतात, समजावून घेता येतात, उद्भवलेल्या समस्यांवर शास्रीय, उचित मार्ग काढता येतो. हेच मुळी आपण उत्साहाच्या भरात विसरतो. इतर क्षेत्र सोडाच, पण विज्ञानाच्या क्षेत्रातही जेव्हा अशाप्रकारच्या अवैज्ञानिक घटना, प्रसंग घडतात, तेव्हा शिक्षणातून मोठ्या प्रमाणात प्राप्त झालेला वैज्ञानिक दृष्टिकोन हा केवळ व्यावहारिक शहाणपणापुरताच आपण वापरला किंवा मर्यादित ठेवला.

निखळ किंवा नैतिक शहाणपण आपण शिक्षणातील वैज्ञानिक दृष्टिकोनातून कमावलेच नाही, असे खेदाने म्हणावे लागते. निसर्ग नियम माणसाला समजू शकतात. माणसाला जसे ज्ञान मिळवता येते तसे मिळवलेल्या ज्ञानाची चिकित्साही करता येते. जिज्ञासा शमवण्यासाठी माणूस सतत नवनवीन काहीतरी शोधत असतो. थोडक्यात असे म्हणता येईल की ज्ञान, जिज्ञासा, चिकित्सा हे माणसाचे विशेष गुणधर्म आहेत. त्याद्वारे तो घटनांचे निरीक्षण करतो, प्रयोग करून ज्ञानात भर घालतो. पुन्हा त्या ज्ञानाचे चिकित्सकपणे परीक्षण करतो. त्यांची पद्धतशीरपणे मांडणी करतो. ज्ञानाला नियमांमध्ये बसवून माणसाने विज्ञानाची संकल्पना मांडली आहे. त्यातूनच पुढे विविध विज्ञान शाखांचा उदय झाला.

चांद्रयान मोहीम ही माणसाच्या या वैज्ञानिक मनोवृत्तीच्या वाटचालीचा एक भाग आहे. खरं तर या घटनेची मोठ्या प्रमाणात चर्चा व्हायला हवी. म्हणजे या घटनेतून संविधानाला अभिप्रेत असलेली शोधकबुद्धी, वैज्ञानिक मनोभावाची निर्मिती पुढच्या पिढीत विकसित व्हायला मदत होईल. जीवनाच्या सर्वच क्षेत्रात टप्प्याटप्प्याने यशस्वी होण्यासाठी निसर्ग नियमांशी साधर्म्य साधून उपलब्ध वस्तुस्थितीला प्रश्नांकित करून, वारंवार चिकित्सा व प्रयोग करून समर्थपणे पुढे जाता येईल, मात्र त्यासाठी व्यक्ती, कुटुंब व समाज या सर्वच पातळ्यांवर जाणीवपूर्वक वैज्ञानिक मनोवृत्तीचा विकास करण्यासाठी, तसा संस्कार घडविण्यासाठी ज्यांना आपण समाज परिवर्तनाची प्रमुख साधनं म्हणतो ते शिक्षण, राजकारण व प्रसार माध्यमं यांनी सतत तारतम्य बाळगून, सातत्याने महत्त्वाची भूमिका वठवण्याची गरज आहे.

–(लेखक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -