घरफिचर्ससारांशवाईन उद्योग; वरातीमागून घोडे...

वाईन उद्योग; वरातीमागून घोडे…

Subscribe

आजमितीस ठराविक मोठ्या कंपन्या वगळता बहुतांश शेतकरी आणि वाईन उद्योजकही ‘वाईन’पासून दूर गेलेला आहे. त्यांचे व्हायचे तेवढे नुकसान आधीच होऊन गेले आहे. मदतीची अपेक्षा करताना हजारो छोट्या शेतकर्‍यांचे अश्रू तसेच थिजून गेले आहेत आणि आता शासनाने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिली आहे. या निर्णयाने नुकसान काहीच होणार नाही. मात्र, नेमके भले कुणाचे होणार आहे, हा प्रश्न उपस्थित होत आहे. वरात निघून गेली आहे आणि आता मागून घोडा पाठवून काही उपयोग होईल अशी स्थिती आता तरी दिसत नाही.

वाईन ही सुपर मार्केटमध्ये उपलब्ध होईल का? वाईन हे मद्य आहे का? या विषयावर दोन्ही बाजूंनी भरपूर चर्चेचा धुरळा उठला आहे. व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठातील तज्ज्ञ आपापली बाजू मोठ्या हिरीरीने मांडत आहेत. फेसबुक व अन्य सोशल मीडियावर संस्कृतीचे आणि नैतिकतेचे रक्षक तसेच शेतकर्‍यांचे हितचिंतकही सरसावले आहेत. खरंतर हे प्रश्न सतत दर चार ते पाच वर्षांच्या अंतराने नियमित चघळले जातात. नाशिक या द्राक्ष उत्पादनात आघाडीवर असलेल्या जिल्ह्यात मागील 15 वर्षांपासून कृषी पत्रकारिता करीत असताना मी हे प्रश्न अनेकदा जवळून अनुभवले आहेत. जगभरात द्राक्षांचे उत्पादन हे मुख्यत: वाईनसाठी, खाण्यासाठी आणि बेदाणा करण्यासाठी घेतले जाते.

त्यातही वाईनच्या उत्पादनाला इसवी सन पूर्व काळापासूनची अतिशय दीर्घ अशी परंपरा आहे. युरोपीय देशांत द्राक्ष उत्पादन आणि त्याला जोडून वाईन उत्पादन हा तसा आपल्या भाषेत कुटीरोद्योग बनलेला आहे. वाईन हे पेय काय आहे आणि त्याचे सेवन कसे केले पाहिजे, याबद्दल सर्वच युरोपीय देशांत पुरेशी स्पष्टता आहे. आपल्याकडे मात्र वाईन हे मद्य आहे की नाही, हा प्रश्न सुरुवातीपासून द्राक्ष वाईन उद्योगाच्या मानगुटीवर बसलेला आहे आणि तो खाली उतरायलाही तयार नाही.

- Advertisement -

वाईनच्या या जागतिक पार्श्वभूमीची जाण असलेल्या आपल्याकडील काही लोकांमध्ये मागील दशकांत या पेयाविषयीची जागरुकता वाढली आहे. त्यातून वाईनचा खपही बर्‍या प्रमाणात वाढला आहे. ‘सुला’ सारख्या वायनरीने जगभरात केलेले मार्केटिंग, ब्रॅण्डिंग हेही कारणीभूत आहे. तरीही अजूनही वाईन या प्रकाराविषयी माहिती असलेले आणि नसलेलेही बहुतांश लोक याकडे तितक्याच साशंकतेने पाहत आहे. याच्या ‘मद्य’ असल्या-नसल्याबद्दलचा झगडा सतत सुरू आहे. या सगळ्याचा अडथळा मात्र वाईन उद्योगाच्या गतीला नेहमीच बसला आहे.

माधवराव मोरे, हंबीरराव फडतरे, प्रल्हाद खडांगळे, सदाशिव नाठे, अशोक गायकवाड, अण्णासाहेब म्हस्के, शिवाजी आहेर, जगदीश होळकर, हिरामण पेखळे अशा अनेक ज्येष्ठ शेतकर्‍यांनी द्राक्षासाठीचा प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी आणि त्यातून वाईन निर्मिती करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले. शरद जोशींच्या सोबत शेतकरी संघटनेचे कार्य राज्यभर नेलेल्या पिंपळगाव बसवंत येथील माधवराव खंडेराव मोरे यांनी शरद जोशींच्या कृषी उद्योजकतेच्या आवाहनाला प्रतिसाद देत वाईन निर्मितीचा पहिला पिंपेन प्रकल्प उभारला. त्यातून शेती उत्पादनाला प्रक्रियेची जोड देण्याचाच उद्देश त्यांनी समोर ठेवला होता. शरद पवार हे केंद्रीय कृषीमंत्री असताना त्यांनीही या प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठीची पाऊले उचलली होती.

- Advertisement -

दरम्यान, 90 च्या दशकांत नाशिक, सांगली, पुणे जिल्ह्यात अनेक तरुण अभ्यासू शेतकरी वाईन उद्योजक होण्याचे स्वप्न घेऊन या उद्योगात उतरले. जगदीश होळकर, शिवाजी आहेर यांच्यासह अनेक शेतकर्‍यांच्या पुढाकाराने देशपातळीवरील वाईन बोर्ड स्थापन करण्यात आले. त्याही काळात सरकारमधील काहींना वाईन हा शब्द रुचत नसल्याचे दिसल्यावर या बोर्डाचे नामांतर ‘ग्रेप प्रोसेसिंग बोर्ड‘ असेही करण्यात आले होते. 2000 च्या दशकात महाराष्ट्राच्या मातीत द्राक्ष वाईन उद्योग रुजण्यास सुरुवात होत होती.

सगळे काही सुरळीत असताना अचानक २6/11/2008 रोजी मुंबईच्या ताज-ऑबेरॉय हॉटेल येथे दहशतवादी हल्ला झाल्याची घटना घडली. ही घटना वाईन उद्योगाची नव्याने बसत असलेली घडी विस्कटण्यास पुरेशी ठरली. पंचतारांकित हॉटेलांतून होणारा वाईनचा खप घटला. नवीन वाईन उद्योजक अडचणीत आले. त्यांचे वाईन द्राक्ष उत्पादकांशी असलेले करारही बिघडले. सुला आणि काही मोजकी दोन तीन नावे वगळता बहुतांश वायनरी बंद पडल्या. शेतकरी उद्योजक कर्जबाजारी झाले. त्यांनी सरकार दरबारी मदतीसाठी अगणित हेलपाटे मारले. मात्र, त्यांच्या पदरी फारसे काही पडले नाही.

या काळात सर्वात जास्त हाल हे वाईन द्राक्ष उत्पादकांचे झाले. त्यांना वाईन उद्योजक आणि सरकार या दोन्हीही घटकांनी वार्‍यावर सोडून दिले. हजारो एकरावरील द्राक्षे वेलीवरच वाळून गेली. नाशिक, निफाड, सिन्नर भागातील अनेक द्राक्ष उत्पादकांनी त्यांच्या वाईनच्या द्राक्षबागांवर कुर्‍हाड चालवली. या काळात ठराविक बड्या ब्रॅण्डचा बोलबाला त्यांचे नेत्रदीपक फेस्टिव्हल सर्वत्र होत राहिले. मोठ्या कंपन्यांनी अडचणीतील वाईन उद्योगांना पूर्णपणे स्वत:च्या कह्यात घेतले. कर्जबाजारी झालेल्या छोट्या उद्योजकांसमोर दुसरा पर्यायही नव्हता. दरम्यान, मोठ्या वायनरींनी काही नावापुरते शेतकरी कराराने जोडून ठेवले. बाकी स्वत:चे क्षेत्र शेकडो एकरांनी वाढवित स्वत:चेच उत्पादन घेण्यावर भर दिला.

मागील 15 वर्षांपासून वाईन द्राक्ष उत्पादक शेतकरी मदतीसाठी याचना करीत आहेत. वाईनला लिकरपासून वेगळे करा अशी मागणी वाईन उत्पादक करीत आहेत. आतापर्यंत सरकारने याकडे कानाडोळाच केला आहे. दरम्यान, या मधल्या काळात द्राक्ष उत्पादकांनी आणि उद्योजकांनीही काही सकारात्मक घडेल, अशी आशा सोडून दिली होती. आजमितीस ठराविक मोठ्या कंपन्या वगळता बहुतांश शेतकरी आणि वाईन उद्योजकही ‘वाईन’पासून दूर गेलेला आहे. त्यांचे व्हायचे तेवढे नुकसान आधीच होऊन गेले आहे. मदतीची अपेक्षा करताना हजारो छोट्या शेतकर्‍यांचे अश्रू तसेच थिजून गेले आहेत आणि आता शासनाने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिली आहे. या निर्णयाने नुकसान काहीच होणार नाही. मात्र, नेमके भले कुणाचे होणार आहे, हा प्रश्न उपस्थित होत आहे. वरात निघून गेली आहे आणि आता मागून घोडा पाठवून काही उपयोग होईल अशी स्थिती आतातरी नाहीय.

वाईन उद्योग हा शेतीचा प्रक्रिया उद्योग नक्कीच आहे. मात्र, यात आजमितीस सामान्य शेतकरी किती उरला आहे हा खरा प्रश्न आहे. वाईन द्राक्षबागा आता कमी असल्यातरी शासनाच्या या निर्णयामुळे भविष्यात शेतकरी पुन्हा वाईन द्राक्षांच्या लागवडीकडे वळेल व आता असलेले 5 हजार एकराचे क्षेत्र भविष्यात 10 हजार एकरांपर्यंत जाईल, अशी आशा राज्य द्राक्ष बागायतदार संघाला तसेच अखिल भारतीय वाईन उत्पादक संघटनेला वाटत आहे. या मंडळींच्या प्रामाणिक धडपडीसाठी शुभेच्छा नक्कीच आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -