घरफिचर्ससावित्री- जगण्याच्या तत्वज्ञानाचे नाव

सावित्री- जगण्याच्या तत्वज्ञानाचे नाव

Subscribe

ज्या गोष्टीला सर्वांचा, समाजाचा सामूहिक विरोध आहे अशा गोष्टींवर अढळपणे काम करीत राहणे यासाठी जी हिंमत लागते ती सावित्रीबाईंच्या ठायी होती म्हणूनच त्या इतक्या संघर्षाला सहज तोंड देऊ शकल्या. जेव्हा आपल्या कामाला रोज विरोध होणार आहे, असे माहीत असतानाही त्याच रस्त्यावरून नियमित ताठ मानेने जाणे यासाठी लागणारी शक्ती त्यांच्या अंगी होती म्हणूनच हे काम त्या पूर्ण करू शकल्या. रोजच्या होणार्‍या विरोधाचे भांडवलही त्या कुठे करताना दिसत नाहीत. त्रास देणार्‍या लोकांविषयी कुठेही त्यांनी लिहून ठेवले नाही. सावित्रीबाईंचा येत्या ३ जानेवारीला जन्मदिन आहे, त्यानिमित्त त्यांच्या स्फूर्तीदायक व्यक्तिमत्वाची भावलेली विविध गुणवैशिष्ठ्ये.

या वर्षीच्या शेवटच्या रविवारी आपण बोलतो आहोत. अनेकजण जाणार्‍या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तयारीत अडकले आहेत. अनेकांच्या मनातल्या या भावना मार्केट बरोबर उचलेल आणि या उत्साहाच्या भावना व्यक्त करण्याच्या जागा तयार करेल, अर्थात तुमचेच पैसे घेऊन तुम्हाला मुक्त करून देण्याच्या तोर्‍यात. पण माझ्यासारखे अनेकजण, नवीन वर्षाच्या तयारीत आहोत. कारण आमच्या सर्वांची मुक्ती दाता सावित्रीबाई यांचा जन्मदिन ३ जानेवारीला असतो तो साजरा करण्यासाठी. अर्थात असा एक दिवस साजरा केल्याने मुक्ती मिळत नाही याची जाण आम्हाला आहेच; पण एकदा जिच्यामुळे आम्ही रोज स्वतःचा मुक्त श्वास घेऊ शकतो तिला एकत्र येऊन धन्यवाद म्हणण्याची गरज आहे, ज्यामुळे या प्रवासात ज्यांना यायचे आहे त्यांना मोकळेपणाने येण्याची संधी मिळते म्हणून हा जल्लोष.

पूर्वी तीन जानेवारी शासकीय परिपत्रकामुळे किंवा काहींना खरोखरच त्याचा आनंद व्यक्त करायचा असतो म्हणून कुठे तरी काही मर्यादित लोकांसमोर साजरा केला जायचा. आता राष्ट्र सेवा दल, कायद्याने वागा लोक चळवळ सारख्या जनमानसातल्या संघटनांनी याचा ‘उत्सव’ केला आणि तो आता घराघरातून अगदी आकाश कंदील लावून व्यक्त करायला सुरुवात केली आहे. आज सर्वच क्षेत्रात महिलांनी जी कामगिरी करून दाखवली त्याची सुरुवात ‘सावित्री’ने केली याची जाणीव मोठ्या संख्येने स्त्रियांना होताना दिसते आहे आणि त्याची धन्यता मानण्यासाठी त्या ती भावना, सावित्रीच्या प्रति आदर व्यक्त करण्यासाठी उत्सव साजरा करून व्यक्त करताना दिसत आहेत.

- Advertisement -

सावित्रीबाई कोण होत्या हे सांगण्याचे करंटे धाडस मी करणार नाही. आपण सर्वांनी त्या कशा शाळेत शिकवायला जायच्या, काही समाजकंटक कसे त्यांच्या अंगावर शेणमाती टाकायचे ही गोष्ट कंटाळा येईपर्यंत ऐकली आहे. मला तुम्हाला याच्या पुढचे सांगायचे आहे. सावित्री जेव्हा शाळेत निघायच्या तेव्हा रोजच्या या अनुभवामुळे पुढे त्या एक जास्तीचे लुगडे घेऊन निघू लागल्या. शाळेत पोहोचल्यानंतर त्या ते खराब लुगडं बदलून स्वच्छ लुगडं घालून मगच मुलींना शिकवायच्या. त्यांनी कधीच त्या शेणमाती टाकणार्‍यांना अडवले नाही किंवा असे म्हणाल्या नाही की, अरे बाबांनो मी तुमच्याच मुलींच्या भल्यासाठी हे सर्व करते आहे तेव्हा तुम्ही असे का वागता? हे मला आजच्या समाजातल्या परिस्थितीपुढे खूपच महत्त्वाचे वाटते. आज जरा आपल्या विरोधी कोणी बोलत असेल, त्याचा/तिचा जरा वेगळा सूर लागला की, अशी माणसं मुळातूनच संपवण्याचा, त्यांना मारून टाकण्याचा निर्णय अंमलात आणला जातो. त्यामुळे लोक बोलायला घाबरतात; पण माझी सावित्री मात्र त्या विरोधकांच्या मनाची शांती होईपर्यंत त्यांना त्यांची कृती करायची संधी देत होती. त्यामुळेच हे विरोध करणारेच पुढे तिचे पाठीराखे झाले आणि सर्वात जास्त मुलींना शाळेत घालण्याचे प्रमाण याच समूहातून झालेले दिसते. ज्या समूहाने सर्वात जास्त सावित्रीला विरोध केला आज शिकलेल्या मुलींमध्ये सर्वात जास्त संख्या त्याच समूहाची आहे.

ज्या मुलींना शिकवण्यासाठी सावित्रीने जीवाचा आटापिटा केला त्या मुलींना कधीही आपल्या त्यागाची कथा सावित्रीने सांगितली नाही. कधीही म्हणाल्या नाही की, बघा तुमच्या शिक्षणासाठी मी कसा त्याग करते आहे किंवा कसा त्रास सहन करते आहे. आज मात्र बहुतेक लोक फोटोपुरतं काम करताना दिसत आहेत. कुठल्या तरी गावाच्या ठिकाणी जाऊन त्या गावाचा काहीही अभ्यास न करता झाडे लावण्याचा कार्यक्रम केला जातो. ज्या गावात पिण्यासाठी पाणी स्त्रिया लांबून डोक्यावर घेऊन येतात, त्यामुळे त्यांची उंची वाढत नाही, कायमचा अशक्तपणा त्यांच्या कपाळावर लिहिला जातो अशा गावात यांच्या वृक्षारोपणाच्या हौशेपायी त्या आधीच दुर्बल असलेल्या स्त्रीचा किंवा त्या गावाचा बळी घेतला जातो. रोपाला हात लावून फोटो काढला की, यांचे काम संपते; पण पुढे त्या झाडाचे काय होते याचा कुठलाही पाठपुरावा या फोटोवाले लोक घेत नाहीत, त्यांना ते घेण्याची इच्छाही नसते. त्यामुळेच सावित्रीने शिक्षणाचा जो वसा घेतला तो टिकला त्याचा राजमार्ग झाला. पिढ्याच्या पिढ्या मुली शिकल्या. सावित्रीकडून हे शिकण्यासारखे आहे. एखादे काम पूर्ण होण्यासाठी जीवाचा आटापिटा करायचा आणि ते काम मार्गी लावायचे; पण ते काम योग्य दिशेने जायला लागल्यानंतर मात्र सहज त्यातून बाहेर यायचे. अशा व्यक्तींच्या तन्मयतेमुळे त्या त्या कामावर त्यांचा ठसा उमटतो.

- Advertisement -

दुसरी मला भावलेली गोष्ट म्हणजे त्यांच्यातले धैर्य. त्या फक्त जोतीबा यांची पत्नी होत्या म्हणून हे काम करू शकल्या असे मला वाटत नाही. त्यांचे स्वतःचे धैर्य होते. जोतिबांच्या साथीमुळे त्यांचे काम अधिक सुकर आणि स्पष्ट झाले. इतर स्त्रियांना घरातच अधिक संघर्ष करावा लागतो. घरच्यांना पटवण्यातच स्त्रियांचा अधिक काळ आणि एनर्जी जाते ती सावित्रीबाईंची वाचली. पण ज्या गोष्टीला सर्वांचा, समाजाचा सामूहिक विरोध आहे अशा गोष्टीवर अढळपणे काम करीत रहाणे यासाठी जी हिंमत लागते ती सावित्रीच्या ठायी होती म्हणूनच त्या इतक्या संघर्षाला सहज तोंड देऊ शकल्या. जेव्हा आपल्या कामाला रोज विरोध होणार आहे, असे माहीत असतानाही त्याच रस्त्यावरून नियमित ताठ मानेने जाणे यासाठी लागणारी शक्ती सावित्रीच्या अंगी होती म्हणूनच हे काम त्या पूर्ण करू शकल्या. रोजच्या होणार्‍या विरोधाचे भांडवलही त्या कुठे करताना दिसत नाहीत. या त्रास देणार्‍या लोकांवर कुठेही त्यांनी लिहून ठेवले नाही. पण आज मात्र आपण जे सावित्रीचे वारसदार म्हणून स्वतःला म्हणवतो ते मात्र कोणीतरी एक ‘खुळचट’ गुरुजी काहीतरी मुर्खासारखा बोलतो आणि आपण त्याचा निषेध करण्याच्या नावाखाली त्याला अधिक प्रसिद्धी देतो आणि त्याचे मुद्दे खोडण्याच्या नादात आपले मुद्दे मांडायचे राहून जातात हे आपल्या लक्षातच येत नाही. विरोधकांना अनुल्लेखाने कसे संपवावे याचा चांगला पायंडा खरंतर आपल्या सावित्रीने आपल्याला घालून दिला आहे; पण आपण तिथंपर्यंत पोहोचायलाच तयार नाही.

सावित्रीने ठरवले असते तर त्यावेळच्या सरकारला पत्र लिहून तिची मुलींना शिकवण्याची इच्छा परदेशात जाऊनही पूर्ण करता आली असती. सावित्रीच्या एका होकारावर ब्रिटिश सरकार तिला त्यांच्या देशात घेऊन गेले असते आणि एक चांगली शिक्षिका त्यांना मिळाली असती. पण सावित्रीने तसे केले नाही. तिचे ध्येय स्पष्ट होते. तिला आपल्याच देशातील अनेक पिढ्या अज्ञानात ठेवलेल्या प्रथा, परंपराना छेद द्यायचे होते. अनेक वर्षे जो समूह गुलामीत होता त्यांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून देण्यासाठी काम करायचे होते. सावित्रीची काम करण्याची दिशा आणि उद्दिष्ट स्पष्ट होते हे मला अतिशय भावलेले आहे. कुठे जायचे हे निश्चित असले की, व्यक्ती अडथळ्यांनी अडकत नाही, थांबत नाही हे सावित्रीच्या आयुष्यातून मी घेतलेला धडा आहे. त्यामुळे मला जेव्हा मरगळ येते, आजूबाजूचे लोक असे असंवेदनशील वागतात त्यामुळे जे नैराश्य येते ते दूर करण्यासाठी सावित्रीच मला उपयोगी पडते, असे माझ्या लक्षात आले आहे. तिचा संघर्ष आठवला की, आपले अडथळे निकामी करण्यासाठीची ऊर्जा आपल्याला मिळते.

जे करायचे ते अभ्यासपूर्ण आणि कृतीतून हे सावित्रीच्या आयुष्याचा मला कळलेला आणखी एक अर्थ. मुलींच्या शिक्षणासाठी ब्रिटिश सरकारला पत्र देऊन, निवेदन देणे हा त्यावेळचा मार्ग तिला स्वीकारता आला असता. पण जोतीबा आणि तिने प्रत्यक्ष कृतीवर भर द्यायचा ठरवला आणि तो निर्णय त्यांनी टिकवूनही धरला. त्यांनी ब्रिटिशांनाही निवेदन दिले; पण ज्यांना इथे त्यांचे राज्य टिकवायचे असल्यामुळे ते इथल्या चुकीच्या प्रथा परंपरा तोडायला पुढाकार घेणार नाही हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्या फक्त निवेदन देण्यावर थांबल्या नाही तर त्यांनी प्रत्यक्ष शाळा चालवणे हा पर्याय शोधला आणि तो सिद्ध करून दाखवला. कुठलीही गोष्ट करायची तर आधी आपण अभ्यास करायचा हा जोतिबा आणि सावित्री यांचा हट्ट असायचा. त्यामुळेच सावित्री आधी स्वतः शिकल्या आणि मग त्यांनी शाळा सुरू केली.

त्या कुठल्यातरी गोर्‍या मेमला हाताशी धरून त्यांच्या मार्फतही शाळा चालवू शकल्या असत्या. पण त्यांनी तसे केले नाही. त्या स्वतः शिकल्या आणि शिकवण्याचे कामही स्वतः केले. त्यामुळे त्याचा जो काही परिणाम असेल तोही स्वतः अनुभवला. नाही तर आपले आत्ताचे पुढारी ज्यांनी आयुष्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग केला नाही, लोक कसे जगतात याचा अनुभव घेतला नाही ते लोकांच्या धर्माच्या भावना, अस्मिता जाग्या करतात. आधीच बेरोजगारीने त्रस्त तरुणाच्या हातात समूहाचे बळ देतात. त्यांना सेवक म्हणून फुकटचा किताब द्यायचा, धार्मिक स्थळे उद्ध्वस्त करण्यापर्यंतची नशा द्यायची आणि त्या नशेत त्यांनी विध्वंस केला की, त्याचा मला अभिमान आहे असे म्हणायचे. म्हणायला काय जाते? नशेत ज्यांनी विध्वंस केला त्याची परिणती त्या बेरोजगारांनाच भोगावी लागली. माझी सावित्री मात्र प्रत्येक मोर्चात लोकांच्या सोबत रस्त्यावर होती म्हणूनच ती मला नेता म्हणून भावते.

प्रत्येक कृतीमध्ये स्वतः उतरायचे हा नियम त्यांनी किती पाळला, तर जेव्हा पुण्यात प्लेगची साथ आली तेव्हा फक्त सूचना देत त्या थांबल्या नाही किंवा कार्यकर्त्यांना फक्त तोंडी मार्गदर्शन देत त्या बसल्या नाही. त्या स्वतः घरोघरी जाऊन रुग्णांवर योग्य उपचार होतो की नाही, उपचार करणारे रुग्णापर्यंत पोहोचू शकत नसतील तर आपण रुग्णांना दवाखान्यापर्यंत पोहोचवूया यासाठी त्यांनी प्रयत्न केले. असे प्रयत्न करण्यासाठीच त्यांनी एक रुग्ण स्वतः दवाखान्यात पोहोचवला आणि त्यातच त्यांना प्लेगची लागण झाली ज्यात त्यांना मृत्यू आला. त्यांना प्लेग हा काय आजार आहे याची माहिती असणारच. तरीही त्या स्वतः कामात उतरल्या. कदाचित त्या उतरल्या नसत्या तर त्यांना आणखी आयुष्य मिळाले असते.

पण जर आपले इतर कार्यकर्ते त्या आजाराशी झुंज देत असतील तर आपणही त्यांच्या बरोबरीने उभे राहिले पाहिजे या एका विचारापोटी त्या सहजपणे लोकांमध्ये गेल्या. त्या त्यांच्या निर्णयासाठी लागणारी स्वतःच्या आयुष्याची किंमत त्यांनी दिली. मी जेव्हा हे सर्व वाचते तेव्हा त्यांच्यात मला गौतम बुद्ध दिसतो. गौतमाने आपल्या शिष्यांना ‘भिक्षा पात्रात दान मागितल्यानंतर जे काही मिळेल त्याचा स्वीकार करा’ याचा संस्कार केला होता. ते स्वतःही भिक्षा मागूनच जगले. एकदा असेच ते भिक्षा मागत असताना एका माऊलीने त्यांना भिक्षा पात्रात मांस दिले. ‘मिळेल त्याचा स्वीकार’ या धम्माच्या नियमानुसार त्यांनी ते अन्न ग्रहण केलं त्यामुळे ते अतिसाराने आजारी पडले ज्यात त्यांचा मृत्यू झाला. सावित्रीबाई आणि बुद्ध यांचा मृत्यू हा फक्त शरीराचे संपणे नव्हते तर एका मूल्यासाठी दिलेली ती किंमत होती.

सावित्रीबाईंनी त्यांच्या आयुष्यात जे जे काम केले, धोरण आखले ते फक्त समाजाच्या फायद्याचेच नाहीतर समाजात आमूलाग्र बदल करणारे आणि समाजातल्या सर्वात शेवटच्या व्यक्तीला न्याय देणारे होते. त्यांचे कृती कार्यक्रम हे ‘सम्यक’ होते असे मी म्हणेन. ज्येष्ठ कवी ग्रेस ‘सम्यक’ शब्दाची व्याख्या ‘अधिक न्यायाच्या बाजूने’ अशी करतात. लोक मात्र मधला मार्ग म्हणजे ‘सम्यक’ असे म्हणतात. आमचा आनंद नावाचा मित्र म्हणतो, जिथे समाजातल्या एखाद्या व्यक्तीवर किंवा समूहावर हिंसाचार होत असतो आणि आपल्याला भूमिका घ्यायची असली तर आपण ग्रेस म्हणतात त्या ‘सम्यक’ची भूमिका घेतली पाहिजे. सर्वसामान्य लोक सम्यकची मधला मार्ग ही जी व्याख्या करतात ती घेतली म्हणजे नेमकी काय भूमिका घेतली. हिंसाचारात हिंसाचार ज्या व्यक्तीवर झाला आहे त्याच्या बाजूची किंवा विरोधी अशा दोनच भूमिका असू शकतात. मधला मार्ग म्हणजे मग असे म्हणावे लागेल की, अरे एवढं कशाला मारलं, एखाद दोन फटकेच मारायचे होते. आपल्याकडे अशी मधली भूमिका घेतात हीच खरी अडचण आहे.

कुठलाही हिंसाचार चूकच ही खरी अधिक न्यायाच्या बाजूची म्हणजे सम्यक भूमिका आहे, असली पाहिजे. सावित्रीबाई या मात्र कवी ग्रेस यांच्या ‘सम्यक’ची भूमिका घेताना दिसतात. त्या जेव्हा विधवांचे बाळंतपण करायचा निर्णय घेतात, त्यातल्या एका मुलाला दत्तक घेतात तेव्हा त्यांचा निर्णय ‘सम्यक’ होता याचा पुरावा सापडतो. ज्या स्त्रियांच्या दुर्बल असण्याचा, जगण्याचे कुठलेही साधन नसल्याचा गैरफायदा कोणीतरी ताकदवर व्यक्ती घेते, आपल्या लैंगिक भूकेची बळी त्या स्त्रीला करते अशा स्त्रीला मृत्यूला सामोरे जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, अशा परिस्थितीत त्यांना जगण्याचा सन्मानाचा मार्ग सावित्रीबाई आणि जोतिबा यांनी दिला हे मला अधिक महत्त्वाचे वाटते. जी गोष्ट त्या स्त्रीच्या इच्छेविरुद्ध झाली त्याची किंमत तिने का मोजावी? हा त्यांचा प्रश्न हा खर्‍या अर्थाने न्यायाच्या बाजूचा आहे असे मला वाटते. याच न्यायाने विधवांचे केशवपन थांबवण्यासाठी न्हावी समाजाचा केलेला संप हाही असाच न्यायाच्या बाजूने घेतलेला निर्णय होता. आपल्याला मिळणार्‍या व्यवसायामुळे कोणावर तरी अन्याय होतो, तो अन्याय थांबवण्यासाठी स्वतःची रोजीरोटी नाकारण्याची तयारी एखाद्या समूहाकडून करून घेण्याची ताकद सावित्रीबाई आणि जोतिबांमध्ये होती. कारण त्यांची न्यायाची व्याख्या स्पष्ट होती.

सावित्रीबाईंमधील मला आणखी एक गोष्ट आवडली ती म्हणजे त्यांच्या कविता. सावित्रीबाई संवेदनशील होत्या याचे अनेक पुरावे त्यांच्या सर्वच कृती कार्यक्रमांमधून आणि विचारातून आपल्याला दिसतात. तीच संवेदनशीलता आपल्याला त्यांच्या कवितांमधूनही व्यक्त होताना दिसते. कार्यकर्ता म्हणजे फक्त जड बोजड अवघड भाषण किंवा विश्लेषण नव्हे तर तरल भावनांच्या पातळीवर लोकांना केलेले आवाहनही असली पाहिजे याचा पायंडा सावित्रीबाईंनी घालून दिला म्हणूनच आपण पुढे पाहतो की, या परिवर्तनाच्या चळवळीत सांस्कृतिक अंगाला एका भाषणाइतकेच महत्त्व आहे. त्यामुळेच सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत कवितेतून आपले विचार, चळवळ व्यक्त करणार्‍या शेकडो सावित्री जन्माला आल्या. शासनाचा दबाव असताना, जेलमध्ये डांबल्यानंतरही शीतलसारखी सावित्रीची लेक ‘माझी साउ’ म्हणत डफावर थाप मारू शकली.

सतत कार्यरत असलेल्या सावित्रीबाई लिहीतही होत्या हे मला त्यांच्यातील माणूस असण्याचा, एक स्वतंत्र विचार असलेली व्यक्ती असण्याचा पुरावा आहे असे वाटते. नाहीतर आपण अनुभवले आहेच की, सरपंच बाई असते पण तिचे लेटरहेड मात्र तिच्या कुटुंबातल्या पुरुषाकडे असते. अर्थात त्याच सावित्रीबाईंच्या चळवळीने या वातावरणातही बदल केला आहे बरं का! सुरुवातीला घरातल्या पुरुषांच्या डोक्याने चालणार्‍या स्त्रिया आता स्वतःच्या विचारांचा स्वतंत्र शिक्का, ठसा दाखवू लागल्या आहेत आणि हे शक्य होऊ शकलं. कारण सावित्रीने सुरू केलेली शिक्षणाची चळवळ. राजकारणात पहिल्यांदा ज्या स्त्रिया आल्या त्यांना शिक्षणाची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे त्यांनी पुरुषांचा आधार घेतला; पण आता राजकारणात, समाजकारणात, प्रशासनात असलेल्या स्त्रिया मात्र स्वतःचे विचार स्पष्टपणे मांडू लागल्या आहेत. याचे सोपे कारण आहे कारण या सर्वजणी स्वतःला सावित्रीच्या लेकी मानतात. त्यामुळेच मोठ्या कष्टाने मिळालेल्या संधीचे सोने करताना अनेक स्त्रिया आपण पाहू शकलो आहोत.

याचा अर्थ आता सर्वच स्त्रिया वडाच्या फेर्‍या सोडून शिक्षणाचा उपयोग करीत आहेत असे चित्र नाही. पण फार काल असे चित्र राहणार नाही. जसजसा शिक्षणाचा प्रचार, प्रसार होतो आहे तसतसे स्त्रियांचे नेतृत्व पुढे येताना दिसत आहे. परकीयांचे राज्य असताना आमची आई सावित्री कधी डगमगली नाही तर तिच्या लेकी म्हणून स्वतःला व्यक्त होणार्‍या आम्ही माघार कशा बरं घेणार. त्यामुळे शिक्षणाचा कुठलाही भाग घ्या, विषय घ्या नाहीतर फिल्ड घ्या तिथं आपल्याला स्त्रिया गुणवत्ता सिद्ध करताना, त्यात नंबर पटकावताना दिसत आहेत. आता हा प्रवाह थांबण्याची सुतराम शक्यता नाही. कारण हा प्रवाह आमच्या ‘सावित्री’ने सुरू केला आहे. ज्या धर्माने स्त्रियांना अडकवले, बंधनात बांधले सावित्रीने त्या धर्माला आव्हान देणार्‍या ‘सत्यशोधक धर्माच्या’ स्थापनेत जोतिबांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. त्यामुळेच जोतिबांच्या मृत्यूनंतरही तिने तो धर्म संपू दिला नाही किंवा त्यात मरगळ येऊ दिली नाही. मोठ्या ताकदीने तिने पुढाकार घेतला आणि तो धर्म तिने टिकवला.

आज भारतात असणार्‍या सर्व समस्यांना ‘भारतीय राज्यघटना’ हाच सक्षम पर्याय किंवा उत्तर आहे. कारण भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे असलेले योगदान. ज्या घटनेकडे आपण आधार म्हणून पाहतो ते घटनाकार बाबासाहेब जोतिबांना आणि सावित्रीबाई यांना आपले गुरु मानत होते. त्यामुळेच सावित्रीबाई ही एक व्यक्ती नसून ती एक आचार विचार प्रणाली आहे, त्या एक आनंदी, न्याय्य, परिवर्तनशील आयुष्याचे तत्वज्ञान आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -