घरफिचर्सवो शाम कुछ अजीब थी...

वो शाम कुछ अजीब थी…

Subscribe

राजेश खन्नाचा ‘आराधना’ हा चित्रपट झळकला होता. यातल्या ‘मेरे सपनो की रानी’ या गाण्याने किशोरदा पार्श्वगायकांमधला सुपरस्टार झाला होता. उडत्या चालीची, हलकी-फुलकी गाणी गाणार्‍या या गायकाच्या तोंडी ‘वो शाम...’ हे गाणं शोभणार नाही किंवा त्याला हे गायला जमणार नाही, असं अनेकांना वाटत होतं. पण संगीतकार हेमंतदा मात्र ठाम होते. किशोरच्या गायन क्षमतेवर त्यांचा पूर्ण विश्वास होता. किशोरने देखील त्यांचा विश्वासाला किंचितही तडा जाऊ दिला नाही. किशोरदाच्या कारकिर्दीतल्या सर्वोत्कृष्ट गीतांपैकी हे एक समजलं जातं.

प्रवीण घोडेस्वार

गीतांजली पिक्चर्स निर्मित ‘खामोशी’ हा कृष्ण-धवल चित्रपट 1969 मध्ये प्रदर्शित झाला होता. याचं दिग्दर्शन असित सेन यांनी केलं होतं. या चित्रपटात वहीदा रहमान, धर्मेंद्र, राजेश खन्ना, ललिता पवार, नासीर हुसेन, इफ्तेखार, अन्वर हुसेन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाची कथा प्रसिद्ध बंगाली लेखक आशुतोष मुखर्जी यांच्या ‘नर्स मित्रा’ या लघुकथेवर आधारित होती. चित्रपटाची गाणी आणि संवाद लेखन गुलजार यांनी केलं होतं. बंगाली आणि हिंदी चित्रपटसृष्टीतले प्रख्यात गायक आणि संगीतकार हेमंतकुमार मुखर्जी यांनी चित्रपटाला संगीत दिलं होतं. याच कथानकावरचा ‘दीप ज्वले जाल’ हा बंगाली चित्रपट 1959 मध्ये प्रदर्शित झाला होता. याचेही दिग्दर्शक असित सेनच होते. बंगाली चित्रपट लोकप्रिय झाल्याने त्याची हिंदी री-मेक म्हणजे हा सिनेमा. ‘खामोशी’त तुम पुकार लो.. तुम्हारा इंतजार हैं… (हेमंतकुमार), वो शाम कुछ अजीब थी… (किशोरकुमार), हमने देखी है उन आंखो की महकती खुशबू… (लता मंगेशकर), आज की रात चिरागो… (आरती मुखर्जी) आणि दोस्त कहा कोई तुमसा… (मन्ना डे) अशी पाच श्रवणीय गाणी होती.

- Advertisement -

या चित्रपटाच्या कथानकात विश्वास, प्रेम, समर्पण, सहानुभूती अशा अनेक मानवी भाव-भावनांची गुंफण केलेली आहे. चित्रपटात राजेश खन्ना आणि वहिदा रहेमान दोघंही शांत चित्तानं नावेत बसलेयत. त्यांची सावली पाण्यात पडलेली दिसते. वरकरणी शांत भासत असले तरी त्या दोघांच्या मनात भावकल्लोळ निर्माण झालाय. दोन मनाची झालेली ससेहोलपट, फेर धरून नाचत असलेल्या भूतकाळातल्या आठवणी आणि अजूनही खूप काही व्यक्त करणार्‍या या आशयगर्भ गाण्यावर हा दृष्टीक्षेप…
वो शाम कुछ अजीब थी, ये शाम भी अजीब है
वो कल भी पास-पास थी, वो आज भी करीब है
वो शाम कुछ अजीब थी…
झुकी हुई निगाह में कही मेरा खयाल था
दबी-दबी हंसी में इक हसीन सा गुलाल था
मै सोचता था मेरा नाम गुनगुना रही है वो
न जाने क्यो लगा मुझे के मुस्कुरा रही है वो
वो शाम कुछ अजीब थी…

मेरा खयाल है अभी झुकी हुई निगाह में
खिली हुई हंसी भी है, दबी हुई सी चाह में
मै जानता हू मेरा नाम गुनगुना रही है वो
यही खयाल है मुझे, के साथ आ रही है वो
वो शाम कुछ थी…
हे गाणं हेमंतदांनी ‘यमन’ रागांत स्वरबद्ध केलंय. हा शांतरस निर्माण करणारा राग. एका इस्पितळात नासीर हुसेन डॉक्टर आहेत. मानसिक आजार दूर करण्यासाठी ते एका वेगळ्या उपचार पद्धतीचा पर्याय देतात. याच इस्पितळात वहिदा परिचारिका म्हणून काम करीत असते. धर्मेंद्र तिचा प्रियकर. परिचारिकेचं कर्तव्य निभावत असताना तिच्यावर राजेश खन्नाला मानसिक विकारातून बरं करण्याची जबाबदारी डॉक्टर सोपवतात. या जबाबदारीचं पालन करताना तिला राजेश खन्नावर मायेचा वर्षाव करावा लागतो. तो बरा व्हावा यासाठी ती प्रयत्नांची पराकाष्ठा करते. हेच या चित्रपटाचं मध्यवर्ती सूत्र आहे. वहिदाने ही भूमिका अत्यंत तन्मयतेने साकारली आहे. तसेच राजेश खन्ना, नासीर हुसेन आणि पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत असलेल्या धर्मेंद्र, अशा सार्‍यांनी उत्तम अभिनय केला आहे.

- Advertisement -

संध्याकाळची कातर वेळ.. सूर्य मावळतीला चाललाय.. जाता जाता त्याने त्याच्या अस्तित्वाच्या रंगीत खुणा मागे ठेवल्याहेत.. वर आभाळात पक्ष्यांचे थवे घरट्याकडे प्रस्थान करताहेत.. आता आकाशात थंडावा जाणवायला सुरुवात झालीये.. अंधाराचा अंमल वाढत जाऊन उजेड नाहीसा होतोय.. काळोख दाटून यायच्या आतच एखादी इवलीशी चांदणी आकाशात अवतरते.. काहीच क्षणात सारा आसमंत चांदण्यांनी उजळून निघतो.. पट्टीच्या गवयाची मैफिल रंगत जावी तशी संध्याकाळ आपल्या अवती-भवती पसरत जाते.. कसल्याशा अपघातामुळे आपलं मानसिक संतुलन बिघडलेले रुग्ण आणि त्यांना आपल्या सेवेने, मायेने आणि आत्मीय जिव्हाळ्याने पूर्ववत करणारी परिचारिकेची विलक्षण कहाणी म्हणजे हा भावस्पर्शी चित्रपट.

उपचाराचा भाग म्हणून रुग्णाची काळजी घेत असताना, त्याच्या भावना समजून घेताना त्याच्यात भावनिक गुंतवणूक होणार नाही याची खबरदारी घेत आपल्या मनावर काबू ठेवणं आवश्यक नि अनिवार्य असतं! पण कधी-कधी मात्र ही तटस्थता भंग पावते. चित्रपटाच्या नायिकेचीही अशीच अवस्था होते. ती नकळतपणे रुग्णाच्या प्रेमात पडते. रुग्णाच्या मनात तिच्याविषयीची भावना मात्र कृतज्ञतेची असते. महत्प्रयासाने नायिका यातून बाहेर पडते. एका प्रेमभंगाचं दु:ख पचवत ती आपल्या कर्तव्यासाठी पुन्हा सज्ज होते. परत एकदा ती सेवा करत असलेल्या रुग्णाच्या प्रेमात पडते. तो देखील तिच्यासारखाच. प्रेमात अपयश पचवलेला. दोन्ही दु:खी जीव एकमेकांच्या सहवासात सुखावतात. पण भूतकाळातल्या नकोशा आठवणी दोघेही विसरत नाहीत.

या गाण्याचा प्रारंभ समुद्राच्या लाटांच्या आवाजाने होतो. गाणं सुरू होतं स्वराच्या एका विशिष्ट नोटवर. टिपेचा स्वर, उधाणलेला समुद्र नि उसळणार्‍या लाटा आणि नायकाच्या मनोविश्वातला भावकल्लोळ .. अशा अनुकूल वातावरणाची निर्मिती करत गाणं थेट मनात घर करतं! मागचं अपयशी प्रेम आताही आपला पिच्छा पुरवेल की काय अशी शंका नायकाला अस्वस्थ करते.

याच सिनेमाच्या सुमारास राजेश खन्नाचा ‘आराधना’ हा चित्रपट झळकला होता. यातल्या ‘मेरे सपनो की रानी’ या गाण्याने किशोरदा पार्श्वगायकांमधला सुपरस्टार झाला होता. उडत्या चालीची, हलकी-फुलकी गाणी गाणार्‍या या गायकाच्या तोंडी ‘वो शाम…’ हे गाणं शोभणार नाही किंवा त्याला हे गायला जमणार नाही, असं अनेकांना वाटत होतं. पण संगीतकार हेमंतदा मात्र ठाम होते. किशोरच्या गायन क्षमतेवर त्यांचा पूर्ण विश्वास होता. किशोरने देखील त्यांचा विश्वासाला किंचितही तडा जाऊ दिला नाही. किशोरदाच्या कारकिर्दीतल्या सर्वोत्कृष्ट गीतांपैकी हे एक समजलं जातं. गुलजार देखील नुकतेच चित्रपटविश्वात दाखल झाले होते. हे त्यांच्या सुरुवातीच्या काळातलं अर्थपूर्ण गीत. शब्द, संगीत आणि गायकी ह्या तिन्ही घटकांचा अनुपम आविष्कार म्हणजे हे भावमधुर गाणं! या गाण्याच्या जन्मदात्यांना हृदयापासून कुर्निसात! शिवाय पडद्यावर वहिदा रहेमान आणि राजेश खन्ना यांनीही आपल्या अभिनयाने या गाण्यातला आशय सजीव केलेला आहे. गुलजार-हेमंतदा-किशोरदा या महान कलावंतांच्या कारकीर्दीतली ही एक अविस्मरणीय आणि अभिजात निर्मिती आहे, यात जराही अतिशयोक्ती नाही!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -