घरफिचर्सअश्रू... खरे आणि खोटे!

अश्रू… खरे आणि खोटे!

Subscribe

विधानसभा निवडणुकीला सगळा महाराष्ट्र सामोरा जात असताना ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्या नेत्यांचे अश्रू घळाघळा वाहताना लोकांना दिसले तर उदयनराजे यांचेसारखे नेते उमेदवारी मिळूनही हमसून हमसून रडताना दिसले. ज्यांना तिकीट मिळाली नाही, त्यांनी तिकीट नाकारून आपल्याशी रडीचा डाव खेळला गेला असे म्हटले तर काहींनी तिकीट मिळूनही रडारड केली. राजकारणात वर्षानुवर्षे वावरणार्‍या नेत्यांनी निवडणुकीच्या तोंडावर केलेली ही रडारड आणि त्यांच्या डोळ्यांतून आलेले अश्रू किती खरे आणि किती खोटे हे जनतेला पडलेले एक कोडेच आहे. अशा वेळी ‘अमर प्रेम’मधील राजेश खन्नाचा तो डायलॉग आठवतो, पुष्पा, मुझ से ये आँसू नही देखे जाते, आय हेट टिअर्स.

महाराष्ट्राच्या राजकारणात इतकी रडारड झालेली कधी पाहिली नाही. यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे, एस.एम.जोशी, मृणाल गोरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, एन.डी.पाटील आणि शरद पवार यांचे मोठ्या अवकाशाचे राजकारण ज्यांनी पाहिले त्यांना आज एका काळातील पक्षांतर, उमेदवारी, बंडखोरी आणि रडारड पाहायला मिळते, यापेक्षा या महान राज्याचे दुर्दैव ते कोणते? राजकारणाचा सर्वसामान्य माणसांना आधीपासूनच किळस होता, आता त्याची घृणा वाटायला लागली आहे. रडारडीचा एवढा मोठा तमाशा याआधी कधी बघितला नव्हता. काँग्रेस, पुलोद, काँग्रेस आघाडी आणि 1195 चे शिवसेना- भाजप युती सरकार यांच्या काळात आधी, नंतर असे खोटे, खरे अश्रू बघितले नव्हते. राजकारण कुठल्या वळणावर जाऊन पोहचले आहे, हेच यातून दिसून येते.

रडारडीच्या या तमाशात अजित पवार यांचे भर पत्रकार परिषदेतील अश्रू एका संवेदनशील मनाचे प्रतीक दाखवत असले तरी एका मोठ्या नेत्याला हे अजिबात शोभत नाही. आज शरद पवार यांच्यानंतर महाराष्ट्र त्यांच्याकडे मोठ्या आशेने पाहत आहे. सत्ता चालवण्याची त्यांची हातोटी, प्रशासनावरील पकड, कामाचा उरक, मेहनत घेण्याची वृत्ती हे सारे मोठ्या नेत्याचे गुण त्यांच्याकडे आहेत. पण, त्यांच्या काकांकडे शरद पवारांच्या ठायी असलेला संयम त्यांच्याकडे नाही. तो प्रचंड असावा असेही नाही, तो एखाद्याला जन्मजात मिळतो. पण, राजकारणाच्या पटलावर दोन घरे मागे जाताना तो तुमच्याकडे असावा लागतो. सत्ता असताना आक्रमक वृत्ती चालून जाते. कारण सारीपाटाची सूत्रे तुमच्या हाती असतात, तुम्ही म्हणाल तसे तुमची प्यादी तुम्हाला 64 घरांत फिरवता येतात. पण, सत्ता नसताना प्रत्येक घर चालताना जाणीवपूर्वक चाल रचावी लागते. पण, अजित पवार तसे वागतील तर ते दादा कसले? खरेतर ईडी चौकशीच्या निमित्ताने पवारांनी राजकारणाचा खेळ चांगला रंगवत आणला होता.

- Advertisement -

सत्ताधार्‍यांचे डाव त्यांच्यावर उलटवत आणले असताना अजितदादांनी एका दिवसात रडारडीने सर्व हवेतील रंगत घालवून टाकली. आता हे त्यांनी ठरवून केले असेल का, तर याचे थेट उत्तर नाही, असेच येते. कारण कुठलीही गोष्ट ठरवून करणे हे त्यांच्या स्वभावात नाही. पत्रकार परिषदेतील अश्रू हे त्याचे साक्षी आहेत. शिखर बँकेच्या प्रकरणात पवारांचे नाव आल्याने ते आधीपासून अस्वस्थ होते. कुठल्याही बँकेच्या संचालकपदी नसतानाही आपल्या काकांना आपल्यासोबत गोवल्याने ते निराश होते. ही निराशा त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याप्रमाणे आक्रमक होत व्यक्त केली असती तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना हत्तीचे बळ आले असते, पण तसे न करता ते कोशात गेले. आपल्यामुळे काकांना त्रास झाला हे मनाला लावून घेऊन पक्षात कोणालाही न सांगता त्यांनी स्वतःला मुंबईत कोंडून घेतले आणि आपल्या आमदारकीच्या राजीनाम्याची घोषणा केली. विशेष म्हणजे हे करताना आपल्या मुलांना राजकारण सोडून शेती करण्यास सांगितले. हे म्हणजे उद्ध्वस्त धर्मशाळा करून युगांत लोटल्यासारखे मग्न तळ्याकाठी बसण्यासारखे होते. यामुळे पवारांनी ईडी चौकशीच्या निमित्ताने तयार केलेल्या वातावरणावर पाणी फिरले.

अजित पवार यांची हतबलता समोर आली. दुसर्‍या दिवशी पत्रकार परिषदेत त्याचे अश्रू झाले! मात्र वयाच्या 80 व्या वर्षी भाजपचा उधळलेला वारू रोखण्यासाठी घराबाहेर पडलेल्या पवारांना आपल्या घरातून ब्रेक लागला. पण, पवार शांत होते. आपल्या पुतण्याची समजूत काढायला दुपारी पुण्याला गेलेले पवार रात्री मुंबईला आले. त्यांनी संयमाचे धडे पुन्हा एकदा त्यांना दिले. काकांचा जीव आपल्यासाठी कसा तुटतोय हे पाहिल्याने अजितदादांना कॅमेर्‍याच्या समोर आपले अश्रू रोखता आले नाही. यातून ते मोठा धडा शिकतील, अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. कारण लोकशाहीत विरोधी पक्ष टिकणे खूप गरजेचे आहे. सत्तेसाठी आपल्या सोबतचे, आपण मोठे केलेले लोक लाचार होत असताना नेत्यांनी प्रचंड संयमी असावे लागते. शरद पवार यांच्याकडून राजकारणाचे बॅटन हाती घेताना अजितदादांना हा गुण आपल्या ठायी आणावाच लागेल.

- Advertisement -

अजितदादांचे अश्रू एका मनस्वी मनाने समोर येत असताना उदयनराजे भोसले यांच्याही डोळ्यात पाणी आले. पवारांना त्रास म्हणून त्यांनी डोळे पुसले. आधी आपल्या वागण्याने त्रास द्यायचा आणि नंतर आपल्या वडिलांसमान माणसाला दुखावले म्हणून अश्रू ढाळायचे, हा काय प्रकार आहे? याला कोणी मगरीचे अश्रू म्हणाले तर उदयनराजे यांची शर्टाची खाली गेलेली कॉलर वर जाऊन थोडी टाईट होणार आहे. ती आता खालीच गेली आहे. पवारांनी आणखी तुम्हाला काय द्यायचे बाकी ठेवले होते, हे उदयनराजे यांनी आपल्या मनाला विचारले असते तर त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले नसते… खरेतर त्यांचे स्वतःचे एक जग आहे आणि त्या जगाचे ते सम्राट आहेत. या जगात कसे जगायचे, कसे बोलायचे, कसे चालायचे हे त्यांनी ठरवले आहे. त्यांना कोणी रोखू शकत नाही.

पण, लोकशाही म्हणून तुम्ही एका पक्षाचे प्रतिनिधित्व करता, तुम्हाला सातारा सोडून सारे जग बघत असते. याची पर्वा ते करत नसतील तर त्यांना मग खासदारकी कशाला हवी. सातार्‍याच्या गादीचे ते राजे आहेतच की? राष्ट्रवादीत राहूनही त्यांनी पवार आणि इतर नेत्यांना किंमत दिली नाही. बेलगाम वागत त्यांनी आपले तेच खरे केले. हे पवारांना समजत होते, पण त्यांनी दुर्लक्ष केले. त्यांचे हे सत्तेचे गणित असले तरी आपण कोणाबरोबर गुणाकार करत आहोत, याचा आता पवारांना उत्तर मिळाले असेल. आता भाजपने उदयनराजे यांना आपल्या तळ्यावर आणून कमळ हाती दिले असले तरी त्यांचे हदय परिवर्तन होणार नाही. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत आणून त्यांचे प्रशिक्षण वर्ग घेतले तरी काही फरक पडणार नाही.

या सर्व पडझडीत जितेंद्र आव्हाड यांच्या निळ्या डोळ्यात पवारांच्या प्रति आलेले अश्रू एका खर्‍या सोबत्याचे उदाहरण आहे. प्रतिकूल परिस्थितीत आपल्या वागण्या बोलण्यातून त्यांनी आपण पवारांचा मानसपुत्र असल्याचे दाखवून दिले. माझ्या जन्मदात्या बापाचे मी नाव लावत असलो तरी माझा खरा बाप शरद पवार आहेत, हे आव्हाड फक्त बोलून दाखवत नाही तर ते तसे वागतात. पवारांनी सर्व काही भरभरून दिले, पण आता सत्ता बदलली म्हणून माणसे तीन चार दशकांचे संबंध तोडून जातात आणि एका वडीलधार्‍या माणसाला दुःख देतात, याचे त्यांना वाईट वाटते. एवढे होऊनही तो डोंगराएवढा माणूस हलत नाही आणि हात पाय चालत नसताना केवळ इच्छा शक्तीच्या जोरावर आज महाराष्ट्र पिंजून काढत आहे, हे पाहून आव्हाडांचे डोळे भरून येतात. पवारांच्या पुरोगामी राजकारणाची रेषा वाढवणार्‍या या आपल्या नेत्याला सत्तेत असताना राष्ट्रवादीने फार काही दिले नाही, पण आपल्या सर्वोच्च नेत्याला काय हवे आहे, हे आव्हाडांना बरोबर कळते.

या सगळ्या कळण्या न कळण्याच्या प्रवासात विधिमंडळात आणि बाहेर आव्हाडांकडून जास्तीचा अभिनय झालाही असेल आणि याबद्दल त्यांना टीकेचे धनीही व्हावे लागले. पण, ते कधी हलले नाहीत. सत्ता असताना त्यांना फार काही मिळाले नाही, पवारांनी मोठे केलेले संस्थानिक आणखी मोठे होत गेले. प्रसंगी अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी आव्हाड यांना दोन हात दूर ठेवले. त्यांचा राग केला. पण, आज बाकी कुठे आहेत आणि आव्हाडांसाठी पवार ठाण्यात भर उन्हात दोन तास रॅली घेतात, यात सर्व आले आहे. इतिहास, समाजकारण हे विषय आणि सोशल मीडियावरील पकड हे आव्हाड यांचे खास गुण आहेत. आता पवारांना राज्यात असे आणखी आव्हाड तयार करावे लागतील. नगरच्या कर्जतमधून उभे असलेले पवारांचे नातू रोहित पवार यांच्यातही मोठ्या नेत्याचे गुण आहेत. संस्थानिक बनवण्याऐवजी पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते घडवण्यावर पवारांनी भर दिला तर त्यांचा पक्ष टिकेल. मुळात आता सहकार, घराणी यांच्या भोवती राजकारण फिरणार नाही, याची पवारांनी खूणगाठ बांधून ठेवलेली बरी!

पडझडीत विरोधी पक्ष नेत्यांच्या डोळ्यात पाणी आलेले एकवेळ आपण समजू शकतो, पण सत्ताधारी रडू लागतात तेव्हा काही तरी गडबड चालू असल्याचे दिसते. पुण्याच्या आमदार मेधा कुलकर्णी यांना पुन्हा उमेदवारी नाकारल्यानंतर बाईंच्या डोळ्यातील अश्रू आजही थांबण्याचे नाव घेत नाहीत. रडून रडून आणि रडता रडता रात्री डोळ्याला डोळा लागत नसल्याने त्यांचे डोळे सुजले आहेत. पण, अमित शहा आणि चंद्रकांत पाटील यांच्या डोळ्यांची पापणी काही मिटायचे नाव घेत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते, संघटक, विधान परिषदेतील आमदार आणि भाजपच्या राज्यातील दुसर्‍या क्रमांकाचे नेते हा चंद्रकांतदादांचा प्रवास कुठल्याही संघ कार्यकर्त्याला प्रोत्साहित करणारा आहे. पण, दादांसारखे असे कार्यकर्ते तर खूप आहेत, मग तेच का? तर त्यांच्या मागे अमित शहा आहेत. राजकारणात गॉडफादर असला की किती वेगाने पुढे जाता येते हे एक उदाहरण आहे. अन्यथा हासभास नसताना दादा एवढे वेगाने शिड्या चढले कसे? या प्रश्नाचे उत्तर मिळते. कोल्हापूरचे जावई असलेले अमित शहा दादांना खूप वर्षांपासून ओळखतात. मेधाबाईंच्या डोळ्यात पाणी आणून शहा यांना कदाचित महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या जागी चंद्रकांत पाटील यांना मुख्यमंत्रीपदाच्या गादीवर बसवायचे असेल.

विधानसभा निवडणुका फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील, पण नंतर काही महिन्यांनी गादीवर पाटील येऊही शकतात. फडणवीस यांना दिल्लीत बोलावले जाईल. मनोहर पर्रिकर, अनंतकुमार, सुषमा स्वराज, अरुण जेटली यांच्या निधनानंतर प्रशासन चालवणार्‍या सक्षम नेत्यांची मोठी उणीव पंतप्रधान मोदी यांना जाणवत आहे. ती भरून काढण्यासाठी ही पावले उचलली जात आहेत, असे दिसते. विशेष म्हणजे मोदी यांचा फडणवीस यांच्यावर प्रचंड विश्वास असल्याने ते कधीचे त्यांना दिल्लीत नेण्यासाठी आतुर आहेत. पण, महाराष्ट्राची आधी घडी नीट बसवावी लागणार आहे. यासाठी मेधाबाईंसाठी पुण्यातील हजारो ब्राम्हण प्रचंड नाराज झाले तरी भाजपला त्याची पर्वा नाही. गंमत बघा, आपल्या उमेदवाराला तिकीट नाकारले म्हणून आकाश पाताळ एक करणार्‍या आपल्या ब्राम्हण कार्यकर्त्यांना भाजपने जमिनीवर तर आणलेच, पण, मेधाबाईंना हाती माईक देऊन दादा, मी पाठीत खंजीर खुपसणारी नाही, असे त्यांना भरल्या डोळ्यांनी बोलायला लावले आणि दादा यावेळी शांत बसले होते. मेधाताई, याला राजकारण म्हणतात. राजाला वाचवण्यासाठी प्याद्याना मरण पत्करावे लागते. त्यामुळे यापुढे तुम्ही कितीही रडला तरी काही फायदा होणार नाही. प्रथम राष्ट्र, बाद में पक्ष आणि अंत में मैं हे सांगायला आणि लिहायला बरे वाटत असले तरी नेते मोठे होत जातात आणि कार्यकर्ता तेथेच राहतो..

मेधाताई, तुम्हाला अश्रू आवरत नसतील तर आजकाल एकटे पाडण्यात आलेल्या एकनाथ खडसे यांना जाऊन भेटा. दुःख आणि निराशा काय असते हे या माणसाकडे बघून दिसेल. सहन होत नाही आणि सांगता येत नाही, असे त्यांचे हाल झाले आहेत. कोणी घर देता का घर… असं सांगत फिरणार्‍या नटसम्राटासारखी त्यांची हालत झाली आहे. अनुभव, प्रशासनावरील पकड, जातीचे समीकरण याचा विचार झाला असता खडसे हे मुख्यमंत्री व्हायला हवे होते. पण त्यांना डाववले. आपण मोठा केलेला युवा नेता एक नंबरच्या खुर्चीवर बसतो, हे त्यांचे दुःख भाजप सत्तेच्या पहिल्या काही महिन्यांत आल्यानंतर त्यांच्या वागण्या बोलण्यातून दिसले. मात्र, सत्तेपुढे शहाणपण चालत नसते, हे ते मान्य करायला तयार नव्हते. ज्येष्ठत्वाचा आधार घेत मुख्यमंत्र्यांच्या सहाव्या माळ्यावर त्यांनी आपल्याला हवा तसा कारभार करायला सुरुवात केली होती. त्यांचे वयाचे आणि अनुभवाचे मोठेपण मान्य करून त्यांना समजवण्यात आले.

पण, ते सांगण्याच्या पलीकडे गेल्यानंतर त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लावला आणि गेल्या चार वर्षांत त्यांची राजकीय कारकीर्द होत्याची नव्हती करून टाकली. विधानसभेत त्यांची भाषणे म्हणजे अगतिक नटसम्राटाची स्वगते वाटतात आणि आता उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांचे भावनिक आव्हानही शोकांतिका होऊन जाते. जळगाव आणि मुक्ताईनगर परिसरातील आपले संस्थान आणि सून खासदार या सगळ्यावर पाणी सोडून ते भाजपला रामराम करतील असे मुळीच वाटत नाही. तसे जर त्यांना वाटत असते तर त्यांनी कमळ कधीच दूर लोटले असते. पण, ते झुगारणे त्यांना कधी जमले नाही आणि जमणारही नाही. जळगाव सोडून राज्यभर त्यांची तेवढी ताकद होती का ? हा प्रश्न या निमित्ताने उभा राहतो.

आता त्याच कमळाकडे बघत आणि मनातल्या मनात रडत त्यांना उरलेले दिवस काढावे लागणार आहेत. अश्रू खरे असतात, तसे खोटे असतात. ते दिसतात, कधी दिसत नाही. ते घळाघळा डोळ्यातून वाहतात तसेच पाणी न येताही सर्व शरीरभर पसरून जातात. एक वेळ वाटते की माणूस किमान हुंदके देऊन आपल्या भावनांना तो वाट करून देईल. पण, तसे काहीच खडसेंच्या बाबतीत होताना दिसत नाही. आज ते शून्यात नजर लावून बसले आहेत…

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -