चित्रपट हे प्रभावी माध्यम आहे?

चित्रपट हे प्रभावी माध्यम आहे, असं म्हटलं जातं. म्हणजे त्याचा सर्वसामान्य लोकांवर, खरं तर ते पाहणार्‍या सर्वांवरच जबरदस्त पगडा असतो. राजकारण आणि क्रिकेटच्या खालोखाल हाच तर चर्चेचा विषय असतो बहुतेक वेळा. आता तर समाजमाध्यमांमुळे लोक वेगवेगळ्या प्रकारे आपल्या प्रतिक्रिया वा टिप्पणीची नोंद करत असतात. सल्लेही देतात आणि सावधगिरीचा इशाराही. कधी आवडलेल्या चित्रपटाची शिफारस करतात, तर कधी वाट चुकून तिथं गेलात तरी आत जाऊ नका. पस्तावल! असा धोक्याचा इशाराही देतात. अनेक निर्मात्यांना आपण यातून जनतेला काही शिकवण वा संदेश देऊ शकतो असा विश्वास असतो.

पूर्वीच्या काळी, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व आणि त्यानंतरच्या एकदोन दशकांत, तर हे प्रमाण खूपच होतं. सैरंध्री या चित्रपटाद्वारे जुलमी इंग्रज अधिकार्‍यांना मारण्याला काहीच हरकत नाही (जसं भीमानं कीचकाला मारलं), उलट ते देशकार्यच आहे असं सुचवलं होतं. दूर हटो ऐ दुनियावालो हिंदोस्तां हमारा है अशा गाण्यांतूनही स्वातंत्र्यलढ्याला पाठिंबा देण्यात आला होता. काहींमध्ये तरुणांना संदेशही असे जसा शांतारामबापूंनी जीवन हे जगण्यासाठीचा माणूस द्वारे दिला होता. देवदास च्या ( कुदनलाल सैगलचा देवदास) प्रभावाने मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग नैराश्याकडे झुकत आहे आणि नकारात्मक दृष्टीनंच सारं पाहत आहे, हे जाणवल्यानं त्यांनी हे काम प्रभावीपणानं केलं होतं. कुंकू द्वारे लहान मुलींचा विवाह वयस्कर पुरुषांबरोबर करणार्‍या जरठ-बाला विवाह प्रथेवर प्रहार केले होते. साहिरसारख्या कवींनी तर औरतने जनम दिया मर्दोंको, मर्दोंने उन्हे बाजार दिया, जब जी चाहा मसला कुचला, जब जी चाहा धुतकार दिया, किंवा जला दो, जलादो, मेरे सामनेसे हटा दो ये दुनिया असंही निर्वाणीच्या भाषेत सांगितलं होतं.

प्रभातच्याच शेजारी नं हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश दिला होता. नंतरच्या काळात तर अशा प्रकारची दोन धर्मीयांतील मैत्री अगदी जंजीर मध्येही दाखवण्यात आली होती. मनोज कुमारनं साक्षात भारत च बनायचं ठरवल्यामुळं त्याच्या चित्रपटांत तर काही वेळा कंटाळा येईल वा हसू येईल अशा प्रकारची देशभक्ती दाखवण्यात येत असे. अर्थात त्याचं दिग्दर्शनातलं कौशल्य असं की लोकांनी उपदेश फारसा मनावर न घेता त्यातील करमणूकीची मौज अनुभवली. सध्याच्या भाषेत एंजॉय केली. भगतसिंग म्हणजे तर स्वातंत्र्य योद्ध्याचं प्रतीकच. त्याच्यावर अनेक चित्रपट आले. विश्राम बेडेकरांनी शम्मी कपूरला घेऊन भगतसिंग हा चित्रपट काढला होता. चांगला असूनही त्या काळात तो फारसा का चालला नाही, हे हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कोड्यांप्रमाणं एक कोडंच आहे. शम्मी कपूरनं खरं तर मन लावून काम केलं होतं, आणि प्रेमनाथनं साकारलेला चंद्रशेखर आझादही प्रभावी होता. पण असं सांगतात की, दिग्दर्शकाचं निर्मात्याशी बिनसल्यामुळे बेडेकरांना आपल्या मनाप्रमाणे सर्व चित्रपट तयार करता आला नव्हता. तसंही असेल!

मनोज कुमारचा शहीद भगतसिंग मात्र चांगलाच गाजला, प्राणच्या फाशी झालेल्या कैद्याची मोजक्या मिनिटांची भूमिका आजही अनेकांना आठवते. अभिनेत्याचा प्रभाव काय असतो ते पा्रणच्या ए भारतमाता क्या होती है अशा अर्थाच्या प्रश्नाच्या वेळी कळत होतं. पाठोपाठ उपकार आला आणि मनोज कुमारवर भारत हा शिक्काच बसला. त्यातही प्राणनं मलंगबाबाच्या भूमिकेत अशी जान भरली की तोच जास्त ध्यानात राहतो. मनोजची देशभक्ती ही मनोरंजनपूर्ण असायची त्यामुळे लोक कंटाळत नसत. उत्तम गाणी नाच सारं काही असायचं. म्हणूनच पूरब पश्चिम, रोटी कपडा मकान असे चित्रपट चालले. क्रांती मध्ये तर त्यानं साक्षात दिलीप कुमारला आणलं आणि भर म्हणून हेमा मालिनी, शत्रुघ्न सिन्हा इ. त्यामुळे टीकाकारांनी काहीही म्हटलं, तरी चाहत्यांनी ते मनावर न घेता क्रांती ला चांगलं यश दिलं.

दुसरीकडे राज कपूर कॉमन मॅनलाच हीरो बनवून चित्रपट बनवत होता अर्थात त्याची पब्लिक बरोबर अचूक नाळ जुळत होती. असं असलं तरी त्याच्या चित्रपटांना अप्रतिम गाण्यांची जोड असायची. शिवाय नायिकांचं (काही प्रमाणात) वस्त्रहरण करण्याचा त्याचा हव्यास. खरं तर सवयच! नंतरच्या काळात सत्यम शिवम सुंदरम, राम तेरी गंगा मैली अशा चित्रपटांत भरीला भर म्हणून नायिकांची स्नानदृश्य आली. आणि स्नान का कुणी सारे कपडे अंगावर ठेऊन करतं? मग सेन्सॉरचीही पंचाईत व्हायचीच ना! संगम मध्ये त्यानं युद्ध आणि देशप्रेमाची फोडणीही दिली होती. याला अपवाद अर्थात जागते रहो चा. पण त्यामुळंच असेल पहिल्यांदा प्रदर्शित झाला तेव्हा त्याला प्रतिसाद फारसा नव्हता. आता मात्र त्याचं गोडवे सारेजण गातात. अर्थात या यशात शंभू मित्र यांचाही मोठा वाटा आहे, तसा सलील चौधरी यांच्या संगीताचाही.

बी. आर. चोप्रांनी माणूस विरुद्ध यंत्र असा संघर्ष नया दौर मध्ये रंगवला तसा मजदूर मध्येही, मालक-नोकर संघर्ष होता. पण या सर्वांतपेक्षा प्रभावी होता तो कानून. गाणीच नसलेला चित्रपट. तो अनोखा प्रयोगच होता आणि चांगलाच यशस्वी झाला. त्यानंतरही त्यांनी इन्साफ का तराजू मध्ये कोर्ट रूम ड्रामा आणला होता. पण एका भगतसिंगचा अपवाद सोडला तर शम्मी कपूरनं नंतर केवळ करमणूक प्रधान (सौजन्य नाझीर हुसेन) चित्रपटांवरच भर दिला. जीतेंद्र त्याचीच गादी आणि परंपरा पुढं चालवत होता. (सौजन्य दाक्षिणात्य दिग्दर्शक). अपवाद म्हणून कदाचित धरती कहे पुकारके चं नाव घेता येईल. पण आता अशा निव्वळ मनोरंजनासाठी तयार करण्यात आलेल्या, (काहीजण कुचकटपणं गल्लाभरू म्हणतील), चित्रपटांमधून कसला प्रचार वा शिकवण अशी अपेक्षा ठेवणंही चूकच.

पण असं समजण्यातच आपण चूक करतो, हे अचानक उमगलं होतं. जानवर (शम्मी कपूर राजश्री) या चित्रपटानंतरची गोष्ट एका केशकर्तनालयात अचानक त्या कारागिराचं एकाशी चाललेलं संभाषण ऐकण्याचा योग आला. कसेल हे नवे चित्रपट, अगदी बेकार, नुसता धांगडधिंगा असं त्याचा मित्र म्हणाला त्यावर तो कारागीर उसळून म्हणाला, अरे त्यात तर मोठी शिकवण आहे, आजच्या पिढीला. बघ ना पृथ्वीराज कपूर कसं सांगतो मुलाला-अर्थात शम्मी कपूरला- की बाबारे नीट वाग इ.इ. नक्की काय ते आता ध्यानात नाही, कारण त्याच्य मोठी शिकवण या बोलांनीच भान हरपलं होतं! खरं तर जानवर म्हटलं की लोकांना लाल छडी मैदान खडी हे गाणं आठवतं (आणि गाण्याच्या शेच्वटी शम्मी राजश्रीच्या ओढणीवर छडी फेकून ती जमिनीत रुतवतो. राजश्री अर्थातच जागीच थांबते. तेव्हा पिटातून आरोळी आली होती, छोड मत सालीको! ) पण प्रत्येक चित्रपटातून शिकवण शोधणार्‍या त्या कारागिराची गोष्टच वेगळी!

-आ. श्री. केतकर