घरफिचर्सजगण्याचा संदेश देणारा ः माणूस

जगण्याचा संदेश देणारा ः माणूस

Subscribe

गणपत नावाच्या एका साध्यासुध्या प्रामाणिक पोलिसाची ही कथा आहे. तो त्याच्याच दिवसभराच्या वेळापत्रकात व्यस्त असतो. गस्त घालत असताना मैना नावाच्या वेश्येशी त्याची अचानक भेट होते. त्याला ती आवडलेली असते. त्यामुळे नंतर एकदा पोलिसांची धाड वेश्यावस्तीवर पडते, तेव्हा तो तिला त्यांच्या तावडीतून वाचवतो. तिचे आयुष्य मात्र आधीप्रमाणेच सुरू असते. तिच्या गाण्यासाठी तिच्याकडे येणार्‍यांची रीघ असते. तीही त्यांचे मनोरंजन करते. गणपत आणि मैना आता वारंवार भेटायला लागतात.

जीवन हे जगण्यासाठी, हा संदेश देणारा प्रभातचा हा चित्रपट. जवळपास ऐंशी वर्षांपूर्वीचा-1939 सालचा. तरीही कालबाह्य न वाटता तो चांगलाच वाटतो. अगदी सहजपणे उगाच लहानसहान कारणावरून जीव देण्याचे आजचे वाढलेले प्रमाण पाहता, या चित्रपटाचे महत्त्व आणखीच वाटते. खरे तर बंगाली चित्रपटांतील प्रेमभंग झाल्याने देवदासचा आदर्श ठेवून मद्याच्या आहारी जाऊन जीवनाची नासाडी करणार्‍या तत्कालीन पिढीला, उगाच मोलाचा जीव कशाला वाया घालवता, त्यापेक्षा प्रेमभंग, दारू सारेकाही विसरून, नव्या जोमाने जगायला सुरुवात करा. कारण जीवन हे जगण्यासाठीच आहे असा संदेश देणारा हा चित्रपट. प्रभातच्या बर्‍याच चित्रपटांमध्ये काही ना काही शिकवण असायची पण ती जाणून बुजून दिल्यासारखी वाटू नये, यासाठी करमणुकीकडे दुर्लक्ष होणार नाही, ही काळजी घेतल्यामुळे ती शर्करावगुंठित कडू गोळीसारखीच परिणामकारक असायची.

गणपत नावाच्या एका साध्यासुध्या प्रामाणिक पोलिसाची ही कथा आहे. तो त्याच्याच दिवसभराच्या वेळापत्रकात व्यस्त असतो. गस्त घालत असताना मैना नावाच्या वेश्येशी त्याची अचानक भेट होते. त्याला ती आवडलेली असते. त्यामुळे नंतर एकदा पोलिसांची धाड वेश्यावस्तीवर पडते, तेव्हा तो तिला त्यांच्या तावडीतून वाचवतो. तिचे आयुष्य मात्र आधीप्रमाणेच सुरू असते. तिच्या गाण्यासाठी तिच्याकडे येणार्‍यांची रीघ असते. तीही त्यांचे मनोरंजन करते. गणपत आणि मैना आता वारंवार भेटायला लागतात. काही भेटींनंतर हळूहळू तो तिच्या प्रेमात पडतो आणि तिला त्या वस्तीतून बाहेर काढून योग्य मार्गावर आणायचा प्रयत्न करतो. तिला चांगल्या प्रकारे राहाता यावे, आणि त्यामुळे तिला नव्याने आयुष्याला सुरुवात करून समाजात मानाने जगता यावे, अशी त्याची इच्छा असते.

- Advertisement -

त्यासाठी तो एका चाळीत जागा घेतो आणि तिला तेथे राहायला सांगतो. तो तेथे येऊन जाऊन असतो. चाळकर्‍यांना एकीकडे तिचे येणे आवडत नाही आणि दुसरीकडे तिच्याबाबतचे कुतूहल स्वस्थ बसू देत नाही. या ना त्या कारणाने ते तिच्याकडे येतात किंवा बाहेरूनच डोकावतात. चाळीतल्या बायका तिचा रागराग करतात आणि तिच्याकडे मुलांनीही जाऊ नये, याची काळजी घेतात. कारण मुलांना आणायच्या निमित्ताने मोठे तिच्याकडे जातील, ही भीती त्यांना वाटते. मैनालाही आता गणपत आकर्षण वाटू लागलेले असते. मन्नू नावाचा हॉटेलचा चहा आणणारा मुलगा हा तिच्या विश्वासातला असतो आणि ती तिचा व्यवसाय करत असल्यापासूनच तिला शक्य होईल ती मदत करत असतो.

चाळीतील लोकांपासून सुटका करून घ्यायचा मार्ग म्हणून गणपत तिच्याशी लग्न करायचे ठरवतो आणि त्यासाठी तिला आपल्या आईला भेटण्यासाठी घेऊन येतो. आईलाही मैना आवडते. एकट्या मुलाबरोबर राहणारी ही आई देवभक्त असते आणि पूजा, पोथीवाचन यातच वेळ घालवत असते. त्यामुळेच गणपतला मैनाबरोबर लग्नाची परवानगी देण्याकरता ती देवाला कौल लावते. पण बरीच वाट पाहून कौल मिळत नाही. गणपत फुंकरीने फूल पाडण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्यालाही यश येत नाही. आईला याचा पत्ताच नसतो.

- Advertisement -

आई मोठ्या मायेने मैनाला जवळ घेऊन झोपी जाते. पण मैनाचाही देवावर विश्वास असल्याने आपण गणपतच्या आईची फसवणूक तर करत नाही ना, या शंकेने ती अस्वस्थ होते. मन खात असल्याने निराश झालेली मैना तेथून निघून जाते. गणपत तिचा पाठलाग करतो. ते दोघे तिच्या जुन्या घरापर्यंत जातात. तेथे लहानपणी तिचा सांभाळ करणारा दुष्ट काका राहात असतो आणि त्याला दारूच्या व्यसनासाठी केवळ तिचा पैसाच हवा असतो. मैना त्याला कंटाळते आणि गणपत आणि ती दुसरीकडे जाण्यासाठी निघतात. काका तिचा पाठलाग करतो, पण त्यांना गाठू शकत नाही.

वाटेत एका ठिकाणी त्यांना चित्रपटातील गाण्याचे चित्रीकरण होत असल्याचे दिसते. ते पाहून तेही त्याची नक्कल करायचा प्रयत्न करतात. टिंगलही करतात आणि हसत बसतात. पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकत नाही आणि मैना आणि गणपत आपापल्या घरी परततात, मैनाचा दुष्ट काका मात्र दारूसाठी तिला सतत पैशाची मागणी करून हैराण करत राहातो. मैना दुरावल्याने निराश झालेला गणपत आत्महत्या करायला निघतो. पण त्याच्यावर नितांत प्रेम करणारा सहकारी त्याचा पाठलाग करून त्याला थोपवतो आणि जोरात खडसावतोः अरे तुझ्या बापाने एवढ्या खस्ता खाऊन तुला शिकवलं, ते काय प्रेम नव्हतं, तुझ्या आईनं तुला खस्ता खात वाढवलं, अजूनही ती तुझी काळजी घेते, ते काय प्रेम नाही? पण त्याची तुला जाणीव नाही आणि आता या प्रेमाच्या नादात स्वतःला वाया का घालवतोस? अरे प्रेम हे क्षणभंगूर असते इ. इ.

मग मित्र गणपतला तो परत घेऊन जात असतानाच त्यांना मैनाचा काका हातघाईला येऊन तिच्याकडून पैसे खेचून घ्यायचा प्रयत्न करतो. ती आता हे सारे सहन करण्याच्या पलीकडे गेलेली असते. त्यामुळे ती त्याला प्रतिकार करते. त्यांच्या त्या झटापटीमध्ये, त्याला प्रतिकार करताना मैनाने ढकलल्याने तोल जाऊन तो पडतो आणि मैना त्याच्या डोक्यावर धोंडा मारते. तो मरतो. गणपतने हे सारे पाहिलेले असते. पण तो गप्प राहातो. मैना निसटून जाण्याचा प्रयत्न करते. खुन्याचा तपास जोमाने सुरू होतो. गणपतही त्यात त्याची इच्छा नसली तरी सहभागी होतो. त्याला मैना भेटते. तो तिला पळून जायला सांगतो पण ती ऐकत नाही. योगायोगाने मैना त्याच्याबरोबर असतानाच इतर पोलीस तिला अटक करण्यासाठी येतात. तेव्हाही गणपत तिला निसटून जायची संधी देत असतो, पण ती त्याची मदत नाकारून पोलिसांच्या स्वाधीन होते. इन्स्पेक्टर गणपतला शाबासकी देतो.

तुरुंगातही गणपत तिला भटतो आणि ताबडतोब येथून जा असे तिला सांगून, कोठडीच्या किल्ल्या देतो. पण ती मी असं करणार नाही, मी तुझ्या सचोटीवर प्रेम केलंय, त्याला बाधा येईल असं काही मी करणार नाही, असं सांगून त्याला नकार देते. गणपत निराश होऊन तेथून जातो. नंतर खुनीला पकडल्याबद्दल त्याला बढती मिळून तो परेडचे नेतृत्वही करतो, येथे चित्रपट संपतो.

दिग्दर्शक शांतारामबापूंना मैनाची भूमिका शांता आपटेला देण्याची इच्छा होती. प्रत्यक्षात मात्र ती भूमिका शांता हुबळीकर यांना मिळाली आणि त्यांनी ती एवढी चांगली केली की, मैना हीच त्यांची ओळख बनली. आता कशाला उद्याची बात, या मराठी बरोबरच तामिळ, तेलुगु, बंगाली, गुजराथी आणि पंजाबी भाषांतील गाण्यात त्यांचे गायनाचे कौशल्यही दिसले. त्यांच्या लुटुया प्रेमाचा बाजार, हे गाणेही रसिकांना आवडले. मैनेच्या स्वभावाच्या छटा त्यांनी उत्कटपणे दाखवल्या आहेत. गणपतच्या भूमिकेसाठी त्यांच्या मनात वसंत देसाई (ज्यांनी नंतरच्या काळात संगीतकार म्हणून कीर्ती मिळवली) यांना घ्यायचे होते. (संत ज्ञानेश्वरमध्ये देसाईंनी गाडीवानाची छोटी भूमिका केली होती.) पण ऑडिशनमध्ये देसाई यशस्वी न झाल्याने ती भूमिका नवोदित शाहू मोडक यांना देण्यात आली.

शाहू मोडक यांनी बाल-कलाकार म्हणून शांता आपटे यांच्याबरोबर श्यामसुंदर या चित्रपटात त्यांनी लहान कृष्णाचे काम केले होते. नंतरच्या काळातही त्यांनी अनेकदा कृष्ण रंगवला, एवढा की, शाहू मोडक म्हणजे कृष्ण, हे समीकरणच झाले. ते मनात पक्के असलेल्या रसिकांना या चित्रपटातील पोलिसच्या भूमिकेत शाहू मोडक यांना पाहताना आश्चर्याचा धक्काच बसेल. नायकाच्या भूमिकेतला हा त्यांचा पहिलाच चित्रपट पण त्यांनी त्या भूमिकेला न्याय दिला. गणपतचा साधा स्वभाव, त्याचे भाबडेपण, मैनेवरील प्रेम, आईवरील माया आणि वरिष्ठ इन्स्पेक्टरला आदर देण्याची सवय त्यांनी छान दाखवली आहे. त्यांचे नवखेपण कुठेही जाणवत नाही.

छोट्या शामाची भूमिका मंजूने केली आहे. तिचा खट्याळपणा आणि गणपतला सतावण्याची खोड तिने अगदी सहजपणे छान दाखवली आहे. इन्स्पेक्टरच्या भूमिकेत गणपतराव तांबट आहेत. आईची भूमिका सुंदराबाई यांनी केली आहे, तिचा भोळेपणा, भक्तिभाव तर त्यांनी प्रकट केला आहेच पण अभंग गाण्यातील कौशल्यही दाखवले आहे. इतके की, त्यांच्या मन पापी भूला कौन इसे समझाये, हे गाणे चांगलेच गाजले होते. बाल कलाकार म्हणून हॉटेलच्या पोर्‍याच्या- मन्नूच्या भूमिकेत राम मराठे यांनी मजा आणली आहे. त्यांचे गुलजार नार ही न्यारी, हे गाणे आहे. गौरी (संत तुकाराममधली आवली), बुधासाहेब, मानाजीराव आणि राजा परांजपे इ. कलाकारांनीही आपापल्या छोट्या भूमिका नेटकेपणे केल्या आहेत. मास्टर कृष्णा-कृष्णराव फुलंब्रीकर यांचे संगीत गाजले ते त्यातील वैविध्यामुळे.

अशा या माणूसची कथा होती ए. भास्करराव यांची, पटकथा संचद आणि गीते प्रख्यात लेखक अनंत काणेकर यांची होती. या चित्रपटाने शांतारामबाूंना ख्याती मिळवून दिली आणि नंतरही त्यांनी अनेक चित्रपट दिग्दर्शित केले. कला दिग्दर्शक एस. फत्तेलाल यांचा मुद्दाम उल्लेख करायला हवा. त्यांचे मुंबईच्या लाल बत्ती भागाचे (रेड लाइट एरियाचे) सेट एवढे प्रभावी होते की श्याम बेनेगल यांनी माणूस पाहिल्यानंतर म्हटले होते की, हे चित्रण स्टुडिओमध्ये झाले आहे, यावर विश्वासच बसत नाही! अशोक कुमार आणि देविका राणी यांच्या मैं बनका पंछी, या गाण्याचे विडंबनही छान रंगले आहे. त्याकाळी गाणी कशी चित्रित केली जात, संगीतकार आपापली वाद्ये घेऊन कलाकारांमागे कसे जात, हे त्यात पाहायला मिळते. चित्रपटाचा गंभीरपणा त्यामुळे थोडा कमी होतो.

अशा या परिणामकारक चित्रपटाला रसिकांची आणि समीक्षकांचीही पसंती मिळाली, यात काही नवल नव्हते. अगदी फिल्म इंडियाच्या बाबूराव पटेलांनीही त्याचे कौतुक केले होते. इतकेच काय पण साक्षात चार्ली चॅप्लिननेही या चित्रपटाची वाखाणणी केली होती. प्रभातने त्यांच्या प्रथेनुसार माणूस हा चित्रपट हिंदीमध्येही आदमी या नावाने आणला होता, त्यात फरक एवढाच की मराठीपेक्षा त्यात दोन गाणी जास्त होती.

– आ. श्री. केतकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -