घरफिचर्सआधुनिक मुंबईचे शिल्पकार

आधुनिक मुंबईचे शिल्पकार

Subscribe

देशाच्या सर्वांगीण विकासामध्ये मुंबई ही आर्थिक राजधानी म्हणून केंद्रवर्ती भूमिका निभावत आहे याबद्दल कोणालाही शंका नाही. अशा वेळी मुंबईच्या विकासाचे आद्य शिल्पकार ना. जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेट यांच्या कार्याची आठवण आल्यावाचून राहत नाही. नानांचे आयुष्य अवघे ६२ वर्षांचे. १० फेब्रुवारी १८०३ ते ३१ जुलै १८६५. त्यांचा जन्म दैवज्ञ समाजातल्या पिढीजात श्रीमंत मुर्कुटे घराण्यात झाला. सचोटीने व्यापार करून मोठा धनसंचय करावा व त्याचा उपयोग परोपकारासाठी करावा हे या कुटुंबाचे अनेक पिढय़ांचे तत्त्व होते व त्यामुळे त्यांना सर्वत्र प्रतिष्ठा होती. 

नानांचे वडील शंकरशेटजी ईस्ट इंडिया कंपनी व इंग्रजांचेही सावकार होते. सन १८०० मध्ये त्यांची एकूण संपत्ती १८ लाख रुपयांच्या घरात होती. नानांचे मातृछत्र लहानपणीच हरपल्यावर शंकरशेटजींनीच त्यांचे संगोपन केले. नानांचे उत्तम शिक्षण व्हावे यासाठी विद्वानांकडून तत्कालीन भारतीय पारंपरिक शिक्षण व नावाजलेल्या इंग्रजी शिक्षकांकडून आधुनिक इंग्रजी शिक्षणाची घरीच सोय केली. नानांची बुद्धी अत्यंत कुशाग्र होती. त्यांचे भाषांवरचे प्रभुत्व दांडगे होते. ते संस्कृतमध्ये आणि इंग्रजीत अस्खलित संभाषण करीत व लिहीत असत. शंकरशेटजींच्या निधनानंतर वयाच्या एकोणिसाव्या वर्षी कारभाराची संपूर्ण जबाबदारी नानांच्या खांद्यावर येऊन पडली, जी त्यांनी अत्यंत समर्थपणे पेलली. शंकरशेटजींचे अत्यंत जवळचे मित्र जमशेदजी जीजीभाई व त्यांचे दोन्ही मुलगे यांच्याबरोबर नानांचे आयुष्यभर जिव्हाळ्याचे संबंध राहिले. त्यांच्या सहकार्याने नानांनी अनेक संस्थांची उभारणी केली आणि महत्त्वाकांक्षी उपक्रम यशस्वी करून दाखवले.
नाना व त्यांचे समकालीन सहकारी यांनी मुंबईच्या विकासासाठी केलेल्या कार्यामुळे १९व्या शतकाच्या सुरुवातीला मुख्यत्वे सात बेटांची मुंबई, पुढील काही वर्षांत देशातील एक अव्वल शहर आणि जगातल्या सर्वात महत्त्वाच्या महानगरांपैकी एक बनली. मुंबईच्या या अल्पावधीतल्या रूपांतरणाचे जे शिल्पकार होते, त्यात ना. जगन्नाथ शंकरशेट हे अग्रगण्य होते. मुंबई म्हटली की सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर शहराच्या तीन मुख्य प्राणवाहिन्या उभ्या राहतात – दर दिवशी जवळपास ५० लाख प्रवाशांची ने-आण करणारी रेल्वे, एक कोटी २० लाख मुंबईकरांना दैनंदिन नागरी सुविधा पुरवणारी महानगरपालिका आणि प्रचंड प्रमाणात मालवाहतूक हाताळणारे मुंबई बंदर. याचबरोबर तलावांद्वारे पाणीपुरवठय़ाची यंत्रणा, सुसज्ज सार्वजनिक रुग्णालये आणि आरोग्य यंत्रणा, रस्त्यांवरचे  दिवे, फोर्ट भागातील दिमाखदार इमारती, राजाबाई टॉवर आणि मुंबई विद्यापीठ, एल्फिन्स्टन महाविद्यालय, ग्रँट मेडिकल महाविद्यालय, नायर महाविद्यालय, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, डेव्हिड ससून लायब्ररी, एशियाटिक सोसायटी, म्युझियम, राणीचा बाग या सर्व संस्था १५० वर्षे मुंबईचा अविभाज्य भाग बनून राहिल्या आहेत. मुंबईची लोकसंख्या गेल्या दोनशे वर्षांत अनेक पटींनी वाढली असली तरीही दीडशे वर्षांपूर्वी कार्यारंभ केलेल्या या संस्थांनीही आपले कार्यक्षेत्र वाढत्या लोकसंख्येच्या प्रतिसादात यशस्वीपणे वाढवत नेले आहे. वरील सर्वच संस्था व यंत्रणा नानांच्या अथक कार्यातून उभ्या राहिल्या.
जमशेदजी जीजीभाई थोरले व धाकटे, फ्रामजी कावसजी, बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग, डॉ. भाऊ दाजी लाड व दादाभाई नौरोजी यांच्यासह मुंबईची उभारणी करण्यात नानांनी त्यांचे आयुष्य खर्ची घातले.१८१९ मध्ये माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन संपूर्ण मुंबई इलाख्याचा गव्हर्नर झाला. दरबार व मेजवान्यांच्या निमित्ताने त्याची व नानांची गाठ पडली. एल्फिन्स्टनने मुंबई इलाख्यात आधुनिक शिक्षणाचे पर्व सुरू करण्याचा ठाम निर्धार केला होता. नानांची बुद्धिमत्ता व प्रगल्भता यामुळे एल्फिन्स्टनने त्याच्या प्रयत्नांमध्ये नानांना महत्त्वाचे स्थान दिले. मातृभाषेतून शिक्षण दिले जावे याबद्दल एल्फिन्स्टनप्रमाणेच नानाही आग्रही होते. त्यांच्यामुळे मराठी, गुजराती व हिंदी भाषांमध्ये व देवनागरीत प्रथमच क्रमिक पाठय़पुस्तके छापली गेली. परिणामी, आधुनिक शिक्षणाची दारे सर्वाना खुली झाली. १८२७ मध्ये एल्फिन्स्टन इंग्लंडला परत जाण्यासाठी निघाला तेव्हा त्याच्या सत्कारासाठी जो निधी गोळा केला गेला, त्यातून एल्फिन्स्टन कॉलेज व शिक्षण संस्था कार्य करू लागल्या. याच एल्फिन्स्टन महाविद्यालयामधून दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती रानडे यासारख्या बुद्धिमंतांची पहिली पिढी तयार झाली; ज्यांनी भारतीयांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -