घरफिचर्सभूकबळी की कोरोनाबळी?

भूकबळी की कोरोनाबळी?

Subscribe

संयुक्त राष्ट्र अर्थात United Nations चा The State of Food Security and Nutrition in the World 2020 हा अहवाल नुकताच प्रकाशित झाला. कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत जगभरात मोठ्या प्रमाणावर भूकबळी आणि गरिबी वाढू लागली आहे. त्यामुळे २०२० या एका वर्षातच जगभरात ८.३ ते १३.२ कोटी लोकं अल्पपोषित किंवा कुपोषित राहण्याचा अंदाज आहे. हे वाचायला फक्त आकडे असले, तरी याचा अर्थ इतक्या मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता वाढणार आहे. कोरोनामुळे जगभरात झालेल्या आणि होणार्‍या मृत्यूंपेक्षा हा आकडा १०० हून जास्त पटींना मोठा आहे! त्यामुळे लॉकडाऊनमध्ये घरात बसून राहणं आणि उद्योगधंदे बंद ठेवणं यामुळे किती नुकसान होऊ शकतं, याचं भीषण वास्तवच या आकडेवारीनं समोर आणलं आहे. या परिस्थितीत बाहेर पडलो तर कोरोनामुळे कदाचित बाधित होऊ; पण घरात बसून राहिलो तर उपासमारीने हमखास गाळात जाऊ, या निर्णयाप्रत लोकं आले आहेत.

‘आपली तयारी आहे कोरोनासोबत जगण्याची; पण कोरोनाची तयारी आहे का आपल्याला त्याच्यासोबत जगू द्यायची?’ खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं हे वाक्य! कोरोनाच्या काळात त्यांनी लोकांना उद्देशून जी काही फेसबुक लाईव्ह केली, त्यातल्या एका लाईव्हमधला हा सर्वात चर्चेत राहिलेला डायलॉग! चर्चेत यासाठी कारण या डायलॉगवरून प्रचंड मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले. कोरोनाशी संबंधित इतर सर्व मुद्यांवर ज्या प्रमाणे विनोद झाले, त्याचप्रमाणे याही गोष्टीवर विनोद झाले. गेल्या ६ महिन्यांपासून कोरोना देशात ठाण मांडून बसला आहे. जसे कोणत्याही नव्या सरकारसाठी पहिले ६ महिने हनिमून पिरियड म्हटले जातात, तसेच पहिले तीन महिने जणू काही कोरोनासाठीही आणि लोकांसाठीही हनिमून पिरियडसारखेच गेले. चेष्टा, मस्करी, विनोद, टाईमपास, लॉकडाऊन, वर्क फ्रॉम होमची मजा, वेगवेगळ्या रेसिपी, नवनवे प्रयोग, व्हिडिओ कॉलिंगला आलेला ऊत, झूमवरचे बक्कळ इंटरव्ह्यू-मीटिंगा असं सगळं काही या पहिल्या तीन महिन्यात अगदी धमाल आणि नेहमीच्या लाईफस्टाईलमध्ये काहीतरी वेगळं म्हणून लोकांनी एन्जॉयदेखील केलं.

- Advertisement -

पण पहिल्या तीन महिन्यातला हनिमून आता ओसरला असून खरा भीषण कोरोना समोर आला आहे. पण आपल्याला त्याच्यासोबत जगू द्यायची तयारी नसलेल्या कोरोनाची बखोटी धरून त्याच्या मानगुटावर बसून, प्रसंगी गळ्यात गळे घालून लोकांनी त्याला अंगवळणी पाडून घेतला. कोरोनापासून बचाव करण्यासाठी नाका-तोंडाला हात लावायचा नाही इथपर्यंत ठीक होतं; पण सकाळ-दुपार-रात्र असं दिवसातून तीन वेळ हाता-तोंडाची गाठ घालण्यासाठी लोकांपुढे कोरोनाला शिंगावर घेण्याशिवाय पर्यायच उरला नाही आणि त्यांनी ते घेतलंही!

कोरोनाचं मोठं विलक्षण चित्र सध्या देशात आणि महाराष्ट्रात दिसतंय. जेव्हा इथे दिवसाला तीन अंकी रुग्ण सापडायचे, तेव्हा सगळी जनता घरात कुलूपबंद करून ठेवल्यासारखी मारून मुटकून कोंडून ठेवली. आता दिवसाला चार अंकी रुग्ण सापडतायत आणि तीन अंकी रुग्णांचा मृत्यू देखील होतोय; पण आता मात्र अनलॉक आणि मिशन बिगीन अगेन म्हणत गाड्या, बायका, माणसं, पोरं-टोरं, विमान असं सगळं बाहेर पडलंय. नव्हे, सरकारला ते पाडावं लागलंय. सुरुवातीच्या तीन महिन्यांत लोकांना घरात बसा म्हणून विनवावं लागत होतं, ते शारीरिक आरोग्यासाठी. आता लोकांना आपली काळजी घेऊन घराबाहेर पडण्याचं आवाहन करावं लागतंय, ते आर्थिक आरोग्यासाठी. अनलॉक १.० किंवा मिशन बिगीन अगेनची ऑफिशियल घोषणा होण्याआधीच जनमानसाचा निर्धार झाला होता. त्यांच्यासाठी मिशन बिगीन अगेन केव्हाच सुरू झालं होतं. त्यामुळे जिवावर उदार होऊन त्यांनी आपापल्या घरांचे उंबरे ओलांडले होते.

- Advertisement -

आज बाहेर फिरणार्‍या कोणत्याही व्यक्तीला विचारलं की तुम्ही बाहेर का फिरत आहात, तर त्याच्याकडून काही ठराविक आणि कॉमन अशी उत्तरं मिळतील. पहिलं म्हणजे ‘काही पर्याय आहे का?’, दुसरं ‘घरात किती दिवस बसून राहणार? शेवटी कुठेतरी सुरु करावंच लागेल ना?’ आणि आताशा सुरू झालेलं तिसरं उत्तर म्हणजे ‘आता बाहेर पडावंच लागेल, बघू काय होतंय ते’! लोकांनी कोरोनाला आता शिंगावर घेतलंय. तोंडाला मास्क लावून का होईना, दिवसातून शंभर वेळा हातावर सॅनिटायझर लावून का होईना, घरात आल्यानंतर वस्तूंना सॅनिटायझरने आणि स्वत:ला गरम पाण्याने आंघोळीचे सोपस्कार पार पाडून का होईना; पण लोकांनी आता कोरोनाचं मानगुट पकडून कामधंदा सुरू केला आहे. शेवटी माणूस कितीही पैसेवाला असला किंवा कितीही गरीब असला, तरी त्यानं कामकाज सुरू करणं हे इतरांसाठीही आवश्यक असतंच.

आपल्या आर्थिक संरचनेत सगळेच इतके परस्परावलंबी झालेत की यातला एक कुठला घटक गायब झाला, की त्याचा परिणाम दुसर्‍याच्या आयुष्यावर व्हायला लागतो. श्रीमंत माणूस सगळं बंद करून घरात बसला की त्याच्या उद्योगावर अवलंबून असणार्‍या गरीब आणि मध्यमवर्गीयांवर संकट येतं. आणि कामगार वर्ग घरी बसला की त्यांच्यावर अवलंबून असलेला मालक वर्ग संकटात येतो. त्यामुळे या प्रत्येक घटकाला घराबाहेर पडणं त्यांच्या स्वत:साठीही आणि व्यापक आर्थिक-सामाजिक हितासाठीही गरजेचं होतं.

हल्ली कोरोनाची लस असं कुठेही ऐकलं, वाचलं किंवा पाहिलं की झाडून सगळ्यांचे डोळे, कान (आणि काहींचं नाकही! बातमीचा वास असणारे!) लगेच टवकारले जातात. सगळ्यांनाच त्याची प्रतीक्षा आहे. पण जगभरातल्या ७० हून जास्त संस्था कोरोनाच्या लसीचा मागोवा घेत असताना कुणालाही लस यशस्वीरित्या बनवण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण करता आलेली नाही. अनेक तज्ज्ञांनी असं स्पष्टपणे सांगून टाकलं आहे की २०२१च्या आधी कोरोनाची लस येण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे अनेकांनी २०२० हे वर्ष आयुष्यात ब्लॅक इयर म्हणून जाहीर देखील करून टाकलं आहे; पण म्हणून कोरोनाच्या लसीच्या प्रतिक्षेत घरात बसून राहणं परवडणारं नाही. त्यामुळे लस येईल तेव्हा येईल; पण आपण कामाला लागा, होईल ते होईल, अशा मानसिक स्थितीपर्यंत सर्व येऊन पोहोचले आहेत.

लोकांचे जीव घेणार्‍या आजारावर संशोधन असलेल्या लसीची प्रतीक्षा जरी सगळ्यांना असली, तरी त्यासाठी कुणी हवालदील झाल्याचं चित्र अजून तरी दिसत नाहीये. लोकांनी आता परिस्थिती स्वीकारली आहे. जे आहे ते असं आहे आणि यातूनच मार्ग काढायचा आहे याची व्यापक जाणीव कोणत्याही सामाजिक जनजागृतीशिवाय किंवा कुणीही सांगितल्याविना आपोआप उत्स्फूर्तपणे आली आहे. त्या अर्थाने गरीब, श्रीमंत, मध्यमवर्गीय, रोजंदारीवरचे, एसी ऑफिसातले, सरकारी नोकरीतले, खासगी कंपन्यांत घाण्याला जुंपलेले असे सगळेच कोरोनानं एकाच रांगेत आणून बसवले आहेत. सगळ्यांना लागण होण्याची सारखीच शक्यता. सरकारी आणि खासगी रुग्णालयांमधले बेड्स आता सरकारी ताब्यात असल्यामुळे सगळ्यांवर उपचार होण्याचीही सारखीच शक्यता (खासगी रुग्णालयांमधले लाखोंच्या बिलांचे २० टक्के बेड्स वगळता!). आणि मृत्यूचं म्हणाल तर ते पूर्णपणे आपल्या प्रतिकारशक्तीवर अवलंबून! ज्या देशातली लस यशस्वी होईल, त्या देशातल्या नागरिकांना प्राधान्याने ती मिळणार. त्या गणितानुसार २०२१च्या सुरुवातीला जरी लस आली, तरी ती शेवटच्या माणसापर्यंत पोहोचायला अख्खं २०२१ हे वर्ष जायचीच शक्यता जास्त. त्यामुळे जी गोष्ट पुढच्या वर्षभरात आपल्या आसपासही फिरकण्याची शक्यता नाही, अशा गोष्टीच्या भरवशावर आपलं सगळंच सोडून देणं म्हणजे आपणच आपला नाश करून घेण्यासारखं आहे. अशा परिस्थितीत कोरोनाच्या आधी उपासमारीनेच जीव जाण्याचा धोका जास्त आहे!

शेवटी आपण कोरोनासोबत जगायला तयार झालो काय किंवा कोरोना आपल्यासोबत जगायला तयार झाला काय, यात फायदा किंवा नुकसान कोरोनाचं काहीच होणार नाही. जे होणार ते आपलं होणार! घराबाहेर पडलेली सगळीच लोकं काही नियम मोडायला किंवा घरात कंटाळा आला म्हणून किंवा फिरायला म्हणून बाहेर पडलेली नाहीत. काही अपवाद असतीलही; पण व्यापक अर्थाने विचार केला, तर यातल्या बहुतेकांना हाता-तोंडाची गाठ घालण्यासाठी बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. जिथे ८-१० लोकांचा मृत्यू झाला तरी गहजब होऊन वृत्त-प्रसारमाध्यमांमध्ये मोठमोठाले मथळे व्हायचे, तिथे दिवसाला शेकडो लोकांचे मृत्यू होऊनही फक्त वाढलेल्या ‘काऊंट’मध्ये त्याची गणना होतेय. मात्र, अशा परिस्थितीतही जेव्हा कुणी काम-धंदा सुरू करतो, तेव्हा या सर्व भीतीच्या पलीकडे असणार्‍या गोष्टी घडू लागल्या आहेत हे समजून जावं!

Pravin Wadnerehttps://www.mymahanagar.com/author/pravin/
समाजाशी बांधिलकी, बदल घडवण्याची प्रामाणिक इच्छा, त्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी आणि त्याच तयारीचा एक भाग म्हणून माध्यमांमध्ये प्रवेश. लेखनाची आवड, त्यासाठी वाचनाची निवड. सोबतीला फोटोग्राफीचा छंद, जगण्यासाठी अजून काय पाहिजे?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -